Thursday, November 15, 2012

विषयांचा त्याग




म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे ।

रागद्वेष स्वभावेॅ । नाशतील ।।



सतत अनेक विचार घोळत असतात. हे विचार जोपर्यंत संपत नाहीत, तो पर्यंत मनाला शांती लाभणार नाही. मन स्थिर होणार नाही. वृद्धापकाळात किंवा वयाच्या 40 नंतर अनेक आजार जडतात. यावर डॉक्‍टर विचार करणे कमी करा असा सल्ला देतात. मुळात अति विचार करण्यामुळेच हे रोग जडलेले असतात. या रोगावर विरक्त मन हा उपाय आहे. असे असेल तर पाश्‍चात संस्कृतीत या रोगावर इलाज नाहीत. आपल्या संस्कृतीत मात्र निश्‍चितच यावर उपाय सांगितले आहेत. विशेष म्हणजे यासाठी पैसा खर्च करण्याचीही गरज नाही. इतके सोपे सहजपणे हे उपाय आपणास सांगितले गेले आहेत. संस्कृतीमध्येच याचा आचार-विचार सांगितला आहे. मग आपण आपल्या संस्कृतीचा तिरस्कार का करतो? एखादी गोष्ट आपल्या संस्कृतीत सांगितलेली असेल, तर त्याचा सखोल अभ्यास का केला जात नाही. यावर सखोल विचार केला तरच हे तत्त्वज्ञान आपणास आत्मसात होणार आहे. अन्यथा तिरस्कार करून हे तत्त्वज्ञान अयोग्य आहे. असेच आपण म्हणत बसणार. आपल्या संस्कृतीला नावे ठेवत बसणार. पण भावी काळात आपणच आपल्या संस्कृतीच्या संवर्धनाकडे वळू. आपणाला त्याचे फायदे निश्‍चितच पटू लागतील. अनेक रोग हे मनापासूनच उत्पन्न होतात. यासाठी मनावर नियंत्रण ठेवायला हवे. आपल्या संस्कृतीत हेच सांगितले आहे. मनावर बंधने घालण्याची सवय आपणास पडावी यासाठी काही गोष्टी शिकविल्या गेल्या आहेत. पण नेमके येथेच आपण चूक करत आहोत. नेमक्‍या याच गोष्टीचा त्याग आपण करत आहे. विषयांचा वाढता प्रभाव हेही यामागचे कारण आहे. विषयांना धरून राहिल्यानेच आपल्या डोळ्यावर झापड आली आहे. चांगल्या गोष्टी याचमुळे आपल्या दृष्टीस पडेनाश्‍या झाल्या आहेत. यासाठी विषयांचा त्याग करायला हवा. लोभ, स्वार्थ, काम यांचे प्राबल्य वाढल्यानेच हातून या चुका होऊ लागल्या आहेत. स्वार्थामुळे आपण अनेकांची मने दुखावत आहोत. घरामध्ये वागतानाही या गोष्टीचा विचार करायला हवा. आपल्या वागण्याने कोणी दुखावणार नाही असे वागणे आपण शिकायला हवे. हीच अहिंसा आहे. अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरू करायला हवे. याची सुरवात ही स्वतः पासून करायला हवी. आजच्या बदललेल्या जगात असे करणे निश्‍चितच आव्हानात्मक असणार आहे. पण हे आव्हान आपण स्वीकारायलाच हवे. पूर्वीच्या कालात ही परिस्थिती वेगळी होती. पण त्याकाळातही असे वागणे हे आव्हानच होते. त्याकाळातील लोकांनी हे स्वीकारले त्यामुळेच ते पुढे संत, महात्मा झाले. विषयांचा त्याग त्यांनी केला. साहजिकच त्यांच्यात उत्पन्न होणारा राग, द्वेषही नष्ट झाला. यामुळे त्यांचे ते सतत निरोगी राहिले. रोग त्यांना जडलेच नाहीत. जे रोग जडले त्याला प्रतिकार करण्याचीही क्षमता त्यांच्यात उत्पन्न झाली. विषयांचा त्याग केल्याने हे सर्व आपणास सहज प्राप्त होते.

