Thursday, August 30, 2018

ऊठ तूं सत्वर


आता धनुर्धरा । ऊठ तूं सत्वर । सर्वथा स्वीकार । धैर्यवृत्ती ।। 361।।
अध्याय 4 था स्वामी स्वरूपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

मोहाचा पडदा पांघरूण गाठ झोपी गेलेल्या मानवा ऊठ, जागा हो. असे आवाहन स्वामी करत आहेत. स्वामींच्या या आर्त हाकेने जागे व्हा. पूर्वी सकाळी भूपाळी गायली जायची. सकाळच्या प्रसन्न वातावरणात ही भूपाळी दिवसाची सुरवात आनंदी करायची. दिवसभरात कितीही दुःखाचे प्रसंग आले तरी या भूपाळीच्या प्रसन्नतेमुळे त्यावर मात केली जायची. आता तसे घडत नाही. सकाळी उठतो पण कामाच्या तणावाने. या ताणतणावातच सगळा दिवस जातो. झोपतानाही तोच विचार असतो. कोठेही शांतता नसते. सध्या अनेकजण ऑफिसचे काम ऑफिसात घरी आल्यावर त्यावर चर्चाही करत नाहीत. इतके कंटाळवाणे काम झाले आहे. सदैव त्याच विचाराने आपण कंटाळलो आहोत. याचा परिणाम आपल्या शरीरावरही होत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मग कधी प्रवासाला जातो. भटकंती करतो. अशा पर्यटनाने थकवा दूर करावा लागतो. या क्षणिक आनंदाने ताणतणावाला थोडी उसंत मिळते खरी, पण कायमचा थकवा जात नाही. पुन्हा घरी परतले की तोच ताणतणाव, तीच धकाधकीची कामे सुरू होतात. अशा या धकाधकीचे जीवन आनंदी कसे करायचे हे सांगण्यासाठी स्वामी आपणास हाक मारत आहेत. मोहमयी जीवनातून बाहेर काढण्यासाठी त्यांची ही आर्त हाक आहे. या जीवनाला कंटाळू नकोस. हे जीवन आनंदी कर. भगवंतांनी दिलेला प्रत्येकक्षण मोलाचा आहे. तो आनंदी कर. आनंदाने त्याचा स्वीकार कर. दुःख जरी झाले. तरी ते आनंदाने स्वीकार. धैर्याने त्याला सामोरे जा. दुःखावर आनंदाने मात कर. मन आनंदी राहिले तर जीवनही आनंदी होईल. दुःखाचा विचार करत बसलास तर जीवनच दुःखी होईल. याचा विचार करून दुःखावर आनंदाने मात कर. कामाचा आनंद घेण्यास शीक. जीवनाचा प्रत्येकक्षण आनंदी करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे आपले जीवनच आनंदी होईल. हा आनंद म्हणजे चंगळ नव्हे. हुल्लडबाजी नव्हे. क्षणिक आनंदाचा लाभ घेऊन जीवन पुन्हा दुःखी करू नकोस. खरा आनंद ओळख. आध्यात्मिक जीवनात दडलेला आनंद शोध. त्याचा लाभ घे. जीवनात कायमस्वरूपी आनंद नांदावा यासाठीच या मार्गाचा स्वीकार कर. हा मार्ग आहे तरी काय, हे जाणून घे. जीवनाच्या प्रत्येकक्षणी त्याचा प्रवास सुरू आहे. त्याची धडधड सुरू आहे. ती धडधड स्वतःच्या कानाने ऐक. स्वतःच्या मनाने ती अनुभव. गर्वाचा त्याग करून, अहंकाराचा नाश करून त्या अनुभवाचा आनंद घे. धैर्याने ही साधना अखंड सुरू असू दे. त्या आनंदात जीवन आनंदी कर. स्वामींचीही आर्त हाक आता तरी ऐक. ऊठ तूं सत्वर जागा हो.

