Friday, March 15, 2019

ब्रह्म तेंचि कर्म



कर्म न करता फळाची आशा धरणे म्हणजे स्वप्न पाहण्याचा प्रकार आहे. अशी स्वप्ने ही कधीही पूर्ण होत नाहीत. स्वप्नातून बाहेर पडून सत्याची कास धरली पाहिजे, तरच जीवनात यशस्वी होता येईल.

म्हणौनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आलें जया सम ।
तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ।। 121 ।। अध्याय 4 था

अर्थ - म्हणून कर्म ब्रह्मच आहे, असे साम्य ज्याच्या प्रचितीला आले, त्याने कर्तव्यकर्म जरी केले तरी अर्जुना, तें नैष्कर्मच होय.

प्रपंच म्हटला की कर्तव्यकर्मे आली. घर चालवायचे म्हटले की पैसा हा कमवावा लागणार. संसार करावा लागतो. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपणास खरेदी करावे लागते. खरेदीसाठी पैसा हा लागणारच. पैसा हा काहीतरी कर्म केल्याशिवाय येणेच शक्‍य नाही. देवाचे भजन करून कायमस्वरूपी पैसा तर मिळणे शक्‍य नाही. एक दिवस दान देतील, दोन दिवस दान देतील. रोज रोज कोण पैसे दान देणार. पुर्वीच्याकाळी भिक्षा मागून देवधर्म केला जायचा. लोक श्रद्धेपोटी भिक्षा द्यायचे. तसे आजही देतात. पण रोज रोज कोण भिक्षा देणार. बदलत्या काळात गरज वाढल्या आहेत. तसा एकमेकातील विश्‍वासही कमी झाला आहे. देवधर्म करतो म्हणून कोणी फुकटचे पोसेल असे सध्याच्या जगात तरी शक्‍य वाटत नाही. पूर्वीच्या काळीही अशीच स्थिती होती, पण त्याचे प्रमाण कमी होते. म्हणजे कर्म केल्याशिवाय जीवन जगता येणे कठीण आहे. जमीन आहे, तर ती कसली पाहिजे. पीक घेतले पाहिजे काही ना काही उत्पन्न त्यातून मिळवले पाहिजे. म्हणजे कष्ट हे करावेच लागतात. कर्म हे करावेच लागते. कर्म न करता फळाची आशा धरणे म्हणजे स्वप्न पाहण्याचा प्रकार आहे. अशी स्वप्ने ही कधीही पूर्ण होत नाहीत. स्वप्नातून बाहेर पडून सत्याची कास धरली पाहिजे, तरच जीवनात यशस्वी होता येईल. आत्मज्ञान प्राप्तीसाठीही कर्म करावेच लागते. पण येथे ब्रह्म हेच कर्म आहे. सोऽहमची अखंड साधना हेच कर्म आहे. संसारात राहूनही हे कर्म करता येते. फक्त मनाची स्थिती बदलायला हवी. हे मी केले, हे माझ्यामुळे झाले असे न म्हणता समर्पनाची भावना ठेवून कर्म करायला हवे. हे भगवंतामुळे झाले. हे भगवंतामुळे घडते. चांगले घडले तरीही भगवंतामुळेच घडते. वाईट घडले तरीही भगवंतामुळे घडते. चांगले घडले म्हणून आनंदाने हरखून जायचे नाही व वाईट घडले म्हणून दुःखही करत बसायचे नाही. चांगले व वाईट असा भेदभाव न करता मनाची स्थिरता राखून कर्म करत राहायचे. हर्ष-शोक या दोन्ही ठिकाणी मनाची साम्यावस्था ठेवायला हवी. म्हणजे याचा शरीराला त्रास होणार नाही. वाईट गोष्टीचा शरीरावर पटकन परिणाम घडतो. दुःखामध्ये माणूस खचून जातो. काहीजण तर दुःखाला कंटाळून आत्महत्या करतात. इतकी त्यांची मानसिक स्थिती ढासळलेली असते. तर आनंदामध्ये स्वतःचे भान राहात नाही. आपल्यामुळे कोणाला दुःख झाले याचीही कल्पना यावेळी येत नाही. यासाठी मनाची स्थिरता ही जीवनात महत्त्वाची आहे. कोणत्याही कर्मामध्ये साम्यावस्था ही महत्त्वाची आहे. कर्म करूनही तो नैष्कर्मी होतो. कारण त्याच्या मनाची तयारी झाली आहे. त्यामध्ये मीपणा नाही. त्यामुळे सुखही नाही, अन्‌ दुःखही नाही. काही कमवल्याचा आनंदही नाही व काही गमवल्याचे दुःखही नाही. अशी मनाची स्थिरता ठेवायला हवी. ब्रह्म हेच कर्म म्हणून कर्म करत राहायला हवे. अशी अवस्था जेव्हा प्राप्त होईल तेव्हा आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग सुकर होईल. ब्रह्मसंपन्नता येईल.

No comments:

Post a Comment