Wednesday, January 16, 2019

अंतर्ज्ञानी



सद्‌गुरू हे अंतर्ज्ञानी असतात. त्यांना भक्त कोणते प्रश्‍न घेऊन आला आहे. त्याच्या समस्या काय आहेत. या सर्वांचे ज्ञान असते. असे सद्‌गुरूच भक्तांना योग्य मार्ग देऊ शकतात
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ९०११०८७४०६

म्यां जें कांही विवरूनि पुसांवें । तें आधींचि कळिलें देवें ।
तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करुनि ।।

ओवीचा अर्थ - मी जें कांही विचार करून तुम्हांस विचारावें तें देवा आपण आधीच जाणलें तरी आपण जें बोलला तेंच स्पष्ट करून सांगा.

सद्‌गुरूंना अनेक भक्त व्यक्तिगत प्रश्‍न विचारतात. एका भक्ताने सद्‌गुरूंना प्रश्‍न विचारण्यासाठी वेळ मागून घेतली. त्या भक्ताने सद्‌गुरूंना वाकून नमस्कार केला आणि प्रश्‍न विचारण्यासाठी उठला. तेवढ्यात सद्‌गुरू त्याला म्हणाले, 'अरे काय पत्रिका घेऊन आला आहेस? पण मी काय पत्रिका पाहून भविष्य सांगणारा ज्योतिषी नाही. बरं काय लिहिले आहे पत्रिकेत? तुझा जन्म अमुक अमुक..' असे सांगून सद्‌गुरूंनी त्याला त्याची पत्रिका न पाहताच सांगितली. भक्त आश्‍चर्यचकित झाला. अरे ही पत्रिका माझ्या खिशात आहे. त्यातील अक्षर आणि अक्षर या सद्‌गुरूंना माहिती आहे. हे कसे शक्‍य आहे. मुळात मी पत्रिका घेऊन आलो आहे, हे सद्‌गुरूंना कसे माहीत? असे अनेक प्रश्‍न त्या भक्ताच्या मनात घोंघाळू लागले. सद्‌गुरू हे अंतर्ज्ञानी असतात. त्यांना भक्त कोणते प्रश्‍न घेऊन आला आहे. त्याच्या समस्या काय आहेत. या सर्वांचे ज्ञान असते. असे सद्‌गुरूच भक्तांना योग्य मार्ग देऊ शकतात. एकदा एका भक्ताचे घड्याळ चोरीला गेले होते. तो भक्त सद्‌गुरूंच्या जवळ आला आणि त्याने चोराचा पत्ता विचारला. आश्‍चर्य म्हणजे सद्‌गुरूंनी त्या चोराच्या ओळखीच्या खुणा सांगितल्या. त्याने चोरी कशी केली तेही सांगितले. तसेच त्याने चोरी करून ते घड्याळ कोठे लपवून ठेवले आहे. याचीही माहिती सद्‌गुरूंनी दिली. सद्‌गुरू हे सर्व सांगू शकतात. अंतर्ज्ञानाचा उपयोग ते समाजासाठी करू इच्छितात. समाजातील दुष्ट दूर व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. यासाठी येणाऱ्या भक्तांना ते सन्मार्गाला लावतात. त्यांच्यामध्ये अध्यात्माची आवड ते निर्माण करतात. भक्ताला सुद्धा त्यांच्याप्रमाणे आत्मज्ञानी, आंतरज्ञानी करण्याकडे त्यांचा ओढा असतो. यासाठी भक्ताच्या समस्या जाणून त्याची प्रगती करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. यासाठी वेगवेगळे अनुभव ते भक्तांना देतात. विविध प्रकारे ते भक्तांना मदत करतात. त्याच्या कार्यात त्यांचा मोठा हातभार असतो. भक्ताच्या विजयी रथाचे सारथी ते स्वतः असतात. दुष्ट विचाराने आलेल्या भक्ताला ते सन्मार्ग शिकवतात. त्याच्यातील खल, दुष्टपणा ते काढून टाकण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. गुंडवृत्तीचे लोक अनेकदा सद्‌गुरूंच्या दर्शनास येतात. सद्‌गुरू मात्र त्यांच्यातील ही दुष्टप्रवृत्ती घालविण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच वाल्याचा वाल्मिकी झाला. अंतर्ज्ञानी सद्‌गुरू समाज हितासाठी त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग करतात. म्हणूनच ते समाजात संत, महात्मे म्हणून ओळखले जातात.


No comments:

Post a Comment