Thursday, January 24, 2019

कृष्णार्जुनसंवादु



तो कृष्णार्जुनसंवादु। नागरीं बोली विशदु।
सांगोनि दाऊं प्रबंधु। वोवियेचा।। ।। अध्याय वा

ओवीचा अर्थ - ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो कृष्णार्जुनाचा संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर शब्दांनी स्पष्ट सांगून दाखवू.

गीता हा कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे. गुरू आणि शिष्य यांच्यात झालेला संवाद आहे. हा संवाद आपल्या आयुष्यातही मार्गदर्शन करणारा असा आहे. युद्ध न करण्याचा निर्णय अर्जुनाने रणभूमीवर घेतला. लढायची मानसिकता तो गमावून बसला. अशावेळी त्याला त्याचे कर्म, धर्म समजावून सांगण्याचे कर्तव्य श्रीकृष्णाने येथे केले. तसेच त्यांनी जीवनाचे सारच रणभूमीवर अर्जुनास सांगितले. युद्धापासून परावृत्त झालेल्या अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचे काम श्रीकृष्णाने केली. जीवनाच्या युद्ध भूमीवर आपलीही अशीच अवस्था बऱ्याचदा होत असते. आपणही असेच अनेकदा वैतागून जात असतो. अर्जुनाने जसे गांडीव खाली ठेवून नकारात्मक विचार सुरु केला. तसाच विचार आपणही जीवनात बऱ्याचदा करत असतो. अशा अवस्थेमुळे आपणास अनेकदा अपयशही पदरी पडते. पण अशा अवस्थेतून बाहेर पडून यशस्वी कसे व्हायचे, हा मार्ग आपणास गीता व ज्ञानेश्वरी वाचनातून निश्‍चितच मिळतो. यासाठीच गीता, ज्ञानेश्‍वरी ही आपणासाठी मार्गदर्शक आहे. जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर गीतेचा अभ्यास हा करायलाच हवा. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीका आहे. गीता संस्कृतमध्ये आहे, पण सर्वसामान्य माणसाला संस्कृत येतेच असे नाही. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य माणसाच्या उद्धारासाठी ती सोप्या भाषेत सांगितली. उदाहरण देऊन सांगितले की एखादी गोष्ट समजालया सोपी जाते. ती पटकन लक्षात राहते. म्हणून अनेक उदाहरणे देऊन संत ज्ञानेश्‍वरांनी गीतेचे सार पटवून सांगितले. हा कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे, हे वारंवार सांगण्यासही माऊली विसरली नाही. गुरु आणि शिष्य हे नाते कसे श्रेष्ठ आहे हे सांगताना कृष्णाने हे गुह्य आपल्या प्रिय राधेसही सांगितले नाही. केवळ आपला शिष्य अर्जुनाला हे गुह्य सांगितले. गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते किती श्रेष्ठ असते हे यावरून स्पष्ट होते. गुरू शिष्याला सर्व समस्यांतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करतो. पण त्याबरोबरच तो जीवनाचे मर्म सांगतो. शिष्याच्या मनातील शंका दूर करण्यासाठी, त्याच्या मनातील जळमटे दूर करण्यासाठी गुरूची धडपड असते. जीवनाचा खरा अर्थ सांगून त्याला ज्ञानी करणे व त्याला आपल्या पदांवर बसवणे हे गुरूचे मुख्य ध्येय असते. आपल्याप्रमाणे त्यालाही आत्मज्ञानी करणे हेच खऱ्या गुरुचे लक्षण आहे. यासाठी गुरू आणि शिष्यात वारंवार संवाद होणे गरजेचे असते. हा संवाद स्मरणातूनही होऊ शकतो. आपली योग्यता असेल तर स्मरणातही गुरू आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांची समाधी ही संजीवन आहे. ते समाधीस्थ अवस्थेतही खऱ्या शिष्याला मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाने शिष्याला धीर येतो. कृष्ण आणि अर्जुनातील हा संवाद श्री ज्ञानेश्‍वरांनी उघड करून जगासमोर मांडला आहे. हा संवाद सर्वांसाठी मार्गदर्शन आहे.

No comments:

Post a Comment