Monday, April 9, 2012

बडोद्यातील नोकरी सोडून शेतीत 'करिअर'

बडोद्यातील नोकरी सोडून शेतीत केले यशस्वी 'करिअर'
.................................
कोल्हापूर जिल्ह्यातील युवकाची यशकथा
...................
"इलेक्‍ट्रॉनिक्‍स' विषयातील पदविका घेतलेला कोल्हापूर जिल्ह्यातील एक तरुण बडोद्याला चांगल्या कंपनीत नोकरीसाठी जातो. तेथे तो स्थिरही होतो. मात्र वडिलांच्या निधनानंतर त्याला आपल्या गावी यावे लागते.
शेतीचा गंधही नाही. तरीही वडिलांनी चालवलेली शेती पुढे नेण्याचा विचार करतो. अभ्यास, योग्य नियोजन, ठाम निश्‍चय व कष्ट यांतून तो शेती यशस्वीही करतो. ही कोणती काल्पनिक कथा नाही. ध्येय असावे सुंदर, त्यातच चालत राहावे, प्रगती होत जाते. ही संकल्पना प्रत्यक्षात आणून दाखविणाऱ्या एका तरुणाची यशकथा आहे.
.................................
राजेंद्र घोरपडे
.............................
वेदगंगा, दूधगंगा, चिकोत्रा नद्यांच्या खोऱ्यातील कर्नाटक- महाराष्ट्र सीमाभाग सधन आहे. नद्यांवर बंधारे झाल्यानंतर उसाचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळेच कागल तालुक्‍यात शाहू, बिद्री पाठोपाठच आता हमिदवाड्याचा साखर कारखानाही भरभराटीला आला आहे. गलगले हे या सीमा भागातीलच गाव. चिकोत्रा नदीमुळे हिरवाईला आलेले. ही संपन्नता सोडून बाहेर नोकरीला जाण्याचा विचार करणे कठीणच म्हणायला हवे. प्रसाद बाळासाहेब घोरपडे यांच्याबाबत असेच काहीसे घडले. शेतीचा गंधही नसताना शेतीला सुरवात करून ऊस, तंबाखू, सोयाबीन आदी पिके घेऊन त्यात केलेली प्रगती निश्‍चितच कौतुकास्पद आहे. प्रसाद यांचे वडील साखर कारखान्यात व्यवस्थापकीय संचालक होते. नगर, सोलापूर, कोल्हापूर येथील विविध साखर कारखान्यात त्यांनी नोकरी केली. नोकरीतील बदल्यांमुळे प्रसाद यांच्या शिक्षणाची ठिकाणेही बदलत राहिली. गावाकडे ते सुट्टीलाच येत. त्या काळात येथे बागायती शेतीही फार नव्हती. 1992 मध्ये प्रसाद यांचे वडील निवृत्त झाले. त्यानंतर ते गावाकडे येऊन शेती करू लागले. प्रसाद "इलेक्‍ट्रॉनिक्‍स' विषयातील डिप्लोमाधारक. शिक्षणामुळे साहजिकच नोकरीच्या मागे लागले. मुंबईच्या एका लोकप्रिय कंपनीला बडोद्यातील प्रकल्पासाठी अभियंत्यांच्या जागा भरायच्या होत्या. पहिल्याच प्रयत्नात त्यांची निवडही झाली. तेथे ते सहायक अभियंता म्हणून काम पाहू लागले. याच कालावधीत लग्न झाले. लग्नानंतर कुटुंबासह बडोद्याला राहू लागले. अधूनमधून गावाकडे फेरी असायची. वडिलांना शेतीचा अनुभव चांगला होता. त्यांनी शेतीत चांगला जम बसवला होता. तंबाखू, ऊस शेती विकसित केली. सुमारे पाच वर्षे प्रसाद नोकरीत रमलेही होते. मात्र 1999 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि तेथून प्रसाद यांचे जीवनच बदलले.
प्रसाद एकुलता एक मुलगा. दोन बहिणी. त्यांची लग्ने झाली होती. आई ही वडिलांसोबतच गावाकडे राहायची. वडिलांच्या निधनानंतर आई बडोद्याला यायला तयार होईना. प्रसाद यांना काय करावे हे समजेना. गावापासून दूर राहिल्याने गावची ओढ होती. पण शेतीचा गंध नव्हता. शेताची हद्दही नीट माहीत नव्हती. जमिनीचे प्रकार, सात-बारा कसा असतो याचीही व्यवस्थित कल्पना नव्हती. साहजिकच प्रसाद शेती कशी काय सांभाळणार अशी शंका व्यक्त करून काही पाहुण्यांनी त्याला नोकरीतच राहण्याचा सल्ला दिला. बरं, गावाकडे राहून दुसरा उद्योग तरी कोणता करणार असाही प्रश्‍न होताच. पण प्रसादने शेतीच करण्याचा निर्णय पक्का केला.