नामरुपाचा विस्तार

करी पार्था, नाम - ।
रुपाचा विस्तार । सर्वथा साचार । प्रकृतिच ।। 51 ।।

स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी अध्याय 7 वा

नामात काय आहे? आपण साधना करतो पण फक्त तोंडाने नाम उच्चारतो पण मनाने ते उच्चारत नाही. मन मात्र भटकत राहाते. नामावर त्याचे लक्ष केंद्रित नसते. नाम हे मनाने उच्चारायला हवे. तरच साधना होते. अन्यथा ती केवळ बडबड होते. स्वरूपाचे दर्शन घडायचे असेल तर नामाचा जप मनाने करायला हवा. मनात स्वरुप पहायला हवे. साधना करताना अनेक अडचणी येतात. कधी वेळच मिळत नाही. तर कधी सर्दी पडसे झालेले असते. अशा अनेक कारणांनी साधनेत व्यत्यय येत राहातो. पण साधना सोडायची नाही. या अडचणी ह्या क्षणिक असतात. आज सर्दी झाली आहे. उद्या वेळ नाही. परवा डोक दुखत आहे. अशी अनेक कारणे असतात. पण विचार केला तर ती सर्व क्षणिक असतात. मोठा आजार किंवा मोठा आघात झाल्यानंतर मात्र देव लगेच आठवतो. भीती पोटी देवाकडे आपण वळतो. तेव्हा देवाचे स्मरण होते. स्वाभाविक आहे. गरजेच्या वेळी तरी त्याचा आधार आहे असे वाटते. मनाला आधार मिळतो. पण गरज संपली की पुन्हा त्याचे विस्मरण होते. हे ही खरे आहे की साधना मारून मुरगुटून होत नाही. साधनेसाठी मनाची तयारी असावी लागते. जबरदस्तीने साधना करता येत नाही. पण मनाला साधनेला बसण्याची सवय लावावी लागते. ही सवय आपणास जरूर लागते. चांगल्या सवयी लागण्यास थोडा वेळ लागतो. धकाधकीच्या जीवनामुळे आता असल्या सवयी लागत नाहीत. फावला वेळच नसतो. असला तरी टि. व्ही. किंवा मोबाईलवर चॅटींग करण्यातच सारा वेळ जातो. वाचण्यासाठीही सध्या लोकांना वेळ नाही. मग देवाचे स्मरण करायला, साधना करायला वेळ कोठून येणार. पण एकक्षण जरी स्मरण केले तरी पुरेसे आहे. बसल्या बसल्या देव आठवला तरी दर्शन घडते. नामाचा एक शब्दही देवाचे दर्शन घडवतो. इतके नामामध्ये सामर्थ्य आहे. नाम देवाच्या रुपाचा विस्तार करते. आपण जरी देवाचे स्मरण केले नाही तरीही त्याचा उच्चार मात्र सतत सुरू असतो. सोऽहम, सोऽहम चा नाद सदैव सुरू असतो. फक्त आपण त्याकडे लक्ष द्यायला हवे. अवधान द्यायला हवे. आपले लक्ष नसले तरी ते सुरूच असते. सायकल चालवताना दोन्ही पायांची हालचाल सुरू असते. लक्ष जरी दुसरी कडे असले तरी ही क्रिया सुरू असते. मध्येच आडवा कोणी आला तर लगेच ही क्रिया थांबते. ब्रेक मारला जातो. तसे आपल्या शरीरातही सोऽहमचा नाद सुरू असतो. मन आपले फक्त दुसरीकडे धावत असते. आपण या नादाकडे लक्ष दिले तर तो नाद निश्‍चितच आपणाला ऐकू येतो. या नादात रमले तर त्याचा निश्‍चितच विस्तार होतो. स्वरुपाचे दर्शन घडते. फक्त हा स्वर आपण मनाने उच्चारायला हवा. मनाने ऐकायला हवा. मनाने जाणायला हवा. मन त्यामध्ये रमवायला हवे. तरच हे शक्‍य आहे.

Sunday, August 26, 2018

समर्पण


म्हणोनि उचित । कर्मे ती आघवीं । मज समर्पावी । आचरोनि ।।311।।
स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

प्रत्येक धार्मिक ग्रंथाच्या शेवटी ते पुस्तक सद्‌गुरुंना अर्पण केल्याचा उल्लेख असतो. तशी ही परंपरा आहे. प्रत्येक कर्म हे सद्‌गुरुंना अर्पण करावे, असा नियमच आहे. म्हणूनच तसे कसे केले जाते. पुस्तक लिहिले गेले, विचार मांडले गेले ते सद्‌गुरुंच्या कृपेमुळे सुचले. नव्हेतर ते सद्‌गुरुंनीच सुचविले असा भाव त्यामध्ये असतो. सद्‌गुरुंच्या भावातून जे प्रगटले. ते स्वतःचे आहे असे कसे म्हणता येईल. ते सद्‌गुरुंचेच आहे. सद्‌गुरुंना समक्ष भेटून जरी ते अर्पण करता आले नाही, तरी तो भाव मनात कायम असणे म्हणजे ते सद्‌गुरुंना समर्पित करण्यासारखेच आहे. समर्पण म्हणजे शरणांगती. शत्रू समोर पत्करलेली शरणांगती आणि सद्‌गुरूंच्या समोरील शरणांगती यामध्ये फरक आहे. याची गल्लत करु नये. शरण जाणे म्हणजे सर्वस्व घालविणे अशी मनाची दुर्बलता करून घेणे चुकीचे आहे. सद्‌गुरूंना शरण जाणे म्हणजे मन दुबळे होते. विचार दुबळे होतात असा अर्थ लावणे चुकीचे आहे. तसा विचार करणेही चुकीचे आहे. अध्यात्मात तसा त्याचा अर्थ नाही हे समजून घ्यायला हवे. सद्‌गुरु हे शत्रू नाहीत. मित्र आहेत. सहकारी आहेत. अशा थोर व्यक्तीच्या चरणी शरण जाणे हे सहजरित्या घडत नाही. याला काहीतरी अनुभव यावा लागतो. तरच हे घडते. देवाची आठवण ही कठीण प्रसंगी चटकण होते. इतर वेळी ही आठवण होईलच असे नाही. शरण जाणे आणि पराभूत होणे यामध्ये फरक आहे. शरण जाणे हा पराभव नाही. सद्‌गुरूंच्या अनुभवामुळे ही शरणांगती येते. जे पुस्तक आपण लिहीले ते विचार त्यांचे होते हा अनुभव जेव्हा येईल. तेव्हा ते पुस्तक त्यांचे आहे. त्यांनाच समर्पित करायला हवे. असा भाव सहजच मनात प्रगट होते. म्हणूनच धार्मिक पुस्तके ही सद्‌गुरुंना, भगवंताना अर्पण केलेली असतात. संशोधनाचे प्रबंध हे गुरुंना समर्पित करावेत. कारण ते गुरुंच्या कृपेमुळे त्यांच्या सहकार्यामुळेच ते पूर्ण झाले असतात. त्यांनीच तर ते शिकविले आहे. अशा गुरुंना तो प्रबंध समर्पित करायला हवा. अध्यात्म गुरु आणि प्रत्यक्ष शिक्षण देणारे गुरु यामध्ये फरक आहे. पण शेवटी ते गुरुच आहेत. गुरूंचा मान हा राखायलाच हवा. गुरु हे ज्ञानाचे सागर असतात. त्यांच्यातून प्रकट होणाऱ्या ज्ञानातुनच तर शिष्याचा विकास होत असतो. यासाठी सद्‌गुरुंना समर्पण करण्याचा भाव सदैव मनामध्ये असावा. हा भाव कायम राहीला तर मीपणाची भावनाच राहणार नाही. अशा भावामुळेच आत्मज्ञानी होण्याचा मार्ग सुकर होईल.

