साखर निर्मितीत हवे सातत्य
---
राजेंद्र घोरपडे
---
ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन वर्षभर घेतले जाते. तमिळनाडूतील पोकलूरमध्ये वर्षभर गूळ निर्मितीचे काम चालते. महाराष्ट्रातही शक्य तेथे साखर उद्योग, गूळ उद्योग वर्षभर कसा चालेल, याचा विचार करावा लागेल... कोल्हापूर येथील प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्रातील वनस्पती रोग शास्त्रज्ञ प्रा. डी. एम. वीर यांची मुलाखत
---
हवामान बदलाचा ऊस शेतीवर कोणता परिणाम होत आहे? यावर कोणते उपाय योजले जाऊ शकतात?
- रात्रीच्या तापमानात अचानक घट होणे, अवेळी पाऊस, प्रमाणापेक्षा अधिक पाऊस, उन्हाळ्यातील सरासरी तापमानात वाढ, दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात दिसून येणारी मोठी तफावत असे बदल हवामानात होताना दिसत आहेत. यामुळे जमिनीची धूप वाढत आहे. साहजिकच याचा परिणाम शेती उत्पादनावर होत आहे. अशा या नैसर्गिक आपत्तीमुळेच रोग - किडींचा प्रादुर्भावही वाढत आहे. हवेतील आर्द्रता, पूरस्थितीमुळे मावा, तुडतुडे, खोडकिडीत वाढ होते. तांबेरा रोगाचाही प्रादुर्भाव वाढतो. दलदलीमुळे मर रोग वाढतो. हवामान बदलाच्या या परिस्थितीचे ऊस शेतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. उन्हाळ्यात पूर्व मॉन्सूनचा पाऊस पडला नाही, तर पाण्याअभावी पिके वाळून जाण्याचे संकटही वाढत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तापमानवाढीचा फटका शेतीला बसत आहे; पण पाण्याचा योग्य वापर करून शेतीचे उत्पादन वाढविणे शक्य आहे. दुष्काळी पट्टा असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातही आज 23 साखर कारखाने आहेत. आणखी खासगी साखर कारखाने होऊ घातले आहेत. कालव्याच्या पाण्याने तेथे विकास होत आहे; पण या पाण्याचा योग्य वापर शेतकऱ्यांनी केला तरच उसाचे उत्पादन घेता येणे शक्य आहे, तेव्हाच हे साखर कारखाने तग धरू शकतील. शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी दुग्ध व्यवसाय, मत्स्यशेती, कोंबडीपालन आदी जोड धंद्यांना चालना देण्याची गरज आहे. पीक पद्धतीमध्येही बदल करण्याची गरज आहे. नुसते एकच एक पीक घेऊन सध्या शेती करणे अवघड होणार आहे. वेगवेगळ्या हंगामाची पिके घेऊन उत्पन्न टिकविणे गरजेचे आहे. नुकसान झालेच तर ते अंगावर येणार नाही. द्राक्ष, ऊस, केळी, भाजीपाला अशी विविध पिके घेऊन नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला करण्याची गरज आहे.
.......
शेतीबाबत सरकारचे धोरण कसे असावे?
- पाण्याचा वापर पिण्यासाठी, उद्योगधंद्यांना प्रथम केला जातो. नंतर शेतीसाठीच्या पाण्याचा विचार केला गेला आहे. यामुळे सिंचनाखालील क्षेत्राच्या वाढीत मर्यादा आली आहे. महाराष्ट्रात आज सुमारे 18 टक्के क्षेत्र हे सिंचनाखाली आहे. गुजरातमध्ये 40 ते 42 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे, त्यामुळे तेथे शेती विकासाचा दर उत्तम आहे. महाराष्ट्र सरकारने शेतीसाठीचे धोरण ठरविताना याचा विचार करायला हवा. जागतिक मंदीच्या फटक्यात शेतीच तारणहार आहे. याचाही विचार करून शेतीला योग्य प्राधान्य द्यायला हवे; पण तसे होत नाही. शेतीसाठी आवश्यक पाणी आणि वीज याबाबतचे प्रश्न प्रथम विचारात घ्यायला हवेत. प्रत्येक सहकारी साखर कारखान्यास सहवीजनिर्मिती करण्याची सक्ती करायला हवी. तमिळनाडूत विजेची समस्या सोडविण्यासाठी पवन ऊर्जेला प्राधान्य दिले आहे. तसा विचार महाराष्ट्रानेही करायला हवा. भारनियमनामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. हवामान बदलाच्या काळात योग्य वेळी पिकांना पाणी देण्याची गरज आहे; पण भारनियमनामुळे शेतीला पाणी देण्यात अडचणी येत आहेत. पिके हातची जाण्याची समस्या वाढत आहे. वादळाचे तडाखे सोसूनही तमिळनाडूने शेतीत प्रगती केली आहे. मग महाराष्ट्रात हे का होऊ शकत नाही? शहरांचा विस्तार होतोय म्हणजे विकास होतोय असे नाही. सामाजिक जीवनावर याचा मोठा परिणाम जाणवत आहे. शेतीसाठीच्या पिकाऊ जमिनीवर सिमेंटची जंगले उभारली जात आहेत. सरकारने शेतीचे धोरण ठरविताना या गोष्टींचा विचार करायला हवा. इमारती बांधकामांसाठी वापरण्यात येणाऱ्या विटांसाठी सुपीक गाळाची माती वापरली जाते. यावर पर्याय शोधल्यास ही माती शेतीच्या उत्पादनवाढीसाठी निश्चितच उपयोगी ठरू शकेल. हे मुद्दे सरकारी धोरण ठरविताना विचारात घ्यायला हवेत, तरच भावीकाळात शेती तग धरू शकेल.
