Monday, April 15, 2019

जिहीं ध्यानाचां डोळां पाहिलासी


ध्यानानंतर शरीराला जडत्व प्राप्त होते. शरीर थंडावते. म्हणजे त्या व्यक्तीच्या चालण्यात बोलण्यात फरक जाणवतो. इतर वेळी ती व्यक्ती चिडखोर असेल तर त्याचा चिडखोरपणा जाऊन त्याच्यामध्ये मृदुता, प्रेमभाव निर्माण झाल्याचे आढळते. त्याच्या बोलण्यातून प्रेम ओसंडून वाहू लागते. त्याच्या शरीरामध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण होते.
- राजेंद्र घोरपडे, 9011087406


जिहीं ध्यानाचां डोळां पाहिलासी । वेदादि वाचां वानिलासी ।
जें उपसाहिलें तयांसी । तें आम्हांही करी ।। 29 ।। अध्याय 16

ओवीचा अर्थ - ज्यांनी तुला ध्यानाच्या डोळ्यांनी पाहिलें व ज्या वेदादिकांच्या वाचेकडून तूं वर्णन केला गेला आहेस,त्यांचे अपराध जसे सहन केलेस तसे आमचेही करा.

ध्यानयोगी कसा असतो याचे वर्णन दिव्यामृतधारा या ग्रंथात परमपूज्य बाबा महाराज आर्वीकर यांनी केले आहे. ते म्हणतात, ध्यानयोगी हा हठयोगाचाच मार्ग आहे. तथापि सुषुम्नामार्गे येणाऱ्या योग्याप्रमाणे दैवी सामर्थ्यलाभ होत नाही तर दैवी अवस्थानुभव उच्च भूमिकांचे ज्ञान हठयोगाप्रमाणे होत असते. हा जग व शरीर यांकडे ज्ञानयोग्याप्रमाणें दुर्लक्ष करीत नाही. तो जग विनाशी आहे असे मानत नसून ते महत्तत्त्वांत लीन होणारें आहे असे मानतो. देह सोडावा लागणार आहे. हे जरी जाणत असला तरी देहाचा-मनाचा- मुलभूत संबंध चित्तद्रव्यांशी आहे, असे तो जाणतो. देहाचा मनावर व मनाचा देहावर सतत परिणाम होते असे तो मानतो. म्हणून देहाची हेंडसाळ करणे त्याला पसंत नसते. तथापि हठयोगी जसा शरीरशास्त्रवेत्ता व नियंत्रक असू शकतो तसा ध्यानयोगी कधींच असूं शकत नाही. बाबा महाराजांनी केलेल्या या विवेचनावरून ध्यानामध्ये कोणत्या क्रिया शरीरात घडतात. याचा अभ्यास केल्यास देहावर मनाचा परिणाम सातत्याने होतो हे स्पष्ट होते. ध्यानानंतर शरीराला जडत्व प्राप्त होते. शरीर थंडावते. म्हणजे त्या व्यक्तीच्या चालण्यात बोलण्यात फरक जाणवतो. इतर वेळी ती व्यक्ती चिडखोर असेल तर त्याचा चिडखोरपणा जाऊन त्याच्यामध्ये मृदुता, प्रेमभाव निर्माण झाल्याचे आढळते. त्याच्या बोलण्यातून प्रेम ओसंडून वाहू लागते. त्याच्या शरीरामध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण होते. धान्याने त्वचा तेजस्वी होते. ध्यानामध्ये पित्त जळाल्यानंतर या पित्तातून निर्माण होणारे विविध रसाने त्वचेला तेज येते. उतारवयातही त्वचा तेजस्वी दिसते. धान्याने मनाला येणारी शांती ध्यानयोग्याच्या शरीरावर परिणाम करते. याला शास्त्राचाही आधार आहे. शास्त्रानेही याला मान्यता दिली आहे. ध्यानकाळात शरीरात उत्पन्न होणारी विविध रसायने शरीरावर परिणाम करतात. ध्यानयोगी शरीराचा व मनाचा कसा संबंध आहे हे जाणतो. मन प्रसन्न असेल तर शरीर स्वास्थही चांगले राहाते. ध्यानाने मन प्रसन्न होते. याचा परिणाम शरीरावर होतो व स्वास्थ सुधारते. स्वास्थ राखण्यासाठी तरी ध्यानाची गरज आहे. पण ध्यान योग्य प्रकारे करायला हवे. चुकीच्या प्रकारे ध्यान केल्यास मनाला शांती मिळणार नाही. यामुळे शरीरस्वास्थ अधिकच बिघडण्याचा धोका असतो. यासाठी ध्यान योग्य प्रकारे करावे. यासाठी माऊलीच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आमचे सर्व अपराध, चुका पोटात घेऊन आम्हाला माफ कर आणि आमच्याकडून योग्य प्रकारे साधना करून घे. आम्हाला आत्मज्ञानी कर.

No comments:

Post a Comment