Monday, July 13, 2020

आतुरता: कोरोना लसीची


एकमेव सजीव ग्रह असलेल्या पृथ्वीवर कोरोना विषाणूच्या रूपाने एक अभूतपूर्व संकट ओढवलेले आहे, आपण एकटेच या सजीव ग्रहाचा मालक आहोत अशा अहिर्भावात असलेल्या संपूर्ण मानवजातीला एक न दिसणारा घटक कसे जग बदलू शकतो याची प्रचिती कोरोना विषाणूने करून दिली आहे, यावरून मानवाने पृथ्वीवरील प्रत्येक प्रजातीचा योग्य सन्मान राखण्याचा बोध घ्यावा असे मला वाटते.
डॉ निलेश पवार मोबाईल 9860282394
 
या जागतिक महामारीला तोंड देण्यासाठी सर्व देश आपपल्या परीने प्रयत्न करत आहेत. लॉकडॉउन किंवा इतर तत्सम उपाय वापरून कोरोना विषाणू काही काळासाठी नियंत्रित करत आहेत, पण कायमस्वरूपी लस कधी येणार आणि सर्वकाही पूर्ववत कधी होणार याची आतुरता कायम आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु होऊन सात महिने होऊन गेलेत तरी जग अजून या विषाणू पासून नवनवीन धडेच घेत आहे, रोज नवनवी लक्षणे किंवा इतर तत्सम नवीन माहिती मिळत आहे.
 
आपणास कल्पना आहे की, या जीवसृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पतींना प्रामुख्याने बुरशी, जिवाणू आणि विषाणू याच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतो, मानवामध्ये बुरशी आणि जिवाणूपासून होणारे रोग प्रतिजैवीकांचा वापर करून बरे होऊ शकतात, मात्र सर्वाना भीती वाटते ती विषाणूजन्य रोगांची कारण यावर प्रतिजैविकांचा फारसा फरक पडत नाही, यावर एकमेव उपाय म्हणजे लस. अस्तित्वात असलेल्या बऱ्याच विषाणू जन्य रोगांवर लसी उपलब्ध आहेत, मात्र कोरोना विषाणूचे कुळ जरी जुने असले तरी या कुळातील कोव्हीड-१९ हा विषाणू नवीन असल्याने या वर अजून लस विकसित झालेली नाही. एखाद्या नवीन प्रादुर्भाव झालेल्या विषाणूवर लस तयार करायचे असेल तर त्या साठी विशिष्ठ कालावधी लागतो आणि ते काम जगभर सर्वत्र सुरु झाले आहे.

सद्यस्थितीत जगामध्ये १५५ हुन अधिक ठिकाणी कोरोना लसीवर संशोधन सुरु आहे, अभिमानाची बाब म्हणजे त्यामध्ये भारतातील झायड्स कॅडीला आणि भारत बायोटेक यांचा समावेश आहे, पुण्यातील सिरम सारखी संस्थाही ऑक्सफर्ड बरोबर भागीदार म्हणून काम करत आहे ही भारतीयांच्या दृष्टीने गौरवास्पद बाब आहे.
 
या मधील बऱ्याच ठिकाणी लस तयार करण्याच्या प्रचलित पद्धतीना अनुसरून काम चालू आहे, ज्यामध्ये इनऍक्टिवेटेड, एटीनुआटेड, कॉन्जुगेट, सब युनिट आणि टॉक्सओईड सारख्या काही मुख्य पद्धती असलेल्या बघायला मिळतात, इनऍक्टिवेटेड मध्ये विषाणू मारला जातो तर एटीनुआटेडमध्ये त्याची रोग निर्माण करण्याची शक्ती कमी केली जाते. सर्व लसींचे एकच मूलभूत तत्व असते ते म्हणजे निरोगी माणसाच्या शरीरात प्रतिपिंडे (अँटी बॉडी ) तयार करणे आणि ज्यावेळी तो विषाणू शरीरात प्रवेश करेल त्यावेळी त्याला निकामी करणे.
 
उपरोक्त प्रचलित पद्धतीव्यतिरिक्त अलीकडच्या काळात जनुकीय पद्धत एक अपारंपरिक पद्धत म्हणून विकसित झाली आहे, की ज्यामध्ये विषाणूचे अनुवांशिक केलेले बदल लस म्हणून वापरले जातात. ही एक तुलनेने नवीन प्रक्रिया आहे जी वैज्ञानिक म्हणतात की पारंपारिक लसी पेक्षा अधिक सुरक्षित असू शकते. संशोधकांचे म्हणणे आहे की जनुके (डीएनए आणि आरएनए) आधारित, लस तयार करणे पारंपारिक लसीपेक्षा वेगवान आणि स्वस्त आहे. कारण पारंपारिक लस तयार करताना बहुधा "कमकुवत" किंवा "ठार झालेल्या" विषाणूच्या आवृत्त्या वापरतात, ज्यामध्ये प्रयोगशाळांना मोठ्या प्रमाणात विषाणू आणि प्रोटीन तयार करावे लागतात, या साठी खूप खर्च येतो आणि जास्त वेळ लागतो. सध्या १५५ संस्था पैकी सुमारे 34 संस्था आरएनए आणि डीएनए लस वरती काम करत आहेत.