Saturday, August 25, 2018

अभिषेकाचे पुण्य....


अनेक मंदिरात मुर्तींना अभिषेक केले जातात. पण या अभिषेकात वापरले जाणारे दुध वायाच जाण्याचा प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. हे दुध वाहत जाऊन सांडपाण्यात मिसळते इतके भानही लोकांना राहात नाही. तरीही भावनेपोटी हे अभिषेक सुरुच असतात. अशा या प्रथांना कोठेतरी आळा बसायला हवा. काही मंदिरात तर हजारो लिटर दुध असेच वाया जाते. ही प्रथा थांबवण्याचा वसा बेळगावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला. गेले दोन वर्षे कपिलेश्‍वर मंदिरात श्रावणातील सोमवारी होणारे अभिषेक या कार्यकर्त्यांनी रोखले आहेत. हे वाया जाणारे दुध त्यांनी अनाथ व वृद्धा आश्रमांना देऊन एक वेगळा आदर्श उभा केला आहे.

आता मला विचाराल तर आम्हा नव्यापिढीला अभिषेक कोणी सुरु केला याची कल्पनाही नाही. तो का केला जातो हे ही माहीत नाही. ते जाणून घेण्याचीही आमची इच्छा नाही. केवळ परंपरा म्हणून अभिषेक करण्याकडेच आमचा कल दिसतो. पूर्वज सांगतात म्हणून श्रद्धेपोटीच आपण अभिषेक करतो. यात त्या मुर्तीची झिज होते याचे भानही राहात नाही. हा अभिषेक दिवसातून एकदाच करावा याचेही भान नसते. दगडीमुर्तीला देव मानायचे मग त्या दगडावर दुध ओतून ओतून त्याचे सोैदर्य नष्ट होते. हे आपल्या लक्षात कसे येत नाही. देवाचे सौदर्य नष्ट होत असेल तर मग ती पुजा कशी आपणास मान्य होते हेच मुळात समजत नाही. तरीही आपण अभिषेक करतच राहातो. अशा अभिषेकाने कित्येक मंदिरात दुर्गंधीही पसरते. याकडे कोणाचेही लक्ष नसते. हीच देवाची भक्ती का? नव्या पिढीला भक्ती म्हणजे काय याचीही माहिती नसल्याने ही परंपरा म्हणून आपण अंधश्रद्धा जोपासतो आहोत. याबाबत आता प्रबोधनाची गरज आहे. संतांनी भक्ती कशी करावी ? श्रद्धा म्हणजे काय ? पुजा कोणाची होते ? पुजेसाठी काय हवे असते ? हे सर्व सांगितले आहे. पण तरीही आपण याचा अभ्यास करत नाही. विचार करत नाही. मग चुका या होणारच. पण त्या चुका आहेत हे ही आपण मान्य करायला तयार नाही. विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. पण तरीही जनता मात्र याबाबत अज्ञानी कशी ? भोळीभाबडी जनता अशा अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडते. विज्ञान प्रगत झाले पण लोकांच्या भाबडेपणाचा फायदा उठवणारे काही कमी राहीले नाहीत. त्यांनी या प्रगत तंत्राने लोकांची फसवणूक केली जात आहे. फसवणूकही आता हायटेक झाली आहे. आपण फसत आहोत याचेही भान आता जनतेला राहीले नाही. पण काही जागरुक माणसे सामाजिक भान ठेऊन कार्य करत आहेत. समाजाला दिशा देण्यासाठी अशा व्यक्तींची गरज आहे.

