Wednesday, May 30, 2018

अक्षर


तें अक्षर जी अव्यक्त । निर्देशदेशरहित । 
सोऽहंभावें उपासित । ज्ञानिये जे ।। 32 ।। अध्याय 12 वा 

ओवीचा अर्थ - ती वस्तू अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे. ती वस्तु दाखवितां येण्याजोगी नाहीं व ती देशानें मर्यादित नाही, अशी आहे अशा वस्तूची जे ज्ञानी ती वस्तु मी आहे अशा भावनेनें उपासना करतात.

सो ऽ हं हे अक्षर आहे तरी काय? सो ऽ हं हा स्वर आहे. आपण श्‍वास आत घेतो तेव्हा सो तर श्‍वास बाहेर सोडतो तेव्हा हम्‌ हा स्वर उत्पन्न होतो. श्‍वास आत बाहेर घेण्याची ही क्रिया म्हणजे सो ऽ हम्‌. साधनेत हेच तर करायचे असते. श्‍वास आत बाहेर घेण्याच्या या क्रियेवर लक्ष केंद्रित करायचे असते. मन या स्वरात मिसळायचे असते. सो ऽ हं हे अक्षर असे आहे. आपला जन्म होतो तेव्हापासून ते आपला मृत्यू होईपर्यंत हाच तर जप सुरू असतो. समस्त जिवांचा हाच तर प्राण आहे. यासाठीच समस्त जिवात मी सामावलो आहे. मी म्हणजे हा सो ऽ हं सामावला आहे. प्रत्येक मानवामध्ये तो आहे. हा सो ऽ हं जो आत्मा आहे. तो या शरीरात आला आहे. जन्म झाल्यानंतर तो शरीरात येतो. मृत्यू पावल्यानंतर तो शरीरातून जातो. देहात आला असल्याने आपण त्याला नाव देतो. पण प्रत्येकाच्या देहात तो आहे. या देहात वेगळा, त्या देहात देहात वेगळा असा भेदभाव नाही. त्याला मरण नाही. तो अमर आहे. अविनाशी आहे. इंद्रियात येतो पण इंद्रियापासून तो वेगळा आहे. सो ऽ हं हा स्वर आहे त्यामुळे तो दिसत नाही. पण तो कानाने ऐकायचा असतो. मन त्याच्यावर नियंत्रित करायचे असते. डोळ्यांची नजर त्याच्यावर केंद्रित करायची असते. त्याला वास नाही, गंध नाही त्यामुळे त्याची जाणीव ही स्वरांनीच अनुभवायची असते. आपण म्हणजे कोण आहोत ? आपणाला नाव आहे पण ते आपण नाही. ते देहाचे नाव आहे. मग आपले खरे स्वरूप काय आहे? श्‍वास हेच आपले खरे स्वरूप आहे. आपण म्हणजे श्‍वास आहोत. श्‍वासातील स्वर सो ऽ हं. हे आपले खरे स्वरूप आहे. हे आपण ओळखायला हवे. ते जाणून घ्यायला हवे. ते अनुभवायला हवे. त्याची अनुभूती यायला हवी. अनुभवातूनच अध्यात्माची खरी ओळख होते. यासाठी हा स्वर अनुभवायला हवा. आपण म्हणजे सो ऽ हं. ही वस्तू आहोत हे जाणून घ्यायला हवे. ज्याला हे समजले तो ज्ञानी. ज्याने याचा अनुभव घेतला तो ज्ञानस्वरुप होतो. ज्याला याचा बोध होतो तो आत्मज्ञानी होतो. अमरत्वाला पोहोचतो. कारण सो ऽ हं हे अक्षर अमर आहे. अविनाशी आहे. यासाठी या भावनेने सो ऽ हं ची साधना करायला हवी. उपासना करायला हवी. म्हणजे आपणही आत्मज्ञानी होऊ. आपणही त्याचा बोध घ्यायला शिकले पाहिजे. हेच अध्यात्म आहे. अध्यात्म हे याच अक्षरात सामावले आहे. या अक्षरातच सर्व विश्‍व सामावले आहे. यामुळेच या विश्‍वस्वरुप अक्षराची उपासना करायला हवी. सर्व सचिवांची अनुभूती या अक्षरातून घ्यायला हवी. 

