Monday, May 13, 2019

ऊठ तूं सत्वर जागा हो

क्षणिक आनंदाचा लाभ घेऊन जीवन पुन्हा दुःखी करू नकोस. खरा आनंद ओळख. आध्यात्मिक जीवनात दडलेला आनंद शोध. त्याचा लाभ घे. जीवनात कायमस्वरूपी आनंद नांदावा यासाठीच या मार्गाचा स्वीकार कर. हा मार्ग आहे तरी काय, हे जाणून घे.


- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406

आता धनुर्धरा । ऊठ तूं सत्वर । सर्वथा स्वीकार । धैर्यवृत्ती ।। 361।।
अध्याय 4 था स्वामी स्वरूपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

मोहाचा पडदा पांघरूण गाठ झोपी गेलेल्या मानवा ऊठ, जागा हो. असे आवाहन स्वामी करत आहेत. स्वामींच्या या आर्त हाकेने जागे व्हा. पूर्वी सकाळी भूपाळी गायली जायची. सकाळच्या प्रसन्न वातावरणात ही भूपाळी दिवसाची सुरवात आनंदी करायची. दिवसभरात कितीही दुःखाचे प्रसंग आले तरी या भूपाळीच्या प्रसन्नतेमुळे त्यावर मात केली जायची. आता तसे घडत नाही. सकाळी उठतो पण कामाच्या तणावाने. या ताणतणावातच सगळा दिवस जातो. झोपतानाही तोच विचार असतो. कोठेही शांतता नसते. सध्या अनेकजण ऑफिसचे काम ऑफिसात घरी आल्यावर त्यावर चर्चाही करत नाहीत. इतके कंटाळवाणे काम झाले आहे. सदैव त्याच विचाराने आपण कंटाळलो आहोत. याचा परिणाम आपल्या शरीरावरही होत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मग कधी प्रवासाला जातो. भटकंती करतो. अशा पर्यटनाने थकवा दूर करावा लागतो. या क्षणिक आनंदाने ताणतणावाला थोडी उसंत मिळते खरी, पण कायमचा थकवा जात नाही. पुन्हा घरी परतले की तोच ताणतणाव, तीच धकाधकीची कामे सुरू होतात. असे हे धकाधकीचे जीवन आनंदी कसे करायचे? हे सांगण्यासाठी स्वामी आपणास हाक मारत आहेत. मोहमयी जीवनातून बाहेर काढण्यासाठी त्यांची ही आर्त हाक आहे. या जीवनाला कंटाळू नकोस. हे जीवन आनंदी कर. भगवंतांनी दिलेला प्रत्येकक्षण मोलाचा आहे. तो आनंदी कर. आनंदाने त्याचा स्वीकार कर. दुःख जरी झाले. तरी ते आनंदाने स्वीकार. धैर्याने त्याला सामोरे जा. दुःखावर आनंदाने मात कर. मन आनंदी राहिले, तर जीवनही आनंदी होईल. दुःखाचा विचार करत बसलास, तर जीवनच दुःखी होईल. याचा विचार करून दुःखावर आनंदाने मात कर. कामाचा आनंद घेण्यास शिकावे. जीवनाचा प्रत्येकक्षण आनंदी करण्याचा प्रयत्न करावे. म्हणजे आपले जीवनच आनंदी होईल. हा आनंद म्हणजे चंगळ नव्हे. हुल्लडबाजी नव्हे. क्षणिक आनंदाचा लाभ घेऊन जीवन पुन्हा दुःखी करू नकोस. खरा आनंद ओळख. आध्यात्मिक जीवनात दडलेला आनंद शोध. त्याचा लाभ घे. जीवनात कायमस्वरूपी आनंद नांदावा यासाठीच या मार्गाचा स्वीकार कर. हा मार्ग आहे तरी काय, हे जाणून घे. जीवनाच्या प्रत्येकक्षणी त्याचा प्रवास सुरू आहे. त्याची धडधड सुरू आहे. ती धडधड स्वतःच्या कानाने ऐक. स्वतःच्या मनाने ती अनुभव. गर्वाचा त्याग करून, अहंकाराचा नाश करून त्या अनुभवाचा आनंद घे. धैर्याने ही साधना अखंड सुरू असू दे. त्या आनंदात जीवन आनंदी कर. स्वामींचीही आर्त हा आता तरी ऐक. ऊठ तूं सत्वर जागा हो.


No comments:

Post a Comment