कोणतीही लस लोकांच्या पर्यंत यायच्या अगोदर सुरुवातीला उंदीर किंवा माकड या सारख्या प्राण्यांच्यावर त्याचा वापर करून परीक्षण केले जाते ज्याला प्रिक्लिनिकल ट्रायल म्हणतात, तदनंतर दुसऱ्या टप्प्यात लसीची सुरक्षितता व त्याचे प्रमाण किती असावे याचे परीक्षण करण्यासाठी ठराविक लोंकाच्यावर याचे प्रयोग केले जातात याला फेज - १ म्हणतात, तिसरा टप्पा म्हणजे फेज - २ ज्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना हि लस दिली जाते आणि त्याचे परीक्षण केले जाते, फेज - ३ मध्ये लसीची कार्यक्षमता तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणांच्या लोकांवर याचे परीक्षण केले जाते. संपूर्ण परिक्षणामध्ये अगदी विषाणू निकामी होत असेल पण त्या लसीचा मेंदू, हृदय, यकृत, फुफुस, किडनी सारख्या अवयवावर काय दुष्परिणाम होतोय का हे ही पहिले जाते, हे सर्व टप्पे यशस्वी पार पडले नंतर त्या लसीला त्या त्या देशातील नियामक संस्थे मार्फत मान्यता दिली जाते. मान्यते नंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि वितरण या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. या साठी साधारण दीड वर्षाच्या वर एकूण कालावधी लागू शकतो.

आपण जर सद्य स्थितीतील लस तयार करणाऱ्या प्रक्रियेचा आढावा घेतला तर जगभरात १५५ च्या वर संस्था या वर काम करत आहेत, त्यापैकी १३५ दावेदार अजून प्रीक्लीनिकल (प्राण्यांच्यावर परीक्षण) टप्प्यामध्ये आहेत, १४ दावेदार फेज १ (सुरक्षितता आणि प्रमाण) मध्ये आहेत, ११ जण फेज २ मध्ये आहेत आणि फेज ३ मध्ये ४ प्रमुख दावेदार उतरले आहेत यामध्ये १) एस्ट्रा - झेनेका, ऑक्सफर्ड (इंग्लंड) आणि सिरम इंडिया २) सायनो फार्म चीन ३) सायनो व्हॅक बायोटेक चीन ४) बी सी जी लस तयार करणारी ऑष्ट्रेलिया मधील मुरडोक संस्था यांचा समावेश आहे.
भारतात झायड्स कॅडीला आणि भारत बायोटेक यांना आत्ता फेज-१ परिक्षणासाठी मान्यता मिळाली आहे.

एकंदरीत हा लसीचा आढावा घेतला तर नक्की कोणत्या महिन्यात लस येईल आणि ती सर्वांसाठी कधी उपलब्ध होईल हे सांगणे कठीण आहे, पण पुढच्या वर्षी सुरुवातीला एखादी लस उपलब्ध होईल हा आशेचा किरण कायम आहे. गेल्या महिन्यात चीन च्या कॅन सिनो बायोलॉजिक्स या कम्पनीला काही प्रमाणात लस वापरायला परवानगी मिळाली आहे पण त्याचे अजून सार्वत्रीकरण झालेले नाही.

खरतर परिसंस्थेमध्ये एखाद्या प्रजातीची संख्या जास्त झाली तर निसर्ग स्वतःच त्याचे नियमन करत असतो, परंतु कोरोनाच्या बाबतीत अजून तरी निसर्गाने मनावर घेतलेले दिसत नाही. आपण फक्त हे ही दिवस जातील एवढीच अपेक्षा व्यक्त करू शकतो.

शेवटी रुग्णांची संख्या वाढतच आहे,सद्यस्थितीत आहार आणि व्यायामाच्या माध्यमातून रोग प्रतिकार शक्ती संतुलित ठेवणे एवढंच आपल्या हाती आहे, लवकरात लवकर लस उपलब्ध होऊन सर्वकाही पूर्ववत व्हावे ही आपणा सर्वांचीच इच्छा आहे. तोपर्यंत आपण सर्व मिळून शासनाच्या नियमांचे पालन करुया.

डॉ. निलेश पवार
न्यू कॉलेज, कोल्हापूर

No comments:

Post a Comment