Tuesday, November 13, 2012

अल्पभूधारक शेतकरी जगवणे हेच आव्हान

अल्पभूधारक शेतकरी जगवणे हेच आव्हान


- राजेंद्र घोरपडे

9011087406



गेल्या पन्नास वर्षांचा विचार करता शेतीमध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळतो. लाकडी नांगर आता इतिहास जमा झाले आहेत. त्याची जागा आता ट्रॅक्‍टरने घेतली. असे होताना शेताचा आकारही कमी होत चालला आहे. याचा विचार व्हायला हवा. तसे आधुनिक तंत्रज्ञानात कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न घेता येऊ शकते. पण हे ग्रीनहाऊसचे तंत्र सर्वसामान्य शेतकरी आत्मसात करू शकत नाही. तसे भांडवलही त्याच्याकडे नाही. यामुळे भावी काळात शेती आणि शेतकरी टिकवायचा असेल तर योग्य नियोजनाची गरज भासणार आहे. दुरदृष्टीचा विचार करून नियोजन आखायला हवे तरच देशातला शेतकरी शेतीत टिकून राहणार आहे.



1991 ते 2001 या काळात 80 लाख शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे. 1991 मध्ये 11.3 कोटी शेतकरी शेती कसत होते. तर 2001 मध्ये 10.5 कोटी शेतकरी शेती कसत होते. दररोज दोन हजार शेतकरी शेती सोडून उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधत आहेत. उदारीकरणाचा परिणाम म्हणून याकडे पाहीले जाते. पण इतरही कारणे आहेत. याचा आढावा घेणे गरजेचे आहे.



शेतकऱ्यांच्या आत्महत्यातही 2001 नंतर वाढ झाली. याचाही परिणाम विचारात घ्यायला हवा. 1995 ते 2009 या काळात महाराष्ट्रात 47 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वीस वर्षात शेतीवर इतके भयाण संकट का कोसळले आहे.? सरकारला शेतकरी जगवायचा आहे. का नुसते पॅकेज जाहीर करून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन द्यायचे आहे. पॅकेज हा विकासासाठीचा मार्ग होऊ शकत नाही. नुकसान भरपाई, पॅकेज हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते का?



2006 मध्ये बर्ड फ्लूने अनेक पोल्ट्रीधारक शेतकरी उद्धवस्थ झाले. शासनाने काही पोल्ट्री धारकांना नुकसान भरपाई दिली. पण आजही काही शेतकरी या नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. आज सहा वर्षे झाले हे शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. अधिवेशनानंतर निधीच्या तरतुदीचा सरकारी अध्यादेश (जीआर) निघतो. पण निधीचे वाटप काही होत नाही. इतक्‍या वर्षानंतर तो शेतकरी ती नुकसानभरपाई घेऊन प्रगती काय करणार? विकास कसा साधणार? यामुळेच नुकसान भरपाई किंवा पॅकेज हा पर्याय होऊ शकत नाही. यासाठी आगामी काळात नवे पर्याय शोधणे गरजेचे आहे. नवा पर्याय हा पारदर्शी असायला हवा. शेतीला जोड व्यवसाय करणारा शेतकरी या नुकसानीमुळे जोड धंदा तर सोडत आहेत. पण शेतीही सोडत आहे. त्याची भावी पिढी या शेतीत येत नाही. शेतकरी मुलाला शेतीमध्ये आणण्यास इच्छुक दिसत नाही.



