Wednesday, July 1, 2020

कां आडवोहळा पाणी आलें । म्हैसयाचें झुंज मातलें । तैसें तारुण्याचें चढलें । भुररें जया ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

 
दोन म्हशी भांडत होत्या. त्यांची झुंज लागली होती. दोन कुत्रीही समोर आल्यानंतर एकमेकावर गुरगुरतात. एकमेकांची ताकद दाखविण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. हा ताकद दाखविण्याचा प्रकार मैत्रिपूर्ण, खेळीमेळीतील असेल तर गोष्ट वेगळी आहे. कुस्तीच्या स्पर्धेत अशी खिलाडूवृत्ती असते. पण हे भांडण खरोखरच असेल तर यात दोघांचेही नुकसान होणार. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

कां आडवोहळा पाणी आलें । म्हैसयाचें झुंज मातलें ।
तैसें तारुण्याचें चढलें । भुररें जया ।। 755 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - अथवा आडरानांतील ओढ्यास असा पूर यावा, किंवा रेड्यांची जशी टक्कर माजावी, त्याप्रमाणें ज्याला तारुण्याची भुरळ चढलेली असते.

वादळी पावसाने मोठे नुकसान होते. वाऱ्याची ताकद प्रचंड असते. यात अनेक झाडे मोडतात. दगडही उडून जातात. पण हा वादळी वारा क्वचितच येतो. इतर वेळी हा वारा शांतपणे वाहात असतो. माणसाचा स्वभाव ही असाच आहे. कधी रागीट होतो. कधी मवाळ असतो. कधी इतका शांत असतो की त्याला बोलण्यासाठीही ऊर्जा द्यावी लागते. माणसाच्या मनात कोणता विचार येईल आणि त्यानुसार त्याची कोणती कृती असेल हे सांगता येत नाही. निसर्गातील वाऱ्याचेही तसेच आहे. पण ही ताकद आहे. यात शक्ती आहे. हे संशोधकांनी ओळखले.
 
शक्तीचा वापर करून नुकसान ही करता येते व त्याचा योग्य वापरही केला जाऊ शकतो. सात्त्विक मनुष्य त्याचा योग्य वापर करण्याचे ठरवतो. ही शक्ती इतर शक्तीमध्ये परावर्तित होऊ शकते का याचा विचार झाला. ती कशी परावर्तित केली जाऊ शकते यावर संशोधन झाले. यातूनच मग पवनउर्जेचा शोध लागला. ही वाऱ्याची शक्ती पवनचक्कीच्या माध्यमातून साठविण्यात आली. यातून विजेची निर्मिती झाली. वादळी पावसाने अचानक पूर येतो. ओढे, नाले तुडुंब भरून वाहतात. या पाण्याचा वेग प्रचंड असतो. पाण्याच्या शक्तीची अनुभूती संशोधकांना झाली. यातून पाण्यापासून विजेची निर्मिती झाली.
 
दोन म्हशी भांडत होत्या. त्यांची झुंज लागली होती. दोन कुत्रीही समोर आल्यानंतर एकमेकावर गुरगुरतात. एकमेकांची ताकद दाखविण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. हा ताकद दाखविण्याचा प्रकार मैत्रिपूर्ण, खेळीमेळीतील असेल तर गोष्ट वेगळी आहे. कुस्तीच्या स्पर्धेत अशी खिलाडूवृत्ती असते. पण हे भांडण खरोखरच असेल तर यात दोघांचेही नुकसान होणार. युद्धात विजय कोणाचाच होत नाही. जो विजयी होतो त्याचेही मोठे नुकसान झालेले असते.
 
झुंज करण्यासाठी ताकद निर्माण करावी लागते. पैलवान जोर, बैठका करून ताकद उभी करतो. ग्रामीण भागात अनेकांना अशी ताकद निर्माण करण्याचा छंद असतो. बलदंड शरीर करणारेही अनेकजण आहेत. त्यांनी ही ताकद भांडणात घालविली तर ती व्यर्थ जाते. पण हीच ताकद त्यांनी चांगल्या कर्मासाठी वापरली तर निश्‍चितच फायदा होतो. शेतकऱ्यांनी ही ताकद शेतीसाठी वापरली तर फायदाच फायदा होतो.

या ताकदीतूनच अनेक शोध लागले. बैलांच्या साहाय्याने होणारी नांगरट आता टॅक्‍टरच्या साहाय्याने केली जात आहे. आता अनेक यंत्रे आली आहे. विविध शक्तीची अवजारे तयार केली जात आहेत. आवश्‍यकतेनुसार त्याचा वापर शेतीमध्ये केला जात आहे. पंजाब व उत्तरेतील राज्ये यात आघाडीवर आहेत. त्यांनी यांत्रिकीकरण करून शेतीचे उत्पादन वाढविले आहे.
 
तरुण शेतकऱ्यांच्यातील ही ऊर्जा योग्य कर्मासाठी वापरली जावी. शक्तीचा वापर योग्य ठिकाणी व्हायला हवा. हा आग्रह शेतकऱ्यांनी ठेवून शेतीत प्रगती साधायला हवी. आत्तापर्यंत अशाच सात्विक विचारांनी प्रगती आहे. हा संशोधक बाणा शेतकऱ्यांच्या अंगी हवा.

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    
 

No comments:

Post a Comment