Tuesday, July 24, 2012

ऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे

दर्जेदार ऊस उत्पादनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी ऊस रोपवाटिका व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून पूरक उत्पन्न मिळवण्याची संधी त्यांनी शोधलीच, शिवाय रोपांचा उपयोग करणाऱ्या ग्राहक शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळू लागला आहे.
राजेंद्र घोरपडे
कोल्हापूर जिल्ह्यात चिंचवाड (ता. करवीर) येथील संदीप पाटील यांचे दोन एकर शेत पंचगंगा नदीच्या पूरक्षेत्रात आहे. दरवर्षी उसाचे शेत पुरात बुडते. सन 1995 मध्ये पुराचे पाणी जास्त दिवस राहून संपूर्ण ऊस कुजला. पुन्हा लावण करण्याची वेळ आली. पूर ओसरल्यानंतर किंवा भात पिकानंतर रोपवाटिकेद्वारे रोपांची लावण करायची, असे निवृत्त प्राध्यापक डॉ. के. एम. पोळ यांनी सुचविले. त्यानुसार संदीप प्लास्टिकच्या पिशवीत रोपे तयार करून लावण करू लागले. उगवण चांगली होत असल्याचे पाहून परिसरातील शेतकरीही रोपांची मागणी करू लागले. उगवण न झालेल्या रिकाम्या जागी रोप लावण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. यातूनच संदीप यांच्या रोपवाटिका व्यवसायाचा जन्म झाला. त्यांना वडील शांतिनाथ व ज्येष्ठ बंधू सचिन पाटील यांचीही मदत होते.
भाड्याच्या जागेत रोपवाटिका -
रोपांची मागणी वाढू लागल्याने रोपवाटिकेसाठी क्षेत्र कमी पडू लागले. यासाठी महिन्याला 1500 रुपये भाड्याने दीड एकर क्षेत्र घेतले. गेली सहा वर्षे याच जागेत ते रोपवाटिका करतात. सुमारे 13 महिला कामगार त्यांच्याकडे आहेत. वर्षाला पाच लाख रोपे तयार करतात. दोन ते अडीच रुपये प्रति रोप अशी विक्री होते. त्यातून सुमारे दहा लाख रुपये मिळतात. रोपवाटिकेचा साडेआठ लाख रुपये खर्च वजा जाता दोन - अडीच लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.
बियाणे प्लॉट नियोजन -
फुले 265, को 86032, 99010, 99004 या जातींची रोपे संदीप तयार करतात. बियाणे कृषी विभागाकडून खरेदी करतात. पंधरा गुंठ्यांत चार प्लॉट करून त्यात ठराविक दिवसांच्या अंतराने कांड्यांची लागवड केली जाते. एकावेळी सुमारे तीन टन उसाची तोड होते. त्यापासून 12 ते 15 हजार रोपे आठवड्यात तयार केली जातात. प्लास्टिकच्या पिशवीत गाळाची माती, गांडूळ खत, जिवाणू खते (पीएसबी, ऍझोटोबॅक्‍टर) आदींचे मिश्रण भरून त्यात एक डोळा पद्धतीने लावण होते. कृषी विभागाने अधिकृत जाहीर केलेली जिवाणू खतेच ते वापरतात. एका वर्षी अनधिकृत जिवाणू खते वापरल्याने दीड लाख रोपे खराब झाली होती. सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. रोपांच्या उगवणीसाठी कोकोपीट वापरल्यास 35 दिवसांच्या आत लावण करावी लागते, अन्यथा ती पिवळी पडतात, वाढीची ताकद कमी होते. यासाठीच गाळाच्या मातीत प्लास्टिक पिशवीत रोपे तयार करतात.
रोपवाटिका खर्च - (अंदाजे)
रोपवाटिकेच्या अर्धा एकर क्षेत्राचे भाडे (महिन्याला 1500 रु.) - अठरा हजार
माती, शेणखत (60 ते 70 गाडी) - 850 रुपये प्रति गाडी - 50 हजार
सव्वा टन प्लास्टिक पिशवी (100 रुपये किलोप्रमाणे) - 1 लाख 20 हजार
वर्षाला 70 टन बियाणे (तीन हजार रुपये टनाप्रमाणे) - दोन लाख दहा हजार
वीज, पाण्यासाठी वार्षिक - 30 हजार
मजूर (वार्षिक) - चार लाख
जिवाणू खते, अन्य निविष्ठा - दहा हजार
एकूण खर्च - साडेआठ लाख रुपये
रोपांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न - दहा ते बारा लाख रु.
