Wednesday, April 24, 2019

गंगेचे पाणी






गंगेचे पाणी तेच आहे. फक्त त्या पाण्याचा वापर कशासाठी करायचा हे आपण ठरवायचे आहे. ते पाणी प्रदूषित होणार नाही याचा काळजी आपण घ्यायला हवी. नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आता मोहिम राबविण्याची गरज भासत आहे.

आता गंगेचें एक पाणी । परी नेंलें आनानीं वाहणीं ।
एक मळी एक आणीं । शुद्धत्व जैसें ।।196 ।। अध्याय 17 वा

ओवीचा अर्थ - आतां गंगेचे एकच पाणी, परंतु तें निरनिराळ्या मार्गांनी नेले असतां तें एका मार्गाने अमंगलता प्राप्त करून देतें व एका मार्गाने पवित्रत्व उत्पन्न करणारे होते.

रामु प्रगतशील शेतकरी होता. गावात त्याच्या सल्ल्यानुसार अनेकजण शेती करायचे. त्याने अनेकांचा फायदा झाला. अनेकांना त्याने परदेशी वाऱ्याही करवून आणल्या. परदेशातील शेतीची ओळख आपल्या शेतकऱ्यांना व्हावी, हा त्या मागचा त्याचा उद्देश होता. रामुचा मोठा मुलगा हुशार होता. काही शेतकऱ्यांच्या सोबत तो ही इस्राईल दौऱ्यावर गेला होता. त्याला शेतीची आवड होती. परदेशातील तंत्रज्ञान पाहून तो अवाकच झाला. इतक्‍या कमी पाण्यात तेथे आपल्या पेक्षा तिप्पट चौपट उत्पादन घेतले जाते. कोणताही कीड, रोग यावर नियंत्रण करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडे नाही. वाट्टेत तशा फवारण्या केल्या जातात. याचा परिणाम पिकावर होत आहे. पण तेथे सर्व योग्य पद्धतीने आवश्‍यकतेनुसारच वापरले जाते. आरोग्याचा प्रश्‍नही उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा आपला माल बाजारपेठेत विक्रीसही घेतला जात नाही. सगळा माल नष्ट करावा लागतो. उलट कायदेशीर कारवाईही आपल्यावर होते. इतके हे प्रगत तंत्र पाहून रामुच्या मोठ्या मुलाचे डोळे उघडले. त्याने वडिलांना अशा पद्धतीने शेती करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असा विचार मांडला. पण चांगले करायला लागले की कोणाची तरी नजर लागतेच. रामुच्या लहान मुलाला हा विचार पटला नाही. तू परदेशात जाऊन आलास म्हणून काय झाले. आपल्या शेतात ते तंत्रज्ञान चालणार नाही. तेथील शेती वेगळी आहे. आपली शेती वेगळी आहे. यावरून दोन्ही भावात भांडण सुरू झाले. रामूची ही दोन्ही मुले शेतीचे तुकडे करायला लागले. मोठा मुलगा समजुतदार होता. रामुलाही शेती वेगळी करण्यातच फायदा वाटला. वाटण्या अखेर झाल्या. लहान मुलाने चांगली नदी काठची कसदार जमीन मागितली. मोठ्याच्या वाटणीला माळरानची जमीन आली. शेवटी भांडणावर पडदा पडला. दोघेही वेगवेगळ्या मार्गाने शेती करू लागले. लहान भावाच्या वाट्याला कसदार जमीन आली होती. नदीकाठीची जमीन असल्याने पाण्याची कमतरता नव्हती. सर्व बागायती जमीन होती. पेरालं ते तेथे उगवत होते. फक्त राबणारे हात त्या जमिनीली हवे होते. लहान भाऊ मोठ्या ईर्ष्येने शेती करायला लागला. ऊस शेतीत वडील विक्रमी उत्पादक होते. त्यांचा आदर्श त्याच्या पाठीमागे होता. पण दोघा भावांच्या वाटण्याने नाराज असलेले वडील फारसे आता शेतीमध्ये