त्याने विचार केला. नोकरीत असे उत्पन्न मिळते किती? बडोद्याला राहून पगार मिळणार किती? वाढ किती होणार? गावाकडे अकरा एकर जमीन, विहीर, नदीचे पाणी आहे. इथे प्रापंचिक खर्चही कमी आहे. दूध, भाजीपाला घरचा आहे. खर्च वाचणार आहे. साखर कारखान्याची स्वस्तात साखर मिळते. कडधान्याचा खर्च कमी. धान्य घरीच पिकते. पण ते बडोद्याला घेऊन जाणे परवडणार नाही. अभियंता असतानाही नोकरीत सुरवातीला प्रशिक्षण घ्यावे लागलेच ना? तसे शेतीतही घेऊ. हळूहळू तीही जमेल असा विश्‍वास होता.
सुरवातीच्या काळात ज्वारी, तंबाखू ही पिके घेतली. विहीर असल्याने पाण्याची चिंता नव्हती. वडिलांनी शेतीत चांगला जम बसविला होता. मजुरांची कमतरता नव्हती. माणसे जोडलेलीच होती. फक्त योग्य व्यवस्थापनाची गरज होती. तरीही स्वतः शेती करण्यात फरक होता. खतांच्या मात्रा समजत नव्हत्या. सुरवातीला दोन वर्षे तरी पेरलं की उगवतंय याच पद्धतीने शेती होत होती. सन 2002 मध्ये गावाने पाण्यासाठी योजना आखली. नदीचे पाणी आले. शेतीसाठी कर्ज मिळाले. निसर्गाची साथ मिळाली. अनेक जाणकार शेतकऱ्यांचा संपर्क आला. चॅनेलवरील शेती मालिका, शेती मासिके चाळून माहिती घेतली. शेतीचा अभ्यास सुरू केला. भौगोलिक तसेच जमिनीचा अभ्यास केला. सोसायटी तसेच कृषी सेवा केंद्राची मदत झाली. पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेत सहा दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला. कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकांची मदत झाली.
सीमा भागात तंबाखूची लागवड होते. तंबाखूचे व्यापारी वडिलांच्या परिचयाचे होते. नेहमी ते एकाच व्यापाऱ्याकडे तंबाखू विकत. वडिलांचा अनुभव कारणी लागला. नेहमीचा व्यापारी या नात्याने त्याच्याशी व्यवहार सुरू ठेवला. सुरवातीला दराचे काही समजत नव्हते. पण वडिलांच्या परिचयातील व्यापारी असल्याने फसवणूक झाली नाही. व्यापारी घरी येऊन प्रतीनुसार दर देत. पैसे वेळेवर मिळतात. गेल्या चार-पाच वर्षांत तंबाखूचे क्षेत्र कमी झाले, दरातही चढ-उतार झाले, पण फायदा झाला. तंबाखू पिकाला नैसर्गिक संकटे खूप आहेत. प्रत टिकविण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. वडील चांगल्या प्रतीचा तंबाखू काढत. यामुळे व्यापाऱ्यांचा विश्‍वास होता. तसेच व्यवहार प्रसाद यांनी सुरू ठेवले. विश्‍वास वाढविला. माणुसकी टिकवली, पत राखली की शेतीत फसवणूक होत नाही. नुकसान झाले तरी व्यापारी सांभाळून घेतो. एकच व्यापारी ठेवल्याचा हा निश्‍चितच फायदा आहे.
ऊस पिकविण्याचाही अनुभव नव्हता. सोसायटीची पाण्याची योजना झाल्यानंतर उसाचे क्षेत्र वाढविले. अभ्यास करून उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केला. तज्ज्ञांची मदत घेतली. कारखान्याचे तज्ज्ञ वारंवार शेताला भेट देत. त्यांच्याच आग्रहाने हमिदवाड सहकारी साखर कारखान्याच्या पीक स्पर्धेत भाग घेतला व दुसरा क्रमांकही पटकावला. उसात प्रगती होत होती. 2005-06 मध्ये लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला. परिसरातील शेतकऱ्यांना फटका बसला. फवारणीचा खर्चही खूप झाला. पूर्वी शासनाचे अनुदान कधी घेतले नव्हते. पण या वेळी मात्र शासनाची मदत स्वीकारली. एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे फेरपालट ठेवली की कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. उत्पादनातही वाढ होते. यंदा मेच्या दुसऱ्या पंधरवड्यातच सोयाबीन लावला. एकरी 12 क्विंटल उत्पादन मिळाले. दरही 2200 रुपये मिळाला. पीक कोणतेही असो. निव्वळ नफा 60 ते 65 टक्के मिळविण्याचे ध्येय ठेवले आहे. सुधारित तंत्रज्ञान वापरण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शून्यापासून सुरवात, आता विकासाकडे...

