Tuesday, March 6, 2012

कल्पतरु

चलां कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणींचे गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।

इच्छा व्हावी आणि ते पटकण हस्तगत व्हावे. धनाची अपेक्षा करावी आणि अमाप धनलाभ व्हावा. फार थकल्यानंतर कामाच्या दगदगीतून अचानक सुटी मिळावी. असे सर्व काही मनासारखे व्हावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. पण तसे नेहमीच घडते असे नाही. वास्तवात हे शक्‍यही होत नाही. म्हणून वडीलधारीमंडळी नेहमी सांगत असतात. वास्तवात जगायला शिका. स्वप्नात राहु नका. जग वेगाने बदलते आहे. त्या वेगाची लय पकडा. स्वप्ने पाहात बसाल तर, काहीच हाती लागणार नाही. स्वप्नातून यासाठी भानावर यायला हवे. तरच तुम्ही प्रगती करु शकाल. खरा योद्धा झोपेत सुद्धा जागा असतो. इतका तो जागरुक असतो. ध्येयावर लक्ष केंद्रीत करायला हवे. तरच इच्छा पूर्ण होतील. ध्येय प्रत्येकाचे असते. कोणाला इंजिनिअर व्हायचे असते तर, कोणाला डॉक्‍टर. कोणाला राजकारणात करियर करायचे असते. पण हे प्रत्येकाला साध्य होतेच असे नाही. तरीही ती गोष्ट साध्य झाली नाही, म्हणून तुम्ही निराश होता कामा नये. स्वप्न भंगले म्हणून, निराश व्हायचे नाही. दुसरे स्वप्न पाहायचे असते. ते उद्दिष्ठ ठेवायचे असते. त्यासाठी झटायचे असते. तसे केले तरच या जगात नांदता येईल. नैराश्‍येतून अनेकजण आत्महत्या करतात. इच्छित फळ मिळाले नाही म्हणून आत्महत्या हे गैर आहे. इच्छा करावी आणि ती प्राप्त व्हावी. असे कल्पतरू सध्याच्या जगात साध्य होतेच असे नाही. पण निराश न होता. धीर धरायला हवा. तो सोडता कामा नये. तसा प्रयत्न करायला हवा. त्यातूनच प्रगती होते.


राजेंद्र घोरपडे, 9011087406