कपिलेश्‍वर हे बेळगाव शहरातील प्रसिद्ध मंदिर. या मंदिरात श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी देवाला अभिषेक करण्याची प्रथा आहे. हजारो लोक दुधाच्या पिशव्या घेऊन या मंदिरात अभिषेक करत होते. पण हे सर्व दुध गटारीत मिसळले जायचे. दुधाची ही नासाडी रोखण्याचा संकल्प नांदुर गल्लीतील मंडळांनी घेतला. देवस्थांनचे पुजारी व विश्‍वस्थांना विश्‍वासात घेऊन त्यांनी दुधाची नासाडी थांबवण्यासाठी पुढाकार घेतला. दैनिक सकाळनेही या उपक्रमाचे स्वागत करत जनजागृतीसाठी मंडळास सहकार्य केले. दुधाचा अभिषेक करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना विश्‍वासात घेऊन येणारे दुध संकलित करण्याचा उपक्रम हाती घेतला. गेली दोन वर्षे हे कार्य सुरु आहे. शेकडो लिटर वाया जाणारे दुध संकलीत करून अनाथ व वृद्धाश्रमात ते वाटण्यात येत आहे. खरी भक्ती कोणती? खरा धर्म कोणता ? खरे पुण्य कशात आहे ? हे आता जनतेनेच ठरवायला हवे आणि कृती करायला हवी. भक्तीचा खरा अर्थ समजून कृती करायला हवी. बेळगावचा हा उपक्रम देशातील अनेक मंदिरात राबविता येणे शक्‍य आहे. याबाबत जागृतीही करता येणे शक्‍य आहे. अभिषेकाचे पुण्य कशाने मिळेल हे जनतेने समजून घेऊन आता कृती करायला हवी. यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

देवस्थानच्या परिसरात असे अनेक उपक्रम राबविण्याची आता गरज आहे. अनेक मंदिरात देवळात नारळ फोडले जातात. या नारळातील गोड पाणी शिंपडण्यात येते. पाण्याचे पवित्र विचारात घेऊन कार्य करायला हवे. हे पाणी कोणाच्या तरी पोटात गेल्यास त्याला उर्जा मिळेल. हा विचार का केला जात नाही. एखाद्या आजारी व्यक्तीला हे पाणी दिले तर त्याचा आधार मिळेल. हा विचार का केला जात नाही. यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा देवस्थानाने उभारायला हवी. अशा विचार का केला जात नाही. दैनिक सकाळच्या तनिष्का गटाने जोतिबा डोंगरावर हा उपक्रम राबविला. त्याला प्रतिसादही मिळाला. नारळाचे वाया जाणारे पाणी साठवून ते शाळा व रुग्णांना ताबडतोब दिले. या उपक्रमाचे कौतुक झाले. अशा या उपक्रमातून देवस्थानात होणारी स्वच्छताही राखली जाते याचा विचार व्हायला हवा.

पुण्य कर्म कोणते हे आता जनतेनेच ओळखायला हवे. तशी कृती करायला हवी. खरी भक्ती कोणती ? खरे अध्यात्म कशात आहे ? देव कोठे आहे ? याचा अभ्यास करुन कृती करायला हवे. हे जाणून घेऊन आपला आचरण करायला हवे. ही जागृती आली तर श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय हे सांगण्याची गरज भासणार नाही. 

