Tuesday, December 31, 2019

तैसें होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ।।


सद्‌गुरू भक्ताला आत्मज्ञानाची गोडी लावतात. गुरुकृपेतूनच ही गोडी लागते. गुरूंचा आशीर्वाद यासाठी महत्त्वाचा आहे. गुरूंचा शब्द यासाठीच महत्त्वाचा आहे.

आलिंगिला पूर्णिमा । उणीव सांडी चंद्रमा ।
तैसें होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ।। 969 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - पौर्णिमेने आलिंगलेला चंद्र ज्याप्रमाणे आपल्या स्वरुपांतील कलेचा कमीपणा ठेवीत नाही. त्याप्रमाणे अर्जुना, त्या साधकाला गुरुकृपेने पूर्णत्व प्राप्त होते.

गुरुकृपा म्हणजे काय? ती कशी होते? याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता असते. मला एक गृहस्थ म्हणाला, गुरुकृपेने मला सगळे मिळाले. गुरूंचा शब्द मी पाळला आणि अमाप पैसा मिळाला. माझा अध्यात्मावर विश्‍वासही नव्हता. तसे या युगात अध्यात्मावर विश्‍वास तरी कोण ठेवणार? पण मला गुरुकृपेचा अनुभव आला. गुरूंच्या शब्दाला महत्त्व असते. मला दैनंदिन जीवनात अनेक कटकटी वाटत होत्या. घरगुती समस्यांनी मी त्रस्त झालो होतो. समस्यांच्या गर्तेत अडकल्यानंतरच जनतेला देव आठवतो, तसा मलाही देव आठवला. देवळात जायला लागलो. तेथे नेहमी प्रवचन चालायचे. प्रवचनकार सांगत होते, माऊलीने संसार करत परमार्थ करा, असे सांगितले आहे. संसार सोडण्याचा विचार माझ्या मनात घोळत होता. यासाठीच मी संन्यस्थाचा मार्ग स्वीकारण्याचा विचार करत होतो, पण येथे तर उलटेच सांगितले जात आहे. संसार न सोडता परमार्थ करा, असे सांगितले जाते. हे कसे शक्‍य आहे? मी विचार केला, ठीक आहे. हा ज्ञानेश्‍वरांचा आदेश, गुरूंचा आदेश असे समजून प्रयत्न तरी करून पाहू. संसार होत राहतो. परमार्थ करावा लागतो. संसारात राहायचे, पण त्यात गुरफटायचे नाही. काय हरकत आहे असे करून पाहायला, असे समजून प्रयत्न सुरू ठेवले. घरगुती समस्यांपासून दूर राहिलो. रोजच्या कटकटींचा विचारच सोडून दिला. त्यामुळे झाले काय, संसार सुरू होता, पण त्या संसाराचा त्रास होत नव्हता. कामावर, व्यवसायावर या कटकटींचा परिणाम होत नव्हता. घरच्या नेहमीच्या कटकटी त्याच असतात. त्याकडे कानाडोळा केला. संसार होतच राहिला, पण त्या कटकटींपासून दूर राहिलो. विकास झाला. हातात अमाप पैसा खेळू लागला. आपोआपच संसारात शांती नांदू लागली, पण परमार्थांचा अर्थ अद्याप समजलेला नाही. मोक्ष म्हणजे काय हेही माहीत नाही, पण तरीही संसारात शांती नांदते, याचे समाधान आहे. गुरूंचा आशीर्वाद पाठीशी आहे, असे वाटते. ही गुरूकृपाच आहे. सांगण्याचे ताप्तर्य हेच की, सद्‌गुरू भक्ताला आत्मज्ञानाची गोडी लावतात. गुरुकृपेतूनच ही गोडी लागते. गुरूंचा आशीर्वाद यासाठी महत्त्वाचा आहे. गुरूंचा शब्द यासाठीच महत्त्वाचा आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Sunday, December 29, 2019

आत्महत्येपेक्षा वीरमरण श्रेष्ठ


नैसर्गिक आपत्तीतून, सावकारी पाशातून या आत्महत्या होत आहेत. शोषणामुळेच शेतकरी आत्महत्या करतो आहे. मानवतेच्या धर्माचा प्रसार झाला तर हे शोषण निश्‍चितच थांबेल. 

येर काह्यां मोलें वेंचूनि । विष पियावें घेऊनि ।
आत्महत्येसि निमोनि । जायिजे जेणें ।। 947 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - जें प्याले असतां आत्महत्या करून मरून जावें लागते, असें ते विष द्रव्य खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावे !

धकाधकीच्या जीवनात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जीवनात नैराश्‍य आल्याने, कर्जबाजारीपणाला कंटाळून, अपयश आल्याने आत्महत्या केल्या जात आहेत. त्रासाला कंटाळूनही काही जण आत्महत्या करतात. नव्या पिढीत माणुसकी कमी होत आहे. यातूनच आत्महत्येच्या घटना घडत आहेत. माणसाला आधार देणारा माणूसच राहिलेला नाही. कौटुंबिक जीवनातही वादाचे प्रसंग वाढत आहेत. चंगळवादी संस्कृतीमुळे तर मैत्रीची व्याख्याच बदलली आहे. अशा या युगात मानवता याच धर्माची गरज आहे. त्याचा प्रसार होण्याची गरज आहे. अशी परिस्थिती पूर्वीच्या काळीही होती, पण त्या काळात संतांच्या महान कार्यामुळे यावर प्रतिबंध बसला. सध्याही अशा मानवतेच्या संतांची गरज आहे. सध्या भगवी वस्त्रे घालून धर्माचा प्रसार करणारे अनेक जण दिसतात, पण मानवतेचा गंधही त्यात नसतो. नुसती प्रवचने, सल्ले देऊन हे कार्य होत नाही. यासाठी स्वतः आत्मज्ञानी होण्याची गरज आहे. आत्मज्ञानी संतच हा मानवतेचा धर्म टिकवू शकतात. असा संत प्रत्येक जण होऊ शकतो. जगातील सर्व धर्म हे मानवतेचीच शिकवण देतात. तरीही जगात अशांतता आहे. धर्माधर्मात तेढ निर्माण केली जाते. स्पर्धा लावली जाते. सत्तेच्या हव्यासापायी तंटे लावले जातात. अशा या स्वार्थानेच धर्म बदनाम होत आहे. हुकूमशाहीच्या हव्यासाने अनेकांचे बळी घेतले जातात, पण या हुकूमशहांचा शेवट खूपच वाईट असतो तरीही याची चर्चा होत नाही. हे हुकूमशहा मरताना दयेची याचना करतात, पण त्यांना कोणीही दया दाखवत नाही. काही हुकूमशहांनी तर आत्महत्याच केल्या आहेत. मग त्यांनी अत्याचार तरी केले कशासाठी? दीनदुबळ्यांना दया दाखविली नाही त्यांना कोण दया दाखविणार. हत्या करणारेच आत्महत्या करतात. हाच इतिहास आहे. यातून बोध घ्यायला हवा. यासाठीच तर मानवता धर्माची गरज आहे. देशात सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी गंभीर रूप धारण केले आहे. नैसर्गिक आपत्तीतून, सावकारी पाशातून या आत्महत्या होत आहेत. शोषणामुळेच शेतकरी आत्महत्या करतो आहे. मानवतेच्या धर्माचा प्रसार झाला तर हे शोषण निश्‍चितच थांबेल. आत्महत्या हा प्रकार वाईटच आहे. विष विकत घेण्यासाठीही पैसे लागतात. विष घेऊन मरण्यापेक्षा धाडसाने युद्ध करून, ओढवलेल्या परिस्थितीचा सामना करून वीरासारखे मरावे. अशाने समाजातही मानाचे स्थान मिळू शकेल. आत्महत्या हा काही जीवन संपवण्याचा मार्ग नव्हे. मिळालेले सुंदर जीवन आणखी कसे सुंदर करता येईल यासाठी प्रयत्न हवा. अशा या सुंदर जीवनाचा अर्थ समजून घेऊन जगायला शिकले पाहीजे. तरच हे जीवन अधिक सुंदर होईल.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Tuesday, December 24, 2019

स्वधर्माचे आचरण





मी कोण आहे, याचा शोध घेणे. मी आत्मा आहे. तो आत्मा सर्वांध्ये आहे. सर्वांधील आत्मा समान आहे. तो एक आहे. आत्मा अमर आहे. देह नाशवंत आहे. देहामध्ये तो अडकला आहे. हे जाणणे यासाठी ध्यानधारणा आहे.

अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणी जरी विषमु ।
तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणें ।। 923 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - अरे अर्जुना, आपला धर्म आचरण करण्याच्या बाबतीत जरी कठीण असला, तरी ज्या परिणामानें तो फलद्रूप होईल, त्या परिणामाकडें दृष्टि ठेवावी.