गेल्या पन्नास वर्षात दोन हेक्‍टर पेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्यात वाढ झाली आहे. दहा हेक्‍टरच्यावर क्षेत्र असणाऱ्या शेतकरी केवळ 1.3 टक्केच राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार कमी होत चालला आहे. देशातील 80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र आहे. 1960 साली 60 टक्के शेतकऱ्यांजवळ दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र होते. भावी काळात या पेक्षाही भयानक चित्र पाहायला मिळेल. देशातील शेतकऱ्यांच्याकडे कसायला शेतच नाही अशी परिस्थिती असणारे शेतकरी पाहायला मिळतील. देश श्रीमंत होत चालला आहे पण शेतकरी मात्र गरीब होत आहे. नियोजन करताना ही आकडेवारी विचारात घ्यायला हवी. शेतकरी शेतमजूर झाला आहे. याची आकडेवारीही पाहायला हवी. काही शेतकरी भागाने घेऊन शेत करत आहेत. याचा अर्थ तो शेतकरी आहे पण त्याच्या जवळ कसायला आवश्‍यक तेवढे क्षेत्र नाही. किंवा तो शेत नसणारा शेतकरी आहे. सध्या एखाद्या गावात साधारण असे 20 ते 30 टक्के शेतकरी पाहायला मिळतील. यामध्ये भावी काळात वाढ होणार आहे. कसेल त्याची जमीन हा कायदा सरकारने केला आहे. असे कायदे शेतकऱ्यांच्याच मुळा उठतात. याचा विचार सरकारने करायला हवा. कायदा करताना याचे भान सरकारने ठेवायला हवे. शेतकरी संपवायचा नाही तर तो जगवायचा आहे. सरकारी कायद्याने जमीनीवरुन तंटेच वाढत आहेत. कायदा हा अशा गोष्टीसाठी नसावा. अशा कायद्यानेच शेतकरी संपतो आहे. त्याच्यातील माणूसकी संपवली जात आहे. सरकारने दूरदृष्टी ठेवून विचार करायला हवा.



शेतीचे क्षेत्र कमी होऊ लागल्याने चरितार्थ चालवायचा कसा? हा प्रश्‍न शेतकरी कुटुंबाजवळ पडला आहे. यामुळेच तो शेती सोडून शहराचा रस्ता पकडतो आहे. वाढत्या महागाईमुळे यात मोठी भरच पडत आहे. शेतकऱ्यांनी शेती सोडण्याचा वेग वाढतो आहे. हे थांबविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. वाढती महागाई रोखण्यात कोणत्याही सरकारला यश आलेले नाही. हा प्रश्‍न आवाक्‍याबाहेर गेला आहे. शेतीचा उत्पादन खर्चही वाढला आहे पण उत्पन्नात वाढ झालेली नाही. शेतमालाला योग्य भावही मिळत नाही. गरजेपुरते अन्न पिकविणेही आता या शेतकऱ्याला शक्‍य नाही. यासाठी सरकारने भावी धोरणे ठरविताना याचा विचार करायला हवा. जिराईत शेती बागायती झाली म्हणजे सर्व प्रश्‍न सुटले असे होत नाही.



अशा या भेडसावणाऱ्या प्रश्‍नांची जाणीव सरकारला असेलही पण यावर पर्याय कोणते सुचविले जाऊ शकतात याचे उत्तर त्यांच्याजवळ नाही. हे मात्र निश्‍चित. कारण यामुळेच शेतीसाठीचे पाणी आता उद्योगाकडे वळविले जाऊ लागले आहे. ही सरकारची पळवाट आहे. प्रश्‍नांना उत्तरे शोधण्याऐवजी सरकार पळवाटा शोधत आहे हे यापेक्षाही भयाण आहे. पळवाटा शोधून शेतीचे प्रश्‍न सुटत नाहीत. पळवाटांनी शेतीची प्रगती झाली असल्याचे भासत आहे. पण ही प्रगती मर्यादीत आहे. याचा विचार करायला हवा. जागतिक मंदीच्या काळात देशाला शेतीनेच सावरले आहे याचा विचार अर्थमंत्र्यांनी नियोजन करताना करायला हवा. पर्याय शोधण्यासाठी जनतेला आवाहन करायला हवे. या प्रश्‍नावर सरकारने संसदेत चर्चा घडवायला हवी. अनेक पर्याय यातून खुले होऊ शकतील. पळवाटा शोधल्यानेच शेतकरी शेती सोडून पळतो आहे. याचा विचार करायला हवा. देशाला शेतीच तारू शकते. यासाठी शेतकरी जगवायला हवा.



