Sunday, January 20, 2019

समाधी



संत समाधी अवस्थेतही भक्तांना अनुभव देत राहतात. भक्तांना मार्गदर्शन करत राहतात. म्हणूनच त्यांची समाधी ही संजीवन समाधी आहे असे संबोधले जाते. आपल्या भक्तांनाही अशी अवस्था प्राप्त व्हावी यासाठीच त्यांचे निरंतर प्रयत्न सुरू असतात. 

- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406

जेथ पुढील पैस पारुखे । मागील स्मरावें तें ठाके ।
ऐसिये सरिसीये भूमिके । समाधि राहे ।। 60।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ती बंद पडून मागील कशाचेंही स्मरण होत नाही, अशा या ऐक्‍याच्या भूमिकेवर समाधी राहातें.

समाधी ही एक अवस्था आहे. या अवस्थेत साधक अनाहताचा नाद सहज ऐकू येतो. यात तो गर्क झालेला असतो. या अवस्थेत पाठीमागच्या तसेच पुढच्या सर्व गोष्टींचे विस्मरण त्याला झालेले असते. अशी अवस्था ध्यानाला बसल्यानंतर त्याला लगेच प्राप्त होते. यासाठी अभ्यास करावा लागतो. साधनेने हे सहज शक्‍य होते. मग सद्‌गुरूच्या कृपेने अशा अवस्थेत साधकाला आत्मज्ञान प्राप्ती होते. योगाभ्यासाची अंतिम अवस्था भाव. म्हणजे निर्बीज वा "निर्विकल्प समाधि' होय. तिचे प्राप्तव्य गुरूकृपेने शिष्याला सहज झालेले असते. गुरूंच्या कृपेनेच या सहज समाधी अवस्थेत संत असतात. ते चालत असले, बोलत असले, निवांत असले तरी ते या अवस्थेत निरंतर असतात. यामुळे त्यांच्या निर्वाणानंतरही ते या अवस्थेत असतात. यामुळेच ते भक्तांना अनुभव देत राहतात. यासाठीच निर्वाणानंतर संतांचे अंतिमसंस्कार जेथे केले, तेथे त्यांची स्मृती स्मारके उभी केली जातात. अशा या स्मारकांना समाधी म्हटले जाते. कारण संद्‌गुरूंचे समाधी अवस्थेतील वास्तव्य सदैव तेथे असते. त्यांच्या समाधी अवस्थेत ते तेथे नेहमी प्रकट असतात. अतिंमसंस्कार हे नदीकाठी केले जात असल्याने त्याठिकाणी अनेक संतांच्या अशा समाध्या पाहायला मिळतात. काही संतांच्या समाध्या ह्या नदी संगमावर आहेत. त्यांच्या या वास्तवाने ही स्थाने पवित्र झाली आहेत. ती क्षेत्रे आता तीर्थस्थाने झाली आहेत. संत समाधी अवस्थेतही भक्तांना अनुभव देत राहतात. भक्तांना मार्गदर्शन करत राहतात. म्हणूनच त्यांची समाधी ही संजीवन समाधी आहे असे संबोधले जाते. आपल्या भक्तांनाही अशी अवस्था प्राप्त व्हावी यासाठीच त्यांचे निरंतर प्रयत्न सुरू असतात. यासाठी ते भक्तांना अनुभव देत राहतात. अडचणीच्या काळात त्यांच्या स्मरणाने ते भक्तांच्या प्रश्‍नांना उत्तरे देतात. दूरदेशी असले तरीही त्यांचे मार्गदर्शन सुरू राहते. फक्त भक्तामध्ये तसा भाव असायला हवा. भक्तीची ओढ त्याला लागावी, त्याला समाधीवस्था प्राप्त व्हावी, यासाठी त्यांचे हे प्रयत्न असतात. देहात असूनही विदेही व विदेही असूनही देही, असा विलक्षण व अवर्णनीय अवस्थेत भक्तांचा जीवनक्रम गुरूकृपेने सुरू असतो. साखरेची गोडी जशी साखर खाल्यानंतर कळते. तसे समाधीची ही अवस्था अनुभवाविना वर्णन करणे अशक्‍यच आहे.

No comments:

Post a Comment