Friday, July 3, 2020

जैसा पुजूनि देवो पाहिजे । पेरूनि शेता जाइजे । तोषौनि प्रसादु घेइजे । अतिथीचा ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

 
आजकाल संगणकावर शेती केली जात आहे. पिकांना पाटाने नव्हे तर थेंबाने मोजून मापून पाणी दिले जात आहे. हे तंत्र आपण या शेतकऱ्यांना शिकवायला हवे असा विचार तो युवक करू लागला.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

जैसा पुजूनि देवो पाहिजे । पेरूनि शेता जाइजे ।
तोषौनि प्रसादु घेइजे । अतिथीचा ।। 148 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे पुजून देव पाहावा, शेतांत धान्य पेरून मग शेतांत जावें व अतिथीला संतुष्ट करून मग त्याचा आर्शीर्वाद घ्यावा.

ग्रामीण भागातील एक युवक आयटी झाला. गावातला पोरगा शिकला कि गावकऱ्यांना त्याचे कौतुक वाटते. आयटी शिकून तो आता विदेशात नोकरीसाठी जाणार होता. तेथे काही महिने प्रशिक्षण घेऊन तो भारतातील मेट्रो शहरामध्ये काम करणार होता. इतक्‍या उच्च पदावर त्याला नोकरी मिळाल्याने पगारही तसा भरगच्च होता. घरच्या शेतीतून वडिलांना आयुष्यभर राबून कमविले इतके पैसे त्याला केवळ सहा महिन्यांच्या प्रशिक्षणातच मिळणार होते. इतका पैसा मिळणार याबाबत निश्‍चितच गावकऱ्यांना त्याचा अभिमान वाटत होता. यासाठी त्यांनी त्याचा सत्कारही केला. विदेशात जाताना सगळे गावकरी त्याला अगदी विमानतळापर्यंत सोडायला आले होते. गावकऱ्यांचे स्नेह काय असते? किती आपुलकी असते? किती आपलेपणा असतो? किती गर्व असतो? हे पाहून तो युवकही भारावून गेला होता. कारण दहावीनंतर त्याचे शिक्षण हे शहरातच झाले होते. गावकऱ्यांच्या या व्यक्तीमत्त्वाची त्याला ओळख नव्हती.
काळ बदलला आहे. प्रत्येकाच्या घरी टीव्ही आला आहे. मोबाईल वाजतो आहे. झपाट्याने प्रगती होत आहे. कच्चे रस्त्ये पक्के झाले आहेत. घरा घरात दुचाकी, चारचाकी उभ्या केलेल्या पाहायला मिळत आहेत. असा या बदललेल्या गावातून आपणाला इतके प्रेम मिळेल याचे त्या युवकाला आश्‍चर्य वाटले. शहरात शिक्षणासाठी गेल्यानंतर गावाचा त्याचा संपर्क नव्हता. शहरातील धकाधकीचे जीवन व एकलकोंडेपणाच त्याला माहित होता. आपले तेवढे पाहायचे. इतरांकडे पाहायला येथे वेळच नसतो. सध्या मानसा-मानसातील संवादच बंद झाला आहे. पूर्वी इतके प्रेम, आपुलकी आता दिसत नाही. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न दिसतो आहे. प्रत्येकाला उद्याची चिंता आहे. झपाट्याने बदलणाऱ्या या प्रगतीचा वेग आता गाठणे गरजेचे वाटत आहे.
मागे पडलो तर आपले जगणेही मुश्‍किल होईल याची चिंता आहे. अशा वातावरणातही गावकऱ्यांनी आपणास प्रेम दिले याची जाणीव त्या युवकाला झाली. विमानाच्या प्रवासात तो याचाच विचार करत होता. विदेशात पोहोचल्यानंतर मात्र तो पूर्ण बदलला. आता त्याला तेथील परिस्थितीही बदलणाऱ्या काळाचा वेग पकडणे गरजेचे होते. तसा त्याने तो पकडलाही. सहा महिन्याचे प्रशिक्षण घेऊन तो भारतात परतला. पण गावी न जाता तो मेट्रो शहरातच भटकत राहिला. चार-पाच वर्षात त्याने अमाप पैसा कमविला. हा पैसा कोठे ठेवायचा याचीही चिंता त्याला सतावू लागली.
कोणत्या व्यवसायात गुंतवायचा हा मोठा प्रश्‍नच होता. कारण त्याला शहरात त्याच्या मनासारखा दुसरा व्यवसाय नव्हता. त्याने ठरविले गावी जाऊन शेती विकत घ्यायची. काही वर्षांनी आपण कामातून निवृत्त झालो तर गावी जाऊन शेती तरी करता येईल. तसेच अधूनमधून त्यानिमित्ताने गावीही जाता येईल. गावकऱ्यांचा परिचयही वाढेल. गावच्या लोकांना नव्या तंत्राने शेती करण्याचे ज्ञान देता येईल. त्यांच्या समोर एक आदर्श ठेवता येईल. बदललेले जग बदललेली शेतीही गाव बदलण्यास मदत करेल. आपली चार माणसे भेटल्याचा आनंदही वाटेल. या आशेने तो गावी परतला.
महिना भराची रजा घेऊन तो चार-पाचवर्षांनी गावी पोहोचला. पाहतो तर काय? गावाची स्थिती आहे तशीच होती. फारसा फरक त्याला जाणवला नाही. पण एक फरक जाणवला. पडीक माळरानावर आता उद्योग उभे राहात आहेत. विविध कारखान्यांनी या जागा बळकावल्या आहेत. काही पिकाऊ जमिनीवरही आता वसाहती उभ्या राहात आहेत. तशी ही काळाची गरज आहे हा बदल पाहून तो आयटी युवक सुखावलाही. अरे चांगले झाले. गाव आता सुधारतो आहे. गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आता गावच्या लोकांचे प्रश्‍न सुटतील. गावात पैसा खेळेल. त्याला ही बदलती परिस्थिती पाहून बरे वाटले. सकाळी उठून तो गावाचा फेरफटका मारत होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे तो गावातील मंदीरात गेला.
गावचे ते ग्रामदैवत होते. पुरातन मंदीर होते. प्रसिद्ध मंदिर होते. पुराणात या मंदिराची नोंद आहे. या मंदिरातील पुजाऱ्यांचीही परंपरा आहे. त्याने मंदिरात प्रवेश केला. पाहतो तर काय? तेथे त्याच्यात बालमित्र पुजारी होता. त्याचे पूर्वजही तेथे पुजारी होते. आता तो त्या मंदीरात पूजा करतो आहे. पिढानपिढ्या त्यांची त्या मंदिरात सेवा सुरू आहे. त्याने आश्‍चर्याने त्याच्याकडे पाहिले. तो म्हणाला अरे तू एकटाच फक्त मला गावात दिसतोस. बाकीचे सारे बालमित्र मला भेटतच नाहीत. आपुलकीने त्याने त्याची चौकशी केली. पुजाऱ्यानेही आपुलकीने सर्व माहिती सांगितली.
पुजाऱ्यांने त्याला विचारले पण तू गावात कसा? सुट्टीला आला आहे का? तेव्हा तो हो म्हणाला. पण गावात शेत जमिन खरेदी करायची म्हणतो. पुजारी म्हणाला उत्तम गोष्ट आहे. पुढे शेतीचा विचार दिसतो. तेव्हा तो आयटीचा मित्र थोडा ताठत म्हणाला तसे नाही रे? आयटीत खूप पैसा मिळतो. पण हा पैसा कोठे गुंतवायचा हा प्रश्‍न पडल्याने शेती खरेदीचा विचार करतो आहे. मला शेतीची आवडही नाही. त्यात रसही नाही.
पुजारी म्हणाला जास्त पैसा झाले आहे का? होऊ होऊ दे. अशीच भरभराट होऊ दे. गावची शेतीही उत्पन्न देईल. छान विचार आहे. स्पर्धेच्या युगात वावरणाऱ्या त्या आयटी युवकाला कधी नव्हे ते स्तुतीचे शब्द कानावर पडले. नोकरीच्या ठिकाणी इतकी स्पर्धा असते. चढाओढ असते. कोणाही मित्राला प्रगती झालेले आवडत नाही. पण हा आपला बालमित्र आपली स्तुती करत आहे. आपल्या या प्रगतीने त्याला दुःख होत नाही तर उलट गर्वाने आपली स्तुती करतो आहे. ही आपुलकी पाहून तो आयटीचा युवक पुन्हा एकदा भारावतो आणि पूजेला बसतो.
कित्येक दिवसांनी त्याला मंदिरात पूजा केल्याच्या आनंदही होतो. त्याच्या मनाला शांती वाटते. पूजा झाल्यानंतर जाताना त्या पुजाऱ्याला तो म्हणतो अरे तुला माझ्या प्रगतीचा हेवा वाटला नाही का? पुजारी म्हणतो अरे हेवा कसला मी माझ्या कामात समाधानी आहे. मला पुजेतून किती पैसे मिळतात याची मोजदाद मी करत नाही. येथे सर्व चालते त्याचा हिशोब भगवंत पाहतात. मला तो पाहण्याची गरज नाही. मंदिर भगवंताचे आहे. मी फक्त सेवक आहे. मला कसली चिंता. जे काही मिळते ते भगवंतच देतात.
तेव्हा तो आयटी युवक त्याला म्हणतो. अरे बघ जग किती बदलले आहे. सध्या इंटरनेटवर देवाच्या पूजा बांधल्या जात आहेत. सर्व व्यवहार विदेशात बसून केले जात आहेत. तू सुद्धा असा उपक्रम राबवून खूप पैसा कमवू शकतोस. विचार कर. पाहिजे तर मी तुला या वाट्टेलती मदत करायला तयार आहे.
तेव्हा तो पुजारी म्हणतो. मी देवाचा पुजारी आहे. येथे येणाऱ्या भक्तांचा पुजारी आहे. सेवक आहे. काही भक्त प्रेमाने दान करतात. ते दान आम्ही स्वीकारतो. भक्तांना नाराज करायचे नाही. सेवा या उद्देशाने ते आम्ही स्वीकारतो. त्यामध्ये पैसा कमविणे हा आमचा उद्देश नसतो. देवाच्या देवळात ठेवण्यात आलेल्या दानपेट्या ह्या देवस्थानची निगा राखण्यासाठी आहेत. देवस्थानला जमिनीही आहेत. त्या पिकवून देवाला प्रसाद वाटायचा असतो. येणारा भक्त सुखावला जावा हा त्यामागचा उद्देश आहे.
सर्वच येणारे भक्त हे श्रीमंत नसतात. काही गरीब भक्त ही येतात. त्यांना प्रसाद मिळावा. समाधान मिळावे यासाठी हे दान स्वीकारले जाते. हा व्यवसाय नाही. पिढ्यान पिढ्या या देवस्थानचे आम्ही पुजारी आहोत. ही सेवा आहे. देवाच्या दारात सर्व सारखेच असतात. सेवाभाव येथे जागृत ठेवला जावा हा उद्देश आहे. इंटरनेटवरून दूरच्या भक्तास अभिषेकासाठी पैसे पाठविले जाऊ शकतात. तशी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात काहीच हरकत नाही. पण ही सेवा आहे. हा भाव त्यामध्ये असायला हवा. पैसा कमविणे हा उद्देश नसावा. वाणिज्य आले की तेथे भक्ती नांदत नाही. हे भक्तीचे मंदिर आहे. येथे येऊन पूजा करण्यात जो आनंद आहे तो इंटरनेटवरून पैसे पाठवून अभिषेक करण्यात नाही. येथील भक्तीत डुंबण्यासाठी मंदिरात यावे. येथे देवाचा होणारा सोहळा पाहण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी यावे. मन हलके होते. मनाला आत्मिक समाधान मिळते. हे टिकविण्यासाठी येथे भक्तीत वाणिज्य येता काम नये. अन्यथा तो धंदा होतो. ते भक्तीपिठ राहात नाही. तू शेती खरेदी करणार आहेस. ही शेती कसण्यात जो आनंद आहे. मंदिरातल्या नैसर्गिक गारव्यात जो आनंद आहे. तो आनंद वातानुकूलित कार्यालयात नाही. हा गारवा, हा कष्टाचा आनंद प्रेमाची, भक्तीची ओळख करून देतो.
पुजाऱ्याचे हे संभाषण ऐकून त्या युवकाचे डोळे उघडतात. शहरातील प्रदूषणाने त्याच्या मनावर साचलेली धूळ नाहीशी होते. पुजाऱ्याचे वडीलही असेच भाविक होते. तसा त्यांचा मुलगाही असाच भाविक आहे. पुजाऱ्याचे आजोबाही भक्तिभावाने पूजा करायचे. कोणी दान दिले नाही दिले तरी ते कधी अपेक्षा ठेवायचे नाहीत. शेतातून देवस्थान चालते असे ते म्हणायचे. देवस्थानला याचसाठी शेती दिली आहे. असे ते म्हणायचे. भक्तांनी देवाला पान, फुल, फळ द्यावे असे ते म्हणायचे. पण सध्या पानाचा अर्थ नोटा असा लावला जात आहे. नोटांचे हार आता देवाला अर्पण केले जात आहेत. पण देवाला त्याची गरज नाही. देव भक्तांकडून ही अपेक्षा ठेवतही नाही. देवाला भक्ताची भक्ती हवी असते. नामाचे जप तो मोजतो. कितीवेळा मला भक्ताने बोलावले हे तो पाहतो. साधना पाहतो. साधना कशी केली जाते हे पाहतो. खरा भक्त देवाकडे हेच मागतो. साधनेत मन रमावे हेच मागतो. त्याच्यात जो आनंद आहे तो पैशाने भक्ती मोजण्यात नाही. पिढ्यान पिढ्या भारतात हेच चालले आहे. हाच आदर्श येथे ठेवला जात आहे. यात बदल नाही.
जग कितीही पुढे गेले तरी यात बदल होणार नाही. जग बदलले बदलले, प्रगत झाले असे म्हणता. मग आता या पुरातन मंदिरासारखे मंदिर उभे करून दाखवा. या मंदिराचा कळस गेली हजारो वर्षे आहे तसाच आहे. असे बांधकाम आता का शक्‍य नाही. मग तुम्ही काय प्रगती केली. चार वर्षात भिंतींना तडे जातात. तेथे हजारो वर्षे भिंत टिकण्याची भाषा तुम्ही काय करणार? अरे आपण कोणता आदर्श जनतेसमोर ठेवत आहोत याचा तरी जरा विचार करा. असे त्या पुजाऱ्याचे आजोबा सांगत. त्यांचा नातू सुद्धा आता हेच सांगत आहे. त्यांच्या किती पिढ्या हे भक्तीचे विचार सांगत आहेत. याची गणतीही नाही. असा आदर्श आपण ठेवायला हवा. असा विचार त्या आयटी युवकाच्या मनात घोळू लागला. आयटीत काय? बक्कळ पैसा...अरे तो कोठे ठेवायचा याचाही सोय नाही.
या धंद्यातून त्या धंद्यात, त्यातून दुसऱ्यात केवळ फिरवत ठेवायचे. यात कोणता आदर्श आपण ठेवणार. आज हा धंदा आहे. तो उद्या आहे की नाही याची शाश्‍वती नाही. फायनान्स कंपन्या दरवर्षी नव्या नावाने उघडल्या जातात. दोन वर्षानंतर त्या गायब होतात. अशी आजच्या धंद्याची स्थिती. गुंतवणूक कोठे करायची याची उत्तरेही आज मिळत नाहीत. त्या धंद्यात दूरदृष्टी कशी असणार? पिढ्यान पिढ्यांचे विचार कसे असणार. येथे गुंतवणूक वर्षाला दुप्पट होते पण धंदा बुडतो. तो आदर्श उद्योग कसा ठरेल. पन्नास वर्षापूर्वी ज्या कंपन्या भारतात होत्या त्या कंपन्या आज भारतात आहेत का? परंपरा सांगणारा एकतरी उद्योग आहे का? असे अनेक प्रश्‍न त्या युवकाच्या मनात उपस्थित झाले. मग उत्तर आले. आहे एक उद्योग आहे. जो परंपरा सांगतो. पिढ्यान पिढ्यांची परंपरा सांगतो. तो कोणता तर शेती हा उद्योग पिढ्यान पिढ्यांची परंपरा सांगतो. पण तो धंदा आता बदलला आहे. त्याला काळाचा ओघाने बदलावे लागत आहे. त्यात आपण आदर्श उभा करावा असा विचार त्या युवकाच्या मनात आला.
आजकाल संगणकावर शेती केली जात आहे. पिकांना पाटाने नव्हे तर थेंबाने मोजून मापून पाणी दिले जात आहे. हे तंत्र आपण या शेतकऱ्यांना शिकवायला हवे असा विचार तो युवक करू लागला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो मंदिरात दर्शनासाठी आला तेव्हा त्याने हा त्याचा शेतीचा विचार त्या युवकाला बोलावून दाखवला. तेव्हा तो युवक म्हणाला. हा तुझा विचार उत्तम आहे. पण तुला आयटीची नोकरी सोडून शेतात राबावे लागेल. स्वतः राबल्याशिवाय आदर्श निर्माण होत नाही. आमचे वडील-आजोबा स्वतः राबत होते म्हणून आज आम्ही राबतो आहोत. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करायला हवे. तंत्र बदलले पण कष्टाचा विचार तोच आहे. दुसऱ्याला आदर्श सांगताना स्वतः तो आदर्श अंगी जोपासायला हवा. तरच दुसऱ्याला तो पटेल.
ठीक आहे, असे म्हणून तो युवक गावी शेती खरेदी करतो. दहा वर्षात तो आयटीत अमाप पैसा मिळवतो. मिळालेला पैसा शेतीत गुंतविण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होतात. आधुनिक तंत्राने शेती करण्यास तो प्रारंभ करतो. डोंगरमाथ्यावरील आंब्याच्या बागांना ठिबक बसवतो. सायफनने पाणी देऊन तेथे बाग फुलवतो. पाण्याचे नवे स्रोत शोधतो. शेततळी उभारतो. याबरोबरच शेडनेटही उभारतो. शेतात पिकविलेला भाजीपाला, फुले यांची विदेशात विक्री सुरू करतो. इंटरनेटच्या माध्यमातून विक्री व्यवस्था उभी करतो. पाच वर्षात नोकरी सांभाळत त्याने उभारलेला हा उद्योग पाहून सर्वांनाच आश्‍चर्य वाटते. गावात पैसा मिळत नाही. शहरात पैसा मिळतो अशीच सर्वांची कल्पना होते. पण खरी परिस्थिती वेगळीच असते. जो कमवतो त्यालाच याची कल्पना असते. दहा वर्षात त्याला ना जेवायला वेळेवर मिळाले.
ना कोणाशी निवांत गप्पा मारता आल्या. सदैव केवळ काम, अन कामच दिसत होते. राबराब राबणेच त्याला माहीत होते. संभाषण झाले तरी ते एसएमएस, चॅटिंगच्या माध्यमातूनच ह्या कृत्रिम संभाषणाला तो कंटाळलेला असतो. त्याच्या मनाला निसर्गाचा आनंद घ्यावा. त्याचा आस्वाद घ्यावा याची उत्स्तुकता लागलेली असते. या ओढीमुळेच तो शहरी जीवनाला कंटाळून गावी येऊ पाहात असतो. पैशात समाधान नाही. आपल्या पेक्षा गावाकडे दोन एकरात घर चालवणारा शेतकरी सुखी आहे. हे त्याच्या मनाला पक्के पटलेले असते. कारण हा शेतकरी निसर्गाचा आस्वाद घेत जीवन जगतो. कृत्रिम जगात क्षणिक आनंद मिळतो. पण हा शेतकरी निवांतपणे आपले जीवन जगत असतो.
गावातील चार चौघात गप्पा मारल्याने मन मोकळे होते. मनाला आधार मिळतो. येथे एकट्यालाच एकट्याशी बोलावे लागते. कोणी बोलायला नसते. कोणाशी संवाद करावा म्हटले तरी तो त्या मनस्थितीत असेल की नाही याची शाश्‍वती नसते. चॅटिंग करतानाच भेटला तरच गप्पा होतात. पण या मौनातील गप्पांनी त्याला निवांतपणा मिळत नाही. ही एक शिक्षाच आहे असे वाटते. संन्यास घेतलेला, हिमालयात गेलेला साधूही निवांतपणे जगत असतो. त्याला एकटेपणा हवा असतो म्हणून तो हिमालयात जातो. शात एकेठिकाणी बसून त्याला साधना करायची असते. एकांत ही त्याची गरज असते. त्यामुळे साधनेतील आनंदात तो रमत असतो. पण या शहरात भरमसाठ लोकसंख्या असूनही येथे जबरदस्तीचा एकटेपणा आहे. अशाने त्याचे मन कंटाळलेले असते. त्याच्या मनाला आता मोकळा श्‍वास हवा असतो.
धकाधकीच्या जीवनातून त्याला निवृत्ती हवी असते. भारतीय संस्कृतीच्या पगड्यामुळे त्याला अशा एकटेपणात वाईट सवयी लागल्या नाहीत. संस्कारामुळे तो येथे विजयी झाला. अन्यथा या मायावी जगात तो वाया गेला असता. तो दहा वर्षांनंतर नोकरीतून निवृत्त घरी परततो. आणि शेतीत रमतो. यासाठीच त्याने नोकरी सांभाळत शेतीत मन रमवलेले असते. तेथे प्रगती साधलेली असते. नव्या तंत्राची ही शेती आता तो गावकऱ्यांनाही शिकवत आहे. शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून भाजीपाला तसेच इतर शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था त्याने उभी केली आहे. याचा फायदा आता गावकऱ्यांनाही होत आहे. गावचा भाजीपाला, उत्पादने आता मेट्रो शहरात जात आहे. गावाला आता त्याने एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. शेतीतच खरी प्रगती आहे हे त्याने आता पक्के रुजविले आहे. यासाठी त्याने स्वतः प्रथम शेती करून पाहिली आहे.

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

आपणाला आम्ही केलेले निरुपण आवडत असेल तर नियमित वाचण्यासाठी डेलिहंटवर `इये मराठीचिये नगरी` याला फाॅलो करायला विसरू नये.
 
 
श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे   
 
 
 

No comments:

Post a Comment