रोपांना इतर जिल्ह्यांतूनही मागणी
गेली दहा वर्षे रोपवाटिका व्यवसायात आहेत. पुणे, वैभववाडी, जत, जिल्ह्यातील राधानगरी, करवीर तालुक्‍यातील शेतकरी नोंदणीद्वारे रोपे नेतात. तालुका कृषी अधिकारी डी. बी. पाटील, कृषी सल्लागार ए. आर. पाटील आदींचे मोलाचे सहकार्य संदीप यांना लाभले आहे.
संदीप पाटील - 9271700909
माळ्याची नोकरी सोडून उभारली रोपवाटिका
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील कृषी विद्यालयात सत्यजित शिंदे माळी म्हणून सात वर्षे कार्यरत होते. नोकरीत कायम न केल्याने मनात रुखरुख होती. अखेर नोकरी सोडून तळसंदे येथे स्वतःच्या शेतीत 2009 मध्ये रोपवाटिका सुरू केली. वडील सुरेंद्र धोंडिराम शिंदे माजी सैनिक होते, त्यांनी रोपवाटिकेसाठी अर्थसाहाय्य केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडून को 86032 जातीचे बियाणे आणले. सुरवातीला दहा हजार रोपे तयार केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कमी खर्चात चांगल्या प्रतीची रोपे तयार करून विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते दरवर्षी बेणे खरेदी करतात. पहिल्या वर्षीच्या बियाण्यापासून रोपे तयार केल्यास त्यांची वाढ उत्तम होत नाही, वजन कमी भरते. यामुळेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षीचे बेणे रोपे तयार करण्यासाठी वापरतात.
रोपांसाठीचे व्यवस्थापन
दिवसाला दोन हजार, तर महिन्याला सुमारे 30 हजार रोपेनिर्मितीचे उद्दिष्ट असते. दरवर्षी एक ते दीड लाख रोपे तयार करतात. को 86032, फुले 265 आदी जातींच्या बेण्यांची 20-20 गुंठ्यांवर लागवड होते. एक रोप तयार करण्यासाठी दीड ते पावणेदोन रुपये खर्च येतो. दोन ते अडीच रुपये प्रति रोप याप्रमाणे विक्री होते. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये अधिक मागणी असते. सातारा, गोटखिंडी, उदगाव, आष्टा, तसेच परिसरातील शेतकरी रोपांची खरेदी करतात. आगावू नोंदणी करावी लागते.
सत्यजित शिंदे - 9158982042
आधुनिक पद्धतीकडे भीमरावांचा ओढा
वारणानगरचे भीमराव केकरे पाच लाख रुपये खर्चून उभारलेल्या शेडनेटमध्ये दररोज अडीच ते तीन हजार रोपांची निर्मिती करतात. आधुनिक पद्धतीने रोपनिर्मिती असल्याने मागणी अधिक आहे. दिवसाला तीन हजार रोपांच्या निर्मितीसाठी सुमारे 100 प्लास्टिक ट्रे लागतात. त्यासाठी लागणारे कोकोपीट आंध्र प्रदेशातून खरेदी करावे लागते. दिवसाला दहा पोती लागतात. 10 ते 13 कामगार दररोज त्यांच्याकडे कामास आहेत. अडीच ते तीन हजार रोपेनिर्मितीसाठी सहा हजार रुपये दिवसाला खर्च येतो. अडीच रुपये दराने रोपांची विक्री केल्यानंतर खर्च वजा जाता अंदाजे दहा टक्के निव्वळ नफा मिळतो.
भीमराव केकरे - संपर्क - 9552528632
रोपवाटिकेचे फायदे
- रोपवाटिकेतील रोपांची उगवण क्षमता चांगली असते.
- बेणेप्रक्रिया केलेली असल्याने कीड - रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
- साखर कारखाना लावणीची नोंद दीड महिना अगोदर करून घेतो, यामुळे तोड वेळेवर होते.
- थेट रोपांच्या लावणीमुळे दोन भांगलणी, खताची एक मात्रा यावरील खर्च वाचतो.
- रोपांतील अंतर योग्य ठेवता आल्याने खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे होते.
- पारंपरिक लावणीच्या तुलनेत उत्पादनात 20 ते 40 टक्के वाढ होते.
- हंगामानुसार पाण्याच्या काही पाळ्या वाचतात.
- रोपांमध्ये फुटव्यांची संख्या अधिक असते, त्यामुळे सरासरी उत्पादनात चांगली वाढ होते.
रोपे वापरण्याचा फायदा झाला
पूर्वी दोन डोळा पद्धतीने लावण करायचो. एकरी 40 टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. रोपवाटिकेतून रोपे विकत घेऊन लावण सुरू केली. आता 60 टनांपर्यंत उत्पादन मिळते. किडी - रोगांचा विशेषतः काणी, खोडअळीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आढळले.
- रघुनाथ चव्हाण, तळसंदे
माझे शेत पूरक्षेत्रात आहे, त्यामुळे कांडी लावणीनंतर अनेक ठिकाणी उगवण होत नाही किंवा पुराचे पाणी जास्त दिवस शेतात राहिल्यास उसाची मरतूक होते. या मोकळ्या जागा रोपांच्या लावणीतून भरून घेतो. खोडव्यामध्येही अनेक ठिकाणी उगवण न झाल्याने जागा रिकामी राहते. या ठिकाणीही रोपांची लागवड करण्यात येते.
- दिलीप पांडुरंग पवार, कदमवाडी, जि. कोल्हापूर
उसाची लावण करताना कांडी पायाने जमिनीत पेरतात. यामध्ये डोळा खराब होण्याचा, तसेच कांडी खोलवर गेल्याने उगवण न होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे 100 टक्के उगवण होत नाही. साहजिकच उत्पादनावर परिणाम होतो. याउलट रोप लागवडीत रोपांची संख्या योग्य ठेवली जाते. दोन रोपांतील अंतरही योग्य ठेवले जाते. खतांचा पुरवठा योग्य ठिकाणी होतो. यामुळे खते वाया जाण्याचा धोका टळतो. ठिबक सिंचन केल्यास फायदा वाढतो. रोपलावणीत योग्य व्यवस्थापनाची सांगड घालून उत्पादन वाढविणे शक्‍य आहे.
- डी. एम. वीर, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर

Wednesday, July 11, 2012

भाताचे देशी वाण संवर्धनाचा सूर्याजी पाटलांनी घेतलाय वसा

भाताचे देशी वाण संवर्धनाचा सूर्याजी पाटलांनी घेतलाय वसा
आयुर्वेदिक डॉक्‍टर शेतकरी पटवतोय देशी वाणांचे आरोग्यदायी महत्त्व सध्याच्या संकरित पीकजातींच्या युगात देशी जातींच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे; मात्र आपला आयुर्वेदिक वैद्यकीय व्यवसाय सांभाळत कोल्हापूर जिल्ह्यातील परिते (ता. करवीर) येथील डॉ. सूर्याजी गणपत पाटील यांनी मात्र भात पिकाच्या देशी जातींच्या संवर्धनाचा वसा जपला आहे. दररोजच्या आहारातही ते याच भातवाणांचा वापर करतात. उत्तम आरोग्यासाठी अशा जातींची जपणूक गरजेची असल्याचा संदेश आपल्या कार्यातून त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
राजेंद्र घोरपडे
सन 1985 मध्ये आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. सूर्याजी पाटील यांनी गावी परिते येथे व्यवसायास सुरवात केली. त्यांची वडिलोपार्जित 13 एकर शेती आहे. शालेय जीवनापासूनच वडिलांसोबत ते शेतीकामे करायचे. ऐन दहावी बोर्डाच्या परीक्षेवेळी उसाला खताची मात्रा देऊन अकरा वाजता पेपर देण्यासाठी त्यांना जावे लागले होते. आवडीमुळेच शेतीकामांचे कष्टही त्यांना जाणवले नाहीत. पुढे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
सध्याच्या धकाधकीच्या आणि महागाईच्या जीवनात स्वार्थ साधण्याच्या मागेच मानव लागला आहे. यामुळे तो माणुसकी हरवून बसला आहे. शिक्षण घ्यायचे आणि अमाप पैसा कमविण्यासाठी वेगवेगळ्या युक्‍त्या योजायच्या, हाच व्यवसाय झाला आहे. चांगले काय, गरज कशाची आहे, याचा विचारच मानव विसरून गेला आहे. याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होत आहे. उतारवयात तो विविध व्याधींनी ग्रस्त होत आहे. केवळ योग्य आहार नसल्याने त्याची मानसिकता बदलली आहे. हेच तत्त्वज्ञान डॉ. सूर्याजी यांनी ओळखून जीवनात बदल करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. अध्यात्माची जोड त्यांच्या विचारांना मिळाली आहे. पंढरीची माघातील वारी ते न चुकता करतात. जीवनातील चांगल्याचा स्वीकार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शेतीतही तसे बदल त्यांनी सुरू केले आहेत.
