शेळीपालनाने दिले रेंगडेंना बहुविध फायदे
कोल्हापूर जिल्ह्यात अडकूर (ता. चंदगड) येथील रेंगडे कुटुंबीयांनी शेतीला शेळीपालन व्यवसायाची जोड देऊन शेतीत स्थैर्य आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांच्या शेळीपालनातून अनेक गोष्टी शेतकऱ्यांना शिकण्यासारख्या आहेत. शेळ्यांचे संगोपन करून विक्री आणि लेंडीखताचा शेतीत वापर हे त्यांच्या व्यवसायाचे मुख्य सूत्र आहे.
राजेंद्र घोरपडे
प्रयोगशील कुटुंब
चंदगड तालुक्यात रेंगडे कुटुंबीय प्रयोगशील म्हणूनच ओळखले जाते. कुटुंबातील कृष्णा रेंगडे हे कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाचे शेतकरी आहेत. तालुक्यातील "आत्मा' समितीवरही आहेत. त्यांची वडिलोपार्जित सुमारे 50 एकर जमीन अडकूर येथे आहे. कृष्णा यांना चार मुले. दोन इंजिनिअर मुले व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतात. अनिल व सुनील ही जुळी मुले त्यांच्याजवळ असतात. सुनील यांचे शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनिल यांनी कोल्हापुरात पदवी घेतली. गेली सतरा वर्षे अडकूर येथे वडिलांसोबत ते शेती करतात. उसाव्यतिरिक्त आले, काजू, आंबा, आदी विविध पिके भागाने शेती लावून ते घेतात. पशुपालनाची अनिल यांना लहानपणापासूनच आवड आहे. शेळी हा प्राणी शेतकऱ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण करतो, यावर अनिल यांचा दृढविश्वास आहे. घरात पूर्वीपासूनच दोन गाई व शेळ्या पाळल्या जायच्या. मात्र त्यातून शेतीसाठीच्या शेणखताची गरज भागत नाही असे अनिल यांच्या लक्षात आले. जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादकता वाढवायची या हेतूने त्यांनी 2006 नंतर लेंडीखतासाठी घरातील शेळ्यांची संख्या वाढविण्याचा विचार त्यांनी केला. कोकण कन्याळ, उस्मानाबादी या जाती येथील वातावरणात तग धरू शकतात. घरातच पूर्वीपासून त्या पाळल्या जात होत्या. त्यांचीच पैदास करून हा व्यवसाय वाढविला जात आहे. या अनुषंगाने अनिल यांनी शेळीपालनाविषयक विविध पुस्तके अभ्यासली. त्यानंतर त्यांनी शेळीपालन सुरू केले ते थोडक्यात असे :
चंदगड तालुक्यात शेळीपालनास पोषक वातावरण आहे. जून ते ऑगस्ट कालावधीत भरपूर पाऊस येथे असतो. या काळात बंदिस्त व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पावसामुळे शेळ्यांची कार्यक्षमता थंडावते. ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यासाठी गोठ्यात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यात गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा लागतो. हवा, वाऱ्यापासून संरक्षणासाठी जाळीदार पडदे आदींची व्यवस्था करावी लागते.
व्यवस्थापन
शेळ्यांमध्ये 140 ते 145 दिवस हा गाभण काळ असतो. व्याल्यानंतर दोन ते अडीच महिन्यांनंतर त्या माजावर येतात. विण्यापूर्वी व विल्यानंतर प्रमाणशीर खाद्य, भरपूर चारा द्यावा लागतो. शेळीची उत्तम निगा राखावी लागते. हिरव्या चाऱ्यावर अधिक भर दिला आहे. मात्र उपलब्धतेनुसार मका, बाजरी, सुबाभूळ, हुंबर आदी खाद्यही देण्यात येते.
गोठा व्यवस्थापन
शेळीपालनासाठी 20 x 20 फूट आकाराचा बंदिस्त गोठा उभारला आहे. स्वच्छतेसाठी सिमेंटने कोबा करून घेतला आहे. हवेशीर वातावरणासाठी चारही बाजूने जाळ्या लावल्या आहेत. वन्य प्राण्यांचा त्रास होत असल्याने जास्त जाडीच्या तारांचा वापर केला आहे. पावसाळ्यात तसेच रात्रीच्यावेळी गोठ्यामध्ये शेळ्या ठेवल्या जातात. इतर वेळी त्या चरायला मोकळ्या शेतात सोडण्यात येतात. 70 शेळ्या एकावेळी राहू शकतील अशा क्षमतेचा हा गोठा आहे. यासाठी जवळपास 55 ते 60 हजार रुपये खर्च आला. गोठ्यात सासनवीट ठेवण्यात आली आहे. ही क्षार व खनिजेयुक्त वीट असते. या विटेला शेळ्या चाटतात. यातून त्यांना क्षार व खनिजांचा पुरवठा होतो.
