Friday, July 17, 2020

प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे । पिके तरी बाहो नुबगिजे । पिकाशी निवाडु देखिजे । अधिकाधिक ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

 
वेगवेगळ्या फवारण्या करून तणांचा बंदोबस्त केला जात आहे. प्रयत्न वेगळे असले तरी तत्त्वज्ञान मात्र तेच आहे. फक्त काही पद्धतीबदल झाला आहे. अध्यात्मातही तसेच आहे. अध्यात्मिक विकासामध्ये येणारे अडथळे हे दूर हटवावे लागतील.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे 8999732685

प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे । पिके तरी बाहो नुबगिजे ।
पिकाशी निवाडु देखिजे । अधिकाधिक ।। 55 ।। अध्याय 10 वा

ओवीचा अर्थ - प्रत्येक वर्षाला शेताची पेरणी करावी आणि जर तें पिकले तर त्याची मशागत करण्याचा कंटाळा करू नये, कारण त्यामुळे पिकाची निष्पत्ती अधिकाधिक झालेली दिसते.

सध्या पावसाळा सुरु आहे. खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. पिक तरारून उगवलेही आहे. पाऊस समाधानकारक आहे. चिंता कशाची नाही. पण उत्पन्नवाढीसाठी योग्य ती पिकाची निगा राखण्याची गरज असते. बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली.  त्याकाळात भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. शेतीवरच सर्व अवलंबून होते. सर्व जनता शेतीशी संबंधित होती. त्यामुळे शेतीतील उदाहरणे देऊन एखादे तत्त्वज्ञान सांगितले तर ते जनतेला पटकण समजेल लोकांना ती ग्रहण करणे आत्मसात करणे सहज शक्य होईल. हे ओळखून संत ज्ञानेश्वरांनी शेतीतील अनेक उदाहरणातून अध्यात्म समजावून सांगितले. यातून शेतीचे प्रबोधनही झाले.

नुसती पेरणी करायची आणि थेट कापणीला जायचे. अशी शेती कधी केली जात नाही. पेरणीनंतर आलेले पिक चांगले वाढावे यासाठी प्रयत्न करावे लागतात. मेहनत घ्यावी लागते. योग्य काळजी घ्यावी लागते. पिकाच्या वाढीस अडथळा ठरणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला हटवावी लागते. तरच ते पिक जोमात वाढते. यासाठी पिकाची अंतरमशागतही तितकीच महत्त्वाची आहे. पिकात वाढलेल्या तणांचा बंदोबस्त करण्याची गरज असते. तरच पिकाची जोमदार वाढ होऊन उत्पन्न वाढीस मदत होते. उत्पन्न वाढीचा विचार त्या काळातही केला जात होता.

सध्या बदलत्या काळानुसार शेतीमध्ये बदल करण्यात आले आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे उत्पन्न वाढीसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्याबरोबरच शेतीमध्ये सध्या काम करणाऱ्या मजूरांची कमतरता भासत आहे. साहजिकच यावर यांत्रिकीकरणाचे उपाय योजले जात आहेत. वेगवेगळ्या फवारण्या करून तणांचा बंदोबस्त केला जात आहे. प्रयत्न वेगळे असले तरी तत्त्वज्ञान मात्र तेच आहे. फक्त काही पद्धतीबदल झाला आहे. अध्यात्मातही तसेच आहे. अध्यात्मिक विकासामध्ये येणारे अडथळे हे दूर हटवावे लागतील. तणांचा जसा बंदोबस्त करावा लागतो. तसा साधनेस अडथळा ठरणाऱ्या विचारांचाही बंदोबस्त करावा लागतो. राग, लोभ, मत्सर, अहंकार आदी दोष दूर करून आध्यात्मिक प्रगती साधायची असते. सदगुरु फक्त मंत्रबीज देतात. त्याची पेरणी देहामध्ये आपण करून त्या मंत्राची वाढ योग्य प्रकारे कशी होईल याचा प्रयत्न करावा लागतो. तणांचा बंदोबस्त कसा केला तसा दुष्टविचार, अहंकारी आदी दोषयुक्त तणे काढल्याशिवाय या मंत्रबीजाची वाढ जोमाने होणार नाही. तो मंत्र भरघोस उत्पन्न द्यावा यासाठी त्या मंत्रांच्या वाढीतील अडथळे दूर करायला हवेत. तरच आपणास अपेक्षित आत्मज्ञानाचे फळ प्राप्त होईल.   
  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

आपणाला आम्ही केलेले निरुपण आवडत असेल तर नियमित वाचण्यासाठी डेलिहंटवर `इये मराठीचिये नगरी` ला फाॅलो करायला विसरू नये. 
 
श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे  
 





No comments:

Post a Comment