Tuesday, April 23, 2019

पसायदान





देव म्हणाले तू अवधान राखलेस म्हणून तुला हा ठेवा मिळाला. त्यामुळेच तू या सेवेसाठी पात्र झालास. अशीच तुझी ही सेवा अखंड राहू दे. यावर भक्तही म्हणाला देवा ही सेवा तुम्हीच तर करून घेता. आता तुम्हीच ही सेवा अखंड माझ्याकडून करवून घ्या. असा आर्शिवाद आता मला द्या. हाच प्रसाद आता मला द्या.


म्हणोनि निज अवधान । मज वोळगे पसायदान ।
दीजो जी समर्थु होईन । ज्ञानदेवो म्हणे ।। 473 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - म्हणून महाराज, माझ्या व्याख्यानरूपी सेवेबद्दल मला आपलें अवधानरूपी प्रसादाचें दान द्यावें, म्हणजे मी समर्थ होईन, असे ज्ञानेश्‍वरमहाराज श्रोते संतमंडळीस म्हणतात.

तिरुपती बालाजीचा भक्त होता. भजन, कीर्तन, प्रवचन करणे हाच त्याचा उद्योग. विविध देवस्थानांच्या ठिकाणी तो ही सेवा देत असे. यातूनच मिळणाऱ्या पैशातूनच त्याचा चरितार्थ चालायचा. वर्षातून न चुकता एकदा तरी तो भेट देत असे. तिरुमला हे देवस्थान उंच डोंगरावर आहे. तिरुपती शहर या देवस्थानच्या पायथ्याशी वसले आहे. तिरुमलाला हा भक्त तिरुपतीतून दरवर्षी पायी चालत जायचा. नऊ किलोमीटर उंचीचा हा खडा डोंगर पायी चढायचा. पायी वारीचा आनंद काही औरच असतो. काही पायऱ्या चढायच्या दमायला लागल्यावर बसायचे. उंचावरून तिरुपती शहराचे दिसणारे सौंदर्य मनमोहक असते. शहरातील धावपळ, मोठे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ सहज दिसते. या जीवनापासून विरंगुळा म्हणून हा प्रवास निश्‍चितच मनाला उभारी देतो. तिरुमलाचा हा डोंगर खडा आहे. अगदी अर्धा किलोमीटर चालल्यावर धापा लागतात. तरीही हा खडा डोंगर हा भक्त आनंदाने चढायचा. बालाजीच्या प्रेरणेने दर्शनाच्या ओढीने चढताना वेगळी स्फुर्ती यायची. बालाजीचे सर्वांग सुंदर मुख पाहण्याची त्याची ओढ त्याला सहजच वर उचलून घेत असे. घामाच्या धारा आल्यातरी वाऱ्याची एक झुळूक त्याच्या अंगातील सर्व शीण काढून घेत असे. पहिले चार टप्पे खड्या पायऱ्यांचे अतिशय अवघड असेच आहेत. हे चढण्याचे ज्याच्याच सामर्थ आहे तो शक्तीमान, बलवान आहे. म्हणून हे टप्पे झाल्यानंतर स्वतः मारुतराय त्याच्या स्वागतासाठी उभे असतात. भगवान मारुतीची ती महाकाय मुर्ती हीच स्फुर्ती देण्यासाठी तिथे उभी आहे. तू इथे पर्यंत पायी आलास, तू आता बलशाली झाला आहेस. महाकाय बलवान असल्यानेच मी आता स्वतः तुला दर्शन देण्यासाठी उभा आहे. अशी प्रेरणा ही मुर्ती देत असावी. चपळ हरणांचे, महाकाय शिंगांच्या काळविटाचेही उद्यान याच मार्गावर आहे. हरणासारखे चपळ व्हा. अशी प्रेरणा, स्फुर्ती ही हरणे भक्तांना देत राहातात. चालणाऱ्याच्या पायांना यामुळे तशी चपळताही येते. पशू पक्षांची उद्यानेही पदपथावर आहेत. त्याचा चिवचिवाट मन टवटवीत करतो. ते मधुर स्वर ऐकल्यानंतर मनाची सगळी मरगळ दूर होते. इतके ते पक्षी गोड आहेत. सुंदर रंगीबेरंगी पक्षी, महाकाय वृक्ष, महाकाय कडे हे चढणाऱ्याला एक स्फूर्तीच देत राहतात. जीवनाची अशीच महाकाय आव्हाणे झेलण्याचे सामर्थ्यही याचमुळे पायी येणाऱ्या भक्तांना येत असावे. काही भाविक तर या मार्गावरील पायऱ्या ह्या गुडघ्याने चढतात. तरुणांचे ठीक आहे. पण वयस्कर व्यक्तीही उत्साहाने या पायऱ्या चढतात. त्यांचा तो उत्साह पाहून नवख्या तरुणांनाही स्फूर्ती मिळते. या वाटेवरच पुढे नृसिंहस्वामीचे मंदीर आहे. थकलेल्या भक्तांना येथे महाप्रसाद दिला जातो. चालून चालून