Friday, March 22, 2019

शास्त्ररूपी दुभत्या गायी



पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम आपलेच आहे. साधुसंतांनी याबाबत नेहमीच प्रबोधन केले आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे म्हणणारे संत तुकाराम यांनी याचेच तर प्रबोधन केले. शास्त्रामध्येही दुभत्या जनावरांचा सांभाळ करा असाच सल्ला दिला आहे. संत ज्ञानेश्‍वरही हेच सांगतात. ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक स्रोत ही दुभती जनावरे मिळवून देतात.

- राजेंद्र घोरपडे, उपसंपादक, ई सकाळ
श्री अथर्व प्रकाशन, कोल्हापूर 
मोबाईल - 9011087406

 याचिलागीं सुमती । जोडिती शांतिसंपत्ती ।
शास्त्रांचीं दुभतीं । पोसिती घरीं ।।1130।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - चांगल्या बुद्धीचें लोक ह्याचकरितां शांतिरूप संपत्ति मिळवितात व शास्त्ररूपी दुभत्या गायी घरी पोसतात.

देशी गायी कमी दूध देतात. वाढत्या महागाईत भाकड जनावरांना सांभाळणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. साहजिकच देशी गायींची जागा आता संकरित दुधाळ गाईंनी घेतली आहे. पण देशी गायीचे महत्त्व आजही अनन्य साधारण आहे. त्यांचे पालनपोषण करणे हे आज गरजेचे आहे. देशी गायीच्या दुधात, गोमुत्रात अनेक औषधी गुणधर्म आहेत. देशी गायीचे तूपही औषधी आहे. संधीवातासारख्या अनेक असाधारण रोगांवर गोमुत्रातून आयुर्वेदिक औषधे देण्यात येतात. या गायीचे वैशिष्ट म्हणजे ती सकाळी एकदाच गोमुत्र देते. म्हणजे ती इतर वेळी कोणत्याही प्रकारची घाण करत नाही. तिच्या या सवयीमुळे तिचे संगोपन करणेही सोपे आहे. स्वच्छ राहणे व इतरांनाही स्वच्छ करणे हा तिचा गुण आहे. कीडनाशक म्हणूनही तिच्या गोमुत्राचा उपयोग केला जातो. तिचे हे महत्त्व ओळखूनच पूर्वीच्या काळी साधूसंतांनी तिचे संगोपन केले. पण बदलत्या काळात दूध उत्पादनाचा विक्रम ही गाय करू शकत नसल्याने आता ती टाकाऊ झाली आहे. आकडेवारीचे विक्रम गाठण्याच्या नादात दुधाची प्रत खालावत चालली आहे. याचा विचार कोणी करतच नाही. उत्पादनाचा विक्रम करण्यापेक्षा उत्तम प्रतीचे दूध आणि उत्पादने देण्याचा देशी गायीचा गुण जोपासणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे उत्पादन वाढणे ही काळाची गरज आहे. पण त्या बरोबर मालाची प्रतही सुधारणे गरजेचे आहे. टिकावू मालाचे उत्पादन आज बाजारात होत नाही. वीसवर्षापूर्वी अनेकांच्या घरात फ्रिज नव्हते. तरीही दूध, फळे, भाजीपाला उत्तम राहायचे. आता फ्रिज असूनही एकादिवसातच हा भाजीपाला सुकून जातो. मग फ्रिजने दिले काय? फक्त थंड ठेवण्याचे कार्य त्याने केले. पण विजेचे बिलही वाढविले आहे. अशी ही महागाई वाढत आहे. बदलत्या काळातील गरज म्हणून आपण याचा स्वीकार करत आहोत. वाढते तापमान विचारात घेऊन हा बदल आपण स्वीकारत आहोत. पण या बदलत्या तापमानास कोण कारणीभूत आहे. आपणच ना? पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम आपलेच आहे. साधुसंतांनी याबाबत नेहमीच प्रबोधन केले आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे म्हणणारे संत तुकाराम यांनी याचेच तर प्रबोधन केले. शास्त्रामध्येही दुभत्या जनावरांचा सांभाळ करा असाच सल्ला दिला आहे. संत ज्ञानेश्‍वरही हेच सांगतात. ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक स्रोत ही दुभती जनावरे मिळवून देतात. बैल, भाकड जनावरांच्या बरोबरच आता दुभत्या जनावरांचीही संख्या घटत आहे. याकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज आहे. नव्या पिढीला आता कष्टाचे काम नको आहे. ग्रामीण भागातील तरुण कमी कष्टाचा रोजगार शोधत आहेत. जनावरे सांभाळणे हे कष्टाचे, कमी पणाचे लक्षण मानले जात आहे. पण आर्थिक स्त्रोत्राचा विचार करून तरी नव्या पिढीने सुधारित तंत्राने दुभती जनावरे सांभाळण्यावर भर द्यायला हवा.

No comments:

Post a Comment