Monday, August 29, 2016

अभिषेकाचे पुण्य....



अनेक मंदिरात मुर्तींना अभिषेक केले जातात. पण या अभिषेकात वापरले जाणारे दुध वायाच जाण्याचा प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. हे दुध वाहत जाऊन सांडपाण्यात मिसळते इतके भानही लोकांना राहात नाही. तरीही भावनेपोटी हे अभिषेक सुरुच असतात. अशा या प्रथांना कोठेतरी आळा बसायला हवा. काही मंदिरात तर हजारो लिटर दुध असेच वाया जाते. ही प्रथा थांबवण्याचा वसा बेळगावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला. गेले दोन वर्षे कपिलेश्‍वर मंदिरात श्रावणातील सोमवारी होणारे अभिषेक या कार्यकर्त्यांनी रोखले आहेत. हे वाया जाणारे दुध त्यांनी अनाथ व वृद्धा आश्रमांना देऊन एक वेगळा आदर्श उभा केला आहे.

आता मला विचाराल तर आम्हा नव्यापिढीला अभिषेक कोणी सुरु केला याची कल्पनाही नाही. तो का केला जातो हे ही माहीत नाही. ते जाणून घेण्याचीही आमची इच्छा नाही. केवळ परंपरा म्हणून अभिषेक करण्याकडेच आमचा कल दिसतो. पूर्वज सांगतात म्हणून श्रद्धेपोटीच आपण अभिषेक करतो. यात त्या मुर्तीची झिज होते याचे भानही राहात नाही. हा अभिषेक दिवसातून एकदाच करावा याचेही भान नसते. दगडीमुर्तीला देव मानायचे मग त्या दगडावर दुध ओतून ओतून त्याचे सोैदर्य नष्ट होते. हे आपल्या लक्षात कसे येत नाही. देवाचे सौदर्य नष्ट होत असेल तर मग ती पुजा कशी आपणास मान्य होते हेच मुळात समजत नाही. तरीही आपण अभिषेक करतच राहातो. अशा अभिषेकाने कित्येक मंदिरात दुर्गंधीही पसरते. याकडे कोणाचेही लक्ष नसते. हीच देवाची भक्ती का? नव्या पिढीला भक्ती म्हणजे काय याचीही माहिती नसल्याने ही परंपरा म्हणून आपण अंधश्रद्धा जोपासतो आहोत. याबाबत आता प्रबोधनाची गरज आहे. संतांनी भक्ती कशी करावी ? श्रद्धा म्हणजे काय ? पुजा कोणाची होते ? पुजेसाठी काय हवे असते ? हे सर्व सांगितले आहे. पण तरीही आपण याचा अभ्यास करत नाही. विचार करत नाही. मग चुका या होणारच. पण त्या चुका आहेत हे ही आपण मान्य करायला तयार नाही. विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. पण तरीही जनता मात्र याबाबत अज्ञानी कशी ? भोळीभाबडी जनता अशा अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडते. विज्ञान प्रगत झाले पण लोकांच्या भाबडेपणाचा फायदा उठवणारे काही कमी राहीले नाहीत. त्यांनी या प्रगत तंत्राने लोकांची फसवणूक केली जात आहे. फसवणूकही आता हायटेक झाली आहे. आपण फसत आहोत याचेही भान आता जनतेला राहीले नाही. पण काही जागरुक माणसे सामाजिक भान ठेऊन कार्य करत आहेत. समाजाला दिशा देण्यासाठी अशा व्यक्तींची गरज आहे.

कपिलेश्‍वर हे बेळगाव शहरातील प्रसिद्ध मंदिर. या मंदिरात श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी देवाला अभिषेक करण्याची प्रथा आहे. हजारो लोक दुधाच्या पिशव्या घेऊन या मंदिरात अभिषेक करत होते. पण हे सर्व दुध गटारीत मिसळले जायचे. दुधाची ही नासाडी रोखण्याचा संकल्प नांदुर गल्लीतील मंडळांनी घेतला. देवस्थांनचे पुजारी व विश्‍वस्थांना विश्‍वासात घेऊन त्यांनी दुधाची नासाडी थांबवण्यासाठी पुढाकार घेतला. दैनिक सकाळनेही या उपक्रमाचे स्वागत करत जनजागृतीसाठी मंडळास सहकार्य केले. दुधाचा अभिषेक करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना विश्‍वासात घेऊन येणारे दुध संकलित करण्याचा उपक्रम हाती घेतला. गेली दोन वर्षे हे कार्य सुरु आहे. शेकडो लिटर वाया जाणारे दुध संकलीत करून अनाथ व वृद्धाश्रमात ते वाटण्यात येत आहे. खरी भक्ती कोणती? खरा धर्म कोणता ? खरे पुण्य कशात आहे ? हे आता जनतेनेच ठरवायला हवे आणि कृती करायला हवी. भक्तीचा खरा अर्थ समजून कृती करायला हवी. बेळगावचा हा उपक्रम देशातील अनेक मंदिरात राबविता येणे शक्‍य आहे. याबाबत जागृतीही करता येणे शक्‍य आहे. अभिषेकाचे पुण्य कशाने मिळेल हे जनतेने समजून घेऊन आता कृती करायला हवी. यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

देवस्थानच्या परिसरात असे अनेक उपक्रम राबविण्याची आता गरज आहे. अनेक मंदिरात देवळात नारळ फोडले जातात. या नारळातील गोड पाणी शिंपडण्यात येते. पाण्याचे पवित्र विचारात घेऊन कार्य करायला हवे. हे पाणी कोणाच्या तरी पोटात गेल्यास त्याला उर्जा मिळेल. हा विचार का केला जात नाही. एखाद्या आजारी व्यक्तीला हे पाणी दिले तर त्याचा आधार मिळेल. हा विचार का केला जात नाही. यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा देवस्थानाने उभारायला हवी. अशा विचार का केला जात नाही. दैनिक सकाळच्या तनिष्का गटाने जोतिबा डोंगरावर हा उपक्रम राबविला. त्याला प्रतिसादही मिळाला. नारळाचे वाया जाणारे पाणी साठवून ते शाळा व रुग्णांना ताबडतोब दिले. या उपक्रमाचे कौतुक झाले. अशा या उपक्रमातून देवस्थानात होणारी स्वच्छताही राखली जाते याचा विचार व्हायला हवा.