Wednesday, May 16, 2018

गांडिव


सर्वांगा कंटाळा आला । अति संतापु उपनला ।
तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ।। 197 ।। अध्याय 1 ला


ओवीचा अर्थ - सर्वांगावर काटा उभा राहिला आहे. माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरावयाचा हात लुळा होऊन गेला आहे.

साधनेतील मंत्र हे गांडिव आहे. याचा प्रहार करायला हवा. साधनेला आपण बसलेला असतो पण आपण हे गांडिव उचललेले नसते. साधना सुरू असते. मंत्रोच्चार सुरू असते. पण मन मात्र कोठेतरी भरकटले असते. गांडिव चालवण्याची इच्छा मनात नसेल तर बाण योग्य ठिकाणी लागणार नाही. त्याची जागा चुकणार. त्याचा वार वाया जाणार. यासाठी गांडिव चालविण्याचा दृढ निश्‍चिय हवा. मोहामुळे हा धनुष्य उचलण्याची इच्छा होत नाही. मंत्र म्हणण्यात आपण आपला वेळ फुकट का घालवत आहोत. त्यावेळात आपण अन्य काही तरी कार्य करू शकलो असतो. असे म्हणून आपण तो वेळ दवडतो. साधना करण्याचे विसरूनच जातो. आपण साधना मुळात करतोच किती वेळ. दहा ते पंधरा मिनिटे त्यात वेळ घालवला तर तो वाया कसा जातो? दहा मिनिटे मोलाची आहेत. मग ही दहा मिनिटे साधनेत योग्य प्रकारे घालवली, तर वेळ वाया कसा जाईल. पण तसे घडत नाही. दहा मिनिटे आपण साधनेला बसतो. पण या दहा मिनिटात मनात कोणते विचार करतो यावर लक्ष द्यायला हवे. लक्ष दिल्यानंतर असे लक्षात येते की आपण सोऽहम साधना करतच नाही. साधनेला तर बसलेले असतो. पण मनात दररोजच्या घडामोडी सुरू असतात. मनात अनेक विचार घोळत असतात. त्यातच आपली दहा मिनिटे जातात. मग साधना झालीच नाही. वेळ वायाच गेला ना? यासाठी साधनेत मन रमवायला हवे. येणारे विचार थांबवायला हवेत. मनात विविध मोहाचे विचार येतात. अशाने साधना होतच नाही. हे विचार आपली पाठच सोडत नाहीत. साधनेत मंत्राचा गांडिव काही उचललाच जात नाही. उचलला तरी त्यातून सुटलेला बाण हा योग्य ठिकाणी लागत नाही. तो चुकतो. मनाची एकाग्रता वाढवायला हवी. वेळेचे महत्त्व आपणास पटते ना? मग वेळ वाया का घालवता? साधनेत मनाची एकाग्रता हवी. मन एकाग्र झाले नाही तर वेळ फुकट जाणार. हा नफा-तोटा विचारात घ्यायलाच हवा. तरच लाभ होणार आहे. कोणताही धंदा करताना नफा-तोटा पाहावाच लागतो. तरच तो धंदा यशस्वी होतो. अन्यथा कधी तरी तो व्यवसाय गुंडाळावा लागतो. मनाची एकाग्रता हे आपले धन आहे. ते मिळविण्यासाठी प्रयत्न हे हवेतच. यासाठी मनात येणाऱ्या विचारांचा त्याग हा हवाच. आपणास आवडणारी एखादी गोष्ट शत्रूपक्षात असेल, तर तो आपला शत्रू आहे. आपण त्याला मारले नाही, तर तो आपणावर विजय संपादन करेल. हे लक्षात घ्यायला हवे. मनाला सुटलेला मोह आपणास खाणार आहे. आपला वेळ फुकट घालवणार आहे. हे लक्षात घेऊन साधना जागरूकतेने करायला हवी. सो ऽ हम मध्ये मन रमवायला हवे. तसा प्रयत्न करायला हवा. तरच त्यातून सुटणारे बाण हे आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतील.

