Sunday, April 28, 2019

ठिबकमय कारभारवाडी







जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।।
श्री ज्ञानेश्‍वरीतील पहिल्या अध्यायातील ही ओंवी असे सांगते की झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासें फांद्या व पाने यांना टवटवी येते. हाच विचार कोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी येथील शेतकऱ्यांनी जोपासत ठिबक सिंचनला एकमुखाने साथ देली. कै. शिवा रामा पाटील सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण गावाने शेतीचे सर्व 102 एकर क्षेत्र ठिबक खाली आणले. पाणी व खत व्यवस्थापनातून या परिसरातील शेतीचे चित्रच पालटले आहे. विशेष म्हणजे या योजनेत एक ते पाच गुठा क्षेत्र असणारे 16 अल्पभूधारक शेतकरीही आता उत्पन्न घेऊ लागले आहेत. पट्टा पद्धत, एक डोळा बेणे, रोप लागवड, काटेकोर पाणी व खत व्यवस्थापन अशा नव्या तंत्राकडे शेतकरी वळल्याने केवळ ५५ लाख लिटर पाण्यामध्ये उसाची उत्पादकताही अधिक वाढली आहे.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406


बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या गावांना पाण्याची नेमकी किंमत कळत नसल्याचे दिसून येते. अशा गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश होतो. यातीलच कारभारवाडी (ता. करवीर) हे गाव. ऊस उत्पादक गावामध्ये पाटपाण्याचा अतोनात वापर होत राहिल्याने जमिनीचा पोत बिघडला होता. एकरी केवळ २७ ते ३० टन ऊस उत्पादन मिळायचे. न परवडणारी शेती का करायची, तर केवळ पडून राहू नये म्हणून अशी स्थिती.