देशी वाणांचे संवर्धन...
रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनींचा पोत खराब होत चालला आहे. अन्नपदार्थांची सात्त्विकता कमी होत आहे. रासायनिक कीडनाशकांचे अंश पिकांमध्ये, पर्यायाने अन्नात राहात असल्याने त्याचा अनिष्ट परिणाम आरोग्यावर होत आहे. यामुळे भावी काळात देशी वाणांच्या संवर्धनाची आवश्‍यकता भासणार आहे. हे विचारात घेऊनच डॉ. सूर्याजी यांनी भाताच्या पारंपरिक देशी जाती जतन करण्याचा निर्णय घेतला.
वाणांचा शोध...
पूर्वी डॉ. सूर्याजी यांच्या घरी भाताच्या पारंपरिक देशी जातीच लावल्या जात. लहानपणी देशी वाणांची गोडी चाखलेल्या डॉ. सूर्याजी यांना संकरित वाण बेचव वाटू लागले. त्यांनी जुन्या जाती शोधून लागवड करण्याचे ठरवले. जिल्ह्याच्या दुर्गम भागांचा दौरा केला. दुर्मिळ जाती हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच शेतकरी लागवड करतात, हे लक्षात आले. आजरा भागात "काळी जिरगा', गिरगावमध्ये "जोंधळा जिरगा', भादवण (ता. आजरा)मध्ये "चंपाकळी' या जाती मिळविल्या. काळ्या जिरगा वाण अनेक ठिकाणी अगदी बंगळूरला जाऊन शोधले. तेथे मोठ्या आकाराचा हा वाण मिळाला. काळी गरजी वाणही मिळाले. या सर्वांचे संवर्धनही त्यांनी केले आहे.
सेंद्रिय पद्धतीनेच लागवड
भाताच्या देशी वाणांची लागवड सेंद्रिय पद्धतीने करावी लागते, अन्यथा त्यांचा पौष्टिकपणा राहात नाही, असे प्रयोगानंतर डॉ. सूर्याजींना आढळले. दरवर्षी दीड - दोन एकरांवर ते देशी वाण लावतात. त्यांना खत देताना लेंडी खतासाठी 15 दिवस बकरी शेतात बसवितात. 400 ते 500 बकऱ्यांच्या कळपास दिवसाला 300 रुपये खर्च येतो. 500 किलो गांडूळ खत, प्रति ट्रॉली 400 रुपये दराने 50 ते 60 गाड्या शेणखत शेतात मिसळतात. सेंद्रिय खतावर साधारणपणे 10 ते 15 हजार रुपये खर्च होतात. देशी बियाणे घेतलेल्या शेतात काढणीनंतर ऊस घेतला जातो, तो निडव्यापर्यंत ठेवतात. रासायनिक खतांचा अत्यल्प वापर होतो. एकरी 60 ते 70 टनांपर्यंत एकरी उत्पादन मिळते. चौथ्या वर्षी पुन्हा लेंडी खत, सेंद्रिय खत, गांडूळ खत देऊन शेतात पुन्हा देशी भात लावला जातो.
