Friday, January 4, 2019

नियम



तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें ।
दुरी केंही न वचावें । तीर्थांसी गा ।।

ओवीचा अर्थ - तुम्हाला आणखी व्रतें व नियम करण्याची जरूरी नाही. शरीराला पीडा देण्याची जरूरी नाही व दूर कोठे तीर्थाला जाण्याचें कारण नाही.

एक मंदीर होते. सुंदर होते. परिसर निसर्गरम्य होता. पण या मंदीरात फारसे कोणी जाता येताना दिसत नव्हते. मला मंदीर आवडले म्हणून मी तेथे नेहमी जाऊ लागलो. साधना करायचो. पण इतका चांगला परिसर असूनही येथे कोणीच का येत नाही? हा प्रश्‍न मात्र मला नेहमीच विचलीत करायचा. लोकांच्या आवडी निवडी बदलल्या आहेत का? की लोकांना आजकाल अशा नयनरम्य परिसरातही जायला वेळ नाही? असे अनेक प्रश्‍न मला पडू लागले. उत्तर मात्र सापडत नव्हते. मी मंदीरात नेहमीप्रमाणे साधनेला बसलो होतो. अचानक माझा मोबाईल वाजला. त्यावेळी मंदीरात माझ्या व्यतिरिक्त एक-दोन व्यक्ति असतील. मी फोन वर बोलू लागलो. लगेच मंदीरातील पुजारी, मंदीरामध्ये इतर कामकाज पाहणाऱ्या व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी मला मोबाईल ताबडतोब बंद करण्यास सांगितला आणि माझ्याशी वाद घालण्यास सुरवात केली. तुम्हाला लिहीलेले वाचता येत नाही का? मंदीर आवारात मोबाईलवर बोलण्यास बंदी आहे. असे खडे बोल सुरू झाले. त्यांची उद्धट भाषा पाहून मलाही राहावले नाही. मीही बोलण्यास सुरवात केली. कारण त्या मंदीरात मी रोजच जात होतो. ध्यान मंदीराची जागा स्वतंत्र आहे. तेथे मोबाईलवर बोलू नये हे मलाही समजते. पण मंदीरात बोलले तर काहीच फरक पडत नाहीत. तसे मंदीरात कोणी नव्हतेही? अशावेळी माझ्या बोलण्याचा कोणाला त्रास होणार हेच मला समजत नव्हते. मी रोज मंदीरात साधनेला बसतो तेव्हा तेथील पुजारी येणाऱ्या भक्तांशी गप्पा मारत बसतात. याचा त्रास रोजच होत होता. पण ते चालते. माझे बोलणे चालत नाही. यानंतर मी लगेच तेथून उठलो, बाहेर आलो. माझ्याशी देव बोलला. गावाच्या भर वस्तीत असणाऱ्या या निसर्गरम्य मंदीरात कोणीच का येत नाही? हाच तुझा प्रश्‍न होता ना? मिळाले का उत्तर. नुसता निसर्गरम्य परिसर असून चालत नाही. तेथील वातावरणही रम्य असावे लागते. यासाठी त्या मंदीरात काम करणाऱ्या व्यक्ती, पुजारी हेही तसेच सुभाषिक असायला हवेत. तरच तेथे लोक रमतात. अन्यथा सर्व सुविधा असूनही कोणीच तेथे फिरकत नाही. कारण प्रत्येकाला मनशांती हवी असते. यासाठी प्रत्येकजण तेथे येत असतो. असा फुकटचा वाद घालायला कोणी येत नाही? नियम असावेत पण त्याची अमंलबजावणी योग्यवेळी, योग्यप्रकारे व्हायला हवी. मोबाईल बोलण्यास बंदी आहे तेव्हा मंदीरातील पुजाऱ्याला गप्पा मारत बसण्यास बंदी का नाही? यासाठीच नियम कोणते असावेत यावरही सर्व अवलंबून आहे. याचाही विचार व्हायला नको का? निसर्गरम्य परिसर मनाला मोहित करतो, पण तेथे प्रेम नसेल तर तेथे देव नांदत नाही. मग तेथे भक्तही राहात नाहीत. यामुळेच तेथे कोणी जात नाही. देव कोठे आहे देव कशात आहे हे जाणून घ्यावे. देव स्वतः मध्येच आहे. प्रत्येकामध्ये देव आहे. प्रथम हा देव जाणून घ्यायला हवा. हाच स्वधर्म आहे. याचे पालन केल्यानंतर इतर कोणतेही नियम, व्रते करण्याची गरज नाही. तीर्थेही फिरण्याची गरज नाही. शरीराला पीडा होईल अशी साधनाही करण्याची गरज नाही. हाच स्वधर्म ओळखून त्याचे आचरण करावे. हाच नियम आहे.


No comments:

Post a Comment