Friday, January 25, 2019

अभ्यास






ज्ञानेश्‍वरीच्या ओव्या पाठ असतात. त्याचे अर्थ पाठ असतात. पण त्यावर विचार केला नाही तर ज्ञान प्राप्ती कशी होणार? आत्मज्ञान प्राप्तीसाठी ओव्या पाठ असण्याची गरज नाही. त्याचे अर्थही पाठ असून नुसते उपयोग नाही. तर ती ओवी तुमच्याशी बोलायला हवी. ती ओवी अनुभवायला हवी. त्यांची प्रचिती यायला हवी. अनुभवातूनच ज्ञान प्राप्ती होते.


इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरवसेंनि ब्रह्मत्वा येती ।
हे सांगतियाचि रीती । कळलें मज ।। 330।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - दृढनिश्‍चयाने जे अभ्यास करतात, ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात. हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजले.

एखादे लक्ष्य साध्य करायचे असेल, तर त्याचा अभ्यास हा करायला हवा. नुसती घोकमपट्टी, पाठांतर म्हणजे अभ्यास नव्हे. अभ्यास म्हणजे त्या गोष्टीचा सर्वांगाने केलेला विचार आहे. परीक्षेत विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर पाठ करून दिले. पैकीच्या पैकी मार्क मिळाले. पण तो विषय समजला नसेल तर त्यात काहीच अर्थ नाही. परीक्षेत मार्क जरूर मिळवावेत पण तो विषय सर्वार्थाने समजावून घेतलेला असावा. त्या विषयाच्या सर्व बाजू, त्याचे सर्व पैलू अभ्यासले जावेत. उदाहरण सांगायचे तर रासायनिक समिकरणांची पाठ करून उत्तरे बरोबर देता येतात. एच अधिक ओटू बरोबर एचओटू म्हणजे पाणी हे सांगता येते. पण ही रासायनिक प्रक्रिया नेमकी कशी झाली, ती कशी घडते, याचा सखोल विचार करायला हवा. तसे प्रश्‍न पडायला हवेत. मनाला अशा प्रश्‍नांची सवय लावायला हवी. प्रश्‍न पडू लागले की उत्तरे शोधण्याची सवय आपोआपच लागते. यासाठी अभ्यास करताना त्या विषया संदर्भात प्रश्‍न, शंका मनात उपस्थित व्हायला हव्यात. ते प्रश्‍न सोडविण्यासाठी मन पेटून उठायला हवे. प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यामध्ये मन रमायला हवे. या सवयीमुळे परीक्षेत दिलेले प्रश्‍न सहज सोडविता येतात. त्याची भीती मनात राहात नाही. मनमोकळेपणे उत्तरे देता येतात. पाठांतराने प्रश्‍नाचे उत्तर अचूक लिहिले जाते खरे पण त्यावर विचार होत नाही. लहानपणी पाठांतराने चांगले मार्क मिळतात. पण विचार करण्याची कुवत त्यामध्ये उत्पन्न होत नाही. उच्चशिक्षण घेताना मग याचा तोटा होतो. वैचारिक पातळीतील कमकुवतपणा असल्याने तेथे आपण मागे पडतो. विचार करण्याची क्षमताच नसल्याने उत्तरे देता येत नाहीत. उत्तरेच सापडत नाहीत. यासाठी लहानपणापासून केवळ पाठांतर नको तर तो विषय सर्वांगाने समजून घेण्याची सवय लावायला हवी. अध्यात्मातही असेच आहे. ज्ञानेश्‍वरीच्या ओव्या पाठ असतात. त्याचे अर्थ पाठ असतात. पण त्यावर विचार केला नाही तर ज्ञान प्राप्ती कशी होणार? आत्मज्ञान प्राप्तीसाठी ओव्या पाठ असण्याची गरज नाही. त्याचे अर्थही पाठ असून नुसते उपयोग नाही. तर ती ओवी तुमच्याशी बोलायला हवी. ती ओवी अनुभवायला हवी. त्यांची प्रचिती यायला हवी. अनुभवातूनच ज्ञान प्राप्ती होते. यासाठी ध्यान, साधना करायला हवी. तरच ज्ञानाची अनुभूती येईल. यासाठीच याचा अभ्यास करायला हवा. त्यावर सर्वांगाने विचार करायला हवा. पाठांतर म्हणजे अभ्यास नव्हे. तो विषय समजून घेऊन ज्ञान संपादन करायला हवे.

No comments:

Post a Comment