चारा लागवड
दोन एकरावर चारा लागवड आहे. यामध्ये शेळ्या मुक्तपणे चरण्यास सोडण्यात येतात. अर्ध बंदिस्त गोठ्याच्या या पद्धतीत चोहोबाजूंनी कुंपण केले आहे. कुंपणासाठी एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च आला. एका एकरावरील जागेत यशवंत गवताची लागवड आहे. अन्य एका एकरात चार सऱ्या मका, बाजरी व चार सऱ्या यशवंत गवत आहे. गवताच्या वाढीसाठी आठवड्याच्या अंतराने स्प्रिंकलरच्या साह्याने पाणी देण्यात येते. सहा महिन्यांतून एकरी दीडशे किलो युरिया खताचा वापर होतो.
लसीकरणास महत्त्व
चंदगड भागात मुख्यतः आंत्रविषार आणि घटसर्प या रोगांचा प्रादुर्भाव अधिक आढळतो. या रोगांसाठी प्रतिबंधक लस टोचण्यात येते. घटसर्पसाठी मार्च- एप्रिलमध्ये तर आंत्रविषारसाठी मे-जूनमध्ये लसीकरण करण्यात येते.
लेंडी आणि मांसासाठीच संगोपन
अनिल यांच्या शेतात 23 शेळ्या आहेत. मुख्यतः लेंडी खत आणि मांसासाठीच शेळीचे संगोपन करतात. शेळीचे दूध काढले जात नाही. सर्व दूध पिल्लांनाच दिले जाते. अडीच ते तीन महिने शेळीच्या दुधावरच पिलांची वाढ केली जाते. उस्मानाबादी शेळी ही मुख्यतः मांसासाठीच पाळली जाते. नऊ ते दहा महिन्यांनंतर तिची विक्री करण्यात येते. विक्रीच्या वेळी पालव्याचे वजन साधारणपणे 20 ते 30 किलोपर्यंत भरते. अंदाजे 250 रुपये किलो दराने पालव्याची विक्री केली जाते. एका पालव्याकडून साधारणपणे पाच हजार रुपये तरी हाती मिळतात. नरांचीच विक्री केली जाते. माद्यांची विक्री न करता त्यांचे संगोपन केले जाते. गेल्या वर्षभरात सहा पालव्यांची विक्री केली आहे. वर्षभरात अंदाजे दहा पालव्यांची विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
संगोपनाचा जमा-खर्च
मशागत, औषधे, खते, पाणी, कामगारांवरील खर्च आणि अन्य असा वर्षाला सुमारे 12 हजार रुपये खर्च येतो. वर्षाला पालव्यांच्या विक्रीतून साधारणपणे 40 ते 50 हजार रुपये मिळतात. संगोपनासाठी साधारणपणे 20 ते 25 टक्के खर्च होतो. लेंडीखताचा वापर शेतीसाठी केला जातो. दररोज अंदाजे सहा ते सात किलो लेंडीखत मिळते. वर्षाला साधारणपणे अडीच ट्रॉली लेंडीखत मिळते. सध्या लेंडीखताच्या प्रति ट्रॉलीचा दर साडेतीन हजार रुपये आहे.
आंदोलक शेतकरी
कुक्कुटपालनाचा व्यवसायही अनिल यांनी केला. केवळ मांसासाठी दरवर्षी चार हजार पक्षी ते वाढवत. मात्र 2006 मध्ये बर्ड फ्लू रोगाच्या प्रादुर्भावामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर या व्यवसायातून ते बाहेर पडले. नुकसानभरपाई मिळण्यासाठी त्यांचे आजही प्रयत्न सुरू आहे. यासाठी त्यांनी आंदोलनेही केली. शासनाने बर्ड फ्लू संदर्भातील नुकसानग्रस्तांना मदत मंजूर झाल्याचे सांगितले आहे. पण अद्याप आश्वासनाशिवाय काहीच मिळालेले नाही. आता पुन्हा त्यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सुनील यांचे संशोधन
अनिल यांचे भाऊ सुनील यांनी सोयाबीन, कोरफड यावर प्रकिया करून विविध उत्पादने मिळविण्यावर बरेच संशोधन केले आहे. सोयाबीनपासून वेगवेगळ्या स्वादामधील उदा. सोया दूध, सोया पीठ, सोया पनीर, सोया कुरकुरे, सोया बटर, सोया श्रीखंड, सोया गुलाबजामून, सोया बिअर ही उत्पादने तयार केली आहेत. ही उत्पादने कमी स्निग्ध पदार्थ आणि जादा प्रथिने व शून्य हानिकारक कोलेस्टेरॉल आहेत असा त्यांचा दावा आहे. कोरफडीपासून ज्यूस, बहुपयोगी जेल, साबण, केसांचे तेल, ओठांसाठीचे क्रीम, कोल्ड क्रीम आदी उत्पादने तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या उत्पादनांचा प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
.
अनिल कृष्णा रेंगडे, 9403106534
अडकूर, ता. चंदगड, जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment