Monday, July 20, 2020

जे जे भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत । ( एकतरी ओवी अनुभवावी)

 
जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठीण अशी सुद्धा म्हण प्रचलित आहे. जो पडतो तो सुधारतो. ज्याला अधिक त्रास दिला जातो. तोच स्वतःची प्रगती करतो.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
जे जे भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत ।
हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ।। 118 ।। अध्याय 10 वा
ओवीचा अर्थ - जो जो प्राणी दिसेल, तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावे. हा माझा भक्तियोग आहे, असे निश्चित समज.
सकारात्मक विचार करा, जीवनात काही चांगले घडो वा काही वाईट घडो. आपला पाहण्याचा दृष्टिकोन मात्र त्याकडे सकारात्मक असायला हवा. नकारात्मक विचाराने आपल्या मनाला कमजोरी येते. आपण अस्वस्थ होऊन जातो. एखादे वाईट घडले तरी ते भगवंताच्या इच्छेने घडले असे म्हणून त्याकडे एक आव्हान म्हणून जगायला शिकले पाहीजे. असे केल्यास आपण आपली प्रगती निश्चित करू शकू. कितीही वाईट घटना घडली तरी त्याच्यापासून आपले मन विचलित होता कामा नये. आपण आपल्या मनाला तशी सवय लावून घ्यायला हवी. यातूनच आपण आपला विकास निश्चित करू शकू. जीवनात जास्तीत जास्त वाईट घटनाच घडत असतात. चांगले फारच कमी घडते. म्हणून आपण वाईट घटनांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्यावर मात करायची असते.
निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हटले जाते. कारण खरी प्रगती टीका करणाऱ्यांच्यामुळे होत असते. देशामध्ये सबळ विरोधी पक्ष असेल तर सत्ताधारी पक्षाबरोबरच देशाची प्रगतीही सहज होत जाते. टीका करणाऱ्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. टीका करणाऱ्यांना टीका करण्याची सवयच असते. त्यांच्या तोंडाशी लागून, भांडून उत्तर न देता स्वतःमध्ये तशी सुधारणा करून टीकेला उत्तर द्यावे.
जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठीण अशी सुद्धा म्हण प्रचलित आहे. जो पडतो तो सुधारतो. ज्याला अधिक त्रास दिला जातो. तोच स्वतःची प्रगती करतो. मुलांना सर्व काही सुविधा उपलब्ध असतील तर तो प्रगती करेलच असे नाही. पण कठीण परिस्थितीतून अभ्यास करून मोठे झालेल्यांचीच अधिक उदाहरणे आपणास पाहायला मिळतील.  कठीण प्रसंगाला तोंड देण्याची त्याची तयारी असते. तोच खरा यशस्वी होतो. हे सामर्थ कठीण प्रसंगांना हसत हसत सामोरे जाणाऱ्यांमध्येच असते.
जीवनात अनेक व्यक्ती भेटतात. प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. पण तिच्यात आपण भगवंत पाहीला पाहीजे. जे जे प्राणी भेटतील, जी जी भुते भेटतील, ती सर्व भगवंताची रुपे आहेत असे माणून त्याच्याशी व्यवहार करायला शिकले पाहीजे. त्यांच्या दुष्ट रुपाला न घाबरता. ते देवाचेच रुप आहे असे समजून त्यास सामोरे जाल तर प्रगती निश्चितच कराल. यासाठीच सकारात्मक विचारांनी यावर सहज मात करता येते. हाच भक्तियोग आहे  असे समजायला हवे.
प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी परमात्मा आहे. तो आपल्यामध्येही आहे. देवामध्येही तोच आहे. हे जाणून व्यवहार करायला शिकायला हवे. म्हणजे आपले मन कधीच कमजोर होणार नाही. त्याच्यातील आत्मभाव ओळखून आपण आपला कार्यभाग साधायला हवा. वेळ वाईट आली तरी विचार वाईट होऊ देऊ नये. विचारात चांगूलपणा ठेवून सकारात्मक विचारांनी त्याकडे पाहायला हवे. आलेला प्रसंग हा झेलायला शिकले पाहीजे. तशी मनाची तयारी करायला हवी. तसा मनाचा समतोल राखायला हवा. साधनेसाठी हा समतोलपणा गरजेचा आहे. तरच आपण आध्यात्मिक प्रगती सहज साध्य करू शकू. साधनेत सकारात्मक विचारांनी प्रगती होते हे विचारात घेऊन साधनेत मन गुंतवायला हवे.


No comments:

Post a Comment