कर्जबाजारीपणा, शेतीत नुकसान, कौटुंबिक जबाबदाऱ्यामुुळे वाढता तणाव आदी कारणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मुख्यता सावकारीपाशात अडकलेला शेतकरी आत्महत्या करतो आहे. यासाठी शेतकऱ्यांची कर्जे माफही केलीत. पण याचा लाभ उठविणारेही अनेक आहेत. बोगस कर्ज प्रकरणे करून सरकारची फसवणूक केली. सरकारच्या अशा योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजू शेतकऱ्यांना होतच नाही. यासाठी शेतकरी जगविण्यासाठी योग्य नियोजन असायला हवे. 100 टक्के पारदर्शी योजना राबविणेही कठीण आहे. पण पर्यायही उभे करताना या अशी प्रकारांना रोखण्याची उपाययोजना ठेवायला हवी. यासाठी त्वरीत कारवाई हाच उपाय योग्य ठरू शकतो. प्रलंबित प्रश्‍नांमुळे कोणालाच फायदा होत नाही. गरजूंना योग्य वेळी मदत केली तरच फायदा होतो. अन्यथा पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचाच प्रकार होतो. यासाठी वेळेचे भान ठेवायला हवे. योजनांचा लाभ शेतकऱ्यांनाच होतो का याचाही आढावा वारंवार घेणे गरजेचे आहे. शून्य व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज देऊन सावकारी नष्ट करायला हवी. शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्याला योग्य मार्गदर्शन करायला हवे. प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा सांगून अशा शेतकऱ्यांचे मार्गदर्शन देऊन त्याची खचलेली मानसिकता नष्ट करायला हवी. तणावमुक्ती हाच आत्महत्या रोखण्याचा मुख्य उपाय आहे. या दृष्टीने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन वेळोवेळी कसे होईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.



भावी काळात शेती टिकवायची असेल तर या प्रश्‍नावर हे करता येणे शक्‍य आहे.

- पाच वर्षात 100 टक्के बागायती क्षेत्र करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवायला हवे.

- पाण्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक, तुषार सिंचनाची सक्ती करायला हवी. विशेषतः पाणी पुरवठा सोसायट्यामध्ये याची सक्ती करायला हवी. यामुळे सर्व शेतकऱ्यांना मुबलक व योग्य प्रमाणात पाणी मिळेल. यामुळे कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकेल तसेच पाण्याचे समान वाटप होऊन जास्तीत जास्त क्षेत्र बागायती करता येऊ शकेल. अल्पभूधारक शेतकरीही ठिबक करू शकल्याने कमी क्षेत्रातही जास्तीत जास्त उत्पादन तो घेऊ शकेल.

- गटशेतीस प्रोत्साहन देऊन बाजारभावापेक्षा अधिक किंमतीत शेतमालाच्या खरेदीची हमी सरकारने द्यायला हवी.

- अनुदान, नुकसान भरपाई ऐवजी हमी भावाने शेतमाल खरेदीची हमी यामुळे भ्रष्टाचार कमी होऊन शेतकऱ्यास प्रोत्साहन मिळेल.

- अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे, खते, कीडनाशकांचे वाटप करून त्याच्या शेतमालाची हमी भावाने खरेदी करायला हवी.