थोडी भूक लागते. दमायला होते. येथे एका महाकाय वडाच्या वृक्षाखाली या प्रसादाचे वाटप चालते. हा प्रसाद घेतल्यानंतर शेवटचा एक अवघड टप्पा पूर्ण करण्यास यामुळे प्रेरणा मिळते. पायी दर्शनासाठी येणाऱ्या भक्‍तांना सर्वप्रथम बालाजी दर्शनाचा मान यामुळेच दिला असावा. बालाजीचे सर्वांग सुंदर साजिरे रूप पाहिल्यानंतर पायी चालून आल्याचा शीण सारा दूर होतो. हा बालाजीचा भक्त नेहमी पायी चालत यायचा. दर्शन घेऊन तृप्त व्हायचा. मंदीरात हुंडी आहे तेथे अनेक भक्त दान टाकतात. कोणी पैसे दान देतात. कोणी सोने, चांदी, दागिने, जडजवाहिरे दान देतात. देवाला दान देणाऱ्यांची येथे रीघच लागलेली असते. दान देण्यासाठीही येथे रांग आहे. झोळीमध्ये येथे दान स्वीकारले जाते. देवाच्या दर्शनाने तृप्त झालेला हा भक्त दान देण्यासाठी हुंडीजवळ गेला. तो मनात म्हणाला इतका श्रीमंत देव, त्याच्या चरणी साक्षात लक्ष्मी लोळण घेत आहे. तेथे केरातही लक्ष्मीच असते. इतक्‍या श्रीमंत देवाला आपण पैसे देऊन आपण देवाची चेष्टाच करत आहोत. तो लाजला. अरेरे देवाला पैशाची गरजच नाही. जिथे लक्ष्मी ओसंडून वाहते आहे. तेथे आपण टाकलेल्या नाण्यांचे ते काय मोल. त्या नाण्याने देव मला पावणार कसा? देवाला आपण वेगळे काही तरी देऊ. देव आपल्यावर प्रसन्न व्हायला हवा. असे काही तरी आपण दान देऊ? तसे तिरुमला येथे केस दानाची पद्धत आहे. पण कल्याण कट्ट्‌यावर केसदान स्वीकारले जाते. हुंडीत दान काय टाकायचे? दान हुंडीत स्वीकारले जाते. आता या श्रीमंत देवाला पैसा दान देण्याऐवजी आपण त्यानेच दिलेले ज्ञान दान देऊन टाकू. शेवटी ज्ञान हे देवाच्या चरणी अपर्ण करायचे असतेच ना. त्याने निर्णय घेतला. आपण येवढी प्रवचने, भजने, कीर्तने लिहिली आहेत ती त्या झोळीत टाकायची आणि ती सर्व त्याने देवाला अर्पण केली. देवाने ती स्वीकारली. देव प्रसन्न झाला. हा आपला वेगळा भक्त आहे. आवडीचा भक्त आहे. देव म्हणाला माग तुला काय पाहिजे ते माग. भक्त म्हणाला मी काय मागणार? जे काय मिळते ते तुम्हीच तर देता. पैसा, आकडा सर्व तुमच्या मुळेच तर मला मिळतो. जे दान दिले आहे. ते ज्ञान तर तुम्हीच दिले आहे. हे दान आता तुम्ही स्वीकारले आहे. यापुढेही ही सेवा अशीच सुरू राहू दे. हे दान करण्याची संधी मला वारंवार लाभू दे. ही ज्ञानाची स्फुर्ती आता आत्मज्ञानात परावर्तित होऊ दे. ब्रह्मज्ञानाने आता सेवा करण्याची संधी मला मिळू दे. हीच आता तुमच्या चरणी प्रार्थना आहे. जे ज्ञान तुम्ही देता तेच ज्ञान तुमच्या चरणी अर्पण केले आहे. मी एक साधा भक्त आहे. आता मागणे एकच मला ब्रह्मज्ञानाची सेवा करण्याची संधी द्यावी. असे म्हणताच देव अधिकच प्रसन्न झाले. त्यांनी त्या भक्ताला प्रसाद दिला पुढच्या वेळी तू माझ्या भेटीला येशील तेव्हा तू ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी होऊन येशील. आता तुझी ती सेवा आम्ही यापुढे स्वीकारू. भक्त आनंदी झाला. पुढच्यावर्षी बालाजी चरणी तो भक्त ब्रह्मज्ञानी होऊनच गेला. पण त्याची भजन, कीर्तन, प्रवचनाची सेवा अशीच अखंड सुरू राहिली. देव म्हणाले तू अवधान राखलेस म्हणून तुला हा ठेवा मिळाला. त्यामुळेच तू या सेवेसाठी पात्र झालास. अशीच तुझी ही सेवा अखंड राहू दे. यावर भक्तही म्हणाला देवा ही सेवा तुम्हीच तर करून घेता. आता तुम्हीच ही सेवा अखंड माझ्याकडून करवून घ्या. असा आर्शिवाद आता मला द्या. हाच प्रसाद आता मला द्या.



No comments:

Post a Comment