"मांजरे'करांनी दाखवले एकीचे बळ
पाणीटंचाईच्या समस्येला मिळाले यशाचे फळ
..............
राजेंद्र घोरपडे
.................
लीड
गावातील ऐक्यातून गावातील महत्त्वाचे प्रश्न निश्चितच सुटू शकतात. मांजरे (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील ग्रामस्थांच्या एकीमुळेच गावातील पाणी प्रश्न आज तडीस लागला आहे. महिन्याला 12 ते 14 हजार रुपयांचे विजेचे येणारे बिल आता शून्य झाले आहे. भारनियमनाचीही त्यांची चिंताही दूर झाली आहे. डोंगरकपारीतील नैसर्गिक पाण्याचे स्रोत जोपासून निसर्गाचेही संरक्षण केल्याचा आनंदही त्यांना आहे. महिलांची पाण्यासाठीची भटकंतीही कायमची थांबविण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. श्रमदानातून सायफन पद्धतीने गावात पाणी आणून मांजरेकरांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
..............
राजेंद्र घोरपडे
..........................
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीपासून अणुस्कुरा घाटमार्गावर 40 किलोमीटर अंतरावर मांजरे गाव आहे. भात, नागली ही इथली मुख्य पिके. गवा, रेडा, जंगली श्वापदांमुळे अन्य पिके घेण्यात इथे अनेक अडचणी येतात. अशा या गावाचे उत्पन्न ते किती असणार? त्यातून दैनंदिन चरितार्थ तरी कसा चालायचा? पयार्याने अशा गावांचा विकास कसा साधायचा? वीज, रस्ते आदी सुविधा मिळूनही विकासात ही गावे पिछाडीवर राहिली आहेत. बरं, ज्या काही सुविधा दिल्या त्यांचा वापर करणेही इथल्या जनतेला परवडणारे नाही. पण हातावर हात ठेवून बसणे शक्य नव्हते. समस्यांवर उपाय शोधण्याची गरज होती. यामध्ये कृषी विभाग मदतीला धावून आले. त्यांच्या पुढाकारातून एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत "प्रेरक प्रवेश' हा उपक्रम राबविण्याचे निश्चित झाले.
काय आहे हा उपक्रम?
प्रेरक प्रवेश उपक्रमांतर्गत गावात पाणलोट समिती स्थापन करण्यात येते. गावाची गरज काय आहे? गावातील प्रश्न कोणते आहेत? गावाच्या विकासासाठी कोणते उपक्रम राबविता येणे शक्य आहे? याचा विचार तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही समिती करते. मांजरे येथेही अशीच समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 2010 च्या ग्रामसभेत कृषी पर्यवेक्षक सुनील सानप आणि कृषी सहायक प्रमोद खोपडे यांच्यासमोर गावातील पाणी प्रश्न उपस्थित केला. सन 1992 मध्ये आमदार बाबासाहेब सरूडकर यांच्या प्रयत्नातून नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. यासाठी आमदार फंडातून साडेआठ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. पण मार्चनंतर पाणीटंचाईमुळे ही योजना बंद पडायची. उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गावाला त्रस्त करून सोडत असे. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने गावात सहा बोअर घेतले, पण उन्हाळ्यात बोअरलाही पाणी नव्हते. सन 2003 मध्ये दगडू कांबळे सरपंच झाले. त्यांनी नेहमीच भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर कासारी नदीतून पाणी आणण्याचा विचार मांडला. त्यास त्यांना लोकप्रतिनिधींचेही सहकार्य लाभले. साडेचार लाख रुपये खर्चून ही योजना राबविण्यात आली. पण भारनियमन, मोटर जळणे यांसारख्या समस्या उभ्या राहून या योजनेतही मोठे प्रश्न उपस्थित राहू लागले. त्यातच महिन्याला 12 ते 14 हजार रुपये विजेचे बिल येऊ लागले. त्यासाठी वसुली करणेही कठीण झाले. यामुळे कित्येकदा ही योजनाही बंद पडू लागली. त्यानंतर सन 2009 मध्ये रामचंद्र बाळू पाटील यांनी सरपंचपदाचा कार्यभार सांभाळला. त्यांच्यासमोरही याच समस्या उभ्या होत्या. यातूनच पाणी प्रश्नावर सातत्याने गावात चर्चा होत असे. वेगवेगळे पर्याय शोधले जात होते. उन्हाळ्यात डोंगर कपारीतील नैसर्गिक पाण्याच्या स्रोतातूनच पाणी आणावे लागत होते. हे स्रोतच गावाचा पाणी प्रश्न सोडवू शकतात असे या चर्चेतून वारंवार मांडले जात होते. सन 2010 च्या ग्रामसभेत हा प्रश्न चर्चेला आला तेव्हा या स्रोतांतून सायफनने पाणी आणण्याची कल्पना पुढे आली. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी उमेश पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी विजयेंद्र धुमाळ, तालुका कृषी अधिकारी हनुमंत इंगवले, मंडल कृषी अधिकारी सतीश नांगरे, कृषी पर्यवेक्षक सुनील सानप, कृषी सहायक प्रमोद खोपडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही योजना राबविण्याचा संकल्प केला. अशा रीतीने थांबून राहिलेल्या विकासाला वाट मिळण्याची आशा निर्माण झाली.