- नैसर्गिक आपत्तीच्या काळात (कीड, रोग) सरकारने एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन करणारी पथके तयार करायला हवीत. ही पथके शेतकऱ्यांना मार्गदर्शन तर करतीलच शिवाय या परिस्थितीत शेतकऱ्याने काय करायला हवे याचेही प्रशिक्षण ते देतील. बेरोजगार कृषी पदवीधरांना यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

- घरातील फ्रिझ, एसी बंद झाल्यानंतर कंपनीची माणसे येऊन तो दुरुस्त करून देतात. तशी वार्षिक देखभाल ठेवणाऱ्या गटांची स्थापना करायला हवी. या गटास सरकारच्या वतीने प्रोत्साहन दिले जाईल पण त्यांचा पगार हा शेतकरी ठरवतील. शेताच्या नांगरटीपासून ते काढणीपर्यंतच्या सर्व कामांची जबाबदारी या गटावर असेल. बागायतदार शेतकऱ्यांना या पथकांचा निश्‍चितच चांगला फायदा होऊ शकेल. इतकेच नव्हेतर हा गट प्रक्रिया उद्योगांची उभारणीस प्रोत्साहन देईल. आजही फणस, करवंदे आदी फळावर प्रक्रिया केली जात नाही. पश्‍चिम घाटात असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा उत्तम लाभ होऊ शकेल. फक्त .अशी कामे करणारी यंत्रणा उभी करायला हवी. बदलत्या शेती पद्धतीत असे नवे तंत्र अवलंबणे गरजेचे होणार आहे.



गेल्या पन्नास वर्षात शेतकऱ्यांकडील जमिनीचे बदललेली टक्केवारी

1960-61 1981-82 , 1991-92 2002-03

एक हेक्‍टर पेक्षा कमी क्षेत्र असणारे 39.1 45.8 56.0 62.8

एक ते दोन हेक्‍टर क्षेत्र असणारे 22.6 22.4 19.3 17.8

दोन हेक्‍टरपर्यंत क्षेत्र असणारे 61.7 68.2 75.3 80.6

दोन ते चार हेक्‍टर असणारे 19.8 17.7 14.2 12.0

चार ते दहा हेक्‍टर असणारे 14.0 11.1 8.6 6.1

दहा हेक्‍टरच्या वर क्षेत्र असणारे 4.5 3.1 1.9 1.3









Friday, November 9, 2012

भात बीजोत्पादनातून होतोय अल्पभूधारक आर्थिक सक्षम

कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्‍यात तुकड्या-तुकड्यात भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने बीजोत्पादनाचा पर्याय उपलब्ध केला. त्यांना या प्रकल्पातून सुधारित लागवड तंत्रज्ञान शिकवले. त्यातून पारंपरिक पद्धतीपेक्षा उत्पादन वाढत आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळत आहे.


राजेंद्र घोरपडे



कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुके भाताचे आगार म्हणून ओळखले जातात. चंदगड, आजरा येथे उत्पादित होणाऱ्या भाताला वेगळीच चव असते. आजरा घनसाळ, काळी गजरी अशी इथल्या भाताची ओळख आहे. पारंपरिक जातींची उत्पादकता मात्र एकरी 15 ते 20 क्विंटल इतकी कमी आहे. वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करता इतके कमी उत्पादन परवडत नाही. यासाठीच नवे प्रयोग करणे गरजेचे झाले आहे.



या भागातील शेती उताराची म्हणजे पायऱ्या-पायऱ्यांची आहे. त्यांचे तुकडे पडत आहेत. शेतकरी अधिकच अल्पभूधारक होत आहे. मालाला योग्य दर मिळाला तरच येथील शेतकरी शेतीत तग धरू शकणार आहे. त्यादृष्टीने बीजोत्पादन हा पर्याय चांगला वाटून येथील कृषी विभागाने बियाणे कंपन्यांच्या सहकार्याने या भागात बीजोत्पादन प्रकल्प राबविला आहे.