अध्यात्माचा अभ्यास करणाऱ्यांवर नेहमीच टीका होते. पारायणे करून कुठे देव भेटतो का ? पारायणांचा फायदा काय ? संतांच्या मागे लागून वेळ फुकट घालविण्यात काय अर्थ आहे ? ध्यानधारणेत वेळ घालविण्याऐवजी देशसेवा करा, असे विविध सल्ले, प्रश्‍न उपस्थित केले जातात. टीका करणारे नास्तिक आहेत असेही नाही, पण टीका होते. सध्या वेळेला महत्त्व आले आहे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. जग वेगाने बदलत आहे. जागतिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे, तसे माणसाची विश्रांतीही कमी झाली आहे. आराम हराम आहे, पण आराम काही काळ तरी हवा असतो, हे मान्य करायलाही वेळ नाही. नवी पिढी आरामच हरवून बसली आहे. अशा या बदलत्या जगाला देवाचा विचार करायला वेळ कुठे आहे ! देव आहे तर मग दाखवा, नाहीतर तो विचार सोडून द्या, अशी विचारसरणी बनली आहे. अध्यात्म हे थोतांड आहे, असे नव्या पिढीला वाटत आहे. देवाला रिटायर करा असे म्हणणारे, तसे सल्ले देणारेही आज बरेच आहेत. भारतात अनेक थोर संत होऊन गेले. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत, पण ते वाचायला आज नव्या पिढीला वेळच नाही. ते काय आहेत, हे जाणून घेण्याचीही त्यांची इच्छा नाही. ज्यांची इच्छा आहे त्यांतील अनेक जण हे ते केवळ त्यातून पैसा कसा मिळवता येतोय, याचाच विचार करतात. देशातील महान आध्यात्मिक ग्रंथांवर टीका होत आहे. देशातीलच नागरिक त्यावर टीका करत आहेत. वेळ असणाऱ्या मंडळींनी मांडलेले शास्त्र, वेळ घालविण्यासाठी मांडलेले सिद्धांत आहेत, असे म्हटले जात आहे. टीका करणारे परके नाहीत. देशीच आहेत. असे का? तर या स्वधर्माचे आचरणच थोडे विषम आहे. झटपट निकाल यात लागत नाही. पूर्वी एकदिवसीय सामना 60 षटकांचा असायचा. नंतरच्या काळात तो 50 षटकांवर आला. पुढे पुढे 45 षटकेच खेळली जाऊ लागली. आता ट्‌वेंटी ट्‌वेंटी सामने खेळले जात आहेत. झटपट निकाल लागला पाहिजे. कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर लगेच मिळायला हवे. लाभ झटपट मिळायला हवा. हुशारीची व्याख्याही बदलली आहे. गुण मिळविणारे हुशार. मग ते कसेही मिळविलेले असोत. पाठांतर करून, घोकमपट्टी करून आजकाल हुशार होता येते. गुणांवर हुशारी तोलली जात आहे. अशाने नव्या पिढीतील चिंतन, मनन वृत्तीच नष्ट होत आहे. ती क्षमताही राहिलेली नाही. विचार करण्याची वृत्तीच नाही, तर मग नवाविचार ते मांडू कसे शकतील. नवा विचारच त्यांच्या उत्पन्न होत नाही. पैसा कमविणे हेच उद्दिष्ट झाले आहे. अशा या विचारसरणीत स्वधर्माचे पालन करण्यात अडचणी येत आहेत. व्यापारी वृत्तीने अध्यात्माचा विचारच संपवला आहे. विश्‍वास, श्रद्धा, भक्तीवर आधारलेले अध्यात्म आता दिसेनासे झाले आहे. मतांच्या पेट्यांसाठी रथ यात्रा काढली जाते. उत्सव भरवले जातात. पैसा मिळतो म्हणून देवधर्म केला जातो. दानही पैसा अधिक मिळावा यासाठीच केले जाते. फळाची अपेक्षा ठेवून कर्म केले जात आहे. अशा विचारांनी मग विकास खुंटतो हेच मुळी लक्षात येत नाही. काही वर्षापूर्वी प्रसिद्ध असणारी वृत्तपत्रे आज अडचणीत दिसत आहेत. काही तर बंदच पडली आहेत. कारण मात्र एकच आहे. त्यांनी बदलत्या काळाला ओळखले नाही. बदलत्या काळाचा विचारच केला नाही. बदलत्या जगासोबत जाण्याची वृत्तीच त्यांच्यात नव्हती. कारण तसा विचार करण्याची वृत्तीच त्यांच्यात नव्हती. अध्यात्म बदलत्या काळात कसे वागायचे हे शिकवते. एखाद्या गोष्टींचे चिंतन, मनन करावे हे अध्यात्म शिकवते. चिंतन, मनन केल्याने विकास होतो. पण हा विचार त्यांना पटला नाही. त्यांच्यात रुळला नाही. ते विकास करू शकलेच नाहीत. पत्रकारिता हा व्यवसाय आहे. हाच विचार त्यांनी मनात ठेवला. सेवा हा व्यवसाय होऊ शकत नाही. सेवेचा विचार वेगळा. व्यवसायाचा विचार वेगळा. सेवेत व्यवसाय आला की मग विचाराचा व्यापार होतो. सेवेचा विचार त्यात राहात नाही. अशानेच मग वृत्तपत्रातील जागा विकत घेण्याचे प्रकार घडत आहेत. विकतच्या बातम्यांनी विचार विकला जात आहे. तेथे सेवाभाव राहिलाच नाही. सामाजिक बांधिलकी मग अशा ठिकाणी कशी राहील. राहिली तरी त्यावर समाज विश्‍वास कसा ठेवेल. हेच मुळी त्यांना समजत नाही. अशाने हा व्यवसाय आता अडचणीत येत आहे. अध्यात्म ही सुद्धा एक सेवा आहे. त्यात सेवाभावच हवा. अध्यात्म हा व्यवसाय नाही. यासाठी अध्यात्माचा धर्म जोपासायला हवा. त्यासाठी तो समजून घ्यायला हवा. अध्यात्मातील स्वधर्माचा विसर पडला आहे. स्वधर्म म्हणजे स्वतःचे अस्तित्व स्वतःच जाणणे. मी कोण आहे, याचा शोध घेणे. मी आत्मा आहे. तो आत्मा सर्वांध्ये आहे. सर्वांधील आत्मा समान आहे. तो एक आहे. आत्मा अमर आहे. देह नाशवंत आहे. देहामध्ये तो अडकला आहे. हे जाणणे यासाठी ध्यानधारणा आहे. यातून सुख, शांती, समाधान मिळते. यातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. यासाठी याचे आचरण करणे गरजेचे आहे. आत्मज्ञानाचे फळ निश्‍चितच मिळते. म्हणूनच तर ही गुरूशिष्य परंपरा आजही अखंड सुरू आहे.




Monday, December 23, 2019

तैसें स्वामीचिया मनोभाव । न चुकिजे हेचि परमसेवा ।


अध्यात्माचा अभ्यास केला पाहिजे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्‍यक असणारी साधना केली पाहिजे. हीच खरी भक्ती आहे. हीच खरी सेवा आहे.
- राजेंद्र घोरपडे

तैसें स्वामीचिया मनोभाव । न चुकिजे हेचि परमसेवा ।
येर तें गा पांडवा । वाणिज्य करणें ।। 913 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - त्याप्रमाणें मालकाच्या इच्छेप्रमाणें करण्यास न चुकणें हीच त्याची श्रेष्ठ सेवा होय. त्यावांचून दुसरें कांही करणें, म्हणजे अर्जुना, तो केवळ व्यापार होय.

सद्‌गुरू मनकवडे असतात. ते भक्ताच्या मनातील भाव ओळखतात. आत्मज्ञानी संत त्यानुसार भक्ताला मार्गदर्शन करतात. आधार देतात. भक्ताची आध्यात्मिक प्रगती करतात, पण अशा आत्मज्ञानी सद्‌गुरूंचा मनोभाव ओळखणार कसा? सद्‌गुरूंच्या मनातील भाव ओळखून त्यानुसार त्यांची सेवा करणे, हीच खरी परमसेवा आहे. खरा शिष्य सद्‌गुरूंच्या मनातील भाव ओळखू शकतो. त्यानुसार त्यांची सेवा करतो. आत्मज्ञानी संतांना शिष्याकडून फक्त पान, फूल, फळ याचीच अपेक्षा असते. स्वच्छ अंतःकरणाने दिले तरच ते त्याचा स्वीकार करतात; पण हल्ली संतांना आणि देवस्थानांना देणग्या देण्याची चढाओढ प्रचंड सुरू आहे. काही समाजात तर पूजेचे मान मिळविण्यासाठी लिलावही आयोजित केले जातात. विशेष म्हणजे लाखो, कोटी रुपये खर्चून ही सेवा केली जाते. देवाला जर फक्त पान, फूल, फळ हेच लागते तर ही जडजवाहिरे, धनसंपत्ती दान का केली जाते? दान दिल्या जाणाऱ्या संपत्तीमध्ये काळ्या पैशाचे प्रमाण अधिक आहे. मुळात ही संपत्ती गैरमार्गाने कमविली जाते आणि ती पचनी पडण्यासाठी देवाला दान दिले जाते. हे कसले दान? खरे दान, खरी सेवा ही यामध्ये नाहीच. अशा प्रकारामुळेच अध्यात्माची चौकट बदनाम होत आहे. या अपप्रचारामुळेच धर्मावर शिंतोडे ओढले जात आहेत. खरे तर धर्मामध्ये याला सेवा म्हटलेले नाही. हा तर व्यापार आहे. यासाठी सेवेचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे.अध्यात्माचा अभ्यास केला पाहिजे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्‍यक असणारी साधना केली पाहिजे. हीच खरी भक्ती आहे. हीच खरी सेवा आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Saturday, December 21, 2019