पुण्य कर्म कोणते हे आता जनतेनेच ओळखायला हवे. तशी कृती करायला हवी. खरी भक्ती कोणती ? खरे अध्यात्म कशात आहे ? देव कोठे आहे ? याचा अभ्यास करुन कृती करायला हवे. हे जाणून घेऊन आपला आचरण करायला हवे. ही जागृती आली तर श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय हे सांगण्याची गरज भासणार नाही.

- राजेंद्र घोरपडे

Tuesday, August 23, 2016

कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे...

कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे... 
अभ्यासकांची भावना; अष्टावधानी व्यक्तिमत्त्वाच्या विविध रूपांची छाप

- राजेंद्र घोरपडे


कृष्ण विविध रूपात पाहायला मिळतो. प्रेममय, भक्तिमय, खोडकर असे त्याचे व्यक्तिमत्त्व जनसामान्यांना आपलेसे वाटते. वात्सल्य, शृंगार, भक्ती, करुणा अशा रसांचा आविष्कार कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वात आहे. प्रेम म्हणजे भक्ती या जाणिवेतून त्याच्यावर काव्य रचना झाल्या. संतांनी विठ्ठल रूपात कृष्णाचे वर्णन केले आहे. कारण पंढरीच्या विठ्ठलात शिव आणि विष्णू अशा दोन्ही तत्त्वांची एकरूपता संतांनी पाहिली आहे. असा हा कृष्ण संत साहित्य अभ्यासकांना कसा वाटतो याविषयी... 


श्रीकृष्ण हे अष्टावधान व्यक्तिमत्त्व आहे. राजनैतिक, युद्धकुशल, चतुरंग योद्धा असा तो आहे. प्रसंगी आपल्या मूल्यांसाठी, स्नेहासाठी तो सारथ्यही पत्करतो. बालवयात तो निरागस खोडकर वाटतो. तारुण्यात तो प्रेमभक्तीत रंगलेला असा वाटतो. त्यानंतर चतुरस्र नेतृत्व करणारे असे त्याचे व्यक्तिमत्त्व आहे. संतांनी कृष्णाचे विविध पैलू मांडले आहेत. संत नामदेवांचा कृष्ण निरागस, निर्मळ असा आहे. संत एकनाथांनी रंगवलेला कृष्ण बालक्रीडेत रममाण झालेला आहे. तो रोमॅन्टिकही वाटतो. संत तुकारामांनी कृष्णाच्या बालक्रीडेवर अभंग रचले. त्यांच्या अभंगातून तो भक्तीचे दैवत म्हणून पाहायला मिळतो. पंडित कवींनी लोकांचे रंजन करणारा, चांगल्या मूल्यांची जपणूक करणारा कृष्ण रंगवला आहे. शाहिरांनी शृंगारप्रधान असे त्याचे चित्र उभे केले आहे. एकूणच कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे.
- ल. रा. नसिराबादकर, 
संत साहित्याचे अभ्यासक 

भगवद्‌गीतेतील कृष्ण कर्मयोगी, ज्ञानयोगी, भक्तियोगी असा तीन प्रकारचा आहे. अर्जुनाला शिकवण्याचे केवळ निमित्त आहे. त्यामुळे आजच्या जीवनातही त्यातील तत्त्वज्ञान लागू पडते. या तीन गोष्टींनी जीवन आनंदी होते. कर्माच्या मोबदल्यात काय मिळाले याचाच विचार होतो. ते आवश्‍यक असले तरी सध्याच्या पिढीला कर्म करण्याआधीच फळ हवे आहे. श्रद्धेने कर्म केले तर यश जरूर मिळते. परमार्थ करताना व्यवहार ज्ञानही आवश्‍यक आहे. याची सांगड घातली तरच प्रपंच सफल होतो.
- यशवंत पाठक, 
संत ज्ञानदेव अध्यासन प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

भगवद्‌गीता म्हणजे कृष्णाने अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेला ग्रंथ आहे. यावर अनेक मतमतांतरे आहेत. भगवद्‌गीता कृष्णाने सांगितलीच नाही, असे म्हणणारेही लोक आहेत. पण हिंदू धर्मात तीन ग्रंथ पवित्र मानले जातात. त्यात भगवद्‌गीतेचा समावेश आहे. कृष्णाचे जगणे हे भगवद्‌गीतेसारखे आहे. यासाठी भगवद्‌गीता समजल्याशिवाय कृष्ण चरित्र समजत नाही व कृष्ण चरित्र समजल्याशिवाय भगवद्‌गीताही समजत नाही.
- डॉ. सदानंद मोरे, 
संत साहित्याचे गाढे अभ्यासक 

Sunday, August 21, 2016

मन करा रे प्रसन्न


ज्याने मन जिंकले
त्याचे मन हे उत्तम दोस्त झाले
ज्याने मनाकडून पराभव स्विकारला
त्याचा सर्वात मोठा शत्रू मन हाच झाला

हा मनाचा नियम आहे
यासाठी मनाला नियंत्रित करायचे आहे
मनावर विजय मिळवायचा आहे
मनावर आपल्या ताब्यात ठेवायाचे आहे

मनाला शांती आवडते
तेव्हा मनाला प्रसन्नता येते
मनाला अशांती आवडते
तेव्हा मन हिंसावादी होते

मनाचे हे शास्त्र समजून घ्यायला हवे
त्यासाठी मनाला नियंत्रणात ठेवायला हवे
लोभ, वासनेपासून मन दुर ठेवायला हवे
मन आपल्या ताब्यात यायला हवे

मन करा रे विचार मुक्त
विचार थांबले की व्हाल मुक्त
मग करा एकचाच स्वीकार
सो हम सो हम चा करा गरज

मनाला लाभेल अखंड प्रसन्नता
मनाला लाभेल अखंड शांतता
मन लागेल वेड अध्यात्माचे
मग फुलेले मन आत्मज्ञानाचे

- राजेंद्र घोरपडे

Saturday, August 20, 2016

सावर रे मना...

