Thursday, April 18, 2019

सत्यवादाचे तप





शक्ती प्रत्येक मानवाच्या ठिकाणी आहे. हेच सत्य आहे. फक्त हे सत्य त्याला पटवून द्यायचे आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्यामध्येच ते सत्य दडले आहे. ते सत्य जागृत करण्याचे तप आता तुला करायचे आहे. चला उठा जागे व्हा, सत्यवादाचे हे तप स्वतः स्वीकारा. याला फळ निश्‍चित येईल.
- राजेंद्र घोरपडे मोबाईल 9011087406

जिया सत्यवादाचें तप । वाचां केले बहुत कल्प ।
तया फळाचें हें महाद्वीप । पातली प्रभु ।। 32 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - महाराज, माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे तप पुष्कळ कल्पांपर्यंत केले, त्या तपाच्या फळाचे हे गीताव्याख्यानरूपी मोठे बेट तिला (माझ्या वाचेला) प्राप्त झाले.

सत्याचा आग्रह तो सत्याग्रह. स्वातंत्र्यपूर्व काळातील आंदोलनेही सत्यावर आधारित असायची. सत्य मेव जयते. सत्याचा नेहमी विजय होतो. यामुळेच ही आंदोलने इतिहासात अजरामर झाली. या आंदोलनांनीच अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधीच्या विचाराने लाखो लोक या आंदोलनात सहभागी झाले. काहींनी देशासाठी प्राणही दिले. अनेकांच्या त्यागामुळेच देश स्वतंत्र झाला. पण आज या स्वातंत्र्यातही पारतंत्र्य असल्याचा भास होतो आहे. इंग्रज गेले आणि स्वकीय इंग्रजासारखे अत्याचार करू लागले. सहकारी संस्था भ्रष्टाचाराने देशोधडीला लागल्या आहेत. सरकारी कार्यालयात पैसे चारल्याशिवाय काम होत नाही. काम लवकर व्हावे सुरळीत व्हावे यासाठी सुशिक्षित मंडळीही पैसे देऊन काम करवून घेत आहेत. भ्रष्टाचार हा आता शिष्टाचार झाला आहे. अशा या नव्या युगात आता पुन्हा एकदा सत्याग्रहाचा झेंडा फडकविण्याची गरज भासत आहे. पण हा झेंडा कोण फडकवणार? कारण फडकवणाऱ्यांच्यावरच जनतेला विश्‍वास राहिलेला नाही. आंदोलने होतात पण ती स्वतःच्या संस्था चालाव्यात यासाठी होत आहेत. राज्यकर्त्यांनीच उभे केलेले सत्याग्रही येथे आंदोलने करत आहेत. सत्याग्रही व्यक्तींचा बोलविता धनी वेगळाच आहे. काही सत्याग्रही तर आता पुन्हा राजकीय पक्ष स्थापन करत आहेत. त्यांनीही आता सत्याग्रह सोडून सत्तेचा आग्रह धरला आहे. इतिहासातही अशी पाने कित्येकदा लिहिली गेली आहेत. पण त्या प्रत्येकवेळी कोणी ना कोणी तरी वाली जन्माला आला आहे. कोणी तरी सम्राट झाला आहे. सत्याचा त्याचा लढा यशस्वी झाला आहे. अशा नैसर्गिक शक्तीमान जन्मन्याची गरज आता प्रत्येकाला वाटत आहे. पण खरे तर ही शक्ती प्रत्येक मानवाच्या ठिकाणी आहे. हेच सत्य आहे. फक्त हे सत्य त्याला पटवून द्यायचे आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्यामध्येच ते सत्य दडले आहे. ते सत्य जागृत करण्याचे तप आता तुला करायचे आहे. चला उठा जागे व्हा, सत्यवादाचे हे तप स्वतः स्वीकारा. याला फळ निश्‍चित येईल. आत्मज्ञानाच्या तलवारीने ही समस्त सृष्टी ब्रह्मज्ञानी करण्यासाठी तयार व्हा. याची सुरवात स्वतःपासूनच करा. स्वतः आत्मज्ञानी व्हा. इतरांनाही आत्मज्ञानी करा.

No comments:

Post a Comment