...असा आहे बीजोत्पादन कार्यक्रम

आजरा, अरळगुंदी, आरदाळ, भादवण, बहिरेवाडी, चिमणे, देवर्डे, हत्तीवडे, कासार कांडगाव, किटवडे, महागोंदवाडी, मेंडोली, पोळगाव, साळगाव, सोहळे, उत्तूर, वडकशिवले, वझारे अशी अठरा गावे भात बीजोत्पादन प्रकल्पात समाविष्ट आहेत. या गावांतील 364 शेतकऱ्यांनी 234 हेक्‍टरवर आपला सहभाग नोंदवला आहे. इंद्रायणी, भोगावती, कर्जत - 5, फुले समृद्धी, रत्नागिरी 24, रत्नागिरी 1 आदी वाणांचा यात समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. सुरवातीला बीजोत्पादनासाठी शेतकरी उत्सुक नव्हते. मात्र त्याचे महत्त्व, त्याचा होणारा फायदा, तंत्रज्ञान समजावून दिल्यानंतर शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.



बीजोत्पादन आणि क्षेत्र

वर्ष बीजोत्पादन क्षेत्र

- 2010 100 हेक्‍टर

-2011 150 हेक्‍टर

- 2012 234 हेक्‍टर



भात शेतीमध्ये पडलेला फरक -

बीजोत्पादन प्रकल्पा आधी बीजोत्पादन प्रकल्पानंतर

1) पारंपरिक पद्धतीने लागवड 1) लागवडीच्या सुधारित पद्धतींचा वापर

2) पारंपरिक वाणांची निवड 2) सुधारित, अधिक उत्पादनक्षम जाती

3) अयोग्य अंतरावर रोपलावण 3) 10 x 15 इंच अंतरावर लावण

4) लावणीची पारंपरिक पद्धत 4) पट्टा, चार सूत्री पद्धतीने लावण

5) एका जागी 10 ते 15 रोपांची लावण 5) एका जागी दोन ते चार रोपांची लावण

6) एकरी 40 किलो बियाणे 6) एकरी 15 किलो बियाणे

7) अयोग्य अंतरावर लागवडीमुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव 7) कीड, रोगाचे प्रमाण तुलनेने कमी

8) एकरी उत्पादन 15 ते 25 क्विंटल 8) एकरी उत्पादन 35 ते 40 क्विंटल





बीजोत्पादन कसे ठरले फायदेशीर?

नदी काठी शेत असल्याने पावसाळ्यात शेतात दलदल असते. पूर्वी घनसाळ वाण घेत होतो. त्याची उंची जास्त आहे. पाणथळ जमिनीत हा भात लोळतो. बीजोत्पादन योजनेत इंद्रायणी वाण गेली दोन वर्षे घेत आहे. याची उंची कमी असल्याने लोळत नाही. या वाणात पोचट दाणे किंवा चिंबण्याचे प्रमाण कमी आहे. साहजिकच उत्पादनावर अनुकूल परिणाम होतो. इंद्रायणीचे एकरी 40 पोती उत्पादन झाले. पारंपरिक पद्धतीत उत्पादन 20 पोत्यांपर्यंत मिळायचे. गेल्या वर्षी इंद्रायणीला प्रति क्विंटल 1500 रुपये दर मिळाला. बाजारभावापेक्षा हा दर 20 टक्के अधिक आहे.

- पांडुरंग कृष्णा पाटील, साळगाव



बीजोत्पादन प्रकल्पाचा लाभार्थी होण्यापूर्वी घनसाळ, कर्जत वाण घ्यायचो. पारंपरिक आडमापी पद्धतीने लागवड होती. चिखल पेरणी करताना कोठेही आळे करून रोपे लावायचो. घनसाळला फुटवे कमी असल्याने 10 ते 15 रोपे एका आळ्यात लावण्यात येत होती. यामुळे बियाणेही जास्त लागायचे. लावणीसाठी मजुरीचा खर्च जास्त होता. आता बीजोत्पादनात इंद्रायणी वाण घेत आहे. याला फुटवे जास्त असल्याने दोन ते चार रोपे एका आळ्यात लावली तरी चालतात. चार सूत्री व पट्टा पद्धतीने लागवडीचे प्रशिक्षण मिळाले. यात बियाण्याची बचत होत आहे.