मन चपळ, चपळ
मन चंचल, चंचल

न राही एके जागी
फिरे सारखे जागो जागी

या मना कसे आवरु
अगणिक विचारांना कसे सावरु

वाऱ्याला रोखू झाडे लावून
प्रकाशाला रोखू भींती उभारुन

सर्वांना आहे विश्रांती
पण मनाला नाही ऊसंत

सतत धावे इकडे तिकडे
सतत राहे भटकत जिकडे तिकडे

एकाग्रतेने कर सोहम सोहम ध्यान
मन त्यावर कर स्थिर होईल मग आत्मज्ञान

- राजेंद्र घोरपडे

Saturday, August 13, 2016

आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो...

‘श्रमिक सहयोग’ राबवितेय प्रयोगशील उपक्रम 

चिपळूण तालुक्‍यात रुजताहेत विकासाची बीजे 


चिपळूण तालुक्‍यामधील (जि. रत्नागिरी) विविध गावांमध्ये श्रमिक सहयोग ही संस्था निसर्ग शेती, वनसंवर्धन, सूक्ष्म जलविद्युत केंद्र, वंचित समाजासाठी वाडी-वस्त्यांवर अनौपचारिक शाळा असे विविध उपक्रम राबवीत आहे. सन २००४ मध्ये संस्थेने कोळकेवाडी (ता. चिपळूण) येथे ‘प्रयोगभूमी’ हे प्रयोगशील शिक्षण केंद्र सुरू केले. विविध उपक्रमांतून ही संस्था शाश्वत विकासाचे धडे परिसरातील लोकांना देत आहे. 

- राजेंद्र घोरपडे 

कोकणच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील काही ध्येयवादी व्यक्तींनी १९८४ मध्ये चिपळूण तालुक्‍यात श्रमिक सहयोग या संस्थेची स्थापना केली. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यासगट, चिंतन शिबिरे, व्याख्याने, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी प्रबोधनात्मक उपक्रम संस्थेने सुरू केले. आदिवासी समाजामध्ये एका पिढीने दुसऱ्या पिढीस शिक्षित करण्याची पद्धती आहे, त्यामुळे या मुलांना शिक्षण देताना अनेक अडचणी उभ्या राहतात. या मुलांना आपला अभ्यासक्रम बोजड वाटतो. हे लक्षात घेऊन त्यांना रुचेल, पटेल अशा भाषेत शिकविण्याची गरज असते. यासाठी श्रमिक सहयोगने मुलांच्या कार्यक्षमता शोधून त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला. ग्रामीण स्त्रिया-युवकांचे प्रबोधन व संघटन, कोकणातील पर्यावरणविषयक तसेच विकासपद्धती विषयक मुद्द्यांची हाताळणी, समाजातील कष्टकरी, वंचित घटकांच्या जीवनधारांच्या अधिकाराच्या मुद्द्यांची हाताळणी, वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणपद्धतीची मांडणी यावर संस्थेचे कार्य सुरू झाले. चिपळूण, गुहागर, संगमेश्‍वर या तालुक्‍यांतील सुमारे १५० गावांत संस्थेचे कार्य सुरू आहे. संस्थेने पहिली १२ वर्षे कातकरी- आदिवासी समाजाच्या दुर्गम भागातील २६ वाड्यांवर अनौपचारिक शाळा चालविल्या, त्यातून सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.

प्रयोगशील निवासी शाळा 
वंचित मुलांच्या विकासासाठी २००४ मध्ये संस्थेने कोळकेवाडी येथे १६ एकर जमीन खरेदी करून प्रयोगशील निवासी शाळा सुरू केली. या शाळेत सध्या ४० मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना औपचारिक अभ्यास, व्यवसाय शिक्षण, कला-कौशल्य असे शिक्षण देण्यात येते. या शाळेच्या संचालनासाठी पुणे येथील नवमहाराष्ट्र कम्युनिटी फाउंडेशन (नवम) या संस्थेचे सहकार्य मिळाले होते. प्रयोगभूमीतील मुलांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्थानमार्फत शालेय शिक्षण व्यवस्थेत सामील करून घेण्यात येते. ‘प्रयोगभूमी’चे संचालन समाजातील शिक्षणप्रेमी व्यक्ती, संस्था, गट यांच्या साहाय्याने चालते. त्यासाठी ‘पालकत्व योजना’ चालविली जाते. नवम (पुणे), एस.पी.ए. एज्युकेशन फाउंडेशन (मुंबई), सकाळ रिलीफ फंड इत्यादी संस्थांचा यात सहभाग आहे.

‘संडे स्कूल’मधून मार्गदर्शन 
डोंगरी भागातील कातकरी समाजात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण न करणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. शिक्षणाची इच्छा असूनही त्यांना शिकता येत नाही. अशा तरुणांसाठी प्रयोगभूमीमध्ये ‘संडे स्कूल’ ही संकल्पना राबविली जाते. दर रविवारी तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यात येतो. सध्या यामध्ये १२ तरुण सहभागी झाले असून, दहावी परीक्षेसाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते.