लक्ष घालत नव्हते. लहान भाऊ शिकलेला होता. पदवीधर असल्याचा त्याला अभिमान होता. हातात खुरपे घेणे त्याला लाजिरवाणे वाटायचे. पदवीचा मान राखायला हवा. शिकलेलो आहोत आपण. आडाण्यासारखे शेतात राबणे त्याला पसंत नव्हते. तो शेताकडे जातच नसे. सर्व व्यवहार तो घरी बसूनच करत असे. शेतावर फेरफटका मारण्याचीही त्याला लाज वाटे. व्यवस्थापन शाखेची पदवी घेतल्याने नुसते व्यवस्थापन करून शेती करण्यातच त्याला अभिमान वाटे. आज काय इतके मजूर होते. इतक्‍या मजूरांकडून इतके काम होते. सर्व काम पूर्ण झाल्यानंतर पगार काढायचा इतकाच त्याचा उद्योग होता. शेतात काय चालते याकडे तो कधीही पाहात नसे. शेतात कोणती कामे चालतात याचीही माहिती तो घेत नसे.
मोठ्या मुलाच्या वाट्याला जमीन जास्त आली असली तरी ही सर्व जमीन पडीक होती. या जमिनीत पीक पिकविणे हे एक मोठे आव्हानच होते. पण तो डगमगला नाही. त्याने इस्राईलचे तंत्रज्ञान या शेतात राबवायचे ठरविले. त्यानुसार त्याने नियोजनही केले. पाण्याची सोय प्रथम करणेआवश्‍यक होते. या माळरानावर जुनी पडकी विहीर होती. यात फारसे पाणी नसायचे पण उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकून राहायचे. ही विहीर त्याने दुरुस्त केली. शासनाच्या विविध योजनांतून त्याने ग्रीन हाऊससाठी अनुदान मिळवले, काही बॅंकांकडून कर्जही केले. हे तसे धाडसाचेच काम होते. नुसती शेती पाहून ते तंत्रज्ञान राबविणे तितके जिकिरीचे होते. पण त्याने जिद्द सोडली नाही. सर्व तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. आपल्या देशातील परिस्थितीचाही त्याने आढावा घेतला. आपण आपल्या देशात हे तंत्रज्ञान राबविताना कोणते बदल करायला हवेत याचाही त्याने अभ्यास केला. सुरवातीच्या टप्प्यात त्याने कमी क्षेत्रावर हा प्रयोग केला. यात त्याला चांगलाच नफा मिळाला. त्यानंतर त्याने सर्व माळरानावर हा प्रयोग राबविला. कमी पाण्याच्या वापरावर, कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मोठ्या भावाने कमावले. त्याचा नावलौकिक सर्वत्र झाला. प्रगतशील शेतकऱ्याचा प्रगतशील शेतकरी मुलगा म्हणून त्याची ओळख झाली. त्याची शेती पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक शेतकरी येत. नामवंत, तज्ज्ञही त्याचा सल्ला घेण्यासाठी त्याच्या मागे धावत.
एकदा असेच चार चौघेजण रामुच्या मोठ्या मुलाकडे बसले होते. यावेळी एकजण म्हणाला, आम्हाला जरा जार गोष्टी सांगता तशा लहान भावाला सुद्धा जरा सांगत जावा. यावर रामुच्या मोठया मुलाने आश्‍चर्य व्यक्त केले. त्याला काहीच माहित नव्हते. वाटण्या झाल्यानंतर याने गावातले घर सोडून माळरानावरच संसार थाटला होता. गावातल्या घरात काय घडामोडी घडल्या याची कल्पना नव्हती. पण उत्सुकतेने लहान भावाचे कसे बरे चालले आहे का? याची चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की हा भाऊ शेताकडे कधी जातच नाही. पिकाला पाणी किती दिले जाते, खते कोणती दिली जातात, ती प्रमाणात दिली जातात