- पांडुरंग श्‍यामराव पाटील, साळगाव



पूर्वी पारंपरिक पद्धतीच्या घनसाळ लागवडीत एकरी 20 पोती उत्पादन मिळायचे. तीन- चार वर्षांपूर्वी क्विंटलला 900 ते 1000 रुपये दर मिळायचा. गेल्या दोन वर्षांत क्विंटलला 2500 रुपये दर तांदूळ महोत्सवामुळे मिळत आहे. यापुढे कायम इतका दर मिळेल याची शाश्‍वती नाही. बीजोत्पादनात बाजारभावापेक्षा 20 टक्के अधिक दर देण्याची हमी दिली आहे. यात मध्यस्थीचा प्रश्‍न नाही. व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, दर पाडण्याचे कारस्थान आदी समस्या भेडसावत नाहीत. बीजोत्पादनात फुले-समृद्धी वाणाची निवड केली. सुधारित तंत्र वापरल्याने एकरी 40 पोती उत्पादन मिळाले. क्विंटलला 1500 रुपये दर मिळाला. पारंपरिक पद्धतीपेक्षा निश्‍चित 10 ते 12 हजार रुपये अधिक उत्पन्न मिळत आहे. दराची हमी असल्याने अनेक प्रश्‍न सुटले आहेत.

- जयसिंग श्‍यामराव नार्वेकर, पोळगाव



यंदा प्रथमच बीजोत्पादन योजनेचा लाभार्थी झालो. अर्ध्या एकरावर बीजोत्पादन आहे. इंद्रायणी वाण घेतला. वाढ जोमदार असून किडी-रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी आहे. बीजोत्पादनामध्ये भेसळ होऊ नये म्हणून विशेष काळजी घेताना अन्य भात वाणाच्या लागवडीपासून तीन ते चार फूट अंतर ठेवून लागवड करण्यास सांगितले आहे. मुळांत पश्‍चिम घाटमाथ्यावर शेताच्या तुलनेत बांधच मोठे असल्याने दोन वेगवेगळ्या जातीच्या शेतातील अंतर साहजिकच योग्य राखले जाते. यामुळे भेसळ होण्याचा धोका कमी असतो.

- पांडुरंग गोविंद नार्वेकर, पोळगाव



दहा एकर शेती आहे. त्यातील तीन एकरांवर भात घेतो. गेली दोन वर्षे इंद्रायणी, भोगावती, फुले समृद्धी या वाणांचे बीजोत्पादन घेत आहे. गेल्या वर्षी भोगावतीचे एकरी 25 ते 26 क्विंटल उत्पादन मिळाले. क्विंटलला 1465 रुपये दर मिळाला. पारंपरिक पद्धतीत एकरी 15 क्विंटलपर्यंत उत्पादन होते. दर एक हजार रुपयांच्या आसपास मिळायचा. व्यापारी दर पाडतात. काढणीनंतर लगेच विक्री करावी लागत असल्याने या काळात दरही मिळत नाही. साठवणूक करणे शक्‍य नसल्याने मिळेल त्या दरात भात विकावा लागतो. याच गोष्टीचा फायदा व्यापारी घेतात. वजनकाट्यात फसवणूक होते. बीजोत्पादनात ही फसवणूक होत नाही. बाजारभावापेक्षा अधिक दर तसेच हमी मिळत असल्याने निश्‍चित फायदा होत आहे.

- बाळू गोविंद मणगुतकर, गणेशवाडी



एक एकरावर भोगावती वाण बीजोत्पादनासाठी आहे. फुटवे चांगले म्हणजे प्रति रोप 25 ते 30 आहेत. त्यामुळे लावणीवेळी रोपे कमी लागतात. यामुळे खर्चात थोडी बचत होते. आता खतांचे दर वाढले आहेत. उत्पादन खर्च एकरी 14 हजार रुपये येतो. खर्च वजा जाता 20 हजार रुपये उत्पन्न मिळते. पण हे फक्त बीजोत्पादनमध्ये शक्‍य झाले. नेहमीच्या भातशेतीत उत्पादन कमी व दराची हमी नसते. शासनाने बाजारभावाप्रमाणे भाताची खरेदी केली तर शेतकऱ्यांना निश्‍चितच फायदा होईल. व्यापारी, मध्यस्थ यांपासून होणारी फसवणूक थांबेल.