घोरपडे यांच्या शेतीचे नियोजन सांगायचे तर त्यांनी 1999 ते 2000 च्या सुमारास शेती सुरू केली. त्यांची 11 एकर शेती असून सात एकर ऊस, तर चार एकर तंबाखू व भात वगैरे पिके असतात. मे महिन्यात सोयाबीन लावतात. साधारण ऑगस्टमध्ये सोयाबीनचा पाला झडत आल्यानंतर बोदावर तंबाखू लावला जातो. सोयाबीनच्या काढणीनंतर फणणी केली जाते. उसासाठी रुंद सरी आधीच तयार केली असल्याने उसाची लागवड केली जाते. पुढे तंबाखू निघून जातो. घोरपडे म्हणाले, की सोयाबीन हे मुख्य उत्पन्नाचे साधन म्हणून घेत नाही तर त्याच्या उत्पन्नातून ऊस व तंबाखू पिकातील खर्चात बचत होते. सोयाबीनचे एकरी दहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. उसाचे सरासरी एकरी उत्पादन 50 टन आहे. प्रति क्विंटल 2200 ते 2500 असा दर राहिला तरी उत्पादन खर्च सुमारे 25 हजार रुपये वजा जाता 80 ते एक लाख रुपये निव्वळ नफा मिळतो. उसाचा खोडवा ठेवला जातो. त्याचे एकरी 40 ते 45 टन उत्पादन मिळते. तंबाखूच्या दरात नेहमी चढ-उतार असतो. एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन मिळते. प्रति किलो 50 ते 60 रुपये दर मिळतो. (काही वेळा तो अगदी खाली घसरतो). निव्वळ उत्पन्न 50 ते 60 हजार रुपये मिळते. खर्च वजा जाता सुमारे 28 हजार रुपये निव्वळ नफा राहतो.
घोरपडे म्हणाले, की शेतीत चांगले लक्ष घातले, अभ्यासपूर्ण शेती केली तर ती किफायतशीर होते. आर्थिक जीवनमान चांगल्या प्रकारे जगता येते. येत्या काळात ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणार आहे. साखर कारखान्याच्या मार्गदर्शनानुसार उसाच्या नव्या जातींचा प्रयोग करतो.


प्रसाद बाळासाहेब घोरपडे,
गलगले, ता. कागल, जि. कोल्हापूर
9421114541
..........................

No comments:

Post a Comment