स्वयंसहायता गटातून महिला विकास 
चिपळूण आणि गुहागर तालुक्‍यातील ६५ गावांमध्ये संस्थेने २५० स्वयंसहायता गट स्थापन केले आहेत. यातून सुमारे ३७०० स्त्रिया संघटित झाल्या असून त्यांच्या आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. श्रमिक सहयोग परिसरातील सहयोगी गटांना सातत्याने प्रशिक्षण, संशोधन इत्यादी स्वरूपात मदत करते. कोकण संघर्ष समिती, सह्याद्री वाचवा अभियान, कोंकण नारी मंच, आम्ही चिपळूणकर, कृषी वसंत शेतकरी संस्था, आदिम कातकरी आदिवासी संघटना इत्यादी संस्थांना सहकार्य केले जाते.

पुरस्कारांनी गौरव ः 
संस्थेला वीजनिर्मिती व पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र शासन व पर्यावरण शिक्षण संस्थेचा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांचा समाजकार्य गौरव पुरस्कार, राष्ट्र सेवा दलाचा साने गुरुजी समाजशिक्षक पुरस्कार
आणि सामाजिक कार्यासाठीचा अस्मि प्रतिष्ठानचा पुरस्कार संस्थेला मिळालेला आहे.

शेकरू महोत्सवाचे आयोजन 
कोयनानगर प्रकल्पाच्या चौथ्या टप्पा परिसरात असणाऱ्या वनांमध्ये पर्यावरणप्रेमींना शेकरू फिरताना आढळले. या निसर्गरम्य परिसरात वन खात्याने शेकरूचा अधिवास असल्याची शासकीय नोंद केल्यानंतर वनसंवर्धनासाठी प्रयोगभूमीने पाऊल उचलले. संपूर्ण परिसरात वृक्षतोडीस बंदी घातली. याबाबत जागृती व्हावी या उद्देशाने संस्थेने आम्ही चिपळूणकर, वन खाते, डी.बी.जे. महाविद्यालय यांच्या सहकार्याने गेल्यावर्षी प्रयोगभूमीमध्ये शेकरू महोत्सव आयोजित केला होता. या वेळी परिसरातील जैवविविधतेची माहिती संकलित करण्यात आली. महोत्सवासाठी उपस्थित निसर्गप्रेमींनी वन परिसरात फिरून, जंगलातील विविध वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग, प्राण्यांच्या पायाचे ठसे, पक्ष्यांचे आवाज, फुलपाखरांचा अधिवास याबाबत माहिती संकलित केली.

सूक्ष्म जलविद्युत प्रकल्प 
कोयना वीज प्रकल्पाच्या परिसरात असणाऱ्या अनेक वाड्या-वस्त्या, तसेच प्रयोगभूमीतही वीज नव्हती. अशा या परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने श्रमिक सहयोगचा अभ्यास सुरू झाला. नागालॅंडमध्येही डोंगरी भागात ही समस्या आहे. तेथे सरकारने झरे-ओढे, धबधब्याच्या वाहत्या पाण्यावर छोटी जलविद्युत केंद्रे उभारली आहेत. हे पाहून तसाच प्रयोग प्रयोगभूमीत करण्यात आला. प्रयोगभूमीच्या परिसरात वाहणाऱ्या झऱ्यावर २००७ पासून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. नागालॅंड सरकारच्या सहकार्याने वीजनिर्मितीचे यंत्र येथे बसविले अाहे. वाहत्या झऱ्याचे पाणी १५ मीटर उंचीवर अडवून तेथून पाइपने हे पाणी जल विद्युत निर्मिती यंत्रापर्यंत आणले आहे. या यंत्रात ठराविक दाबाने पाणी सोडून वीजनिर्मिती करण्यात येते. चार-पाच महिने दररोज तीन किलोवाॅट विजेची निर्मिती या यंत्रातून होते.
प्रयोगभूमीने यंदा ‘चला वीजनिर्मिती करूया’ ही कार्यशाळा आयोजित केली होती. पर्यटन, प्रबोधन, मनोरंजन, शिक्षण, प्रत्यक्ष अनुभव असे उद्देश ठेवून आयोजित या कार्यशाळेमध्ये राज्यभरातून अनेकांनी सहभाग घेतला. सहभागी व्यक्तींना या यंत्राची सर्व तांत्रिक माहिती देऊन स्वतः हे यंत्र जोडणी करून वीज तयार करण्याचे प्रात्यक्षिक करण्यास सांगण्यात आले होते.

भाताच्या पारंपरिक जातींचे संवर्धन 
चिपळूण तालुक्‍याच्या डोंगरी भागात खामडी ही पारंपरिक भाताची जात आढळते. सध्याच्या काळात ही जात दुर्मिळ होऊ लागली आहे. प्रयोगभूमीमध्ये दीड एकरावर खामडी (लाल तांदूळ) या भाताच्या पारंपरिक जातीचे संवर्धन करण्यात येत आहे. एसआरआय पद्धतीने भात रोपांची लागवड करण्यात आली असून, सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन केले आहे. संस्थेतर्फे शेतकऱ्यांसाठी भात लागवडीबाबत कार्यशाळा घेण्यात येतात.

