Wednesday, July 8, 2020

बैल विकूनि गोठा । पुसां लावोनि गांठा । इया करणीं कीं चेष्टा । काइ हंसों ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

 
शेती हा अडाण्याचा धंदा नाही. व्यापाऱ्यापेक्षाही अधिक जागरूकता त्याच्याजवळ असावी लागते. संत ज्ञानेश्‍वरांनीही हाच नियम बाराव्या शतकात सांगितला आहे. शेती करताना नियोजन असायला हवे. नियोजन नसेल तर लोक आपल्यावर हसणार. चुकीच्या पद्धतीने शेती करून स्वतःचे हसे करून घेऊ नये. हा संदेश त्यांनी ज्ञानेश्‍वरीत दिला आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

बैल विकूनि गोठा । पुसां लावोनि गांठा ।
इया करणीं कीं चेष्टा । काइ हंसों ।। 233 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - बैल विकून जसा गोठा बांधावा, अथवा राघूस हाकून देऊन मग पिंजरा तयार करावा, असल्या कृतींना योग्य म्हणावें किंवा चेष्टा म्हणाव्यात ? कां यांना हसावे ?

शेती करताना नियोजनाचा अभाव दिसून येतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. कोणत्याही कामाचे योग्य नियोजन असायला हवे. बैल विकत घ्यायचा असेल तर तो बांधण्यासाठी गोठा बांधावा लागतो. चारा-पाण्याची व्यवस्था करावी लागते. नुसता बैल विकत आणला म्हणजे काम संपले असे होत नाही. बैल विकत घेतला पण त्याचा शेती कामासाठी उपयोग व्हायला हवा. हे सर्व पाहणे गरजेचे असते. सध्या आधुनिक शेतीत जनावरांची जागा आता यंत्राने घेतली आहे. पण त्यातही नियोजन असायला हवे.
 
बैलांची गरज संपली आहे मग गोठा कशासाठी बांधायचा. नको त्या गोष्टीत गुंतवणूक कशासाठी करायची. चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक केले तर नुकसान होणारच. खर्च करताना विचार करायला हवा. खर्च करायचा आहे तर त्याचे नियोजन हवे. खरीप पिकाची कापणी केल्यानंतर खरिपाचे बियाणे खरेदी करून कसे चालेल. योग्यवेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला हवी. पैसा आहे म्हणून वाट्टेल तसा पैसा खर्च करू नये. कोणत्याही धंद्यात हाच नियम आहे.
 
शेती हा सुद्धा एक व्यवसाय आहे. याची जाणीव ठेवून नियोजन करायला हवे. पिकावर कीड दिसते. पण किडीचे प्रमाण किती आहे याचा विचार करून फवारणी करायला हवी. किडीचे प्रमाण कमी असेल तर फवारणीसाठी खर्च करणे योग्य नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी शेती करताना शेतकऱ्यांनी विचारात घ्यायला हव्यात. शेतीमध्ये नेमके हेच होत नसल्याने शेती तोट्यात जात आहे. पाण्याची सोय नाही. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता नसते. अशावेळी अशा ठिकाणी उसाची लागवड कशी फायदेशीर राहील.
 
उन्हाळ्यात पिकास पाण्याचा ताण सहन होत नाही. उसाची वाढ खुंटते. याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होतो. काही ठिकाणी तर ऊस वाळून जातो. तरीही शेतकरी उसाचीच लागवडीच्या मागे धावतो. प्रत्येक पिकाचा खर्च विचारात घेऊन लागवड करायला हवी. तितकी खर्च करण्याची आपली क्षमता आहे का? त्या पिकासाठी लागणारे खत, पाणी याची उपलब्धता होऊ शकते का? हा विचार करून पिकांची निवड करायला हवी. कोणते पीक कोणत्या जमिनीत येते याचाही विचार व्हायला हवा.
 
खडकाळ जमिनीवर उसाचे उत्पादन किती येते? हे विचार करायला नको का? पिकाच्या जातीनुसार सुद्धा जमिनीची निवड करायला हवी. पिकांच्या जातींचा अभ्यास यासाठी हवा. कोणती जात पाण्याचा ताण सहन करू शकते. कोणती जात कोणत्या किडींना बळी पडते. कोणत्या रोगाची प्रतिकारक्षमता त्या जातीमध्ये आहे. हे सर्व विचारात घ्यायला हवे. हवामान, जमिन याचा विचारच शेतकरी करत नाहीत.
 
कपाशीची लागवड करताना तापमान किती असावे लागते याचा विचार करायला हवा. कपाशीसाठी किमान व कमाल तापमान 15 ते 35 अंश सेल्सिअस तापमान लागते. लागवडीच्या कालावधीत तापमान 35 अंशांपेक्षा कमी असायला हवी. मे मधील तापमानाचा विचार केल्यास या महिन्यात पिकाची लागवड कशी करता येईल. 40 च्यावर पारा गेला आहे. मे च्या शेवटच्या आठवड्यातही अशीच स्थिती असते. तापमान 40 च्या आसपास असते. अशावेळी पेरणी केली तर त्याचा परिणाम पिकाच्या उगवणीवर होतो. 25 मे नंतर तापमान कमी असते. पण ते तापमान 35 अंशापेक्षा कमी असायला हवे. या तांत्रिक गोष्टी शेतकऱ्यांनी विचारात घ्यायला हव्यात.
 
उत्पादन का कमी होते? याची कारणे शेतकऱ्यांनी शोधायला हवीत. त्यानुसार नियोजन करायला हवे. पेरणी करताना या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत. मग उत्पादन घटले व उत्पादन खर्च वाढला यावर ओरड करणे कितपत योग्य आहे. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे काढता येईल व तेही योग्य प्रतीचे उत्पादन हवे. याचा विचार शेतकऱ्यांनीच केल्यास भेडसावणाऱ्या समस्या जाणवणार नाहीत. कपाशीत दिवसाचे तापमान 38 अंशांपेक्षा जास्त राहिले व ते दीर्घकाळ टिकून राहिले व त्यातच पाण्याचा ताण बसल्यास पिकाच्या वाढीवर याचा परिणाम होतो. पावसाळ्यात पाणी साचून राहिल्यास कपाशीच्या शरीरक्रिया शास्त्रावर अनिष्ट परिणाम होतो. पाण्याचा ताण बसल्यामुळे अन्नद्रव्य शोषून जलवाहिन्या फुगीर होतात. नलिका बंद होते. झाडाची पाने, फुले. बोंडे यांना अन्नद्रव्य पुरवठा न झाल्यामुळे पानांचा तजेला नाहीसा होतो. पाने पिवळी पडतात. पाने, फुले व बोंडे यांची गळ होते आणि झाड मरते. हे शास्त्र शेतकऱ्यांनी जाणून घेऊन शेती करायला हवी.
 
पूर्वीच्या काळी शास्त्रोक्त पद्धतीने शेती केली जात होती. यामुळेच त्या काळातील उत्पादन हे उत्तम होते. ज्याला शास्त्र जमले त्यालाच शेती जमते. यासाठी शेतकऱ्यांची वृत्ती ही संशोधकाप्रमाणे हवी. कमी शिकलेला शेतीकडे वळतो. शेती करतो. असा आजचा नियम आहे. पण येथे तर जास्त शिकावे लागते याचा विचार व्हायला हवा. शेती करणाऱ्याला कमी शिकलेला म्हणून हिणवणे योग्य नाही. उलट शेती करताना त्याला अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. शास्त्रज्ञाप्रमाणे त्याला प्रत्येक गोष्टीचा बारीकसारीक विचार करावा लागतो.
 
शेती हा अडाण्याचा धंदा नाही. व्यापाऱ्यापेक्षाही अधिक जागरूकता त्याच्याजवळ असावी लागते. संत ज्ञानेश्‍वरांनीही हाच नियम बाराव्या शतकात सांगितला आहे. शेती करताना नियोजन असायला हवे. नियोजन नसेल तर लोक आपल्यावर हसणार. चुकीच्या पद्धतीने शेती करून स्वतःचे हसे करून घेऊ नये. हा संदेश त्यांनी ज्ञानेश्‍वरीत दिला आहे.
 
शेतीमध्ये सध्या 50 टक्के शेतकरी हे कमी शिकलेले आहेत. पण त्यातील अनेक शेतकरी हे तज्ज्ञांच्या पेक्षाही उत्तम शेती करतात. कारण ते मनापासून शेती करतात. मनापासून केलेली कोणतीही गोष्ट फळते. त्यात उत्तम यश प्राप्त होते. कोणतीही गोष्ट मनापासून व नियोजनानुसार केली तर त्यात सहज यश मिळते. देवाची साधना असो किंवा कोणताही व्यवसाय असो. यात यश मिळवायचे असेल तर हा नियम आहे. स्वतःचे हसे होऊ नये यासाठी नियोजनानुसार काम करायला हवे. आपण कोणती कृती करतो याचा विचार करायला हवा. चुकीचे तर करत नाही ना. याचा विचार करायला हवा.
 
चुका अनवधानाने होतात. पण अडाण्याप्रमाणे व्यवहार करणे ही सर्वांत मोठी चूक आहे. अनवधानाने झालेली चूक माफ होऊ शकते. पण अडाणीपणे केलेल्या चुकीस माफी नाही. यासाठी चुका होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. चुका सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. चुका का होतात याचाही विचार करायला हवा. जो चुकतो तो शिकतो. हे लक्षात ठेवून त्यातून शिकायला हवे व सुधारायला हवे.

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

आपणाला आम्ही केलेले निरुपण आवडत असेल तर नियमित वाचण्यासाठी डेलिहंटवर `इये मराठीचिये नगरी` ला फाॅलो करायला विसरू नये. 
 
श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे   
 

No comments:

Post a Comment