- मुकुंद लक्ष्मण तानवडे, देवर्डे



भात उत्पादकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाने बीजोत्पादनाची योजना सुरू केली. शेतकऱ्यांना त्यातून चांगल्या गुणवत्तेचे बियाणे उपलब्ध होईल. अल्पभूधारक शेतकऱ्यांचा त्यास चांगला प्रतिसाद लाभत आहे.

- एकनाथ माने, तालुका कृषी अधिकारी

संपर्क - 9421200167

Friday, November 2, 2012

मुळावर घाव



जैसी वरिवरी पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे ।

तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ।।



एखादी गोष्ट नष्ट करायची झाल्यास त्याच्या मुळावर घाव घालावा लागतो. वरवर नुसती पाने तोडून काहीच साधत नाही. मुळ जो पर्यंत जिवंत आहे, तो पर्यंत त्या झाडाची वाढ होतच राहणार. पालवी येतच राहणार. मुळ मरत नाही, तोपर्यंत त्यात जिवंतपणा राहणारच. तसेच दोषांचे आहे. दोष नष्ट करायचे असतील तर त्याच्या मुळाशी जायला हवे. तो दोष कसा उत्पन्न झाला, याचा विचार करायला हवा. याचे उत्तर मिळाले तरच तो दोष नष्ट करता येईल. काहींना सिगारेट, तंबाखूचे व्यसन असते. ते सोडायचे आहे. पण सुटत नाही. कितीही प्रयत्न केला तरी ही सवय काही जातच नाही. पण सोडण्याची तीव्र इच्छा मात्र असते. असे का होते? हे व्यसनातून मुक्ती मिळविण्यासाठी काय करायला हवे. तर या व्यसनाच्या दुष्परिणामांची जाणीव त्याला व्हायला हवी. एकदा का त्याची जाणीव झाली की हळूहळू व्यसनापासून दूर जाण्याची मानसिकता तयार होऊ लागते. यातच या व्यसनाचा आर्थिक फटका कसा बसतो. याचा विचारही पटवून द्यायला हवा. अरेरे या व्यसनावर आपण दिवसाला इतके खर्च करतो. महिन्याभरात इतका खर्च यावर होतो. हे व्यसन सुटले तर आपले इतके पैसे वाचतील असे विचार याच कालावधीत त्या व्यक्तीच्या मनावर बिंबवायला हवेत. पण असे करूनही व्यसन सुटतेच असे नाही. कारण या व्यसनाचे मुळ अद्यापही जिवंत आहे. मुळात हे व्यसन कशामुळे लागले त्याचा शोध घेण्याची गरज आहे. धनसंपन्न असूनही अशी व्यसने असतात. मग पैसा हे कारण नाही. तर मानसिक शांती, समाधान हे त्यामागचे कारण आहे. मन शांत व नियंत्रणात ठेवता यायला हवे. मनातच व्यसन सोडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न व्हायला हवी. यासाठी तणावातून सुरू झालेले हे व्यसन सुटू शकेल. तणावमुक्ती हे व्यसनावरील उत्तम औषध आहे. तणावातून मुक्त होण्यासाठी अध्यात्माची कास धरायला हवी. मनावर नियंत्रण ठेवण्याचे उपाय अध्यात्मात सांगितले आहेत. पण हे पुस्तकी ज्ञान आत्मसात करून मनावर नियंत्रण ठेवता येत नाही. यासाठी ज्ञानेश्‍वरीच्या पारायणासोबत साधना ही आवश्‍यक आहे. ज्ञानेश्‍वरी साधनाच करायला सांगते. मनावर विजयी होण्याचा तो उत्तम मार्ग आहे.