पारंपरिक पद्धती बदलल्याशिवाय शेती फायद्यात येणार नसल्याची बाब कृषी अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट झाली. तत्कालिन करवीर तालुका कृषी अधिकारी डी. बी. पाटील, तालुका कृषी अधिकारी हरिदास हावळे, कृषी सहायक सतीश वर्मा यांनी ठिबक सिंचनाचा पर्याय सुचवला. ठिबक सिंचन केवळ पाणी वाचवण्यासाठी करायचे अशी मानसिकता असलेल्या शेतकऱ्यांना समजवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील अहिरवाडी आणि गोटखिंडी या गावांना भेट देण्यात आली.
हसूर दुमाला येथील शेतकरी संतोष पाटील यांचा ठिबकचा प्रकल्पही पाहिला. त्यांच्याशी बोलण्यानंतर, प्रगती पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना विश्‍वास आला. त्यातून २०१५ मध्ये गावात स्वयंचलित ठिबक सिंचन प्रकल्प उभा राहीला. या प्रकल्पानंतर गावच्या शेतीचे स्वरूपच बदलून गाव अधिक एकसंध झाला आहे. शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात दुप्पटी, तिपटीने वाढ झाली. ते आंतरपीकही घेऊ लागले. यातून पैसा खेळता राहू लागला.  
कारभारवाडी दृष्टिक्षेपात ...
  • गावाचे भौगोलिक क्षेत्र - ६९ हेक्‍टर
  • पिकांखालील क्षेत्र - ६२ हेक्‍टर
  • ठिबक खाली आलेले क्षेत्र - १०२ एकर
  • ठिबक योजनेत सहभागी शेतकरी - १३१
  • एक हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र असणारे शेतकरी - १०६
  • एक ते दोन हेक्‍टर क्षेत्र असणारे शेतकरी - २२
  • दोन हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र असणारे शेतकरी - ३
ठिबक सिंचनापूर्वीची स्थिती :
  • पारंपरिक पद्धतीने ऊस व भाताची लागवड.
  • तीन फुटाची सरी, आंतरपीक म्हणून फार तर मका.
  • पाटपाण्याद्वारे नियोजन. अनिश्चित पाणी दिले जाई.
  • भारनियमनामुळे पाणी नियोजनात अडचणी. वेळी अवेळी पाणी देण्यासाठी शेतावर जावे लागे.
  • एकाच वेळी अधिक पाणी देण्याची मानसिकता. अतिपाणी वापरामुळे जमिनीची प्रत खालावलेली.
  • पाटपाण्यामध्ये १५ ते २० एकरासाठी एक ‘टी’ असायची. यामुळे पाटातील तणांचे बी शेतात येऊन तणांचा प्रादुर्भाव वाढत असे. भांगलणीचा खर्च वाढे.
  • एकरी ऊसउत्पादन केवळ २५ ते ३० टन.
  • गावात एक ते पाच गुंठे क्षेत्र असणारे १६ शेतकरी आहेत. पूर्वी शेतातून फायदा नसल्याने शेतीविषयी अनास्था वाढली होती. गावात एकसंधपणा राहिला नव्हता.
ठिबक झाल्यानंतरची स्थिती
  • ऊस लागवडीसाठी पट्टा पद्धतीचा अवलंब. साडेचार फुटाच्या पट्ट्यामध्ये भाजीपाला पिके, झेंडू, कांदा, हरभरा, भुईमूग अशी पिके घेतली जातात.
  • एक डोळा किंवा रोप पद्धतीने ऊस लागवड. बेण्यात बचत.
  • तणाचा प्रादुर्भाव कमी. परिणामी भांगलणीचा खर्च ८० टक्क्यांनी कमी झाला.  
  •  स्वयंचलित ठिबक सिंचन, खतांचे नियोजन यामुळे उसाचे उत्पादन एकरी २७ टनावरून ५० ते ८० टनावर पोहोचले.
  • एकूण उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ. एकरी ५५ ते ८० टनापर्यंत ऊस उत्पादन मिळत आहे.
  • वेळी अवेळी शेतात पाणी देण्याचे कष्ट वाचले. नफा वाढल्याने शेतकऱ्यांत समाधान दिसत आहे.
आता होतेय बचतच बचत
  •   पाटपाण्यावर लागवड करताना एकरी २४०० ऊस बेणे (म्हणजे ३ टन ऊस) लागत असे. अलीकडे एक डोळा पद्धतीने, रोपांची लागवड केली जात असल्याने केवळ ४०० उसांत एक एकर लागवड होते. प्रतिएकर अंदाजे अडीच टन ऊस बेणे व खर्च वाचतो.
  •   पाटपाणी पद्धतीत उसाला एकरी १ कोटी दहा लाख लिटर पाणी लागे. आता ठिबकनंतर एकरी केवळ ५५ लाख लिटर पाणी पुरेसे होते. ५० टक्के पाणी वाचले.
  •   पाटपाण्यासाठी वार्षिक ७८,३०० युनिट वीज वापरली जाई. आता केवळ ५३ हजार युनिट वीज पुरेशी होते. ३२ टक्के वीजबचत झाली.  
  •   स्वयंचलित ठिबक सिंचन पद्धतीतील दुहेरी गाळण यंत्रणातून तणांचे बी येणे रोखले गेल्याने तणांचे प्रमाण अत्यल्प राहते. भांगलणीचा खर्च कमी झाला.
  •   विद्राव्य खतांच्या वापरामुळे ऊस उत्पादकतेत दुप्पट, तिपटीने वाढ.
  •   प्रत्येक शेतकरी खताचे नियोजन पीकनिहाय वेगवेगळे करतो. त्यासाठी ठिबकद्वारे खते देण्यासाठी बॅटरी पंपाचा वापर केला जातो.
  •   असंतुलित खत व पाणी वापर थांबल्याने जमिनीची कार्यक्षमता वाढली.  
  •   उसाबरोबरच भाजीपाला आंतरपिके घेतली गेल्याने खेळता पैसा उपलब्ध झाला.
  •   १ टन ऊस उत्पादनासाठी पाट पाणी पद्धतीत ४०० टन पाणी लागे, ते आता केवळ १२० टन पाण्यातही चांगले उत्पादन मिळत आहे.
  •   पूर्वी पाटपाणी पद्धतीत एकूण उत्पादनखर्च एकरी ६३९०० रु. होत असे, तो आता सुधारीत लागवड पद्धती व ठिबक सिंचनमुळे ४०८०० रु. पर्यंत कमी झाला आहे.