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत निधीची तरतूद करण्यात आली. मात्र पाण्याचे नैसर्गिक स्रोत हे गावापासून जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावर होते. योजनेतील तरतुदीनुसार केवळ तीन हजार फूट पाइपसाठीच अनुदान होते. पण येथे कमीत कमी सात हजार फूट पाइप आवश्यक होती. याची तरतूद कोठून करणार हा प्रश्न होता. पण तो गावकऱ्यांनी एकत्रित येऊन सोडवला. त्यांनी चार हजार फूट पाइप खरेदीचा निर्णय घेतला. तसेच आवश्यक साहित्याचीही खरेदी करण्याची तयारी दर्शविली. याबरोबरच तीन दिवस खोदाईसाठी श्रमदान करण्याचाही निर्णय घेतला. गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेतला.
चौकट
योजनेसाठी आर्थिक तरतूद
- शासनाकडून दोन -------लाख हजार------ रुपये अनुदान
- तीन लाख रुपयांची लोकवर्गणी
गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला
पाणलोट प्रकल्पामुळे गावात पाणी समस्येचा प्रश्न सुटला. सायफन पद्धतीने पाणी उपलब्ध झाले. पूर्वी गावात पाण्याची सुविधा नसल्याने येथील तरुण पिढी गावात थांबण्यास तयार होत नव्हती. शाहूवाडी किंवा इतर नगरांकडे ही पिढी वळली होती. पण आता गावातच व्यवसाय करण्याकडे त्यांचा ओढा वाढला आहे. गावात जनावरे पाळून दुग्ध व्यवसाय, परसबाग करून भाजीपाला विक्रीचाही व्यवसाय करण्याकडे त्यांचा कल आहे.
पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबल्याने महिलांना शेतीकामात वेळ देता येणे शक्य झाले आहे. भात, नाचणी या पिकांव्यतिरिक्त आता ऊसशेतीसाठी प्रयत्न होत आहेत. जंगली श्वापदांमुळे काही पिके घेणे अवघड आहे. मात्र कृषी विभागाने तेलताड लागवडीचीही योजना गावापुढे मांडली आहे. शेतकरी त्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी कृषी विभागाकडून जनजागृती मेळावे आयोजित केले जात आहेत.
बाजारपेठेत वाढ
मांजरे गावात पूर्वी पाण्याची सुविधा नसल्याने बाजारपेठेसाठी कोणी येत नव्हते. आता येथे आसपासच्या 12 गावांसाठी बाजारपेठ उभी राहिली आहे.
दुधाच्या उत्पादनात वाढ
गावात पाण्याची सुविधा झाल्याने जनावरे पाळण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. पूर्वी दिवसाला 20 ते 30 लिटर दूध संकलन होत होते. आता यामध्ये वाढ झाली आहे. जवळपास 70 ते 80 लिटर दूध संकलन केले जात आहे.