Tuesday, August 21, 2018

बाटली सोडली नांगर हाती


बीड जिल्ह्यातील हा गाव. गावात सर्व लमाणीच होते. काहीजण मोलमजूरीकरुन पोट भरायचे. तर काही जण दसऱ्यानंतर ऊस तोडणीची कामे करायचे. काहीजण गुऱ्हाळावर काम करायचे. कष्टकरी गाव. पण या गावाला व्यसनाची दृष्ट लागली. कष्ट करुन थकलेल्या माणसाला गरीबी खायला उटते. गरीबी असली की पैसा देणारा कोणताही व्यवसाय चांगलाच वाटतो. तो व्यवसाय वाईट जरी असला तरी तो चांगलाच वाटतो. 
गावातील एकाने दारु भट्टी सुरु केली. गुऱ्हाळघरावर काम करुन राबणारा हा कामगार आता खराब गुळापासून दारु तयार करु लागला. अवघ्या काही दिवसातच त्याच्या हाती पैसा खेळू लागला. कमी कष्टात जास्त कमाई होऊ लागली. त्याची ही करामत पाहून गावातील आणखी चारपाच तरुण त्याच्याप्रमाणे दारुचा व्यवसाय करु लागले. हळूहळू अख्खा गावच दारुच्या आहारी गेला. गावातील सर्व लमाणी कुटूंबे दारुच्या व्यवसायात गुंतली. 
हाती पैसा आला पण त्याबरोबर गावात समस्या वाढल्या. गावाला दारुचे व्यसन लागले. आरोग्य खालावले. माणसांची बुद्धी काम देईना. महिलांनाही दारुचे व्यसन जडले. दारुचा हा धंदा जोमात होता. पैसा मिळत होता. पण समाधान नव्हते. दारुच्या संगतीने इतरही व्यसने तेथे जोर धरु लागली. तशा समस्याही वाढत गेल्या. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागले. 
दारुच्या निर्मितीसाठी पाणी भरपूर लागते. बीड जिल्ह्यातील हा दुष्काळी पट्टा. येथे पाण्याची कायमचीच समस्या. त्यात दारुसाठी पाण्याचा वापर वाढल्याने पाण्याची समस्या बिकट झाली. यावर मात कशी करायची हाच प्रश्‍न पुढे होता. दारु व्यवसाय करणाऱ्या गावास मदत तरी कोण करणार. सरकारचेही धाडस होईना. टॅंकर पाठवला तर विरोधक ओरडतील. दारुसाठी पाण्याचा वापर होतोय म्हणून सत्तेतून पाय उतार व्हावे लागेल. या भीतीने लोकप्रतिनिधींनीही या गावाकडे पाठच फिरवली होती. व्यसनी माणसांना कोण मदत करणार हाच प्रश्‍न भेडसावत होता. पण गावाला पाण्याने उद्दल घडवली. पाणी नसेल तर काय होऊ शकते याची कल्पनाही करणे कठीण होते. व्यवसाय ठप्प झाला. तसा पाण्यासाठी जीवही तडफडू लागला. काहीजणांनी शहराचा रस्ता धरला. 
व्याकुळ झालेल्या या गावाला प्रसाद नावाचा एक सामाजिक कार्यकर्ता भेटला. गावची व्यसनाधिनता पाहून त्याचे मन भरुन आले. त्याला या लोकांची काळजी वाटू लागली. पण ही समस्या सोडवण्यासाठी गाव साथ देईल का याचीही त्याला चिंता होती. तरीही त्याने गावाला मदत करण्याचे ठरवले. गावाला पाणी दिले तर गाव व्यसनापासून दूर जाईल असे त्याला वाटू लागले. पाणी देतो दारु सोडा असा अट्टाहास त्याने त्यांच्यासमोर धरला. प्रसादने दारुचा व्यवसाय बंद करुन शेती करण्याची अट घातली. ही अट गावातील कोणालाच मान्य नव्हती. कारण उत्पन्नाचा स्त्रोत सोडून दुसरा व्यवसाय करणे या लमाणी समाजास पटणे अशक्‍य होते. दारुच्या आहारी गेलेल्यांना समजावणेही कठीण होते. पण प्रसादने जिद्द सोडली नाही. प्रसादने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दारुत बक्कळ पैसा मिळतो. पण हाती कायच राहात नाही. पाण्याची समस्या सोडविण्यासाठीही पैसा शिल्लक नाही. मग तुम्ही जलसंधारणाची कामे कशी करणार आणि गावचा पाण्याचा प्रश्‍न कसा सोडविणार हे प्रसादने त्यांना पटवून दिले. दारुच्या व्यसनाचे दुष्परिणामही त्याने त्यांना समजावून सांगितले. त्याने त्या समाजात जनजागृती केली. व्यसनापासून दुर राहण्याचा सल्ला दिला. पाण्याच्या समस्येमुळे गाव थोडा ताळ्यावर आला होता. याचाच फायदा घेत प्रसादने गावाची समजूत काढली. जलसंधारणाची कामे करुन पाणी प्रश्‍न कसा सोडवायचा ते सांगितले. पण त्यासाठी पैसा कोठून आणणार हा प्रश्‍न होता. 
प्रसादने एक शक्कल लढवली. दारु व्यवसाय सोडणाऱ्यास दहा हजार रुपये बक्षीस देण्याचे त्याने ठरविले. तसा प्रस्ताव त्याने गावापुढे मांडला. पण यावर गावाचा विश्‍वास नव्हता. अखेर एक तरुण दारु व्यवसायीक उठला. त्याने दारु व्यवसाय सोडण्याची ग्वाही दिली. प्रसादने त्याला लगेच दहा हजार रुपये बक्षीस दिले. हे पाहताच गावातील आणखी चार-पाच तरुण पुढे आले. त्यांनीही व्यवसाय सोडण्याची ग्वाही दिली. पाण्याने त्रासलेल्या गावाला पाण्याशिवाय आता काहीच दिसत नव्हते. दहा तरुणांनी हा दारुचा व्यवसाय सोडून शेती करण्याचा निर्धार केला होता. त्यांना प्रसादने एक लाख रुपये बक्षिस दिले. पण या सर्वानी हे पैसे जलसंधारणाच्या कामात खर्च करण्याचा निर्णय घेतला. एका पाण्याच्या थेबासाठी आसूसलेला हा गाव पाहता पाहता जलसंधारणाच्या कामात गुंतला. 
गाळ साठल्याने गावच्या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली होती. पाण्याची साठवणूक वाढावी यासाठी गावकऱ्यांनी गावच्या तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला. टॅंक्‍टर मालकांनी गाळ मोफत उचलून न्हावा अशी योजना आखण्यात आली. तसे गावातील दहा-बारा टॅक्‍टर मालक या कामात गुंतले. त्यांनी गाळ उपसण्यास सुरवात केली. गाळ उपसला. तलावाची साठवण क्षमता वाढली. गावातील विहिरींचे पुर्नभरण करण्याचाही निर्णय झाला. जलसंधारणाची कामेही झाली. ओढे, नाल्यावर बांध बाधण्यात आले. पाणी अडवा पाणी जिरवा हाच संदेश गावात गेला. तशी झपाट्याने कामेही झाली. एका बक्षीसाने हा बदल घडवला. 
पावसाळा आला. तलावात पाणी साठले. विहिरींना पाणी वाढले. ओढे, नाल्यात बंधारे बांधल्याने गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले. गावाचा परिसर हिरवा करण्याचा निर्धार आता गावाने घेतला होता. पाण्याच्या संवर्धनासाठी आता वृक्षांची गरजही त्यांना वाटू लागली. पाहता पाहता गावाचे बांध वृक्षांनी सजले. रस्ते, नाल्याचे काठही वृक्षांनी बहरले गेले. 
इतर वेळी केवळ खरीपात ज्वारी घेणारा हा गाव आता पाण्याच्या मुबलकतेने अन्य भाजीपाला पिके घेण्याकडे वळला. भाजीचे उत्पादन करुन त्याची विक्री करण्यासाठी गावाने पुढाकार घेतला. खरीपासह उन्हाळ्यातही गाव हिरवा दिसू लागला. दारुची विक्री करणारा गाव आता भाजीपाल्याची विक्री करु लागला आहे. दारुच्या व्यसनाने जे गमावले ते आता हातात नांगर धरुन गावाने कमावले. गेलेली पत गावाने पुन्हा मिळविली. गावची प्रगती झाली. लोक शिक्षित झाले. गावाची प्रतिष्ठा वाढली. 