अल्पभूधारकांना फायदा
गावात तीन शेतकरी सोडले तर सर्व शेतकरी अल्पभूधारक आहेत. एक हेक्टरपेक्षा कमी म्हणजे अगदी दहा ते वीस गुंठ्यांमध्ये ऊस किंवा अन्य पिके घेऊन चरितार्थ कसा चालणार, ही विवंचना होती. मात्र, ठिबक सिंचनमुळे एक ते पाच गुंठे क्षेत्र असणारे १६ शेतकरी चांगले ऊस व भाजीपाला उत्पादन घेत आहेत. ही समाधानाची बाब आहे.
अशी होती ऊस उत्पादनातील वाढ
ऊस उत्पादनातील वाढ    शेतकरी (एकूण १३१ पैकी)
०-२५ टक्के वाढ    ९ शेतकरी
२५-५० टक्के वाढ    १७ शेतकरी
५०- ७५ टक्के वाढ    ७५ शेतकरी
७५- १०० टक्के वाढ    ३० शेतकरी   
सामाजिक माध्यमाचा वापर
१३१ शेतकऱ्यांचा व्हॉट्‌सअप ग्रुप तयार केला असून, त्यावर दररोज पाण्याची वेळ निश्‍चित केलला तक्ता पाठवला जातो. त्यानुसार आपल्या शेतात जाऊन निश्चित झालेल्या वेळी केवळ व्हॉल्व सुरू-बंद करावा लागतो. यात कष्ट आणि वेळ दोन्ही वाचले आहेत. नियमित वेळ माहित असल्याने अन्य कामांकडे लक्ष देणे शक्य होते. शेतीसह शेतकरी अन्य कामे, उद्योग, नोकरी यावर निर्धास्त जाऊ शकतात.  संपूर्ण गाव ठिबक सिंचनखाली आल्यानंतर आता संपूर्ण गाव सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभागाच्या वतीने शेतीशाळा घेत गांडूळखत व दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिके घेतली. त्यातून गावात ३१ गांडूळ खतनिर्मिती युनिट उभे राहिले.
प्रतिक्रिया...
आमची शेती २० गुंठे असून, पूर्वी केवळ ऊस पिकावर अवलंबून होतो. पाच गुंठ्यामध्ये केवळ पाच टन ऊस उत्पादन येऊन खर्च वजा जाता कसेबसे पाच ते सात हजार रुपये मिळत. ठिबक योजनेमुळे वांगीसह अन्य पिकेही घेत आहे. पाच गुंठ्यात वांग्यापासून दीड टन उत्पादन मिळते. बाजारभावानुसार ३० ते ३५ हजार रुपये मिळतात.
- सरिता बाजीराव पाटील
माझे तीन गुंठे क्षेत्र असून, आता मी त्यातून पाच टनांपर्यंत ऊस उत्पादन घेत आहे. सोबत आंतरपीक म्हणून वर्षभर लागणारा भाजीपाला, कांदा, हरभरा, भुईमूग, मका अशी पिके घेतो.
- जगन्नाथ नारायण कांबळे
तिघा भावडांचे मिळून तीन गुंठे क्षेत्र आहे. ते पडीक असे. ठिबक योजनेमध्ये सामील होऊन तीन गुंठ्यात ऊस व भात घेतो. उसाचे तीन ते पाच टन, तर भाताचे तीन पोती उत्पादन येते. आंतरपीक म्हणून जनावरांसाठी मकाही लावला आहे. खर्च वजा जाता दहा हजारांची बेगमी होत आहे.
- दिलीप बंडू कांबळे
दीड एकर शेतीमध्ये ऊस लागवडीतून एकरी ३० ते ३५ टन उत्पादन व ६५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळे. आता ठिबक झाल्यानंतर ऊस उत्पादन एकरी ६५ टनावर पोचले असून, खर्च वजा जाता एक लाख ४० हजार रुपये मिळतात. आंतरपीक म्हणून कोबी, काकडी, रेड कोबी, ब्रोकोली यांसारख्या परदेशी भाज्या घेत आहे. या भाज्या मुंबई -दादर मार्केटला पाठवतो. यातूनही ६० हजार रुपये उत्पन्न मिळते.
- प्रदीप तुकाराम पाटील
३० गुंठे क्षेत्रामध्ये केवळ ऊस पीक घेत असे. मात्र, ठिबक सिंचन प्रकल्प झाल्यानंतर आम्ही अन्य भाजीपाला, मिरची पिकांकडे वळलो. गेल्या वर्षी मी १६ गुंठे मिरची लागवडीतून आठ टन उत्पादन व खर्च वजा जाता ३० हजार रुपये फायदा झाला. यंदा मी २५ गुंठ्यात मिरची व पाच गुंठ्यात चाऱ्यासाठी मका लागवड केली आहे.
- नितीन राजाराम साळोखे
दहा गुंठ्यांवर पाटपाण्याने झेंडूची लागवड असे. सुमारे पंधरा हजार रु. उत्पादन खर्च होऊन ७०० किलोपर्यंत फुले मिळत. २०१५ मध्ये ठिबक झाल्यापासून तेवढ्याच क्षेत्रात दोन हजार किलोपर्यंत उत्पादन मिळत आहे.
- संदीप इंगवले
दोन एकर उसाचे क्षेत्र आहे. पूर्वी पाटपाण्यावर मिळणारे एकरी ३० टन उत्पादन ठिबक सिंचन योजनेनंतर वाढून ४५ टनांपर्यंत पोचले आहे. उत्पादनखर्च कमी होण्यासोबतच वेळीअवेळी पाणी देण्याचा त्रास कमी झाला. ऊस शेती आता फायदेशीर वाटत आहे.
- प्रकाश विठ्ठल साळोखे
- प्रा. डॉ. नेताजी पाटील,
(चेअरमन, कै. शिवा रामा पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, कारभारवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर)

2 comments:

  1. ह्यो नुकतच पेपरात आलवत... ह्ये हिथ- https://www.esakal.com/agro/whole-village-karbharwadi-kolhapur-disitrict-under-drip-irrigation-184808 मला आलीवती. पण पेपरात त्ये पाण्याच्या वेळा काय नव्हत! धन्यवाद! त्ये म्हणत्यात तस - गांव करील ते राजा काय करील... का असच कायतरी.

    ReplyDelete
  2. ह्येचा व्हीडो भी हाय - youtu.be/TxeifVcF4Sk वर!

    ReplyDelete