संपर्क ः
राजन इंदुलकर ः ९४२३०४७६२०, ८४०८०११२३१

Thursday, August 11, 2016

आमदारांना पगारवाढीच्या अनोख्या शुभेच्छा

आमदारांना पगारवाढ झाली पण देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची किमान आधारभूत किंमत काही वाढली नाही. उसाचा दर काही वाढला नाही. शेतकरी नेते केवळ आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करतात. स्वतःचे नाव कमावतात. खासदारकी-आमदारकीही मिळवतात. मंत्रिही होतात आणि शेतकऱ्यांना विसरतात अशी काहीशी परिस्थिती सध्या तरी आहे. शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवतात कारण त्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्या उसाला भाव मिळाला. कोणीतरी बोलणारे आहे. म्हणून शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. या विश्वासांचा त्यांनी मान राखायला हवा. हे बोलण्याचा उद्देश याचसाठी कारण पर्वाच आमदारांची पगारवाढ झाली. या आमदारांचे काही शेतकऱ्यांनी अनोखे अभिनंदन केले. असाच एक फ्लेक्स वाचणात आला. त्यावर शुभेच्छुकांची नाव वाचली आणि डोळे उघडले. शुभेच्छुस होते. कपाशीवरील लाल्या रोग अनुदान वंचित शेतकरी, मोसंबी अनुदान वंचित शेतकरी, महागाईने होरपळलेला शेतकरी वर्ग, रंजले गांजलेले सर्व सामान्य शेतकरी. आपणास मिळाले नाही म्हणून काय झाले दुसऱ्याला मिळाले आहे ना. याच भावनेने त्यांनी या आमदारांना शुभेच्छा दिल्या आहेत. अहो आम्हाला मिळाले नाही याचे दुःख नाही पण दुसऱ्याला मिळाले म्हणून आम्हाला जळायचे नाही. त्यांना मिळाले त्यांचा मान राखायला हवा. शेतकऱ्यांच्या या स्वभावाचा विचार करायला हवा. अहो महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली. त्यावेळी त्यांनी मुठीत घेतलेले मीठ टाकले नाही. वाट्टेल तेवढा मार बसला तरी त्याला प्रतिकार केला नाही. उलट वार केला नाही. उ की चुही केले नाही. अशा या गांधी वादाचा शेतकऱ्यांवर प्रभाव आहे. कितीही अत्याचार झाला तरी तो सहन करायचा पण या सहनशक्तीचा अंत राजकर्त्यांनी पाहू नये कारण इंग्रजही देश सोडून गेले. तसे तु्म्हालाही सत्ता सोडावी लागेल प्रसंगी देशही सोडावा लागेल याचे भान त्यांनी ठेवायला हवे. शेतकरी गप्प आहे सोसतो आहे याचा अर्थ असा नव्हे की तो काहीच करणार नाही. हिसेंचा मार्ग कधीही घातक आहे. तो शेतकरी स्वीकारणार नाही. पण तुम्हाला पाय उतार करण्यासाठी योग्य मार्ग मात्र तो निश्चित स्वीकारतो याचा विचार करायला हवा. केवळ आश्वासने देऊन आता भागणार नाही. शेतकऱ्यांचे आपण काहीतरी देणे लागतो याचा विचार करुन राजकर्त्यांनी काम करायला हवे. पगारवाढ घेताना शेतकऱ्यांचा विचार आपण करायला हवा होता. ही पगारवाढ स्वीकारताना शेतकऱ्यास विसरू नका ऐवढेच येथे मला सांगावेसे वाटते.
राजेंद्र घोरपडे

आली आषाढी

आली आषाढी आषाढी
जडली भाव भक्तीची कडी

दुमदुमु लागला विठ्ठल विठ्ठलाचा नाद
वारी वाटेवर गुंफला नामजपाचा निनाद

पावसाच्या सरींनी केले साफ मन
शुद्ध भक्तीची बीजे रोवली ध्यानात

नाभी एकवटली, टक स्थिरावली भूस्थानी,
कुंडलीनी झाली जागृत, झाले विठ्ठलाचे दर्शन

राजेंद्र घोरपडे,

Sunday, August 7, 2016

साने गुरुजींचे स्वातंत्र्य विचार

सहज साधनाची वेबसाईट चाळताना मला साधनेच्या पहिल्या अंकातील साने गुरुजींचा लेख वाचनात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून एक वर्ष झाल्यानंतर साधना साप्ताहिकाचा जन्म झाला. पहिल्या स्वातंत्र्यदिनीच पहिलाच अंक प्रकाशित केल्यामुळे साहजिकच देशाच्या स्वातंत्र्यावर यामध्ये संपादकीय लेख आहे. साने गुरुजींनी स्वातंत्र्य म्हणजे काय याचा विचार यामध्ये मांडला आहे. पण भारताला स्वातंत्र्य मिळूण सत्तरी गाठली तरी आपण साने गुरुजींच्या विचारातील स्वातंत्र्य आणू शकलो नाही याची खंत वाटते.

स्वातंत्र्य म्हणजे संधी असे साने गुरुजी म्हणतात. विकासाची संधी प्रत्येकाला देण्यात यावी असे त्यांना वाटत होते. प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार द्यायला हवा. पण त्यांचा विचारातील संधी मिळू शकली नाही. सज्जन विचार नांदावेत असे त्यांना मनोमन वाटत होते. पण तसे घडले नाही. स्वातंत्र्य मिळाले फक्त इंग्रजी राजवट गेली आणि स्वकियांची राजवट आली. इतकाच बदल झाला. सत्ता बदलच झाला. फक्त व्यक्ती बदल झाला. असेच म्हणावे लागेल. लाच घेण्याचे प्रकार वाढले. राजकिय नेत्यांची मनमानी वाढली. कायदा सर्वांसाठी सारखा असायला हवा. पण तसे घडले नाही. राजकत्यांच्या अरेरावीने हळूहळू स्वकियांची राजवट परकिय वाटू लागली. साने गुरुजींनी रामराज्याचे स्वप्न पाहिले होते. सध्या देशात सत्तेत असणाऱ्या सरकारनेही रामराज्य आणण्याची स्वप्ने आपणास दाखवली होती. रामाचे राज्य आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरुही असतील. पण ते त्यांच्यासाठीच एक आव्हान उभे राहीले आहे. पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. त्यासाठी प्राणांची आहुती गेली तरी चालेल. विचार कधी मरत नाहीत. तो विचार जोपासणारे कोणी तरी उभे राहतेच. अखेर सत्याचाच विजय होतो. यासाठी लढत राहायला हवे. विचारांची चळवळ कधी संपत नाही. संधी देण्याचा विचार साने गुरुजींनी मांडला. पण संधीसाधूंचेच राज्य येथे आले. सध्या तर चांगल्या व्यक्तींनी राजकारणाची पायरीही चढू नये अशी स्थिती आहे. यावरुन संधी कोणाला मिळाली हे सांगण्याची मला येथे गरज वाटत नाही. पण स्वातंत्र्य म्हणजे संधी हा साने गुरुजींचा विचार लक्षात घेऊन मोदी सरकारने काम केल्यास रामराज्य आणणे शक्‍य आहे.

