Tuesday, April 9, 2019

मोहरूपी महारोग





मनाला चांगल्या विचारांची सवय लावायला हवी. मन सतत समाधानी राहावे अशी सवय लावायला हवी. मन समाधानी असेल तर मोह होत नाही. जे मिळते ते त्यांच्या कृपेने मिळते, त्यांच्या आर्शिवादाने मिळते. अशी समर्पनाची भावना अध्यात्मात यासाठीच निर्माण केली गेली आहे. मन समाधानी राहावे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

तरी कृपाळू तो तुष्टो । यया विवेकु हा घोंटो ।
फिटो । महारोगु ।। 412।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - तरी तो कृपाळू श्रीकृष्णपरमात्मा संतुष्ट होवो आणि या धृतराष्ट्रास हा आत्मानात्मविचार सेवन करण्याचे सामर्थ्य देवो. आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा होवो.

ैसमाधान नसल्यास मोह वाढतो. एखाद्या गोष्टीने मन तृप्त व्हायला हवे. संतुष्ट व्हायला हवे. अमुक इतका पगार वाढला. आणखी वाढ हवी होती. मिळाली नाही. त्यात समाधान झाले नाही, तर पैसा कमविण्याचे इतर मार्ग शोधण्याकडे कल वाढतो. मनाप्रमाणे पैसा मिळत नाही तोपर्यंत चैन पडत नाही. पैसा हा कमवायलाच हवा. पगारवाढ ही प्रत्येक कर्मचाऱ्याचा आवडता विषय आहे. पगार वाढत नाही म्हणून पैसा कमविण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब योग्य नाही. पैसा चांगल्या मार्गाने पैसा कमविला जात असेल तर ठीक आहे. पण एकदा का गैरमार्गाने पैसा कमविण्याचा मोह लागला तर तो स्वतःचे आयुष्यही संपवू शकतो. चांगल्या गोष्टीची सवय लागायला वेळ लागते. पण वाईट गोष्टीची सवय लगेच लागते. हा सर्वांत मोठा धोका आहे. वाईटाच्या संगतीत चांगलाही बिघडतो. तो तंबाखू खातो. आपणही जरा खाऊन पाहावी. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा ती खाण्याचा मोह होतो. नंतर ती पुढे सवयच लागते. धृतराष्टाला दुर्योधनाला महासत्ता बनविण्याचा मोह होता. इतरांपेक्षा तो श्रेष्ठ ठरावा यासाठी तो इतरांवर छलकपट करायचा. इतर अनेकजण त्याच्या मुलापेक्षा श्रेष्ठ आहेत हे ध्रुतराष्टाच्या मनाला कधी पटलेच नाही. मोहाने तो इतका आंधळा झाला होता. मोह असावा पण आंधळे होण्यापर्यंत मोह नसावा. तंबाखूने कर्करोग झाला तरीही तंबाखू खाण्याचा मोह सुटत नाही. त्यात समोर मृत्यू असूनही मोहाने तो त्याला दिसत नाही. इतके अंधत्व येते. मोह हा असा महाभयंकर रोग आहे. रोग झाला तर तो बरा करण्यासाठी औषध घ्यावे लागते. असाध्यरोग झाला तरी तो बरा होण्यासाठी औषध घेतले जाते. मोहाच्या महारोगावर औषध आहे. विवेकाने वागणे, सात्त्विक वृत्ती वाढविणे हे मोहाच्या रोगावर औषध आहे. मनात विवेक जागा राहावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावायला हवी. मन सतत समाधानी राहावे अशी सवय लावायला हवी. मन समाधानी असेल तर मोह होत नाही. जे मिळते ते त्यांच्या कृपेने मिळते, त्यांच्या आर्शिवादाने मिळते. अशी समर्पनाची भावना अध्यात्मात यासाठीच निर्माण केली गेली आहे. मन समाधानी राहावे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. अशा विचारांनी मोहापासून मन दूर जाते. मनाला मोहच होत नाही. मोहाच्या महारोगावर हे जालीम औषध आहे.

No comments:

Post a Comment