Wednesday, May 22, 2019

स्मरण गणेशाचे



चंगळवादी संस्कृतीचा वाढता प्रसार रोखणे आवश्‍यक आहे. नाही तर आपली संस्कृती आपणास शोधूनही सापडणे शक्‍य होणार नाही. यासाठी आता भारतीय संस्कृतीच्या जतनाचा श्री गणेशा करायला हवा. एक चळवळ उभी करायला हवी. चंगळवादी संस्कृतीमुळेच सध्या ताणतणावाचे वातावरण निर्माण होत आहे. हा ताणतणाव दूर करायचा असेल, तर भारतीय संस्कृतीच जतन आवश्‍यक आहे.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल - 9011087406

आत्मरूप गणेशु स्मरण । सकळ विद्यांचे अधिकरण ।
तेचि वंदू श्रीचरण । श्री गुरूंचे ।। 1 ।। अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ - सर्व विद्यांचें आश्रयस्थान जें आत्मरूप गणेशाचें स्मरण, तेज श्रीगुरूंचे श्रीचरण होत. त्यांस नमस्कार करूं.

कोणत्याही शुभ कार्याची सुरवात करताना श्री गणेशाचे स्मरण केले जाते. ही आपली संस्कृती आहे. भाद्रपद शुक्‍ल चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी करण्यात येते. पूर्वी हा सण फक्त घरोघरी साजरा केला जात होता, पण स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्याला सार्वजनिक रूप आणले. त्यानंतर घरगुती गणपतीबरोबरच गल्लोगल्लीही श्री गणेशाची प्रतिष्ठापना होऊ लागली. भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी त्या परंपरा जोपासता याव्यात यासाठी ब्रिटिशांची राजवट भारतातून हाकलून लावणे आवश्‍यक होते. या उद्देशासाठी जनतेचे एकत्र यावे, लोकांमध्ये याबाबत जागृती केली जावी, यासाठी टिळकांनी हा उत्सव सार्वजनिकपणे साजरा करण्यास प्रोत्साहन दिले; पण सध्या या उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. त्यातील भक्तिभाव नष्ट झाला आहे. अशा उत्सवात पाश्‍चात्त्य संगीताच्या तालावर धामडधिंगा घातला जात आहे. खरे तर भगवंताचे नामस्मरण सतत राहावे यासाठी अशा सण, उत्सवांची सुरवात करण्यात आली; पण हा उद्देशच मुळात नष्ट झाला आहे. या चंगळवादी संस्कृतीचा वाढता प्रसार रोखणे आवश्‍यक आहे. नाही तर आपली संस्कृती आपणास शोधूनही सापडणे शक्‍य होणार नाही. यासाठी आता भारतीय संस्कृतीच्या जतनाचा श्री गणेशा करायला हवा. एक चळवळ उभी करायला हवी. चंगळवादी संस्कृतीमुळेच सध्या ताणतणावाचे वातावरण निर्माण होत आहे. हा ताणतणाव दूर करायचा असेल, तर भारतीय संस्कृतीच जतन आवश्‍यक आहे. या संस्कृतीच्या मुळाशी जाऊन सण, उत्सवांचे महत्त्व जाणून घेऊन त्यानुसार आचरण करण्याची गरज आहे. तरुण पिढीला याबाबत मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे. गणेश उत्सवांचे स्वरूप बदलायला हवे. त्यामध्ये भारतीय आध्यात्मिक संस्कृती जोपासण्यासाठी आवश्‍यक ते बदल करायला हवेत. गणेशाची आराधना हाच त्याचा मुळ पाया असायला हवा. भगवंताचे नामस्मरण कशासाठी केले जाते. याचा मुख्य उद्देश समजून घेऊनच असे उत्सव साजरे व्हायला हवेत. यामुळे आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्‍यक असणारे स्वरूप या उत्सवात पाहायला मिळेल. आपली खरी आध्यात्मिक संस्कृतीही जतन केली जाईल.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment