Monday, July 6, 2020

सपुष्प मृतोपजीवी वनस्पती - इपोपोजियम रोसियम


 
ऑर्किड हे मुख्यतः दोन प्रकारचे असतात. जमिनीवर वाढणारे व झाडाच्या फांदीवर चिकटून वाढणारे असे हे प्रकार आहेत. झाडाच्या फांदीवर म्हणजे ते परोपजीवी असा अनेकांचा गैरसमज होतो; पण तसे नाही. ते फक्त आधारासाठी या झाडावर वाढते. इपोपोजियम रोसियम हे जमिनीवर वाढणारे मृतोपजिवी ऑर्किड आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621 
 

पृथ्वीतलावरील प्रत्येक लहान मोठी वनस्पती ही जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मग ती अल्पजीवी असो किंवा अनेक वर्षे जगणारी असो, सर्वांचेच महत्त्व आहे. अल्पजीवी वनस्पती मात्र आता दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. त्यामध्ये अपुष्प वनस्पतीच्या बुरशी वर्गामध्ये मृतोपजीवी वनस्पतींची संख्या अधिक आहे; मात्र सपुष्प मृतोपजीवी वनस्पतींची संख्या अत्यंत कमी आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे व ग्लोबल वार्मिंगमुळे अशा वनस्पतींचे अस्तित्व आणखी धोक्‍यात आले आहे. या वनस्पतींचे फायदे नाहीत म्हणून त्या नष्ट झाल्या तरी चालतील, असा विचार करणे जैवविविधतेच्या दृष्टीने धोक्‍याचे आहे. या अल्पजीवी असल्या किंवा त्यांचा मानवास उपयोग नाही, म्हणून याकडे दुर्लक्ष करणेही चुकीचे आहे. याच्या संवर्धनासाठी काही नियम पाळणे आवश्‍यक आहे. या वनस्पती जंगलात वाढणाऱ्या असल्याने जंगलांचे संवर्धन योग्य प्रकारे केल्यास त्यांचे आपोआपच संवर्धन होईल. त्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. यासाठी या वनस्पतींची ओळख, माहिती करून घेणे गरजेचे आहे. 

Image may contain: plant, flower, nature and outdoor

यंदा जूनमध्ये आजरा तालुक्‍यात इपोपोजियम रोसियम ही सपुष्प वनस्पती वन कर्मचारी सलिम मुल्ला यांना आढळली. याबाबत वनस्पतीतज्ज्ञ मधुकर बाचुळकर यांच्याकडून अधिक जाणून घेतले असता ते म्हणाले, ""ही वनस्पती 2002 मध्ये महाराष्ट्रात प्रथमच पश्‍चिम घाटमाथ्यावर आढळल्याची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आजरा, शाहूवाडी तालुक्‍यातील गजापूरच्या जंगल परिसरात तसेच सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य परिसरात ती आढळली होती.''  या संदर्भात वनस्पतीतज्ज्ञ मिलिंद सरदेसाई, एस. आर. यादव व बाचुळकर यांचा शोधनिबंधही 2002 मध्ये प्रकाशित झाला होता. 

Image may contain: plant, flower, nature and outdoor

इपोपोजियम रोसियम हे ऑर्किड आहे. जगभरात ऑर्किडेसी कुळाच्या 25 हजारांहून अधिक जाती 600 च्यावर प्रजातीमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. यांतील 130 प्रजाती आणि 900 जाती या भारतात, तर 34 प्रजाती आणि 109 जाती महाराष्ट्रात नोंदविण्यात आल्या आहेत. 

जमिनीवर वाढणारे ऑर्किड 

ऑर्किड हे मुख्यतः दोन प्रकारचे असतात. जमिनीवर वाढणारे व झाडाच्या फांदीवर चिकटून वाढणारे असे हे प्रकार आहेत. झाडाच्या फांदीवर म्हणजे ते परोपजीवी असा अनेकांचा गैरसमज होतो; पण तसे नाही. ते फक्त आधारासाठी या झाडावर वाढते. इपोपोजियम रोसियम हे जमिनीवर वाढणारे मृतोपजिवी ऑर्किड आहे. मृतोपजिवी म्हणजे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही. तर ते वनस्पतींच्या कुजलेल्या अवशेषापासून अन्न तयार करते. त्यामुळे हे ऑर्किड हे मुख्यतः घनदाट जंगलात आढळते. उन्हाळ्यात पडलेला पालापाचोळा पावसाने कुजू लागतो. या पालापाचोळ्यावर हे जगते. या ऑर्किडचे जीवनही 15 ते 20 दिवस जास्तीत जास्त महिनाभर आहे. पंधरा दिवसांत ते फुलोऱ्यावर येते. परागीकरण होते व त्यापासून बी तयार होते व पुन्हा मरून जाते. जूनमध्ये मुख्यतः हे ऑर्किड पाहायला मिळते.

No comments:

Post a Comment