Thursday, May 3, 2018

आत्मज्ञानाचा लढा

अर्जुना तुझें चित्त । जऱ्ही जाहलें द्रवीभूत ।
तऱ्ही हे अनुचित । संग्रामसमयीं ।। 183 ।। अध्याय 2 रा


ओवीचा अर्थ - अर्जुना, तुझे चित्त जरी दयेनें विरघळून गेले, तरी तें तसें होणें या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही.

जगात स्वयंघोषित महाराज गल्लोगल्ली आढळतात. जनता सुद्धा त्यांच्या नादात फसते. राजकीय नेतही अशा महाराजांच्या आश्रयाला असतात. जे खरे संत असतात. ते आत्मज्ञानी असतात. ते स्वतःला कधीच महाराज म्हणवून घेत नाहीत किंवा तसल्या फंदातही पडत नाहीत. ते कर्माने संत होतात. कर्मच त्यांना हे देवत्व देते. यासाठी त्या कर्माला महत्त्व आहे. हे कर्म कर असे सद्‌गुरू शिष्याला शिकवतो व शिष्याला गुरुपदावर नेऊन ठेवतो. हीच परंपरा आजपर्यंत अध्यात्मात सुरू आहे. सद्‌गुरू झाल्यानंतर असे आत्मज्ञानी शिष्य घडविणे हेच त्यांचे कर्म असते. शिष्याला तो यासाठी प्रेरित करत असतो. हा लढा देण्यासाठी शिष्याला तो प्रोत्साहित करत असतो. हा युद्धाचा प्रसंग आहे. अशावेळी अनेक आमिषे, मोह माया यांचा मारा होत असतो. त्यातून या शिष्याला सावरण्याचा, त्यातून बाहेर पडण्याचा सल्ला सद्‌गुरू हे देत असतात. बाहेर पडणे म्हणजे मनाने या गोष्टीबाबत विरक्त होणे. पाय जमिनीवर ठेवून वागणे. सत्कर्म करत राहणे. सौजन्य पाळणे. पण हे सहज शक्‍य होत नाही. यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. मनाचा दृढ निश्‍चय करावा लागतो. चूक प्रत्येकाकडून होत असते. पण ती सुधारता येणे गरजेचे आहे. सुधारत राहणे यातच खरी प्रगती आहे. सद्‌गुरू ही सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करत असतात. शिष्याची प्रगती हेच गुरूचे आद्य कर्तव्य असते.

शिष्याच्या मनात सुधारणा घडवणे. त्याच्या बोलण्यात, वागण्यात सौजन्य उत्पन्न करणे हेच त्यांचे ध्येय असते. मनाला बळकटी सद्‌गुरू देत असतात. भोंदू साधू हे करत नाहीत. शिष्यांचे शोषण हेच त्यांचे ध्येय असते. पण जनता येथेच फसते. गुरू कसा असावा हे यासाठीच समजून घेणे गरजेचे आहे. गुरू कोणाला करावे? गुरू कोणाला म्हणावे? आध्यात्मिक गुरूचे कर्तव्य काय आहे. हे जाणून घ्यायला हवे. आत्मज्ञानी गुरू आत्मज्ञानाची ओढ असणाऱ्या शिष्याच्या शोधात असतात. यासाठी त्यांचा संग्राम सुरू असतो. यासाठी त्यांनी चळवळ उभी केलेली असते. तेच कर्म ते करत असतात. मादुगरी मागूण स्वतःची ही चळवळ ते पुढे नेत असतात. समाजाला ज्ञानी करणे, समाज जागृत करणे हेच त्यांचे कर्म असते. समाजाची स्वच्छता, मनाची स्वच्छता ते घडवत असतात. मन स्वच्छ असेल तर त्यात उत्पन्न होणारे विचारही स्वच्छ असतात. अशा स्वच्छ विचारांनी, आचारांनी शिष्याची आध्यात्मिक वाटचाल सुरू असते. अशा शिष्यास आत्मज्ञानाच्या वाटा सापडतात. तो ठेवा तो सर्वोच्च आनंद त्याला प्राप्त होतो. यासाठी त्याचा हा लढा सुरू असतो.