Sunday, January 13, 2019

विवेकाचे गाव




आत्मज्ञान प्राप्तीसाठी शरीराच्या गावात विवेक जागा करा. ऐक्‍य आपोआपच साधले जाईल. एकीने अनेक प्रश्‍न सुटतात. मनाचा ढळलेला तोल सावरता येतो. खचलेल्या मनाला उभारी मिळते. मनाला आधार वाटतो. साधनेत मनाचे ऐक्‍य साधले तर विकास निश्‍चित आहे.

- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406

ते विवेकाचे गाव । की परब्रह्मीचे स्वभाव ।
नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ।। 139 ।। अध्याय 5 वा

ओवीचा अर्थ - ते विवेकाचे मुळ वसतीस्थान आहेत. किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणू काय मूर्तिंमंत ब्रह्मविद्येचे सजविलेले अवयवच आहेत.

राज्यात निर्मल ग्राम, आदर्श गाव, इको व्हिलेज, पर्यावरण समृद्ध गाव आदी योजना राबविण्यात येतात. सर्व योजनात श्रमदानास महत्त्व दिले आहे. गावाच्या एकीतून विकास साधला जातो. एकीच्या बळाची ताकद त्यातून स्पष्ट होते. पण सर्वच गावांमध्ये हे शक्‍य होत नाही. प्रश्‍न गंभीर होऊ लागले की ऐक्‍य वाढते. भीती पोटी ऐक्‍य येते. अडीअडचणीच्या काळातच देवाचे स्मरण होते. इतरवेळी देव भेटला तरी दर्शन घेण्याची बुद्धी होत नाही. यामुळेच आज अनेक शहरातील जुनी मंदीरे ओस पडलेली पाहायला मिळतात. पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी गाव एकत्र येतो. पण गावात विवेक जागा असेल तरच प्रश्‍न सुटतो. अन्यथा हे प्रश्‍न वर्षानुवर्षे तसेच पडून राहतात. प्रश्‍नाचे स्वरूप गंभीर झाल्यानंतर मात्र माघारी शिवाय पर्याय नसतो. अहंकार बाजूला ठेवून प्रश्‍न सोडविण्यासाठी एकत्र यावेच लागते. विकासासाठी अहंकार, अहंपणा बाजूला ठेवावा लागतो. तंटे, वाद, राग, द्वेष यांचा त्याग करावा लागतो. तरच विकासाची वाट सुकर होते. अनेक गावांनी विकासासाठी हेच मुद्दे अवलंबले आणि श्रमदानातून विकास साधला. दारूबंदी, चराईबंदी, वृक्षतोड बंदी, लोटाबंदी, उघड्यावर शौच्छास बंदी असे अनेक उपक्रम राबवून गावात विवेक जागृत केला. अशा या योजनांमुळे गावाचे आरोग्य, स्वच्छता राखली गेली. जनजागृती करून पाणलोट विकासातून पाणी प्रश्‍न सोडविला. काही डोंगरकपारीतील गावांनी नैसर्गिक जलस्त्रोत्रांचे संवर्धन करून सायफनने थेट पाइपलाइनने पाणी आणून कायमचा प्रश्‍न मिटविला. ना वीज बिलाची झंजट ना पाणी बिलाचा तगादा. बारमाही पाण्याचा स्त्रोत गावाच्या वाड्यावस्त्यात आणून महिलांचे श्रम वाचवले. हे सर्व विवेकाने, ऐक्‍याने शक्‍य झाले. एकीमुळेच देशास स्वातंत्र्य मिळाले. आत्मज्ञाना प्राप्तीचा मार्ग सुद्धा असाच आहे. शरीराच्या गावात विवेक जागृत ठेवायला हवा. राग, द्वेष, मत्सर, अहंकार, अंहपणाचा त्याग करून विवेकाने विकास साधावा लागतो. गावात जशी स्वच्छता साधली जाते तशी मनाची स्वच्छता येथे होते. आरोग्यही सुधारते. विकासासाठी मनाचे ऐक्‍य गरजेचे आहे. साधनेत श्‍वासावर ऐक्‍य साधून विकास होतो. अध्यात्माच्या विकासाची हीच पायरी आहे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी शरीराच्या गावात विवेक जागा करा. ऐक्‍य आपोआपच साधले जाईल. एकीने अनेक प्रश्‍न सुटतात. मनाचा ढळलेला तोल सावरता येतो. खचलेल्या मनाला उभारी मिळते. मनाला आधार वाटतो. साधनेत मनाचे ऐक्‍य साधले तर विकास निश्‍चित आहे. ब्रह्मविद्येचा विकास तेथे निश्‍चित होईल.

No comments:

Post a Comment