Thursday, May 9, 2019

ब्रह्मज्ञानी





अनुभवातूनच अध्यात्म शिकायचे असते. समाधी अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी आवश्‍यक साधने सांगितली आहेत त्याचा अभ्यास करायला हवा. तेथे पोहोचण्यासाठी आठ साधने उपदेशिली आहेत. यासाठी याला अष्टांगयोग असेही म्हणतात. 
- राजेंद्र घोरपडे, 
मोबाईल 9011087406


ते शांती पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा ।
तैं ब्रह्म होआवयाजोगा । होय तो पुरुषु ।। 18।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - हे भाग्यवंत अर्जुना, ती शांति जेंव्हा संपूर्ण त्यांच्या अंगी येते, तेंव्हा तो पुरूष ब्रह्म होण्याला योग्य होतो.

अध्यात्माच्या वाटेवर आलेल्या प्रत्येक व्यक्तीची हीच इच्छा असते की, आपण ब्रह्मज्ञानी व्हावे. सद्‌गुरूंच्या प्रमाणे आपणही आत्मज्ञानी व्हावे. सद्‌गुरू हाच मार्ग तर शिष्याला शिकवतात. या वाटेवर कसे चालायचे तेच शिकवतात. हे ज्ञान शिष्याने घ्यावे आपल्या पदापर्यंत शिष्याने पोहोचावे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असतो. गुरू पेक्षा शिष्य मोठा व्हावा. अशी प्रत्येक गुरूची इच्छा असते. पण शिष्य या पदापर्यंत पोहोचतो कसा? यासाठी त्याला काय करावे लागते? नेमका मार्गच अनेकांना माहीत नसतो. याचा गैरफायदा अनेक भोंदूबाबा घेतात. शिष्यांची फसवणूक येथेच होते. अंधश्रद्धा पसरविणारे अनेक भोंदूबाबा शिष्यांना आपल्या जाळ्यात पकडून त्यांचा वापर करून घेतात. ही फसगत होऊ नये असेल वाटत असेल तर अध्यात्माच्या वाटेवर प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने ज्ञानेश्‍वरीचे वाचन, चिंतन, मनन करायला हवे. स्वतः त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. साधनेचे विविध मार्ग अभ्यासायला हवेत. ते समजून घ्यायला हवेत. अध्यात्मात सहजतेला अधिक महत्त्व आहे. अनुभवही सहजच येत असतात. कोणताही त्रास न होता अनुभव यायला हवेत. अनुभवातूनच अध्यात्म शिकायचे असते. समाधी अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी आवश्‍यक साधने सांगितली आहेत त्याचा अभ्यास करायला हवा. तेथे पोहोचण्यासाठी आठ साधने उपदेशिली आहेत. यासाठी याला अष्टांगयोग असेही म्हणतात. आठ साधने असलेला योग असा याचा साधा सरळ अर्थ आहे. ही आठ साधने कोणती आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशीही योगाची आठ अंगे आहेत. आता ही आठ अंगे विस्ताराने पाहूया. यम हे पाच प्रकारचे आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे संपत्तीचा संग्रह न करणे. हे पाच यम आहेत. योग साधण्यासाठी हे पाच यम निरपवादरितीने सर्व प्रकारच्या अवस्थेत पाळणे आवश्‍यक आहे. हे एक प्रकारचे व्रतच आहे. म्हणून यास महाव्रत असेही म्हणतात. अहिंसा आपल्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात असायला हवी. कोणालाही दुखावून बोलणे ही सुद्धा हिंसा आहे. दुसऱ्याला टोचून बोलणे ही सुद्धा हिंसा आहे. दुसऱ्याबद्दल वाईट चिंतने ही सुद्धा हिंसा आहे. यासाठी मनातच अहिंसा असायला हवी. म्हणजे आपल्या बोलण्यात, वागण्यात, चालण्यात आपोआप अहिंसा येईल. सध्याच्या युगात असे वागणे हे खरोखरच संतांचे लक्षण आहे. अशी माणसे मिळणेही आजच्या परिस्थितीत कठीण झाले आहे. पण इतकी मृदुता आपल्यामध्ये यायला हवी. अनेकांना अध्यात्माच्या वाटेवर गेलेला मनुष्य वाया गेला असा वाटतो. पण खरे तर अध्यात्म हे जगात कसे वागायचे हे