विकासाच्या संधी देऊन अहिंसक विचारांनी सरकारने काम केल्यास स्वातंत्र्यानंतर पाहिलेली स्वप्ने सत्यात आणणे शक्‍य आहे. सध्या आर्थिक दरी वाढली आहे. गरीब गरीबच होत आहे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होताना पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती सरकारने विचारात घेऊन पाऊले उचलायला हवीत. वाढती आर्थिक दरी देशासाठी घातक आहे याचा विचार करुन समानता आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी काय करता येईल याचा विचार आता सरकारने करायला हवा. त्यावर चिंतन करायला हवे.
स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी असेही साने गुरुजी म्हणतात. सरकारने आर्थिक समानता आणण्यासाठी जबाबदारीने काम करायला हवे. लोकमानस ओळखून कामे करायला हवीत. भाषिक वाद वाढत आहेत. प्रत्येकाला आपली मातृभाषा प्रिय असते. ती टिकवण्यासाठी त्याची धडपड सुरु असते. हा विचार करुन भाषेचे स्वातंत्र्य त्यांना द्यायला हवे. भाषेतून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलायला हवीत. विशेषतः सीमा भागात हा प्रश्‍न प्रकर्षाने जाणवत आहे. पण जनतेनेही संयम ठेऊन व्यवहार करायला हवेत. उगाच खोटी प्रतिष्ठा बाळगूण दुसऱ्यांना त्रास देणे योग्य होणार नाही. विकासासाठी राज्याचे तुकडे करणेही योग्य नाही. तुकडे केल्याने विकास साधता येईलही पण ते तुकडे एकमेकांशी भांडत राहतात याचाही विचार करायला हवा. एकत्र कुटूंब विभक्त झाले तर प्रत्येकाचा विकास होतो असे वाटते खरे पण विभक्त झाल्यानंतर विकासाच्या स्पर्धेतून वादही होतात. या वादातून नुकसानच अधिक होते याचाही विचार व्हायला हवा. भाऊ भावाचा खून करत आहे. राज्याचे तुकडे केल्यानंतर हे तुकडे एकमेकांशी भांडत राहणार याचाही विचार व्हायला हवा. सीमेचे वाद होतात, इंच इंच जमिनीसाठी वाद होतात. नोकरी, व्यवसायासाठी वाद होतात. लुट, हाणामाऱ्या वाढतात यातून विकास तो काय साधला जाणार हे ही विचारात घ्यायला हवे. यासाठी जबाबदारीने योग्य ती पाऊले उचलायला हवीत.

साने गुरुजींना स्वातंत्र्य म्हणजे संयम, स्वातंत्र्य म्हणजे उच्छृंखलपणा नव्हे; स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, नैतिक भावना. असे वाटते. पण असा सतविचार घेऊन आपल्या देशातील कोणतेच सरकार आत्तापर्यंत काम करताना दिसले नाही. इतका सज्जनपणा दाखवणेही कोणाला जमले नाही. सज्जनपणाचे ढोंग करुन लुटारुंचे राज्य आपल्या देशात आले. चंगळवादाने देशाला पोखरले. मग याला स्वराज्य कसे म्हणायचे हाच मोठा प्रश्‍न आहे. कायदा कोणासाठी आहे हेच समजत नाही. राजकर्त्ये कायदा हातात घेऊन कामे करत आहेत. अशाने देशात शांती नांदेल असे कधीही शक्‍य नाही. पण स्वराज्यात सुराज्य आणणे शक्‍य आहे. हा विचार ठेऊन कामे केल्यास विषमता दुर करणे शक्‍य आहे. दुरावलेली मनेही जवळ आणणे शक्‍य होणार आहे. हा बदल केवळ समाजच घडवू शकतो. समाज विघातक कृत्ये करणारे एक टक्केही लोक नाहीत. सर्वच राज्यकर्त्ये वाईट आहेत असेही नाही. यासाठी समाजातील दहा टक्के लोकांनी एकत्र येऊन या एक टक्के लोकांना ताब्यात ठेवल्यास देशात रामराज्य आणणे शक्‍य आहे. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. सरकार अशा संस्थांचा आवाज दाबत असेल तर त्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही याचाही विचार व्हायला हवा. समाजाने अशांना धडा शिकवण्याची गरज आहे. पण आता कोण आवाज उठवणार. कोण चळवळ उभारणार. हे ही तिककेच महत्त्वाचे आहे. पण चांगल्या विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन काम सुरु केल्यास हे अशक्‍य नाही हे ही तितकेच खरे आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने साने गुरुजींच्या विचारातील स्वातंत्र्य देशात कसे नांदवता येईल याचा आता विचार होण्याची गरज वाटते.

- राजेंद्र घोरपडे 

Saturday, August 6, 2016

अभिषेक

चिमणगाव पंधरा हजार लोकवस्तीचा गाव. पुरातन मंदिरे ही गावाची ओळख. रामाने वनावसाच्या काळात येथे वास्तव्य केले होते. यामुळे या गावाला विशेष महत्त्व. वनवासाच्या काळातच देशात मोठा दुष्काळ पडला होता. सर्वत्र पाण्यासाठी ओरड सुरू होती. पाऊस पडावा दुष्काळ दूर व्हावा अशी सर्वांची धारणा होती. पण देवाला याची दया येत नव्हती. अशावेळी चिमणगावातील जनतेने रामाकडे दुष्काळावर उपाय योजण्याची मागणी केली होती. लोकांचे होणारे हाल पाहून रामाने गावच्या डोंगरावर साधना केली व ब्रह्मास्त्राने येथे लिंगाची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. डोंगरावर मारलेल्या बाणाने येथे कायम स्वरूपी झरा निर्माण झाला. हा झरा दुष्काळातही कायम वाहत असतो. या पाण्यामुळे परिसरात कायम हिरवाई बहरलेली असते. या हिरवाईत चिमण्यांचा चिवचिवाट सतत ऐकायला मिळतो. यावरून येथे वसलेल्या या गावाला चिमणगाव असे नाव पडले, असेही येथील लोक सांगतात. असे हे डोंगरकपारीत वसलेले चिमणगाव भक्तीचे केंद्र झाले आहे. शांत वातावरणामुळे आणि विविध गुहांमुळे साधनेसाठी अनेक भाविक येथे येतात. वड, पिंपळासारखे मोठे वृक्ष, विविध वनौषिधींनी नटलेला हा परिसर पर्यटकांसाठी एक वेगळे आकर्षण आहे. कोण साधनेसाठी येथे येतो तर कोण मंत्रोच्चारासाठी येथे येतो.