Friday, August 17, 2018

विरक्ती

  जे अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं ।
सोऽहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ।। 53।। अध्याय 1 ला


ओवीचा अर्थ - वैराग्यशील पुरुष ज्याची इच्छा करतात, संत जें नेहमी अनुभवितात व सोऽहम्‌ भावनेनें पार पावलेले जेथें रममाण होतात.

विरक्ती यायला हवी म्हणजे नेमके काय? अध्यात्मात प्रगतीसाठी विरक्ती आवश्‍यक आहे. पण नेमके विरक्ती म्हणजे काय? मन विरक्त व्हायला हवे म्हणजे नेमके काय व्हायला हवे? अशा प्रश्‍न अनेक साधकांना पडतो. साधना करतो. म्हणजे नेमके काय करतो हा प्रश्‍न स्वतःला विचारला तर विरक्तीच्या प्रश्‍नाचे उत्तर निश्‍चित मिळेल. सद्‌गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करतो. एकाजागी निवांत बसून जप करतो. डोळे मिटून जप करतो. जप सुरू असतो पण मन मात्र जपावर नसते. दिवसभरातील घडामोडीवर ते भटकत असते. जप सुरू असतो. जपाची गणती सुरू असते. पाच माळा, दहा माळा असे ठरलेल्या माळा झाल्या की साधना पूर्ण होते. ही साधना आहे का? मनात सोऽहम नसतो. सोऽहम मात्र सुरू असतो. तुम्ही साधना करत नसला तरीही सोऽहमचा नाद सुरू असतो. मग आपण साधनेत नेमके काय करतो. नुसत्या जपाच्या माळा ओढत असतो. गणती करत असतो. आज एक हजार आठ वेळा जप केला. उद्या दहा हजार करायचा. ही गणती करून साधना सुरू असते. ही गणती नाही केली तरीही सोऽहम सुरूच असतो ना? मग गणती कसली केली जाते. जय जय राम कृष्ण हरी...जय जय राम कृष्ण हरी...हे काम करतानाही म्हणता येते. पण हा जप सुरू असताना मन मात्र इतरत्र भटकत असते. मनाचे हे भटकने थांबायला हवे. मन रिकामे व्हायला हवे. म्हणजेच विरक्त व्हायला हवे. मनात जपा व्यतिरिक्त इतर कोणताही विचार येता कामा नये. असे झाले तरच विरक्ती आली असे म्हणता येईल. मन विरक्त झाले असे म्हणता येईल. यासाठी प्रयत्न करायला हवा. मन भटकत म्हणून साधना सोडायची नाही. जपाची गणती सोडायची नाही. ती सुरूच ठेवायची पण मन त्यावर कसे केंद्रित करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. अवधान ढळता कामा नये. कधी पाच शब्दावर केंद्रित होईल. कधी एका माळेवर होईल पण ते केंद्रित व्हायला हवे. सोऽहमचा स्वर स्वतःच्या कानांनी ऐकण्याचा प्रयत्न केला तर मन निश्‍चितच भरकटण्याचे थांबते. तसा प्रयत्न सुरू ठेवायला हवा. मन सोऽहमच्या नादामध्ये रंगायला हवे. त्यात आपण गुंग व्हायला हवे. बाकीचे स्वर आपोआप बंद होतात. साधनेला एक आध्यात्मिक उंची येते. आत्मज्ञान प्राप्तीचे दरवाजे खुले होतात. फक्त मन विरक्त व्हायला हवे. मनामध्ये सोऽहम व्यतिरिक्त अन्य कोणताही विचार येता कामा नये. सद्‌गुरूंनी दिलेला मंत्रच स्वतःच्या कानांनी ऐकायला हवा. अशी अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा असा साधक आत्मज्ञान प्राप्तीस योग्य होतो. अशी अवस्था सद्‌गुरूंच्या कृपेनेच प्राप्ती होते. ही कृपा व्हायला हवी. या कृपेसाठी प्रयत्न करायला हवेत.