शिकवते. आजच्या युगात असे वागता न येणाऱ्या व्यक्ती याबाबत उलट बोलत आहेत. कारण असे वागणे तितके सोपे नाही. हळूहळू सरावाने मात्र वागण्यात, बोलण्यात फरक पडतो. यासाठी प्रथम प्रयत्न करायला हवा. तसा संकल्प करायला हवा. हे व्रत घ्यायला हवे. सत्य मेव जयते. सत्याचा नेहमी विजय होतो. याचा विचार करून वागायला हवे. चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण आपण चोरी करतो. चोरी न केलेली व्यक्ती या जगात मिळणार नाही. खोट न बोललेही व्यक्ती या जगात मिळणार नाही. म्हणून काय आपण सदैव खोटे बोलत राहायचे का? नाही ना. स्वतःला सुधारत राहायचे. ब्रह्मचर्य पाळायला हवे. संपत्तीचा मोह टाळायला हवा. संपत्तीचा संग्रह करू नका याचा अर्थ पैशाची बचत करू नका असा नाही. बचत ही करायलाच हवा. त्याचे नियोजन हे असायला हवे. योग्यवेळी याची गरज भासते. संग्रह करून नका म्हणजे ती संपत्ती निक्रिय ठेवू नका असा आहे. जमिन खरेदी करायची आणि ती पडीक ठेवायची. हे योग्य आहे का? सध्या तरी असे करणे अयोग्यच आहे. कारण सध्या पडीक जमिनीचाही कर भरावा लागतो. गाडी खरेदी करायची आणि ती वापरायचीच नाही. फक्त दुसऱ्याला दाखविण्यासाठी गाडी खरेदी करायची. संग्रह याचा अर्थ असा आहे. नियम पाच प्रकारचे आहेत. शौच म्हणजे शरीर व मनाने अंतर्बाह्य पावित्र्य ठेवायचे. संतोष म्हणजे नेहमी समाधानी राहायचे. तप म्हणजे जीवनात येणारी सुख-दुःखे सहन करण्याची क्षमता अंगात असायला हवी. स्वाध्याय म्हणजे अध्यात्मविद्येचा अभ्यास करायला हवा. हे शास्त्र काय आहे याचे अध्ययन करायला हवे. आणि पाचवा नियम आहे ईश्‍वरप्राणिधान म्हणजे ईश्‍वराची भक्ती. साधना करताना मुख्यतः मांडी घालून बसायलाच हवे. आसन घातल्याने अंगात थकवा येत नाही. साधना योग्य प्रकारे होते. यासाठी आसनाचे महत्त्व आहे. सद्‌गुरूंनी दिलेल्या मंत्राचे ध्यान करणे हा प्राणायाम आहे. तो स्थिरपणे व आनंदाने करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. जबरदस्ती ही अध्यात्मात नाही. कोणत्याही कामात सहजता असायला हवी. प्रत्याहार म्हणजे मन स्थिर करण्यास करता सतत आवरणे. साधना करताना मनात अनेक विचार येतात. त्या विचारांना विराम देणे. मन गुरूमंत्रावर केंद्रीय व्हायला हवे. मन गुरूमंत्रावर स्थिर करायला हवे. ध्येयाविषयामध्ये चित्त स्थिर करणे म्हणजे धारणा. चित्त स्थिर होत असताना चित्त दुसऱ्या कोणत्याही ध्येयविषयाकडे न जाणे आणि ध्येयविषयात रमणे म्हणजे ध्यान. गुरूमंत्रावर मन स्थिर होणे हे आपले ध्येय आहे. त्या मंत्रात रममान होणे म्हणजे ध्यान लागणे. ध्येयविषयाबाहेरील सगळे विषय मनाने वगळणे म्हणजे समाधी होय. सततच्या अभ्यासाने हे साध्य होते. शिष्य हा अवस्थेत पोहोचतो. त्याच्या शरीरात शितलता येते. शांती येते. समाधी अवस्थेत त्याला सिद्धी प्राप्त होते. तो ब्रह्मज्ञानचा ठेवा मिळविण्यास प्राप्त होतो. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला भूत-भविष्याचे ज्ञान पूर्वजन्माचे ज्ञान, दुसऱ्याच्या मनाचे ज्ञान, मरणाच्या सूचक चिन्हाचे ज्ञान, हत्ती, गरुड, वायू इत्यादीकांची बलही त्याला प्राप्त होतात. सर्व विश्‍वाचे त्याला ज्ञान होते. क्षुधा व तृष्णा यांच्यावर तो विजय मिळवतो. सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. दिव्य गंध, दिव्य रस, दिव्य स्पर्श, दिव्य रूप, दिव्य शब्द इत्यादींचे प्रत्यक्ष ज्ञान त्यास प्राप्त होते.



No comments:

Post a Comment