किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ।।
कामात सातत्य असेल तर ते पूर्णत्वाला जाते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून अनेक कामे सांगितली जातात. पण ती वेळेत पूर्ण होतातच असे नाही. काही कामे अर्धवट राहातात. ज्या कामांत सातत्य असते, ते मात्र पूर्ण होते. त्यापासून मात्र निश्चितच लाभ होतो. राजकारणात जो चांगली कामे करतो. त्याचा जनमानसात नेहमीच ठसा उमटतो. दबदबा असतो. कामात सातत्य ठेवल्यास शत्रूवरही मात करता येते. सातत्यामुळे धाक राहातो. विजयाचा मार्ग सुकर होतो. चिंता राहात नाही. साधनेचेही असेच आहे. साधना ही अखंडित असावी. खंड कधी पडत नाही ते अखंड. सेवा ही सुद्धा अखंड असावी. सेवेत, साधनेत सातत्य राहीले, तर अध्यात्मिक प्रगतीची वाट सुकर होते. दररोज नियमाने ध्यान-धारणा करावी. पाचच मिनिटे करावी, पण त्यात सातत्य हवे. वेळ मिळेल तेव्हा करावी. पण निश्चित न विसरता करावी. साधनेचा विसर पडू देऊ नये. साधनेत मन स्थिर राहावे. ते भंगता कामा नये. जे भंग पावत नाही ते अभंग. अभंगात मांडलेले विचार कधीही भंग पावत नाहीत. काळ बदलला, वेळ बदलली, माणसे बदलली तरी, तो विचार कायम आहे. त्यात बदल झालेला नाही. फक्त तो विचार दुसऱ्या पद्धतीने मांडला गेला आहे. जात बदलली, पंथ बदलले, धर्म बदलले तरीही तो विचार मात्र सर्वत्र एकच आहे. कायम स्वरुपी आहे. युग बदलले पण अभंग हे कायम आहेत. त्याच्यात काहीही बदल झालेला नाही. त्यावर अनेकांनी निरुपणे केली. तो विचार सर्वत्र पसरविला, पण तो विचार बदलता आला नाही. तो ठाम राहीलेला आहे. अभंगातील हा आध्यात्मिक विचार आत्मसात करायला हवा. ती अखंडता जाणून घ्यायला हवी. कोणत्याही युगात, काळात व्यक्तीमत्वाचा विकास करणारा असा तो आत्मविचार आहे. तो आत्मसात करायला हवा. अखंडपणे त्याची साधना करायला हवी. सोSहमच्या ध्यानातच, धासातच आत्मज्ञानाची प्रगती आहे.
राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
संपर्क ः 9011087406
No comments:
Post a Comment