Tuesday, August 14, 2018

स्वसंवेद्या


ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।। अध्याय 1 ला


स्वतःच स्वतःला ओळखणे ही अध्यात्माचा पहिली पायरी आहे. येथून अध्यात्माच्या प्रगतीला सुरवात होते. स्वतःला ओळखायचे म्हणजे नेमके काय? मी कोण आहे? हा प्रश्‍न स्वतःच स्वतःला विचारावा. मी राजा आहे. मी भिकारी आहे. मी उद्योगपती आहे. मी कारखानदार आहे. मी राजकीय नेता आहे. अशी एखादी ओळख आपली आहे का? जगात वावरण्यासाठी स्वतःचे नाव ही स्वतःची ओळख आहे. हे नाव ही आपण स्वतः ठेवलेले नसते. आपल्या वडिलधाऱ्यांनी ते दिलेले असते. ही आपली खरी ओळख आहे का? आपले नाव, आपला व्यवसाय ही आपली ओळख आहे का? ही सर्व ओळख देहाची आहे. देह जन्माला आल्यानंतर त्याचे नामकरण केले जाते. तो काही कर्मे करतो. यातूनही त्याची ओळख निर्माण होते. मग मी म्हणजे देह आहे का? देह हा पंचमहाभूतांपासून तयार झाला आहे. पृथ्वी, आप, वायू, तेज आणि गगन ही पंचमहाभूते आहेत. मृत्यूनंतर देह पंचत्वात विलीन होतो. मग आपली ओळख काय? देह जन्मतो, मृतही होतो. पण देह जिवंत कशामुळे असतो? त्याच्यात चैतन्य कसे येते? ते काय आहे? जिवंतपणा म्हणजे तरी काय? श्‍वास आत येतो, बाहेर जातो ही क्रिया जोपर्यंत सुरू असते तोपर्यंत देह जिवंत असतो. ही क्रिया थांबली की देह म्हणजे निर्जीव वस्तू आहे. मग देह ही आपली ओळख कशी असेल. ही सुद्धा आपली ओळख नाही. देहाला जिवंतपणा कशामुळे येतो. देहात आत्मा आल्यानंतर देह जिवंत होतो. आत्मा देहातून गेल्यानंतर देह मृत होतो. मग मी म्हणजे कोण आहे? मी एक आत्मा आहे. आत्मा ही आपली ओळख आहे. मी आत्मा आहे. पण हा आत्मा प्रत्येक देहात आहे. प्रत्येक देहात असलेला आत्मा वेगळा आहे का? तो एकच आहे. मग सर्वांच्या ठिकाणी आत्मा हा एकच आहे. तर मग सर्वच जण हे एक आहेत. देहात आल्यानंतर त्यांची ओळख बदलली आहे. मी देह आहे हा अहंकार त्याच्यात आला आहे. या अंहकारामुळे आत्मा हा दिसतच नाही. खरी ओळख तो विसरला आहे. स्वतःची खरी ओळख ही आत्मा आहे. ही ओळख सदैव ठेवल्यानंतर आत्मज्ञानाची प्राप्ती होते. ही ओळख कायम स्मरणात राहावी, यासाठीच साधना केली जाते. साधनेने ही ओळख दृढ होते. पण यासाठी योग्य मार्गदर्शकाची गरज आहे. सद्‌गुरू हे मार्गदर्शक असतात. सद्‌गुरू आत्मज्ञान विकासासाठी त्याचे बीज अनुग्रहाद्वारे शिष्यामध्ये लावतात. हे बीज हळूहळू विकसित होते. तो शिष्य आत्मज्ञानी होतो. त्या नराचा नारायण होतो. त्याला देवत्व येते. इतके सोपे, सहज हे अध्यात्मशास्त्र आहे. सद्‌गुरूंच्या आर्शिवादाने हे शास्त्र आत्मसात होते. अशा आत्मज्ञानी सद्‌गुरुंचा जयजयकार असो.

सद्‌गुरू म्हणे....

सर्वांचा आत्मा एकच

सद्‌गुरू म्हणे
आंबा, वड, चंदन, बाभूळ
या वृक्षांचे गुणधर्म वेगळे
आंब्याच्या फळांची गोडी न्यारी
तर थकलेल्या वाटसरुस वडाचा आधार
काटेरी बाभूळाचे कुंपण सुरक्षित
तर चंदनाच्या वासाने मिळतो आनंद जीवनात
पण या सर्व वृक्षांचा अग्नी एकसारखाच
तसे वेगवेगळी विचारसरणी माणसांची
तरी पण त्या सर्वांचा आत्मा मात्र एक सारखाच