पाण्याने सुविधेत वाढ
गावाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलला आहे. आता गावात उद्योगधंद्यासाठी प्रयत्न होत आहेत. वीज मंडळाचे उपकेंद्र गावात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, जनावरांच्या दवाखान्यात पाण्याची सुविधा झाली आहे.
...........................................................
कोट
मांजरे पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर आता गावातील इतर नैसर्गिक स्रोत्रांतून गावातील शेतीसाठी पाण्याचा वापर कसा करता येईल याचाही विचार सुरू आहे. सिमेंटचा एक मीटर उंचीचा बंधारा बांधून सायफनद्वारे जवळपास 25 एकरावर बागायती शेती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- सुनील सानप, कृषी पर्यवेक्षक
..............
गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी महिन्याला 12 ते 14 हजार रुपये केवळ वीज बिलासाठी लागत होते. त्यातच भारनियमन, मोटार जळणे या समस्या होत्या. आता सायफनद्वारे पाणी मिळत असल्याने खर्च वाचला. पुढील काळात 50 हजार लिटरची टाकी बांधण्याचा विचार आहे. यातून सायफनने पाणी देऊन उर्वरित पाण्यावर परसबागेची योजना राबवून गावाचा विकास करण्याचा विचार आहे.
- रामचंद्र बाबू पाटील, सरपंच, मांजरे
...............
पाणीपट्टी वसुली करताना ग्रामस्थांची बोलणी खावी लागत होती. पाणी नाही आणि वसुली कशी करता असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. तसेच वारंवार मोटार खराब होत असल्याने दुरुस्तीसाठीही पळावे लागत होते. आता हा त्रास बंद झाला आहे. ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे पाणीपट्टी देतात.
- लक्ष्मण श्रीपती कांबळे, शिपाई, ग्रामपंचायत
..............
डोक्यावरून पाणी आणावे लागते यामुळे गावात मुलगी द्यायलाही कोण तयार नव्हते. आलेल्या पाहुण्यालाही पाणी मिळत नव्हते. आता पाण्याचा प्रश्न सुटल्याने ही समस्या सुटली आहे.
- आनंदी लक्ष्मण कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य
..................
पाणी प्रश्न सुटावा यासाठी घागर मोर्चे काढले. सरूडला मोर्चा काढला. पाणी प्रश्नावर गांभीर्याने विचार व्हावा यासाठी अनेक प्रयत्न केले. हे प्रयत्न आता सार्थकी लागले. गावाच्या ऐक्यामुळेच हे शक्य झाले. आता आनंद वाटतो आहे.
- रमाबाई यशवंत कांबळे, माजी सरपंच
................
गेली बावीस वर्षे पाणी ओढून मानेचे मणके खराब झाले. हा त्रास आता भावी पिढीला होणार नाही. याचे समाधान वाटते. बचत गटामार्फत गावात परसबागेची योजना राबविण्याचा विचार आहे.
- अंजली आनंदा सुतार, सचिव, शिरादेवी महिला बचत गट
..............
टॅंकरने पाणी घेऊन हॉटेल व्यवसाय चालवावा लागत होता. एका बॅरेलला 20 रुपये देऊन पाणी विकत घ्यावे लागत होते. दररोज किमान चार बॅरेल विकत घ्यावे लागायचे. आता सायफनने पाणी दारात आल्याने चिंता मिटली आहे. दिवसाला फक्त एक रुपया दर द्यावा लागतो.
- राजाराम पांडुरंग पाटील, हॉटेल व्यावसायिक
.................
पाणी नसल्याने दुग्ध व्यवसाय वाढविणे शक्य नव्हते. तीन गाई होत्या, त्या पाणी नसल्याने विकाव्या लागल्या. आता पाणी आल्यानंतर मुऱ्हा, म्हैसाणा म्हशी पाळल्या आहेत. दररोज 12 लिटर दूध डेअरीत घालतो. गोबरगॅसही सुरू आहे. पाण्यामुळे आता गावात हा व्यवसाय वाढीस लागेल.
- भरत शिवाजी पाटील, सचिव, पाणलोट विकास समिती
...............
No comments:
Post a Comment