.........
साखर आणि गूळ उत्पादनाचा उद्योग ऊर्जितावस्थेत ठेवण्यासाठी काय करता येऊ शकेल?
- ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन वर्षभर घेतले जाते. तमिळनाडूतील पोकलूरमध्ये वर्षभर गूळ निर्मितीचे काम चालते; पण आपल्याकडे सहा महिन्यांच्यावर साखर कारखाना चालत नाही, तर गूळ व्यवसाय 120 ते 150 दिवसांतच संपतो. पश्चिम महाराष्ट्रात 270 दिवस साखर निर्मिती करता येणे शक्य आहे. कमी पाऊस पडणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात वर्षभर साखर कारखाने चालविता येणे शक्य आहे. ईआयडी प्यारी यांचे तमिळनाडूतील कारखाने आठ ते नऊ महिने चालतात. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात शेती विकासाबाबत फारसा विचार केला जात नाही. यामुळेच आपण मागे पडत आहोत; पण आता वर्षभर साखर उद्योग, गूळ उद्योग कसा चालेल याचा विचार करावाच लागेल. कारखान्यांनी तसे नियोजन केल्यास हे सहज शक्य आहे. एप्रिल - मेमध्ये जादा तापमानामुळे उतारा कमी मिळतो; पण तुरा न येणारी जात, जादा साखर उतारा असणारी व लवकर पक्व होणाऱ्या जातीचे एप्रिल-मे मध्येही गाळप करता येते. 91010 या जातीवर तसे प्रयोग झाले आहेत. साखर उद्योग ऊर्जितावस्थेत ठेवायचा असेल, तर या पुढील काळात तसा विचार करणे गरजेचे आहे. मनपाडळे (419) या जातीची लागवड वर्षभर केली जाते. या जातीला तुरा येत नाही. रसवंतीसाठी ही जात वापरली जाते. आता साखर आणि गूळ निर्मितीमध्ये वर्षभर लागवड करता येऊ शकणाऱ्या जाती विकसित केल्या, तर महाराष्ट्रातही वर्षभर हे उद्योग चालू शकतील. याचा फायदा निश्चितच हे उद्योग विकसित करण्यात होईल.
...........
साखर उतारा वाढविण्याच्या दृष्टीने कोणते धोरण अवलंबिले पाहिजे?
- उतारा हवामानावर अवलंबून आहे. 20 ते 35 अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या ठिकाणी चांगला उतारा मिळतो. मुख्यतः हिवाळ्यात चांगला उतारा मिळतो. जादा साखर उतारा देणाऱ्या वाणांची निर्मिती करणे गरजेचे आहे. पण त्याबरोबरच वेळेवर तोडणी होणेही गरजेचे आहे. साखर कारखाने ऊस वेळेवर नेत नाहीत, त्यामुळे साखर उताऱ्याला याचा फटका बसतो. सहकारातील राजकारणामुळे पक्व झालेला ऊस उशिरा गाळला जातो, तर काहींची तोडणी वेळेआधीच केली जाते. तोडणी आणि लागणीमध्ये कारखान्याच्या संचालक मंडळांनी हस्तक्षेप करणे योग्य नाही. जिथे हे राजकारण नाही, ते साखर कारखाने चांगला उतारा मिळवत आहेत. उसाच्या वाणांच्या गाळपाचेही नियोजन असे साखर कारखाने करत आहेत. यामुळे 12.5 ते 14.5 पर्यंत उतारा मिळविण्यात हे साखर कारखाने यशस्वी झाले आहेत. व्यवस्थापन योग्य केल्यास हे शक्य आहे. उतारा टिकवून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या 7527 सारख्या जाती शेवटच्या टप्प्यात पट्टा पडताना गाळपास येतील असे नियोजन केल्यास चांगला उतारा मिळू शकतो. सीओसी 671, सीओएम 254 या जातींचे गाळप एकत्रित केल्यास चांगला उतारा मिळतो. 86032 च्या आडसालीचा खोडवा आणि आडसाली लागणीचे गाळप एकत्रितपणे केल्यासही उतारा चांगला मिळतो.
संपर्क ः
प्रा. डी. एम. वीर
9420586032
...
प्रा. वीर यांचा अल्प परिचय
गेली सोळा वर्षे प्रादेशिक ऊस आणि संशोधन केंद्रात कार्यरत असून, उसाच्या वाणांच्या निवडीमध्ये संशोधनाचे मोलाचे काम ते करत आहेत. 2005 मध्ये लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आला होता. त्याच्या नियंत्रणासाठी त्यांनी विशेष कार्य केले. रोग आणि कीड, नैसर्गिक आपत्तीच्या नियंत्रणामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ऊस लागवडीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम ते करत आहेत. देश पातळीवरील ऊस कार्यक्रमामध्ये तांत्रिक कामांचे मूल्यांकन करण्याच्या समितीमध्येही त्यांचा सहभाग आहे.
खूपच माहितीपूर्ण लेख आहेत तुमचे सगळे. Keep it up, all the very best !
ReplyDelete