Tuesday, January 29, 2019

नामांतर


या नर देहाचा नारायण होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. नामामध्ये हे सामर्थ आहे. नामानेच हे नामांतर घडते. यासाठी सतत नामस्मरणात राहायला हवे.

तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।
जेविं दूधचि जाहलिया दहीं । नामरूप जाय ।। 170 ।। अध्याय 8 वा

ओवीचा अर्थ - तेथें त्या साम्यावस्थेंत सम (एकासारखे एक) विषम (एकाहून एक भिन्न) हे कांही दिसत नाही. म्हणून (त्या साम्यावस्थेस) भूतें असें म्हणतां येत नाहीं. ते कसे तर, ज्याप्रमाणे दूध हें दही झाल्यावर त्याचे दूध हे नांव व पातळपणाचें स्वरूप ही जातात.

शुन्य समही नाही, विषमही नाही. त्यामुळे त्याला भार नाही. सम अंक ऋण किंवा उणे असू शकतो. पण शुन्य दोन्हीही नाही. स्थिर आहे. मध्य आहे. अशी ही शुन्यावस्था आहे. येथे विचार थांबलेले असतात. अस्थिरता, चलबिचलता नसते. कमी-जास्तपणा नसतो. उच-निच भेद नसतो. ही अवस्था नेहमीपेक्षा वेगळी आहे. एकदा या अवस्थेला पोहोचल्यानंतर पुन्हा माघारी येणे नाही. दूध नाशवंत आहे. ते एकदोन दिवस उत्तम प्रकारे राहु शकते. त्यानंतर मात्र ते उत्तम राहील का? हे सांगता येत नाही. यासाठी ते वेगळ्याप्रकारात रुपांतरीत करणे गरजेचे असते. दुधाचे विरजण लावून त्यापासून दही केले जाते. दूधाचे दही झाले. अवस्था बदलली. तसे त्याचे नावही बदलले. आता दह्याला कोणी दुध म्हणेल का? उसाच्या रसापासून साखर तयार केल्यानंतर पुन्हा साखरेपासून ऊस तयार करता येत नाही. ही रासायनिक प्रक्रिया आहे. एखाद्या घटकाचे रुपांतरन दुसऱ्या घटकात झाल्यानंतर पुन्हा पहिल्या घटकात त्यांचे रुपांतर करता येत नाही. पहिलीची परिक्षा पास झाल्यानंतर दुसरीच्या वर्गात जाता येते. नापास झाला तर मात्र पहिलीच्या वर्गातच ठेवले जाते. पण एकदा दुसरी, तिसरी, चौथीत गेल्यानंतर पुन्हा कोणी पहिलीमध्ये बसवेल का? तसे होत नाही. कारण त्या सर्व इयत्ताचा अभ्यास त्याने योग्य प्रकारे पूर्ण केलेला असतो. म्हणूनच पुढच्या इयत्तात प्रवेश दिला जातो. तसेच अध्यात्माचे आहे. एक-एक इयत्ता पास व्हायचे असते. सद्‌गुरू परिक्षा घेत असतात. त्यातून पास होत राहायचे असते. गुरूच प्रश्‍न करतात, गुरूच उत्तर देतात. हळुहळु साधकामध्ये ते विकास घडवत असतात. नराचा नारायण ते करतात. मग एकदा ब्रह्मत्वाला पोहोचलेल्या व्यक्तीला सर्वसामान्य कोणी म्हणेल का? कारण त्या व्यक्तीची अवस्था बदललेली असते. त्याचा विकास झालेला असतो. तो त्या पदाला पोहाचलेला असतो. आता तेथून पुन्हा माघारी येता येत नाही. वाल्ह्याकोळीचा वाल्मिकी झाल्यानंतर आता त्यांना वाल्ह्याकोळी कोणी म्हणते का? उलट त्यांना वाल्मिकी ऋषी म्हटले जाते. योग्य तो मान-सन्मान दिला जातो. हे सर्व सद्‌गुरूंच्याकृपेने होते. यासाठी कृपा होणे गरजेचे आहे. कृपेने अवस्थेत बदल होतो. ते भक्ताला त्यांच्या अवस्थेत आणतात. अवस्था बदलल्यानंतर त्यांचे नामांतर हे होतेच. विशेष पदवी प्राप्त केल्यानंतर नावापुढे त्या पदवीचा उल्लेख होतो ना? डॉक्‍टरेट मिळाल्यानंतर डॉक्‍टर हे विशेषण नावापुढे जोडले जाते ना? यासाठी या नर देहाचा नारायण होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. नामामध्ये हे सामर्थ आहे. नामानेच हे नामांतर घडते. यासाठी सतत नामस्मरणात राहायला हवे.

No comments:

Post a Comment