उत्पादकता कमी पण दराला भारी
देशी वाणांची उत्पादकता कमी समजली जाते. सेंद्रिय पद्धतीने लागवड करून एकरी 12 - 14 क्विंटल उत्पादन डॉ. सूर्याजी काढतात. आज या भातास 60 ते 70 रुपये प्रति किलो भाव आहे. याचा विचार करता संकरित वाणांच्या तुलनेत ही लागवड फायदेशीर ठरते. घरगुती वापरासाठी हे वाण उपयोगी ठरतात. दराचा विचार केल्यास या जाती फायदेशीर असल्याचे डॉ. सूर्याजी यांना वाटते.
औषधी भात म्हणूनच ओळख
काळी गरजी, काळा जिरगा, हावळा, जोंधळा जिरगा या जाती "औषधी भात' म्हणूनच परिचित आहेत. क्षयरोगी, अशक्तपणा असणाऱ्यांना, बाळंतिणीस पत देण्यासाठी, दीर्घ मुदतीच्या आजारी रुग्णांना या जातींचा तांदूळ उपयुक्त आहे. या जातींत विविध जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शिअम यांचे प्रमाण अन्य वाणांपेक्षा अधिक आहे. हा भात पचनास हलका, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे. त्यात साखरेचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह आदी विकार असणाऱ्यांना हा भात उपयुक्त आहे.
आंबा, आवळ्याची बागही
डॉ. सूर्याजी यांनी यंदा रेठरे (जि. सातारा) येथून बासमती 370 सुवासिक भातही आणला आहे. सात एकरांवर आंबा - आवळ्याची बागही आहे. आवळ्याच्या नरेंद्र - 7, कांचन जाती आहेत. आंब्याच्या नीलम, केसर, चौसा, लंगडा जाती त्यांच्याकडे पाहण्यास मिळतात. उसाची 98005 या नव्या जातीची 200 रोपे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधून आणून दोन वर्षांपूर्वी त्याची लागवड केली आहे.
खिलारी गाईंचे संगोपन
खिलारी जातीचे संगोपन डॉ. सूर्याजी यांनी छंद म्हणून केले आहे. लातूर येथून जातिवंत खिलारी वंशाच्या जनावराचे सिमेन आणून गाई गाभण ठेवल्या जातात. नर जातीचे वासरू जन्माला आल्यास दोन वर्षांपर्यंत संगोपन करून विक्री केली जाते. यातून 30 ते 40 हजार रुपये मिळतात. भारतीय शास्त्रात खिलारी गाईंची विक्री करायची नाही असे उल्लेख आहेत, त्याचे पालन करत डॉ. सूर्याजी या गाई शेतकऱ्यांना संगोपनासाठी दान करतात.
उत्पादकता कमी तरीही...
देशी वाणांची उत्पादकता कमी आहे. सेंद्रीय पद्धतीने भात लागवड करुन एकरात 12 ते 14 क्विंटल उत्पादन डॉ. सुर्याजी काढतात. आज या भातास 60 ते 70 रुपये किलो इतका भाव आहे. याचा विचार करता संकरित बियाण्याच्या तुलनेत याची लागवड फायदेशीर ठरते. घरगुती वापरसाठीच डॉ. सुर्याजी देशी भाताची लागवड करतात. पण बाजारभावाचा विचार केला तर या भाताच्या जाती फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी याचा विचार करावा. असे डॉ. सुर्याजी यांना वाटते.
भारतात मोठी जैवविविधता आहे. पिकांच्या 160 देशी प्रजाती आहेत. संकरित वाणांसाठीही जंगली वाणांची गरज भासते. असे 340 जंगली वाण भारतात आहेत. अलीकडे या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. स्थानिक वाणांचे उत्पादन कमी असल्याने त्यांची लागवड शेतकरी करत नाहीत. झपाट्याने बदलणाऱ्या जगात स्थानिक वाणांचे संवर्धन करणाऱ्या डॉ. सूर्याजी पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनी हा आदर्श घेऊन काही क्षेत्रावर पारंपरिक वाणांचे संवर्धन करण्याची गरज आहे.
-
डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पतिशास्त्र तज्ज्ञ
संपर्क - डॉ. सूर्याजी गणपत पाटील - 9423800588 परिते, ता. करवीर, जि. कोल्हापूर