Friday, October 8, 2010

हे विश्‍वची माझे घर

हे विश्‍वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ।।

जुन्या पिढीतील लोक व्यापक विचारसरणीचे होते. त्यांच्या विचारावर अध्यात्माचा पगडा होता. त्यामुळे त्यांच्या आचार-विचारात दूरदृष्टीपणा, व्यापकता होती. सध्याच्या पिढीत इतकी व्यापकता दिसून येत नाही. संकुचित विचारसरणी सध्या वाढीस लागली आहे. पण त्यामुळे प्रगतीही संकुचित होत आहे. हे लक्षात घ्यायला हवे. सध्या जागतिकीकरणाचे वारे आहे. याचा लाभ आपण उठवायला हवा. विचार संकुचित न ठेवता त्यामध्ये व्यापकता आणायला हवी. इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आहे. हे विश्‍व महाकाय आहे असे वाटत नाहीये. जुन्या पिढीतील लोकांनी विश्‍वची माझे घर असे समजून विकास घडवला. फक्त स्वतः पुरता विचार त्यांनी केला नाही. संपूर्ण समाजाचा, भागाचा, प्रांताचा विकास करायचा या ध्येयाने त्यांनी काम केले. त्यामुळे कोणी महात्मा झाले, तर कोणी कर्मवीर झाले, तर कोणी शिक्षण महर्षी झाले, तर कोणी सहकार महर्षी झाले. नव्या पिढीने त्यांची ही विचारसरणी आत्मसात करायला हवी. "एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ' असा विचार ठेवून त्यांनी सहकार क्षेत्र उभे केले. ते स्वतः कारखाना उभा करून मोठे कारखानदार होऊ शकत होते. पण त्यांनी स्वतः पुरते कधी पाहिले नाही. इतरांचाही विकास त्यांनी पाहिला. अनेक उद्योग, कारखाने सहकारातून उभे राहिले. पण सध्या या संस्थांमध्ये संकुचित विचारसरणीच्या लोकांचा प्रभाव वाढला आहे. त्यांनी स्वतःचा विकास सुरू केला आहे. यामुळे हे उद्योग अडचणीत आले आहेत. केवळ स्वतःचा फायदा पाहणाऱ्या या लोकांमुळेच सहकाराचा स्वाहाकार झाला आहे. यासाठी ही विचारसरणी बदलायला हवी. सर्वांचा विकास साधणारे विचार जोपासायला हवेत. संत महात्मांच्या विचारांची कास यासाठीच धरायला हवी. जागतिकीकरणात टिकायचे असेल तर हा विचार आत्मसात करायला हवा. विश्‍वची माझे घर समजूनच विकास साधायला हवा.

राजेंद्र घोरपडे, पुणे

1 comment:

  1. Rajendra Ghorpade Khup chaan lihile aahe tumhi
    Anand zala konitari sadhanakartay va dusaryanahi prerit karta aahat. Gurucharani krutadnyata!!
    Gurukrupahi kevalam shishyasya Param Mangalam

    Pranav A M
    pranavoam@gmail.com

    ReplyDelete