Thursday, April 25, 2019

सोऽहमचे प्रसारक सद्गुरू रामचंद्र महाराज तिकोटेकर



(श्री सद्गुरू रामचंद्र महाराज तिकोटेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विश्वपंढरी येथील मानवता मंदिरात बांधण्यात आलेली पूजा)

सोऽहम साधनेचा प्रसार पूर्व व उत्तर महाराष्ट्र मध्ये आधीपासूनच फोफावला होता. पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र सोऽहम साधना वाढण्याचा काल खऱ्या अर्थाने रामचंद्र महाराज तिकोटेकर यांच्यापासून सुरू झाला. पुणे शेजारी केळवड हे त्यांचे जन्मगाव. चिंचणीतील गाढे अभ्यासाक आत्माराम दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे वेदाध्ययन झाले भजन, कीर्तनाचाही छंद लागला. वडिलांच्या निधनानंतर रामचंद्रांना सद्गुरूंची ओढ लागली त्या ओढीतूनच ते गाणगापूरला पायी चालत गेले. श्री दत्तगुरुंचे दर्शन घेऊन दोन महिने तेथे राहून दत्तात्रयाची आराधना केली. दत्तगुरूंनी प्रसन्न होऊन स्वप्नामध्ये येऊन महादेव तुला भेटेल असे सांगून चिंचणीत परत जाण्यास सांगितले. पूजेसाठी बागेतील फुले आणण्यासाठी जाताना वाटेत अनपेक्षितपणे महादेवनाथांचे दर्शन झाले. तथापि सद्गुरु प्राप्तीचा क्षण अजून यायचा होता. परंपरा रक्षण, परंपरा वेदाध्ययन, परंपरा तसेच गुरु-शिष्य परंपरा याची जाणीव रामचंद्राच्या ठिकाणी झाल्यानंतर महादेवनाथांनी सोऽहम दीक्षा दिली. रामचंद्र महाराजांनी १८६५ मध्ये कोल्हापुरात अनुग्रह देण्यास सुरुवात केल्यानंतर परंपरेची एक शाखाच येथे वाढू लागली. यामध्ये स्वामी स्वरूपानंद यांचे परात्पगुरु श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर, प्रकांडपंडित श्रीपतीनाथ गोवर्धन आणि वेदांती खंडोकृष्ण तथा बाबा गर्दे यासारख्या शिष्यांचा समावेश होतो. अशा या शिष्यांकडून रामचंद्र महाराजांनी सिद्ध चरित्र हा ग्रंथ लिहून घेतला अत्यंत निगर्वी, शांत वृत्तीने राहणारे, स्वानंद स्वरूपात रममान असणारे रामचंद्र महाराज चैत्र वद्य षष्ठी शके १८१४ इसवी सन १८९२ रोजी श्रीक्षेत्र विजापूर येथे समाधिस्थ झाले.

No comments:

Post a Comment