आदित्याचीं झाडें । सदा सन्मुख सूर्याकडे ।




आत्मज्ञान प्राप्तीसाठीही मनाची तयारी करावी, असावी लागते. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. मन स्थिर झाले की ने चुकत नाही. लक्ष्य साध्य होते. यासाठी मनावर नियंत्रण मिळवायला हवे. आदित्याच्या झाडाप्रमाणे मनालाही सामर्थवान केले पाहीजे. 
- राजेंद्र घोरपडे

आदित्याचीं झाडें । सदा सन्मुख सूर्याकडे ।
तेवीं समोर शत्रूपुढें । होणें सदा ।। 865 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सूर्याकडे सदा सन्मुख असतात, त्याप्रमाणे शत्रूपुढें नेहमी समोर होणें ( शत्रुला कधी पाठ न दाखविणे )

सुर्यफूल नेहमी सूर्याकडे तोंड करून उभे असते. सूर्याच्या धगीला ते घाबरत नाही. क्षत्रियाचे हे एक लक्षण आहे, पण सध्याच्या युगात हा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा. न भिता, न डगमगता, न घाबरता शत्रूचा सामना करायला हवा. नुसते ताठ उभे राहिले तरी शत्रूची पळता भुई थोडी होते, हे लक्षात घ्यावे. अंगात असा ताठर बाणा हवा. घरात कुत्रा असेल तर त्या घरात जायला आपण घाबरतो. कुत्रे काहीही करत नाही तरीही भीती असते. ते अंगावर येईल का? ते चावेल का? ते भुंकेल का? असे नाना विचार डोक्‍यात घोळत असतात. कुत्रे फक्त उभे राहिले तरी समोर जायला भीती वाटते. ते नुसते पाहात असते, पण समोर जाण्याचे धाडस होत नाही, इतकी दहशत कुत्रा निर्माण करतो. कुत्र्याचा ताठरपणा इतका प्रभावी असतो. त्याच्या या व्यक्तिविशेषामुळेच तो घरात पाळतात. घराचे संरक्षण तो करतो. चोरांच्या आहटाने कुत्रा भुंकतो. मालकाला जाग येते. चोरी होण्यापासून संरक्षण होते. शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी भुजगावणे उभारतो. भुजगावण्यामुळे पक्षी दूर पळतात. धाटातील दाण्यांचे सरक्षण होते. पक्षी शेतात कोणी तरी उभे आहे असे समजून तेथे जात नाहीत. इतका या भुजगावण्याचा प्रभाव आहे. यातून एकच समजते की मनाची तयारी हवी. मन खचता कामा नये. मानसिक धैर्य हे महत्त्वाचे आहे. आजार हा माणसाचा शत्रू आहे. मग तो कोणताही असो. सध्याच्या युगात अनेक मानसिक आजार माणसाला जडले आहेत. आजारपणात धीर हेच मोठे औषध आहे. धीर खचला तर आजारपणातून बाहेर येणे कठीण होते. धीर खचता कामा नये. आजाराचा सामना खंबीरपणे करायला हवा, धैर्याने सामोरे जायला हवे. जो घाबरला तो संपला. भीती मनात उत्पन्न होते. यासाठी मन खंबीर असायला हवे. मन खचू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मनावरच सगळे अवलंबून आहे. मनात आले तर सर्व काही साध्य करता येते. मनात आले तर जगही जिंकता येते. यासाठी मनाची तशी तयारी करायला हवी. आत्मज्ञान प्राप्तीसाठीही मनाची तयारी करावी, असावी लागते. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. मन स्थिर झाले की ने चुकत नाही. लक्ष्य साध्य होते. यासाठी मनावर नियंत्रण मिळवायला हवे. आदित्याच्या झाडाप्रमाणे मनालाही सामर्थवान केले पाहीजे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Wednesday, December 18, 2019

राजेशाही





लोकप्रतिनिधींनी नुसता राजाच्या रुबाबाचा जरी आदर्श घेतला तरी जनता धन्य होईल. देशातील भ्रष्टाचार नष्ट होईल. लोकप्रतिनिधींनी राजेशाहीच्या व्याख्याच बदलून टाकल्या आहेत, पण व्याख्या बदलून तो आदर्श नष्ट करता येत नाही. तो विचार कधीही नष्ट होत नाही. राजेशाही ही श्रेष्ठच आहे.

आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडंव होये ।
कां राक्षसां दिवो पाहे । राति होऊनी ।। 724 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - आणि राजा ज्या वाटेनें जातो ती वाट चोराला अडचणीचें ठिकाण होते. अथवा राक्षसांना दिवस उजाडला असतां ती रात्र आहे, असें वाटतें.

सध्या लोकशाही आहे. राजेशाही पूर्वी होती. राजेशाहीत राजा तसे लोकशाहीत लोकप्रतिनिधी आहेत. राजेशाहीत भ्रष्टाचारी राजाचे शासन जनता उलथून पाडत असे. जनतेने राजाच्या विरोधात विद्रोह केल्याच्या अनेक घटना इतिहासात घडल्या आहेत. लोकशाहीत भ्रष्ट लोकप्रतिनिधींचा पराभव करण्याचा अधिकार जनतेला दिला आहे. सध्याचे लोकप्रतिनिधी हे आजचे सरदार व मंत्री आहेत, असे म्हणायला काहीच हरकत नसावी; पण विचार केला तर राजेशाहीत जनता जितकी सुखी होती तितकी लोकशाहीत निश्‍चितच नाही. लोकशाहीची गरज आहे. लोकशाहीत स्वातंत्र्य आहे. सर्वांचा विचार यामध्ये आहे, पण लोकप्रतिनिधींनी सामर्थ्यवान राजाच्या गुणांचा, आदर्शांचा वारसा जपायला हवा. केवळ सत्ता आली की ऐश्‍वर्य, स्वतःचे घर भरायचे. उलट राजेशाहीत राजांनी काय केले? त्यांनी सत्तेचा भोग घेतला, स्वतःचे राजवाडे भरले, असे सांगून त्यांचाच हा आदर्श आहे हे पटवून देण्यातही हे लोकप्रतिनिधी मागे नाहीत; पण प्रत्यक्षात राजेशाहीचा अर्थ तसा नाही. सामर्थ्यवान राजाचा प्रभाव काय होता, हे ज्ञानेश्‍वरांनी एका ओवीतच सांगितले आहे. राजाची दहशत काय असते, हे यातून स्पष्ट होते. राजा ज्या वाटेने जातो त्या वाटेवर जायलाही चोर घाबरतो. चोराचे धाडसही होत नसते, इतकी दहशत त्यांच्यामध्ये होती. मग सध्याच्या लोकप्रतिनिधींची अशी दहशत आहे का? ती का नाही? उलट लोकप्रतिनिधीच चोरांना सोडवायला पोलिस ठाण्यात दाखल होतात, असे आजचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींच्या सभेतच चोरीच्या अनेक घटना घडतात. लोकप्रतिनिधींच्या वाटेवर जायला आजची जनताच घाबरते आहे. यामुळेच सभेला पैसे देऊन जनता गोळा करावी लागते. चोरावर धाक असणाऱ्या राजाचा रुबाब काय असेल, याची कल्पनाही या लोकप्रतिनिधींना करवत नाही. लोकप्रतिनिधींनी नुसता राजाच्या रुबाबाचा जरी आदर्श घेतला तरी जनता धन्य होईल. देशातील भ्रष्टाचार नष्ट होईल. लोकप्रतिनिधींनी राजेशाहीच्या व्याख्याच बदलून टाकल्या आहेत, पण व्याख्या बदलून तो आदर्श नष्ट करता येत नाही. तो विचार कधीही नष्ट होत नाही. राजेशाही ही श्रेष्ठच आहे. अशा श्रेष्ठ राजांचा आदर्श हा जपायलाच हवा. त्यांचे गुण हे अंगी बाणवायलाच हवेत.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Monday, December 16, 2019

भक्तीचा महिमा





देवाने नृसिंह अवतार प्रल्हादासाठी घेतला. मग यासाठी भक्त प्रल्हाद असावा लागतो. यासाठी प्रल्हाद व्हायला हवे. सर्वच जण हिरण्यकश्‍यपू झाले, तर सर्वत्र राक्षसांचेच राज्य येईल. या राज्यात प्रल्हादाची कमतरता जाणवते आहे, पण प्रत्यक्षात प्रल्हाद हा प्रत्येकात आहे. 
- राजेंद्र घोरपडे


भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ तें तेंचि होत जाये ।
तो मी तुझे जाहालो आहें । खेळणें आजि ।। 284 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - भक्त ज्या भावनेनें जेथें पाहील, त्या भावनेप्रमाणे मी तेथे तसा होत जातों, असा तो मी, तो आज तुझ्या पूर्ण स्वाधीन झालो आहे.