का? याकडेही त्याचे कधी लक्षच नव्हते. फक्त कारखान्याला ऊस गेल्यावर बिले गोळा करायला मात्र तो जायचा. अशा या शेतीने दोन-तीन वर्षातच जमिनीला मिठ फुटले. जमिन क्षारपड झाली. दरवर्षी पेक्षा उत्पादन दुपटीने तिपटीने घटले. आता जमिन पड पडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. अशी कशी दुरवस्था झाली. हे समजनेही कठीण होते. ज्या शेताने गावात विक्रमी उत्पादन दिले ते शेत अवघ्या दोन-तीन वर्षातच पड पडते म्हणजे काय? असा कारभार कसा झाला. मोठ्या भावाला वाटले आपण जगाला सल्ले देत राहिलो. जगानेही आपले सल्ले ऐकले आणि आज तीही मंडळी विक्रमी उत्पादन घेत आहेत. कमी पाण्यात, कमी खर्चात, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन कोट्याधिश होत आहेत. पण आपल्या घरात अशी अवस्था का व्हावी. हा विचारही मनाला न पटणारा होता. वडिलांनी इतरांना विक्रमी उत्पादन कसे घ्यायचे, याचे सल्ले दिले त्यांच्या मुलांना आता दुसऱ्याचा सल्ला ऐकण्याची वेळ येते, म्हणजे नेमके कोणाचे चुकते. असा प्रकार नेमका घडतोच कसा?
या भावाने तातडीने गावातील घर गाठले. वडील गावातील घरातच राहात होते. त्याने सर्व चौकशी केली. अंधपणे शेती केल्याने ही अवस्था झाली. फुशारकी मारत कधी शेती होत नाही. जास्त शिकला म्हणजे खुरपे हातात धरायचे नाही हा काय नियम झाला का? बर खुरपे राहू दे. शेतावर दररोज नुसता फेरफटका मारला जरी असता तरी शेतात काय घडते याचे ज्ञान झाले असते. शेताच्या बांधावर तरी जायला पाहिजे होते. हे ही साधे ज्याला जमत नाही त्याने शेतीचा नाद सोडावा. शेती अशा माणसाचे काम नाही. घरात बसून शेती होत नाही. आता संगणकाचे युग आले आहे. एक भाऊ संगणकाने मोजून मापून खते, पाणी, फवारण्या करतो तर दुसरा घरात बसून केवळ बिले भागवून उत्पन्न घ्यायला कारखाना गाठतो. लहान भावाला त्याची चूक कळली होती. पण आता काय करणार? मोठ्या भावाने त्याला धीर दिला. माळावरच्या घरात महिनाभरासाठी नेले. तेथे कशापद्धतीने शेती केली जाते याचे ज्ञान शिकवले. संगणकावर मोजून मापून पाणी देण्याची पद्धत पाहून लहान भाऊ अवाकच झाला. असे आपण हे जरी केले असते तरी शेताची जमीन शाबूत ठेवता आली असती. झालेल्या चुका आता त्याला दुरुस्त करायच्या होत्या. जमिनीला मीठ फुटले तर त्यावरही उपाय आहेत. ते उपाय त्याने योजले. आता तोही मोठ्या भावाप्रमाणे विक्रमी उत्पादन घेत आहे. सांगण्याचे तात्पर्य एकच की गंगेचे पाणी तेच आहे. फक्त त्या पाण्याचा वापर कशासाठी करायचा हे आपण ठरवायचे आहे. ते पाणी प्रदूषित होणार नाही याचा काळजी आपण घ्यायला हवी. नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आता मोहिम राबविण्याची गरज भासत आहे. नदीच्या शुद्ध पाण्यात मळीची घाण मिसळायची का? गटारीचे पाणी सोडायचे का? याचा विचार आपण करायला नको का? घाण पाणी नदीत मिसळले तर तो प्रवाह प्रदूषित होणार आणि ज्यांनी विचार करून हे प्रदूषण रोखले त्यांची शुद्धता कायम राहणार.

No comments:

Post a Comment