आध्यात्मिक शांती

प्रोटॉन्सवर भार धन, इलेक्‍ट्रॉन्सवर भार ऋण
भाराविना न्युट्रॉन्स, या सर्वांच्या वर्तुळाचा होतो अणू
श्‍वास आतमध्ये जाताना "सो' तर बाहेर पडताना "हम'
एकाग्रता या सर्वांच्या वलयातून होते अध्यात्म
अणुच्या उर्जेतून घडवला जातायेत विघातक स्फोट
तर अध्यात्माच्या उर्जेतून आत्मज्ञानाचे पाठ
हिसाचार विज्ञानाचा,
कि शांती अध्यात्माची


सांगा
सांगा मी तुमची कशी प्रार्थना करु
सांगा मी तुम्हाला कोणत्या नावाने पुकारु
सांगा मी तुम्हाला कसे ओळखू
सांगा मी तुम्हाला कसे पारखू
सांगा मी तुम्हाला कसे भेटू
सद्‌गुरु म्हणे सोपे आहे,
आध्यात्मिक आत्मा तुझ्यातच पाहा 

Monday, August 13, 2018

स्वप्न


जैसे स्वप्नामाजी देखिजे । तें स्वप्नीचि साच आपजे ।
चेऊनिया पाहिजे । तंव कांहीं नाहीं ।। 139 ।। अध्याय दुसरा


स्वप्नात राहू नकोस वास्तवात ये असे सद्‌गुरू दादा माधवनाथ महाराज सांगवडेकर नेहमी मला सांगत. मला स्वप्ने पाहायची सवय आहे. नुसती स्वप्ने पाहाणे जीवनात दुःखद ठरू शकतात. यासाठी वास्तवाशी सामना करण्याचे सामर्थ्य सद्‌गुरुंच्या उपदेशातून वारंवार मिळते. यामुळे ही माझी सवय आता कमी झाली आहे. मी यावर उपाय सुचवला. स्वप्न पडले की साधना अधिक करायची. स्वप्नात राहायचे नाही. आता त्याचा मला अनुभव येऊ लागला आहे. दादांच्या सहवासात असताना सुरवातीस श्री ज्ञानेश्‍वरी काहीच समजत नव्हती. नुसती अक्षरे वाचली जायची. आता ती अक्षरे माझ्याशी बोलू लागली आहेत. ही बोलणारी अक्षरे आता मी पुस्तक रूपाने इतरांनाही सांगण्याचा संकल्प केला. त्यातून तीन पुस्तकांची निर्मिती झाली. मी फक्त स्वप्नच पाहात बसलो असतो तर हे शक्‍य नव्हते. आपणास आलेली अनुभूती इतरांना सांगू नये असे बरेच भक्तगण सांगत असत. पण दादांच्या इथेतर उत्सवाच्या शेवटच्या दिवशी भक्त स्वतः अनुभव सांगत त्यावर दादा आशीर्वचनही देत. मग अनुभूती, स्वतःला आलेले अनुभव का सांगू नयेत. परमपूज्य दादांच्या सर्वांना मुक्त व्यासपीठ आहे. अनुभवांच्या स्वप्नात राहिलो असतो तर पुस्तके झाली नसती. या पुस्तकातूनच आता आध्यात्मिक प्रगतीच्या वाटा सुकर होत आहेत. यासाठी स्वप्नातून वास्तवात येण्याचा सल्ला दादा नेहमी मला का द्यायचे याचा अनुभव आज मला येत आहे. आता हेच ठरवले आहे. स्वप्नात राहायचे नाही. वास्तवाचा सामना करायचा. स्वप्नात स्वर्गही जिंकता येतो. पण आता वास्तवात हा स्वर्ग नाही. यासाठी आत्मसंतुलनाची गरज आहे. ते आता मिळवायचे आहे. वास्तव हेच आहे. स्वप्न जरूर पाहावे पण स्वप्नात राहू नये. जागे होण्याची गरज आहे. आत्मज्ञानाचे स्वप्न पाहणे काही वाईट नाही. पण हे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. आज हे करू, उद्या ते करू. आज हे स्वप्न पाहिले, उद्या ते पाहिले. अशाने नुसत्या स्वप्नातच राहणारा मी, सद्‌गुरुंच्या आशीर्वादाने यातून बाहेर पडू लागलो आहे. वास्तवाशी सामना करण्याचे सामर्थ्य आता सद्‌गुरुकृपेने मला मिळाले आहे. सद्‌गुरुंच्या कृपेने ही स्वप्ने आता सत्यात, वास्तवात साकारत आहेत. ही त्यांनीच करून घेतलेली सेवा आहे. अशी कृपा त्यांची राहावी, हीच सद्‌गुरुचरणी प्रार्थना.

संजीवन समाधी


जरी समाधीत लपशी
तरी असे लक्ष भक्तांपाशी
अनुभव देऊन करी ज्ञानसंपन्न
म्हणनुच तुझी समाधी असे संजीवन

सोऽहम, सोऽहम चा नाद
समाधीतूनही ऐकू येई मंद मंद
तुझ्या नादाचा जडे भक्तांशी छंद
अनुभवातून अनुभूतीचा मिळे त्यासी प्रसाद

पाऊले जालती आपोआप आळंदीची वाट
हुरहुर लागे कधी होई ज्ञानेश्‍वरांची भेट
कोठेही रहा, कसेही रहा, केव्हाही रहा
सोऽहम समाधीची अनुभूती घेत रहा