इतिहासातील अनेक गोष्टी आपणास पटत नाहीत. त्यावर विश्‍वास ठेवण्याऐवजी अविश्‍वास व वादग्रस्तपणाच अधिक वाढविला जात आहे. अर्जुनाच्या रथाचे सारथी भगवान कृष्ण होते. गोरा कुंभाराची मडकी स्वतः विठ्ठलाने वळली, तर बहिणाबाईंना जात्यावर पीठ दळायलाही त्याने मदत केली. भक्ताची भक्ती इतकी महान आहे, की येथे चक्क भगवंत त्याच्या मदतीला धावून येतो. भक्ताला त्याच्या प्रत्येक कामात सहकार्य करतो, पण सध्याच्या युगाला या गोष्टी पटणाऱ्या नाहीत.हे कसे शक्‍य आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो. इतिहासात एक गोष्ट मात्र चांगली आहे. रचनाशास्त्रात मात्र या नव्या पिढीचा पराभव होतो. जगातील अनेक मंदिरे, वास्तू अशा आहेत की त्या बांधल्याच गेल्या कशा, यावर विश्‍वास बसत नाही. आहे ना गंत! होतो ना येथे पराभव! नव्या पिढीला उच्च तंत्रज्ञानाचा अहंकार चढला आहे, पण त्या काळात यापेक्षाही प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वात होते, हे मात्र मान्य करावेच लागते. थोडा विचार केला तर या भक्तीच्या गोष्टीही मनाला पटू शकतील. शास्त्राच्या आधारावर बोट ठेवून चालणारी नवी पिढी सिद्धांतावर विश्‍वास ठेवते. त्यांना तो सिद्धांत सिद्ध करून दाखविला तरच त्यावर विश्‍वास बसतो. अध्यात्मही अनुभूतीवर चालते. अनुभूती आल्यावरच अध्यात्मावर विश्‍वास बसतो. अन्यथा देवाचे अस्तित्वच नाही, अशा भ्रामक कल्पनेत तो वावरतो. देवाचे अस्तित्व आता नव्या पिढीला कसे पटणार? आणि नवी पिढी पटले तरच स्वीकारणार. प्रल्हादासाठी देव खांबात प्रकटला. त्याने नृसिंह अवतार घेतला. आता नव्या पिढीला असा नृसिंह अवतार झाला तरच तो पटणार आहे, इतकी ही पिढी पुढे गेली आहे. देवाने नृसिंह अवतार प्रल्हादासाठी घेतला. मग यासाठी भक्त प्रल्हाद असावा लागतो. यासाठी प्रल्हाद व्हायला हवे. सर्वच जण हिरण्यकश्‍यपू झाले, तर सर्वत्र राक्षसांचेच राज्य येईल. या राज्यात प्रल्हादाची कमतरता जाणवते आहे, पण प्रत्यक्षात प्रल्हाद हा प्रत्येकात आहे. हिरण्यकश्‍यपूच्या अहंकाराने त्याचे अस्तित्व झाकले जात आहे. प्रत्येकाच्या मनातच प्रल्हाद दडला आहे. त्याचे अस्तित्व नित्य आहे. फक्त त्याची जागृती जाणवायला हवी. मनातच त्याचे अस्तित्व जागृत करायला हवे. यासाठी त्याची अनुभूती यायला हवी. मग आपोआपच विश्‍वास बसेल.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।



Sunday, December 15, 2019

आळसाचाच आळस करायला शिका





आळसाचाच आळस करायला हवा. म्हणजे आळस कधी येणार नाही. आळसाचा त्याग करण्यासाठी चांगल्या गोष्टींची संगत धरायला हवी. 
- राजेंद्र घोरपडे

मनशुद्धीचां मार्गी। जैं विजयी व्हावे वेगीं ।।
तैं कर्म सबळालागीं । आळसु न कीजे ।। 139 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - मनाची शुद्धता होण्याच्या मार्गांत आपण लवकरच विजयी व्हावें असे वाटत असेल, तर चित्त शुद्ध करण्याच्या कामी समर्थ असणारे जे कर्म ते आचरण करण्याच्या कामी आळस करूं नये.

एखाद्या गोष्टीत विजयी व्हावे अशी जर इच्छा असेल तर ती गोष्ट मनापासून करायला हवी. ती करताना आळस करून चालणार नाही. नाहीतर विजय हस्तगत करता येणार नाही. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळसामुळे माणूस संपतो. राज्ये बरखास्त होतात. सीमेवर पहारा देणारा सैनिक जर आळशी असेल तर राज्य कसे टिकेल? परीक्षेच्या काळात विद्यार्थ्याने आळस केला तर काय होईल? आळस केल्यावर गुणाची अपेक्षा तरी कशी धरता येईल? यासाठी कामात आळस हा असताच कामा नये. आळस करून विजयाची अपेक्षा ठेवणे चूक आहे. विजयी व्हायचे असेल तर प्रथम आळस हा झटकायलाच हवा. तलवार जर तशीच ठेवली तर तिला गंज चढतो. तिची धार कमी होते. भाजी चिरायच्या विळतीचेही तसेच आहे. वापर नाही केला तर तिचीही धार कमी होते. गंजामुळे धार जाते. जीवनाचेही तसेच आहे. आळस, कंटाळा केला तर त्यालाही गंज चढतो. जीवनाची धार कमी होते. धार येण्यासाठी नियमितपणा हवा. रोजच्या वापरात असणाऱ्या विळीला चांगली धार असते. भाज्या कापून कापून तिचा धारधारपणा वाढतो. दररोज फरशी पुसली तर तिची जशी चकाकी वाढते तसे जीवनात कंटाळा घालवला तर नेहमीच ताचेतवाने राहता येते. मन प्रसन्न ठेवता येते. आळस हा मनातच असतो. तो घालविण्यासाठी मनाची शुद्धता गरजेची आहे. आध्यात्मिक वाचनातून, पारायणातून मनाला शुद्धता येते. या शुद्धतेनेच धार चढते. कर्माने त्रास होतो म्हणून त्याचा कंटाळा करणे योग्य नाही. नोकरीत त्रास होतो म्हणून नोकरी सोडून कसे चालेल? हा त्रास सोसायलाच हवा. आपण याकडे आळसाने पाहिले तर आपलेच नुकसान होणार आहे. आळस झटकायला हवा. आळस माणसाला संपवतो. तो कधीही संपत नाही. यासाठी आळसाचाच आळस करायला हवा. म्हणजे आळस कधी येणार नाही. आळसाचा त्याग करण्यासाठी चांगल्या गोष्टींची संगत धरायला हवी.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Saturday, December 14, 2019

खरा धर्म


दुसऱ्याविषयी दया, माया, प्रेम, जिव्हाळा वाटणे हा धर्म आहे. प्राण्यांनाही हा धर्म समजतो, पण मनुष्यास समजत नाही. गाईजवळ मेलेले वासरू जरी नेऊन सोडले तरी तिच्यासाठी तिचा पान्हा फुटतो. वासरू जिवंत आहे की मृत याचा ती विचार करत नाही, इतके प्रेम, माया गायीमध्ये असते.
- राजेंद्र घोरपडे


पैं वासरूवाचा भोंकसा । गाईपुढे ठेवू जैसा ।
उगाणा घेती क्षीररसा । बुद्धिवंत ।। 386 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - ज्या प्रमाणे हिकमती लोक वासरू मेलेल्या दुभत्या गायीच्या पुढे मेलेल्या वासराचा भोत ठेवून तिच्या कासेंत असेल नसेल तेवढ्या दुधाचा झाडा घेतात.