दर सोमवारी येथे ॐ नमो शिवायः चा जप दिवस-रात्र होतो. मंत्रोच्चराच्या काळात अनेक भाविक येथील शंकराच्या मुर्तीवर व पिंडीवर दुधाचा अभिषेक घालतात. येथे दूध घातल्याने मन स्वच्छ होते असेही मानले जाते. मनातील सर्व अस्वच्छ विचारनाहीसे होतात. स्वच्छतेसाठीच अभिषेक असे त्याचे महत्त्व आहे. आता दुधा सोबत तांदूळही पिंडीवर टाकला जात आहे. या दूध, तांदळाचा सडाच पडलेला परिसरात
पहायला मिळतो. अभिषेकाच्या दुधाचा पाट शेवटी गटारीला मिळतो. याकडेही कोणाचे लक्ष नाही. यामुळे मंदिर परिसरात एक दुर्गंधी पसरली आहे तरीही याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. भक्तीच्या नावे अशुद्धता येथे होते आहे. असेही कोणाला वाटत नाही. शिव...शिव...करत दुसऱ्याचा स्पर्श झाला तरी घरात जाऊन अंघोळ करणाऱ्या भक्तांनाही अभिषेकाने पसरलेली दुर्गंधी दिसत नाही. मंदिर ऐतिहासिक असल्याने येथे पर्यटकांचा ओघ वाढतोच आहे. व्यापारी मात्र दूध, तांदळाचा व्यापार वाढविण्यावरच भर देत आहेत. पर्यटकांना दूध, तांदळाचे महत्त्व सांगून त्यांच्या गळी हा अभिषेक उतरवत आहेत. व्यापाऱ्यांच्या या फायद्याने ही ऐतिहासिक वास्तू गलिच्छ झाली आहे. याचेही भान कोणाला नाही. प्रशासनही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. भाविकांच्या भक्तीपुढे सारेच हतबल झाले आहेत. या दुर्गंधीने गावात डास पसरले. या डासांतूनच आता डेंगुची साथही गावातआली. साथीच्या रोगाचा प्रसार सतत होऊ लागला. आरोग्याच्या वाढत्या समस्यांमूळे या ठिकाणाचे पावित्र्य धोक्‍यात आले. रोगराईमुळे पाहता पाहता पर्यटकांचा ओघही घटला. व्यापाऱ्यांचा धंदा बुडाला. व्यावसायिकांचे उत्पन्न थांबले. सारा चिमणगावच ओस पडला. गावावर अवकळा आली. हे सर्व एका अभिषेकाने झाले.

