Saturday, July 25, 2020

एऱ्हवी साचचि गा धनुर्धरा । नाही शेवटु माझिया विस्तारा । पै गगना ऐसिया अपारा । मजमाजीं लपणें ।।


भले आपण अमिबापेक्षा मोठे असू पण विश्वाचा विचार करता आपणही एक किरकोळ पेशीच आहोत. मग कशाचा गर्व आपण करतो आहोत ? कोणात्या फुशारक्या आपण मारत आहात ?
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५
एऱ्हवी साचचि गा धनुर्धरा । नाही शेवटु माझिया विस्तारा ।पै गगना ऐसिया अपारा । मजमाजीं लपणें ।। ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय  १० वा
ओवीचा अर्थ - एऱ्हवी अर्जुना, खरोखरच माझ्या व्याप्तीचा अंत नाही, अमर्याद अशा आकाशालाही माझ्यात लपून बसता येते.

विश्वाचा अभ्यास करणाऱ्यांनाही अद्याप विश्वातील या पोकळीचा अंत सापडलेला नाही. विज्ञानाने प्रगती केली. भौतिक प्रगती केली पण या अमर्याद विश्वाची अवकाशाची मर्यादा शोधू ते शकलेले नाहीत. याचा विचार केला तर आपण आपले अस्तित्व जरुर समजू शकू. विश्वाचा विचार, वैश्विक विचार जेव्हा आपण करू लागतो तेव्हा अध्यात्माची अनुभुती आपणास होऊ लागते. विश्वाचे अमर्याद रुप जेव्हा आपल्यात उतरते तेव्हा आपण आपले अस्तित्व शोधायला सुरु करतो. खरंच मी कोण आहे ? याचा शोध घेण्याचा विचार डोकावू लागतो. तेव्हाच आपणाला स्व ची अनुभुती येऊ लागते. अमर्याद विश्वात मी आहे तरी कोण ? खरचं आपण याचा शोध घ्यायला नको का ?

आपल्या जीवनाचा तो उद्देश का असू नये. स्वतःच जेव्हा स्वतःचा शोध करु लागलो तेव्हाच अध्यात्म समजण्यास प्रारंभ होतो. स्वरुप आपले आहे तरी कसे आणि हे कशासाठी निर्माण झाले आहे. अमर्याद विश्वाच्या पोकळीत आपण किती छोटे आहोत. सूर्याच्या मालिकेत पृथ्वी सुद्धा छोटी आहे. मग या पृथ्वीवरील मी किती छोटा. पेशींचा आकार मोजू शकतो. सर्वात लहान पेशी, अमिबा सुद्धा आपण जाणतो. पण ही पृथ्वीच विश्वात लहान असेल तर मग आपण किती लहान आहोत.

भले आपण अमिबापेक्षा मोठे असू पण विश्वाचा विचार करता आपणही एक किरकोळ पेशीच आहोत. मग कशाचा गर्व आपण करतो आहोत ? कोणात्या फुशारक्या आपण मारत आहात ? धर्माच्या नावावर इथे युद्ध करत आहोत. पण धर्म म्हणजे काय हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का ? प्राप्त परिस्थितीमध्ये आपणाकडून आवश्यक असे जे कर्म केले जाते त्याला धर्म म्हणतात. ते कर्म करणे म्हणजेच धर्माचे पालन करणे असा याचा साधा सोपा अर्थ आहे. ही धर्माची व्याख्या आहे. ती केवळ एखाद्या जातीसाठी किंवा त्यावर कुणाची मक्तेदारी नाही. तर तो समस्त मानवाजातीचा धर्म आहे. तो सर्वांसाठी आहे. योग्य कृती, योग्य वेळी, योग्य प्रकारे हा आपला धर्म आहे. जगा व जगू द्या हा आपला धर्म आहे.

धर्म कोणावर लादता येत नाही. मारून मुरगुटून तो शिकवताही येत नाही. मग धर्म बाटण्याचा तर यात प्रश्नच नाही. स्वतःच स्वतःची ओळख करून घेणे हा प्रत्येकाचा स्वधर्म आहे.  मग मी म्हणजे कोण ? मी म्हणजे आत्मा. हा आत्मा देहात आला आहे. त्यामुळे तो आपणास जाणवत नाही. देहातून तो मुक्त होतो तेव्हा त्याच्या अमर्याद स्वरुपाची ओळख होते. तो अमर आहे. त्याला अंत नाही. त्याला वास नाही. तो रंगहीन आहे. असा हा आत्मा सर्वांच्यात आहे. मग रंगावरुन धार्मिक वाद घालण्यात काय अर्थ आहे. कारण सर्वांच्या ठायी असणारा रंगहीन आत्मा एकच आहे. मोठा आहे म्हणावे तर त्याला आकारही नाही. त्याच्या विस्ताराला मर्यादाही नाही. असाहा हा अमर्याद आहे.

आपण आकाश अमर्याद आहे असे म्हणतो पण हे आकाशच त्याच्यामध्ये सामावलेले आहे. इतका तो मोठा आहे. मग स्वतःला लहान तरी का समजतोस ? ही अमर्याद असणारी व्यापी जाणून घे. त्याची ओळख करून घे. म्हणजे स्वतःतील न्यूनगंड दूर होईल. स्वतःच्या अमर्याद स्वरुपाची ओळख तुला होईल तेव्हाच अध्यात्माची अनुभुती येईल. ही अनुभुती स्वतःच करुन घ्यायची आहे. गुरुंच्या कृपेने या अमर्याद स्वरुपाची ओळख होते. यासाठी गुरुंची कृपा व्हावी लागते. गुरुंच्या कृपेनेच मग आत्मज्ञानाची प्राप्ती होते.   
 
  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

आपणाला आम्ही केलेले निरुपण आवडत असेल तर नियमित वाचण्यासाठी डेलिहंटवर `इये मराठीचिये नगरी` ला फाॅलो करायला विसरू नये. 
 
श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnynesh

No comments:

Post a Comment