हुशार मंडळी ही एखादे आमिष दाखवून आपला कार्यभाग साधण्यात पटाईत असतात. युद्धात शत्रूची चाल जाणून घेण्यासाठी हेरांना आमिषे देऊन बातम्या काढून घेतल्या जातात. सुरक्षा अधिकाऱ्यांनाही लाच देऊन फितूर केले जाते; पण हे कार्य सर्वांनाच साधता येते, असे नाही. ही एक कला आहे. बोलण्याची ही पद्धत अवगत करून घ्यावी लागते. तसे अशी कामे करणारी माणसे ही वेगळ्याच पद्धतीची असतात. सर्वांनाच हे जमत नाही. काही माणसे ही सरळ मार्गी असतात. काही माणसे वाकड्या चालीची असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. सरळ मार्गाने सर्वच गोष्टी साध्य करता येतात, असे नाही. जीवनात काही गोष्टी साध्य करण्यासाठी वाकडे मार्ग सुद्धा स्वीकारावे लागतातच. लोण्याच्या गोळ्यातून लोणी काढताना बोट सरळ ठेवून चालत  नाही. ते वाकडे करावेच लागते. सरळ बोट ठेवून लोणी काढण्याचा प्रयत्न असफलच होणार. बोट वाकडे केले तरच लोणी मिळू शकेल. यासाठीच वाकड्या वाटांचा वापर योग्य कामासाठी करायला हवा. तसे सर्वच वाकडे मार्ग योग्य असतात, असे नाही; पण एखादे चांगले काम यशस्वी करण्यासाठी वाकड्या वाटेचा अवलंब केला, तर तो अधर्म होत नाही. खरे तर प्राप्त परिस्थितीत जे आवश्‍यक कर्म केले जाते यालाच धर्म असे म्हटले जाते. चांगल्या गोष्टीसाठी एखादे वाईट कर्म करावे लागले तर तो अधर्म होत नाही. माणसाने परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करायला हवेत. हाच त्याचा धर्म आहे. एकदा एक शाकाहारी मनुष्य जंगलात वाट चुकला. त्याला रस्ता सापडेना. तो भटकत राहिला. खायला काहीही मिळाले नाही. शेवटी त्याला एक झोपडी दिसली एक म्हातारी त्यामध्ये राहात होती. भुकेने व्याकुळ झालेला हा शाकाहारी मनुष्य या म्हातारीच्या झोपडीत गेला आणि त्याने ह्या म्हातारीकडे भोजनासाठी याचना केली. ही म्हातारी कोंबड्या पाळत होती व कोंबड्यांची अंडी खाऊन ती जीवन जगत होती. त्या मनुष्याला अंडी देण्याशिवाय तिच्याकडे काहीच नव्हते. वेळ रात्रीची होती, त्यामुळे शेतात जाऊन भाजी तोडून आणणेही शक्‍य नव्हते. भुकेने व्याकुळ झालेल्या, थकलेल्या मनुष्यास काही तरी खाणे आवश्‍यक होते. उपाशीपोटी राहून शरीराला त्रास देणे योग्य नव्हते, पण या परिस्थितीत उपाशी तरी किती दिवस राहणार? अशा परिस्थितीत त्याने त्याचे शाकाहारी व्रत तोडणे आवश्‍यक आहे. यामुळे त्याचा धर्म भ्रष्ट होत नाही. प्राप्त परिस्थितीत त्याने भोजन करणे हे महत्त्वाचे आहे. ते शाकाहारी आहे, की मांसाहारी हे महत्त्वाचे नाही. स्वतःचे जीवन संपविण्याऐवजी त्याने अंडी खाऊन स्वतःचे प्राण वाचविणे हाच त्याचा खरा धर्म आहे. ही हिंसा नाही. परिस्थितीनुसार स्वीकारलेला तो मार्ग आहे. पर्याय आहे. दुसऱ्याविषयी दया, माया, प्रेम, जिव्हाळा वाटणे हा धर्म आहे. प्राण्यांनाही हा धर्म समजतो, पण मनुष्यास समजत नाही. गाईजवळ मेलेले वासरू जरी नेऊन सोडले तरी तिच्यासाठी तिचा पान्हा फुटतो. वासरू जिवंत आहे की मृत याचा ती विचार करत नाही, इतके प्रेम, माया गायीमध्ये असते. तिला त्या वासरूची काळजी वाटते. त्याला पाजविणे, त्याची भूक शमविणे यातच त्या गायीला आनंद वाटतो. हिंदू धर्मात गायीला देवता माणले जाते. कारण त्या गायीपासून घेण्यासारखे काही गुण आहेत. ते दैवीगुण मानव जातीने आत्मसात करावेत, हा त्या मागचा उद्देश आहे; पण तसे होत नाही. दयेचा, मायेचा गुण हा जनावरांध्ये आहे, पण माणसाला त्याची दया, माया वाटत नाही. जनावरांवर प्रेम केले तर ती सुद्धा कठीण प्रसंगी आधार देतात. मानवता धर्म मनुष्याने पाळायला हवा. प्रेमाने जग जिंकता येते. यासाठी दुसऱ्यावर प्रेमाचा वर्षाव करायला हवा. प्रेमाने दुखावलेले अनेक जण राग विसरून जाऊ शकतात. मनुष्य मात्र काही विचित्र नियमात अडकून स्वतःच त्रागा करत बसतो. हे योग्य नाही. खरा धर्म माणसाने ओळखायला हवा. अहिंसेचा खरा धर्म ओळखायला हवा.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Friday, December 13, 2019

धनलोभी


पैशाचा मोह माणसाला संपवितो. हा मोह सुटला की मग समाधानच समाधान. या समाधानातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. 
- राजेंद्र घोरपडे

ऐसेनि धना विश्‍वाचिया । मीचि होईन स्वामिया ।
दिठी पडे तया । उरों नेदी ।। 351 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - अशा रितीने विश्‍वाच्या धनाला मी एकटाच मालक होईन मग माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल, त्याला मी शिल्लक ठेवणार नाही.

पैसा हा सध्याच्या नव्या युगाची अत्यावश्‍यक गोष्ट आहे. पैसा असेल तर सर्व काही सुलभ होते. पैशाशिवाय आज माणसाला काहीच किंमत नाही. यामुळे प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत आहे. या धनाच्या लोभातूनच अनेक प्रश्‍न उत्पन्न होत आहेत. खून, मारामाऱ्या तर आजकाल नेहमीच्याच घटना झाल्या आहेत. तसे पूर्वीच्या काळीही ह्या समस्या होत्या. राजेशाहीत स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी, वाढविण्यासाठी लढाया होत होत्या. सारा कोणी वसूल करायचा, यातून वाद होत होते. पैशासाठीच ह्या लढाया झाल्या. सध्या तर कोणताही कामधंदा न करणारे गुंड लोकांकडून हप्ते वसूल करून स्वतःचे गुंडगिरीचे साम्राज्य प्रस्थापित करत आहेत. पैशाच्या लोभानेच हे साम्राज्य उभे राहात आहे. चंगळवादातून गुन्हेगारी वाढत आहे. यामध्ये अशिक्षित आहेत असे नाही, तर सुशिक्षितांचीच संख्या अधिक आहे. अनेक शिकली सवरलेली माणसेच हे काम करत आहेत. राजकीय नेते तर ही माया जमविण्यासाठी रोज नवनव्या युक्‍त्या शोधतात. त्याचा अवलंब करतात. योजना राबविण्यापेक्षा त्यातून किती माया आपणास जमा करता येते, यावरच त्यांचा भर अधिक असतो. अशा योजनांसाठी ते दिल्ली वाऱ्या, मंत्रालयाचे खेटे मारतात. योजनेचा पैसा लाटण्यातच त्यांना अधिक रस वाटतो. पैसा कमविण्यात मठ, मंदिरेही मागे नाहीत. अशाने अध्यात्माचा खरा अर्थच नष्ट झाला आहे. अनेक साधूंनी वैराग्याच्या नावाखाली भली मोठी माया जमविलेल्याची अनेक उदाहरणे आहेत. सर्वाधिक पैसा कमविणारे देवस्थान सर्वाधिक श्रेष्ठ समजले जाते. हा बदललेल्या समाजाचा आरसा आहे. उलट अशा पद्धतीने अध्यात्मातही बदल करायला हवेत, असे तत्त्वज्ञानही ही मंडळी सांगत आहेत. पैसा हेच वर्चस्व आहे, असा ग्रह त्यांचा झाला आहे. पैशाने
सारे जग जिंकता येते, असे त्यांना वाटते; पण समाधान जिंकता येत नाही, हे परखड सत्य आहे. पैशाचा मोह माणसाला संपवितो. हा मोह सुटला की मग समाधानच समाधान. या समाधानातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Wednesday, December 11, 2019

अती तेथे माती


मानवाचा श्‍वासोच्छ्वासही नैसर्गिक आहे. साधनेने याची अनुभूती येते. त्या नैसर्गिक शक्तीची जाणीव होते. ती नैसर्गिक शक्ती आपल्यामध्येही आहे, याचा अनुभव होतो. यासाठी साधना ही करायला हवी. 
- राजेंद्र घोरपडे

कारण जें जीविता । तें वानिलें जरी सेवितां ।
तरी अन्नचि पंडुसुता । होय विंष ।। 221 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, जगण्याला कारण जें अन्न, तें खात असतांना वर्णन करून वाजवीपेक्षां जास्त खाल्लें असतां, तें अन्न विषासारखें मारक होते.