या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा बोलावण्यात आली. यामध्ये तरुण, सुशिक्षित - अशिक्षित सर्वच यामध्ये सहभागी झाले. अभिषेकामुळे ही दुर्गंधी पसरते यावर ग्रामसभेत एकमत झाले. पण अभिषेक बंद कोण करणार हा मोठा प्रश्‍न होता. यासाठी अभिषेकावर अभ्यास करून यावर निर्णय घ्यावा असे ग्रामसभेत ठरले. तरुणांनी अभिषेकावर अभ्यास सुरू केला. अभिषेक दुधाचाच का? यावरही आता पुस्तके, ग्रंथ चाळले जाऊ लागले. एकात उत्तर मिळाले. दुधाने मुर्ती स्वच्छ होते. स्वच्छतेसाठी दुधाचा वापर केला जातो. मूर्ती स्वच्छ राहावी यासाठी अभिषेक घालण्यात येतो. पण काळाच्या ओघात ही गोष्ट लोक विसरले आहेत. फक्त स्वच्छ होण्यासाठी आवश्‍यक तेवढे दुध मूर्तीवर न ओतता. प्रमाणा बाहेर याचा वापर होऊ लागला आहे. कोणतीही गोष्ट प्रमाणात वापरावी लागते. प्रमाणापेक्षा जास्त वापर झाला तर त्याचा दुरुपयोग होतो. येथे हेच तर झाले आहे. हे तरुणांच्या लक्षात आले. अभ्यासातून काढण्यात आलेला निष्कर्ष अखेर ग्रामसभेत मांडण्यात आला. काही धर्मांध व्यक्तींनी हा निष्कर्ष मान्य केला नाही. याला विरोध दर्शिवला पण स्वच्छतेच्या प्रश्‍नी सर्वांनी पाठींबा दर्शिवला. ग्रामसभेत मंदिरातील इतर स्वच्छतेवरही चर्चा झाली. मूर्तीवर तांदूळ टाकले जातात. मंदिरा बाहेर नारळ फोडण्यात येतो. त्यातील पाणीही वाया जाते. या पाण्यानेही परिसरात अस्वच्छता होत आहे. येणारे पर्यटक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात. वेफर्स, कुरकुरेच्या तयार पॅकेटमुळेही प्लास्टिकचा कचरा परिसरात होत आहे. या अशा अस्वच्छतेच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याचा निर्णय ग्रामसभेत झाला. देवाचे मंदिर हे पवित्र ठिकाण. अशा परिसरात अस्वच्छता योग्य नाही. कोणताही धार्मिक विधी हा स्वच्छ आचार, विचारासाठी असतो. स्वच्छतेचा विचार, मन शुद्धीचा विचार सांगणारे हे ठिकाण अस्वच्छ असणे योग्य नाही. यासाठी स्वच्छता, शुद्धी
हेच अध्यात्म जोपासण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला. मंदिरात स्वच्छतेसाठी विविध उपाय योजना करणाचे ठरले. यात मुख्य म्हणजे अभिषेकामुळे होणारी अस्वच्छता रोखण्यासाठी अभिषेक बंद करण्यात झाला. मूर्तीच्या स्वच्छतेसाठी आवश्‍यक तेवढेच दूध अभिषेकासाठी वापरून उरलेले दूध संकलित करण्याचा निर्णय झाला. हे संकलित झालेले दूध गरजूंना, वृद्धश्रमांना, अनाथांना देण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले. तरुण मंडळांनी याकामी पुढाकार घेतला. मूर्तीवर टाकण्यात येणारे तांदूळही गोळा केले जाऊ लागले. तेही अनाथ आणि वृद्धाश्रमांना देण्याचा निर्णय झाला. नारळ फोडल्यानंतर त्याचे टाकून देण्यात येणारे पाणीही गोळा करून मंदिरात येणाऱ्या भाविकांना वाटण्याचे ठरले. प्लास्टिकचा वाढता कचरा विचारात घेऊन प्लास्टिक
वापरावर मंदिर परिसरात बंदी घालण्यात आली. या सर्व कामांसाठी गावातील तरुण मंडळे पुढे आली. देवस्थानच्या विेशस्तांनीही याकामी पुढाकार घेतला. श्रावणातील पहिल्या सोमवारी याची अंमलबजावणी करण्याचे ठरले. यासाठी जनतेचे प्रबोधन करणारे फलक जागोजागी लावण्यात आले.
नेहमीप्रमाणे श्रावणातल्या या सोमवारीही दर्शनासाठी गर्दी झाली. येणाऱ्या भाविकांचे प्रबोधन करणे हे मोठे आवाहन तरुण मंडळा समोर होते. कोणी उद्धट उत्तरे देत होते. कोणाला हा विचार पटला नाही. त्यांनी दूध घरी नेले. तर काहींनी धार्मिक भावना दुखावल्याचा कांगावा केला. पण ग्रामसभेच्या निर्णयामुळे व स्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण झालेला असल्याचे कारण सांगून भाविकांत जागृती करण्यात आली. मनात शुद्ध विचार असेल, बोलण्यात मृदुता असेल तर कोणाचेही प्रबोधन सहज करता येते. तरुणांनी सर्वांच्या भावनांचा विचार करत. सर्वांचा मान ठेवत कार्य केले.

नम्रपणे केलेली विनंती शत्रूतही बदल घडवते. तसाच बदल आता या मंदिराच्या आवारात घडला. जणूकाय चमत्कार वाटावा असे ते वातावरण होते. जागोजागी लावण्यात आलेल्या फलकांनी मोठे प्रबोधन केले. माणसांना स्वच्छतेचे महत्त्व यातून सांगण्यात आले. स्वच्छता असेल तरच देवाची वस्ती तेथे असते. देव मंदिरात राहावेतयासाठी मनासह परिसराची स्वच्छता करा. असा संदेश वारंवार भाविकांच्या मनावर बिंबवण्यात आला. अध्यात्मात असणारे स्वच्छतेचे महत्त्व वारंवार सांगण्यात आले.

स्वच्छतेचे हे सोमवार आता नियमित सुरू झाले. गावातील इतर मंदिरातही हाच उपक्रम राबविण्यात येऊ लागला. गावातील सारी मंदिरे स्वच्छ झाली. तसा गावही स्वच्छ झाला. परिसरातील स्वच्छता पाहून येणारे पर्यटकही गावाची वाहवा करू लागले. गावाचा हा आदर्श आता इतर गावांनीही घेतला आहे.

Friday, August 5, 2016

सद्गुरु मला सांगा

सद्गुरु, मला सांगा
मला सांगा मी तुमची कशी प्रार्थना करु
मला सांगा मी तुम्हाला कोणत्या नावाने पुकारु
मला सांगा मी तुम्हाला कसे ओळखू
मला सांगा मी तुम्हाला कसे पारखू
मला सांगा मी तुम्हाला कसे भेटू
सद्‌गुरु म्हणे सोपे आहे,
माझा आध्यात्मिक आत्मा तुझ्यातच पाहा

- राजेंद्र घोरपडे

आध्यात्मिक शांती

प्रोटॉन्सवर भार धन, इलेक्‍ट्रॉन्सवर भार ऋण
भाराविना न्युट्रॉन्स, या सर्वांच्या वर्तुळाचा होतो अणू
श्‍वास आतमध्ये जाताना "सो' तर बाहेर पडताना "हम'
मनाची एकाग्रता या सर्वांच्या वलयातून होते अध्यात्म
अणुच्या उर्जेतून घडवला जातायेत विघातक स्फोट
तर अध्यात्माच्या उर्जेतून आत्मज्ञानाचे पाठ
हिसाचार विज्ञानाचा,
कि शांती अध्यात्माची
- राजेंद्र घोरपडे

Tuesday, August 2, 2016

सर्वांचा आत्मा एकच

सद्गुरु म्हणे
आंबा, वड, चंदन, बाभूळ
या वृक्षांचे गुणधर्म वेगळे
आंबाच्या फळांची गोडी न्यारी,
तर थकलेल्या वाटसरुस वडाचा आधार
काटेरी बाभूळाचे कुंपण सुरक्षित
तर चंदनाच्या वासाने मिळतो आनंद जीवनात
पण या सर्व वृक्षांचा अग्नी एकसारखाच
तसे वेगवेगळी विचारसरणी माणसांची
पण त्या सर्वांचा आत्मा मात्र एक सारखाच
- राजेंद्र घोरपडे, 9011087406