ग्रंथोपजीविये
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकी इयें ।
दृष्टादृष्टविजयें । होआवें जी ।।
ज्ञानेश्वरीतील एकतरी ओवी अनुभवावी असे नेहमीच सांगितले जाते. धकाधकीच्या जीवनात आता याची गरज वाटू लागली आहे. अनंताचा विचार सांगणारे हे शाश्वत ग्रंथ आहेत. त्यातील प्रत्येक शब्द हा तो ग्रंथ वाचणाऱ्या भक्तासाठी प्रसादच आहे. शब्दांचा प्रसाद आहे. मनाला तृप्ती आणणारा प्रसाद आहे. भक्ती करणाऱ्या भक्ताला तृप्त करणारा आहे. हे खरे आहे की ज्ञानेश्वरी वाचून प्रत्येकजण ज्ञानेश्वर होऊ शकलेला नाही. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायचीच नाही. ते एक थोतांड आहे. असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्येकाला वाचून ज्ञानेश्वर जरी होता आले नाही. तरी वाचणारा त्या मार्गावर आहे. असे म्हणायला काहीच हरकत नाही. प्रत्येकाला ज्ञानेश्वर व्हायचे आहे. हेच सर्वांचे ध्येय आहे. ध्येय असावे सुंदर त्यातच चालत राहावे. फळाची अपेक्षा न ठेवता त्यात कार्यरत राहावे. निरपेक्ष बुद्धीने काम करत राहावे. यातूनच ज्ञानेश्वरी वाचणाची आवड वृद्धींगत होते. त्यामध्ये रममान व्हायला शिकले पाहीजे. ज्ञानेश्वरीतील एकही शब्द समजत नाही. अशी तक्रार असते. पण एखादा शब्द जरी मनाला भावला, तरी आपण धन्य झालो, असे समजावे. आज एक शब्द भावला. उद्या दुसरा भावेल. परवा तिसरा भावेल. असे करत ओवीच भावेल. हळुहळु ग्रंथच भावेल. अध्यात्मात वाचन किती केले याला महत्त्व नाही. हजारो पारायणे करूनही ज्ञानेश्वरी समजत नाही, असे म्हणणारे अनेक जण आहेत. नुसती पारायणे करून काहीच साध्य होत नाही. ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वरी तोंडपाठ असणारेही अनेक ग्रहस्थ आहेत. नुसती पंडीती ज्ञान असून अध्यात्मात प्रगती होत नाही. उलटा त्यातून गर्व, अहंकार बळावतो. कोणत्या पानावर कोणती ओवी आहे. इतके पाठांतर आहे. पण एकही ओवी मनाला भावत नाही अशाचा काय उपयोग? मनाची पाटी रिकामी असेल तर, पंडीती ज्ञान निष्फळ आहे. ओवीचा एक शब्द जरी अनुभवता आला तरी, जग जिंकल्यासारखे आहे. ज्ञानेश्वरी ही नुसती वाचायची नसून, तो अनुभवण्याचा ग्रंथ आहे. अनुभवातूनच ज्ञानेश्वरी समजते. ज्ञानेश्वरीची अनुभूती यायला हवी. अध्यात्मात अनुभूतीला महत्त्व आहे. यासाठी नुसती पारायणे नकोत. तर ते ग्रंथ पारायणातून अनुभवालया शिकले पाहीचे. जीवनभर त्याची संगत करायला हवी. आज ही ओवी अनुभवली. उद्या दुसऱ्या ओवीचा अनुभव आला. जीवनभर त्यातील प्रत्येक ओवी अनुभवत राहावे. यातूनच ज्ञानेश्वर होता येते. ज्ञानेश्वरीचा हाच सर्वात मोठा प्रसाद आहे. तो मिळविण्याचा प्रयत्न करायला हवा.
राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर 9011087406
No comments:
Post a Comment