कोणतीही गोष्ट अती केली की त्याचे दुष्परिणाम हे भोगावेच लागतात. जेवण सुद्धा प्रमाणातच जेवायला हवे. अन्यथा अपचन होते. अती अभ्यासामुळे परीक्षेत नापास झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. पिकांना रासायनिक खत अधिक दिल्यास पिके जळून जातात. पाणी अधिक दिल्यास पिकांची वाढ खुंटते. यासाठी कोणतीही गोष्ट प्रमाणातच असायला हवी. प्रत्येकात चांगले तसेच वाईट गुण हे आहेतच. निसर्गाची ती देणगीच आहे, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा व्हायला नको. निसर्गाचे नियम हे तोडता येत नाहीत. निसर्गापुढे मनुष्य काहीही करू शकत नाही. शोध कितीही लागले, प्रगती कितीही केली तरी निसर्गाच्या शक्तीशी वैर करून चालत नाही. त्या शक्तीचा योग्य उपयोग करून घ्यायला शिकले पाहिजे. पाऊस पडतो, पण या पडणाऱ्या पावसाचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा. कधी पाऊस अधिक पडतो, तर कधी पडतच नाही, पण पडणाऱ्या पावसाचा थेंब अन्‌ थेंब हा मातीत जिरवायला हवा. तो साठवता यायला हवा. नैसर्गिक पावसावरच आपले जीवन अवलंबून आहे. तो ठेवा जपायला हवा. पावसाचे प्रमाण कमी  - अधीक होत आहे. याची कारणे शोधायला हवीत. तेथील वृक्षसंपदा जपायला हवी. जगाचे तापमान वाढत आहे. ते का वाढत आहे,या मागची कारणे शोधायला हवीत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण वाढत आहे. ते रोखायला हवे. निसर्गाच्या नियमांचा आपल्या जीवनात लाभ उठवता यायला हवा. निसर्गाच्या प्रकोपालाही मानवी चुका तितक्‍याच कारणीभूत आहेत, हे विसरता कामा नये. मानवी चुकात सुधारणा व्हायला हवी. निसर्गाच्या नियमांचे पालन हे करायलाच हवे. मानवाचा श्‍वासोच्छ्वासही नैसर्गिक आहे. साधनेने याची अनुभूती येते. त्या नैसर्गिक शक्तीची जाणीव होते. ती नैसर्गिक शक्ती आपल्यामध्येही आहे, याचा अनुभव होतो. यासाठी साधना ही करायला हवी. आत्मज्ञानप्राप्तीसाठी साधना करायला हवी.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Tuesday, December 10, 2019

आध्यात्मिक तेज

वेग वाढला म्हणून पृथ्वीचा फिरण्याचा वेग काही वाढलेला नाही. तो स्थिर आहे. यासाठी हृदयाचे ठोकेही स्थिर ठेवणे आवश्‍यक आहे. ते वाढले तर हृदयविकाराचा झटका बसू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. हे स्थिर ठेवण्यासाठीच शरीराला स्थिरतेची गरज आहे. ही स्थिरता योगातून येते. आध्यात्मिक विचारातून येते.
- राजेंद्र घोरपडे

ऐसें ईश्‍वराकडे निज । धावें आपसया सहज ।
तया नावं तेज । आध्यात्मिक तें ।। 189 ।। अध्यात्म 16 वा

ओवीचा अर्थ - अशा प्रकारे परमेश्‍वराकडे अंतःकरण सहज आपोआप धांव घेते, त्याला आध्यात्मिक तेज म्हणतात.

जपानमध्ये त्सुनामी आली. ही दृश्‍ये पाहताना निसर्गाचा कोप काय असतो, हे स्पष्ट दिसते. अशा प्रसंगामुळे आपणास देवाची आठवण जरूर होते. ठेच लागल्यावर आईची आठवण होते, तोंडातून अगदी सहजपणे आई गं.. असे शब्द बाहेर पडतात. एकंदरीत, संकटाच्या काळात देवाची आठवण होते. इतर वेळी देवाची आठवण होत नाही. भीतीमुळे आपण देवाकडे वळतो. आधाराची गरज वाटते, पण प्रत्यक्षात अध्यात्मात असे काही नाही. नित्य देवाचे स्मरण करावे. आनंदी राहावे. विधिलिखित आहे ते टाळता येत नाही. घडणारे घडतच राहणार. प्राप्त परिस्थितीत आनंदी कसे राहता येईल व दुसऱ्यांना कसे आनंदी ठेवता येईल, हेच महत्त्वाचे आहे. नव्या पिढीमध्ये देवाचा ओढा फारसा दिसत नाही. पूर्वीच्या काळी सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर देवाची स्तोत्रे म्हटली जायची. संध्याकाळची सुरवातही देवाच्या स्मरणाने व्हायची, पण आताच्या काळात असे फारसे आढळत नाही. हे संस्कार आताच्या पिढीत नाहीतच. फक्त संकटे आली की मगच देवाचे स्मरण होते. इतर वेळी नुसता दिखावा केला जातो. एवढेच काय, देवधर्म मानणाऱ्या व्यक्तीला वेळेचा दुरपयोग करणारा मूर्ख असे समजले जाते. बदलत्या काळात वेळेला अधिक महत्त्व आले आहे. कमी वेळात किती नफा कमविला, हेच पाहिले जाते. यावरच प्रगती ठरविली जाते. जग वेगाने बदलत आहे. बदलत्या जगाचा वेग अधिक आहे. यानुसार माणसालाही धावावे लागत आहे. पूर्वी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या गाड्या आता ताशी 100 ते 120 किलो मीटर वेगाने धावत आहेत. वेग वाढला म्हणून पृथ्वीचा फिरण्याचा वेग काही वाढलेला नाही. तो स्थिर आहे. यासाठी हृदयाचे ठोकेही स्थिर ठेवणे आवश्‍यक आहे. ते वाढले तर हृदयविकाराचा झटका बसू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. हे स्थिर ठेवण्यासाठीच शरीराला स्थिरतेची गरज आहे. ही स्थिरता योगातून येते. आध्यात्मिक विचारातून येते. ईश्‍वराच्या सतत स्मरणातून जीवनात ही स्थिरता येते. एकदा या स्थिरतेची ओढ लागली की आपोआप देवाचे स्मरण घडते. ती ओढ लागते. हे जे सहजपणे देवाकडे ओढणे, धावणे आहे त्यालाच आध्यात्मिक तेज असे म्हटले जाते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Saturday, December 7, 2019

मौन


मौनाचे अनेक फायदे आहेत, पण हे व्रत सर्वसामान्यांना जीवन जगताना पाळता येणे कठीणच आहे. तरीही प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. प्रयत्नांनी सर्व काही साध्य होते. सांसारिक जीवनात या मौन व्रताचा निश्‍चितच फायदा होतो.

मौन गा तुझें राशिनांव । आतां स्तात्री कें बांधों हाव ।
दिससी तेतुली भाव । भजों काई ।। 15 ।। अध्याय 17 वा

ओवीचा अर्थ - महाराज, मौन हे आपल्या जन्मराशीवरून काढलेले आपले नांव आहे. असे असल्याकारणानें मी स्तुति करण्याची उत्कृट इच्छा कोठें बाळगू ? जें तुझें स्वरूप मला दृश्‍यत्त्वेकरून दिसत आहे. तें सर्व मिथ्या आहे तर मग मी भजन कशाचे करावें ?

पाटगावचे मौनी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. ते नेहमी मौन धारण करून असत. फक्त समर्थ रामदास स्वामी यांच्याशीच ते संभाषण करत. त्यांच्यासमोरच ते हे मौन व्रत सोडत. अशा या महान गुरूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांना 1676 मध्ये अनुग्रह दिला. कर्नाटक दौऱ्यांच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाटगावच्या मौनी महाराज यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना अनुग्रहाचा लाभ झाला. गुरूंचा अनुग्रह होण्यासाठी मोठे भाग्य लागते. छत्रपती शिवाजी महाराज आणि पाटगावचे मौनी महाराज यांच्या भेटीच्या प्रसंगाचे वर्णन बखरीमध्ये आढळते, पण मौनी महाराजांच्या विषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. ते कोणत्या जातीचे, पंथाचे, संप्रदायाचे होते, याचीही माहिती नाही. त्यांचे गुरू कोण? याचेही पुरावे उपलब्ध नाहीत. प्रसिद्धीपराडमुख असणारे संतच महान होतात. माहिती उपलब्ध नसणारे, असे अनेक थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. त्यांचा भक्त परिवार आजही मोठा आहे. त्यांच्या महान कार्यानेच, भक्तांना अनुभव देण्याच्या सामर्थामुळेच ते महान झाले आहेत. समाधिस्थ झाले तरीही ते आपल्या भक्तांना अनुभव देत राहतात. भक्तांची प्रगती साधत राहतात. अनुभूतीतून भौतिक, आध्यात्मिक प्रगती साधतात. यासाठीच त्यांची समाधी, मंदिरे ही संजीवन समजली जातात. सध्याच्या युगात मौन व्रत पाळणारे भेटणेच अशक्‍य आहे. हं, पण संसदेत मौनी खासदार म्हणून ओळखणारे अनेक जण आहेत. विशेष म्हणजे हे मौनी खासदार प्रत्येक निवडणुकीत निवडून येतात. 30-40 वर्षे तरी सलग सत्ता त्यांच्याच हातात असते. त्यांच्यावर मौनी खासदार म्हणून टीकाही होते, पण तरीही ते निवडून येतात. लोकमत त्यांच्या बाजूने असते. हे कसे? यावर संशोधन होणे गरजेचे आहे. काय खरंच त्यांना मौनाचा फायदा होतो का? कारण सध्या दंगेखोर नेत्यांपेक्षा असले मौनी नेतेच परवडले, असे जनतेला म्हणायचे तर नाही ना? सतत त्रस्त करणाऱ्या नेत्यांना जनता धडा शिकवते. ते फार काळ टिकत नाहीत. पण न बोलता कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे जनता उभी राहाते. हेच यातून दिसते. सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्‍वासने देणारे नेत सत्तेत येऊन काहीच करत नाहीत. सत्ता मिळाल्यानंतर ती उपभोगण्याकडेच त्यांचा कल असतो. अशा सत्ताधिशांची सत्ता फारकाळ टिकत नाही. चिरंतन सत्ता टिकण्यासाठी आपण काय केले? याची वाच्यता न करणे हेच योग्य आहे. याचा फायदा निश्‍चितच होतो. स्वकिर्ती कानी न ऐकावी । स्वकिर्ती मुखे न बोलावी । हाच खरा नियम आहे.यासाठीच मौनाचे महत्त्व आहे. समाजकार्य करत राहायचे. पण त्याचा डांगोरा पिटाळायचा नाही. यातच खरा विकास दडला आहे.
मौनाचे अनेक फायदे आहेत, पण हे व्रत सर्वसामान्यांना जीवन जगताना पाळता येणे कठीणच आहे. तरीही प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. प्रयत्नांनी सर्व काही साध्य होते. सांसारिक जीवनात या मौन व्रताचा निश्‍चितच फायदा होतो. घरातील वादाच्या प्रसंगी,भांडण तंट्यामध्ये मौन धारण केल्यास हे वाद निवळू शकतात. मौनामुळे सहनशीलता येते. वयोवृद्ध, ज्येष्ठांना घरात उगाचच बडबड करून इतरांना त्रास देण्याची सवय असते. तसे ते मुद्दाम करत नसतात. ही त्यांची सवयच असते. याचा त्रास इतरांना होतो. हे त्यांच्या कधीही लक्षात येत नाही. तसे ही गोष्ट प्रत्येक कुटुंबात आढळतेच. यावरून वाद हे होतच असतात. ही प्रत्येक कुटुंबातील समस्या आहे. वयोवृद्धांच्या अशा वागण्यामुळेच वृद्धाश्रमांची गरज वाढत चालली आहे. शांत बसणे त्यांना कधी जमतच नाही. तारुण्यातही इतका उत्साह त्यांनी कधी दाखवलेला नसतो, पण म्हातारपणी त्यांना कामाचा मोठा उत्साह असतो. अशा गोष्टींचा कुटुंबातील घटकांना त्रास होतो. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तरी अध्यात्मातील या मौनव्रताचा अवलंब करावा, असे त्यांना वाटत नाही. आध्यात्मिक वाचन जरूर करतात, पण मौन व्रताचे पालन ते कधीही करत नाहीत किंवा करावे असे त्यांना कधी वाटतही नाही, पण त्यांनी या उतार वयात हे व्रत पाळले तर त्यांच्या इतरांना मोठा फायदा होईल, यात शंकाच नाही. मनाला आनंदी ठेवण्यासाठी, घरातील शांती कायम ठेवण्यासाठी हे मौन व्रत निश्‍चितच लाभदायक आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Thursday, December 5, 2019

संगतीचा परिणाम




दुसरा भ्रष्ट कारभार करतो, म्हणून स्वतः भ्रष्ट कारभार करणे योग्य नाही. दुसऱ्याने हात काळे केले याचा अर्थ आपणही काळे केले तर चालते, हे चूक आहे. चांगल्या संगतीत राहिला तर चांगले संस्कार घडतील. 

- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

पाणी बुडऊ ये मिठातें । तंव मीठची पाणी आतें ।
तेवीं आपण जालेनि अद्वैतें । नाशेभय ।। 72 ।। अध्याय 16 वा

पाण्यात मीठ टाकले तर पाणी खारट होते. पाण्यात साखर टाकली तर पाणी गोड होते. पाण्याचा संग कोणाशी होतो, यावर त्याची चव ठरते. तसे चांगल्याची संगत केली तर चार चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. वाईटाच्या संगतीत चार वाईट सवयी लागू शकतात. मीठ पाण्यात टाकल्यावर ते त्यामध्ये विरघळते. यामुळे ते खारट लागते, पण अशुद्ध मीठ त्या पाण्यामुळे शुद्ध होते. अशुद्ध मीठ शुद्ध पाण्यात टाकून ते शुद्ध करता येते. शुद्ध, सात्त्विक वृत्तीच्या सान्निध्यात राहिल्यावर आपल्यावरही त्या चांगल्या संस्काराचा प्रभाव पडतो, पण सध्याच्या युगात चांगल्या गोष्टी कोणत्या, हे ठरविणेच अवघड झाले आहे. मठामध्येही भ्रष्टाचार बोकाळला आहे. अनेक वाईट गोष्टी मठामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत. अशा वेळी सुसंस्कृत ठिकाणे कशी शोधायची, हा मोठा प्रश्‍न आहे. अशाने धर्माची बदनामीही होत आहे. याबाबत अपप्रचारही केला जात आहे. स्पर्धेच्या, चढाओढीच्या युगात प्रत्येक जण एकमेकाला खाली खेचण्याचेचे प्रयत्न करत आहे. अशाने वाईट गोष्टींना प्रोत्साहन मिळत आहे. अनेक समस्यांनी त्रस्त अशा वातावरणात सात्त्विक ठिकाणे मिळणार कोठे? चांगली ठिकाणे नाहीत याचा अर्थ धर्म संपला आहे, असे नाही. चांगला विचार हाच खरा धर्म आहे. चांगल्या विचारांची पुस्तके हीच सात्त्विक विचारांची ठिकाणे आहेत. ती शोधणे गरजेचे आहे. चांगल्या विचारांच्या संगतीत, चांगल्या विचारांच्या पुस्तकांच्या संगतीत आपोआपच चांगल्या गोष्टींची संगत घडते. स्वतःलाच ही सवय लावली तर, इतरही त्यामध्ये सहभागी होतील. इतरांनीही ही सवय लागेल. मुख प्रचारातूनच चांगल्या गोष्टींचा प्रसार होऊ शकतो. यातूनच चांगले व्यासपीठ उभे राहू शकते. दुसरा भ्रष्ट कारभार करतो, म्हणून स्वतः भ्रष्ट कारभार करणे योग्य नाही. दुसऱ्याने हात काळे केले याचा अर्थ आपणही काळे केले तर चालते, हे चूक आहे. चांगल्या संगतीत राहिला तर चांगले संस्कार घडतील. लोक चांगले म्हणतील. चांगल्या विचारात राहिल्यावर वाईटाची भीती कसली?

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Wednesday, December 4, 2019

पै निर्धना घरीं वानिवसे । महालक्ष्मीचि येऊनि बैसे ।




नैसर्गिक आपत्ती कमी येते. जपानमध्ये नैसर्गिक आपत्तीची मालिकाच असते. भुकंप, तर कधी त्सुनामी यांनी त्या देशाच्या प्रगतीस नेहमीच आव्हान दिले आहे. तरीही तो देश प्रगतिपथावर आहे. संकटातूनच खरी प्रगती होत राहते. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

पै निर्धना घरीं वानिवसे । महालक्ष्मीचि येऊनि बैसे ।
तयाते निर्धन ऐसें । म्हणों ये काई ।। 36 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - दरिद्री पुरुषाच्या घरी सहज कौतुकाने महालक्ष्मीच येऊन बसली तर त्याला दरिद्री असे म्हणतां येईल काय ?

जपानने तंत्रज्ञानात त्यांनी मोठी क्रांती केली आहे. कितीही संकटे आली तरी ते नेहमी ताठ मानेने उभे राहिले आहेत. भूकंप हा तर त्यांना नेहमीचाच आहे, पण यामुळे त्यांच्या प्रगतीचा वेग काही कमी झाला नाही. प्रयत्नातही त्यांनी कधी कसूर मागे ठेवली नाही. चोवीस तास कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. असे कष्ट भारतीयांनी केले असते तर भारतही जगात महासत्ताक झाला असता. आपण महासत्ताक होण्याची नुसती स्वप्नेच पाहात आहोत. भारतीयांत जीव तोडून कष्ट करण्याची तयारी नाही. तशी त्यांची मानसिकता दिसून येत नाही. स्वार्थी वृत्तीने देश पोखरला गेला आहे. देशात आवश्‍यक गोष्टींची मुबलकता असेल तर कष्ट करण्याची मानसिकता नसते. भारताची पिछेहाट याचमुळे झाली आहे. देश यामुळेच आळसी बनला आहे. देशात पाण्याची मुबलकता आहे. शेतीची जमीनही सुपीक आहे. आवश्‍यक तेवढे उत्पादनही होते. यामुळे देशात समृद्धी आहे. गरजेपुरते कष्ट करण्याची तयारी भारतीयांध्ये आहे, पण भ्रष्टाचार आणि द्वेषभावनेने देश पोखरला जात आहे. नैसर्गिक आपत्ती कमी येते. जपानमध्ये नैसर्गिक आपत्तीची मालिकाच असते. भुकंप, तर कधी त्सुनामी यांनी त्या देशाच्या प्रगतीस नेहमीच आव्हान दिले आहे. तरीही तो देश प्रगतिपथावर आहे. संकटातूनच खरी प्रगती होत राहते. संकटे सहन करण्याची ताकद अंगात निर्माण व्हायला हवी. प्राप्त परिस्थितीशी सामना करण्याची नेहमीच तयारी ठेवायला हवी. यातूनच प्रगती होते. इस्राईलमध्ये पाण्याची कमतरता आहे, पण त्यांनी उपलब्ध पाण्यावर शेतीत भरघोस उत्पादने घेतली आहेत. आपल्या देशात हे होऊ शकले नाही. आपण त्यांचा आदर्शही घेऊ शकत नाही. आपणकडे पाण्याची मुबलकता असूनही आपण आघाडी मिळवू शकलो नाही. सांगण्याचा हेतू इतकाच की, कितीही संकटे आली तरी प्रगती करण्याची तयारी ठेवायला हवी. मन खचता कामा नये. संकटांचा सामना करूनच मोठी प्रगती साधता येते. कितीही उंचीवरून खाली पडले तरी मांजराप्रमाणे ताठ उभे राहता यायला हवे. कष्ट करणाऱ्याच्या घरी, संकटांचा सामना करण्याचे सामर्थ ठेवणाऱ्यांच्या घरी महालक्ष्मी निश्‍चितच नांदते, यावर विश्‍वास ठेवायला हवा.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजे ।


प्रेमविवाह करणाऱ्यांना तर सासर-माहेर हा नातेसंबंधच राहात नाही. त्यांना दोन्हीही नकोशी वाटतात. हे परखड सत्य आहे. अशा बदलत्या काळात खऱ्या प्रेमाची ओळखच बदलत चालली आहे. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५

तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजे ।
तेंचि ग्रंथाचेनि व्याजें । जाणिजें जी ।। 597 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - त्याप्रमाणे तुम्ही संत माझे आईबाप आहोत. (म्हणून) तुम्ही भेटल्यावर मी लडिवाळपणा करतो. महाराज, जो लडिवाळपणा म्हणजे हा ग्रंथ होय, असे आपण समजावे.

माहेर म्हणजे आई - वडिलांचे घर. महिलांना माहेरची अधिक ओढ असते. सासरी कितीही प्रेम मिळाले, कितीही संपन्नता असली तरी माहेरच अधिक प्रिय असते. काही झाले तरी लगेच माझ्या माहेरी, असे नाही. माझे माहेर तसे होते अशी उदाहरणे, टोमणेबाजी सुरू होते. माहेरविषयी कोणी वाईट बोललेले त्यांना सहन होत नाही. माहेरचे कौतुक त्यांच्या तोंडी नेहमीच असते. माहेरसारखे प्रेम या जगात कोठेच नाही, असे त्यांना वाटते. असे प्रेम सासरी असले तरी माहेरची बरोबरी होत नाही, असे त्यांना वाटते. माहेरमध्ये सर्व हक्काचे असते. आपलाच अधिकार असतो. सासरी आल्यावर तसा अधिकार मिळत नाही. काही स्त्रिया आपला अधिकार राहावा, वचक राहावा यासाठी माहेरकडचाच एखादा गडीमाणूस खास कामासाठी नेतात. सासरचा गडीमाणूस त्यांना फारसा आवडत नाही. माहेरकडची सर्व माणसे त्यांना प्रेमळ वाटतात. हवीहवीशी वाटतात. बदलत्या काळात आता असे माहेरचे प्रेमही बदलत चालले आहे. झपाट्याने बदलणाऱ्या या संस्कृतीत माहेरविषयीच प्रेम राहिले नसेल तर सासरविषयी प्रेमाची कशी स्थिती असेल, हा मोठा प्रश्‍न आहे. प्रेमविवाह करणाऱ्यांना तर सासर-माहेर हा नातेसंबंधच राहात नाही. त्यांना दोन्हीही नकोशी वाटतात. हे परखड सत्य आहे. अशा बदलत्या काळात खऱ्या प्रेमाची ओळखच बदलत चालली आहे. खरे प्रेम लुप्त होत चालले आहे. काळाच्या ओघात माणसामधील स्वार्थी वृत्ती वाढल्याने हा फरक पडला आहे, पण समाधानासाठी माहेरसारखे सुख कोठेच नाही. खरे प्रेम हे माहेरीच असते. तेच खरे प्रेम आहे. तीच खरी प्रेमाची ओढ आहे. तीच खऱ्या प्रेमाची ओळख आहे. तेथेच खरे प्रेम मिळते. तसे संतांचे घर म्हणजे आपले माहेर घर आहे. तिथे प्रेम अधिक मिळते. तिथे आपले लाड केले जातात. म्हणून संतांचा सहवास असावा. संतांच्या संगतीत प्रेमामुळे मनातील राग, द्वेष, मत्सर नाहीसे होतात.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Tuesday, December 3, 2019

म्हणोनि माझिया भजना । उचितु तोची अर्जुना ।


पैशाच्या अहंकाराने केली जाणारी भक्ती ही श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे. यासाठी देवाच्या भजनास कोणता भक्त पात्र आहे, याचा विचार प्रथम करायला हवा व तसा भक्त व्हायला शिकले पाहिजे. तशी भक्ती करायला हवी. तीच खरी भक्ती आहे. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५


म्हणोनि माझिया भजना । उचितु तोची अर्जुना ।
गगन जैसें अलिंगना । गगनाचिया ।। 564 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - म्हणून अर्जुना, माझ्या भजनाला तोच योग्य आहे. ( तें कसें तर ) आकाश जसें आकाशाच्या आलिंगनास योग्य आहे.

सद्‌गुरूंचे, देवाचे नामस्मरण म्हणजे भजन. भक्‍तीची गोडी भजनाने लागते. सध्याच्या नव्या पिढीत भजनाची आवड निर्माण होणे, याची गोडी लागणे, या गोष्टी अशक्‍यच आहेत. नव्या पिढीला पैशाची गुर्मी आहे. सर्वच गोष्टी ते पैशाने मोजतात. भक्ती, अध्यात्म या गोष्टीही ते पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न करतात; पण या गोष्टी पैशाने विकल्या जात नाहीत याची कल्पना त्यांना नाही, याचेच मोठे दुःख वाटते. या गोष्टीचा अभ्यास त्यांनी केलेला नाही. भगवंतांना फक्त मनाने विकत घेता येते. फक्त फूल, फळ तेही शुद्ध भावनेने दिलेले एवढेच ते स्वीकारतात. महालक्ष्मी या नावातच लक्ष्मी आहे, पण या मंदिरातही दानपेटी असते. त्यात ते दान टाकतात. काही मंदिरात, धर्मात तर दान टाकण्याची स्पर्धा असते. सर्वाधिक दान देणाऱ्यांचा सत्कारही होतो. सर्वाधिक मान पैशाने मोजला जातो. याचे लिलावही चालतात. हे अध्यात्म नाही. ही भक्ती नाही. कारण देवाला याची काहीच गरज नाही. भक्तीत याची आवश्‍यकता नाही. निरपेक्ष बुद्धीने दिलेले दानच भगवंत स्वीकारतात. पैशाच्या अहंकाराने केली जाणारी भक्ती ही श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे. यासाठी देवाच्या भजनास कोणता भक्त पात्र आहे, याचा विचार प्रथम करायला हवा व तसा भक्त व्हायला शिकले पाहिजे. तशी भक्ती करायला हवी. तीच खरी भक्ती आहे. तीच खरी श्रद्धा आहे. देवाला काय आवडते हे ओळखायला हवे. देव देण्यासाठी बसला आहे. आत्मज्ञानाच्या प्रसादाचे वाटप त्यांच्याकडून सुरू आहे. पण हे घेण्यासाठी भक्ताला सुद्धा त्या प्रकारची भक्ती करावी लागते. म्हणजे काय तर आत्मज्ञानासाठी आवश्‍यक असणारी साधना त्याने करायला हवी. त्याला या व्यतिरिक्त काही नको आहे. आकाश जसे आकाशात सामावले आहे. तसा शिष्य सुद्धा गुरूमध्ये सामावला पाहीजे. शिष्याने सुद्धा गुरूच्या पात्रतेचे व्हायला हवे. आत्मज्ञानी व्हायला हवे. ही त्यांची अपेक्षा आहे. देवाच्या भजनास तोच योग्य आहे. त्यालाच ते आपलेसे करून घेतात आणि आपणासारखे बनवतात.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।