कोल्हापूरच्या यादवांनी केले गुऱ्हाळ व्यवसायात करिअर
सुधारित गुऱ्हाळघरनिर्मिती मागणीनुसार मोदक, वड्या, ढेपनिर्मिती
- राजेंद्र घोरपडे
साखर कारखान्याला उसाची विक्री करून बिलाच्या रकमेची वाट पाहत राहणे अनेक शेतकऱ्यांना आवडत किंवा परवडतही नाही. अशा विचारातूनच मनुष्य उद्योगी होतो. कोल्हापूर जिल्ह्यातील गाडेगोंडवाडीच्या (ता. करवीर) येथील महेश गजानन यादव यांनी याच मानसिकतेतून सुधारित गुऱ्हाळघर बांधले. तसेच बाजारपेठेतील मागणीनुसार गूळ व त्यावर आधारित पदार्थांची निर्मिती करून हा व्यवसाय यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे.
एमकॉमची पदवी घेऊनही नोकरीचा मार्ग न स्वीकारता, आहे त्या शेतीत प्रगती करण्याचे आव्हान गाडेगोंडवाडी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील महेश यादव यांनी स्वीकारले. सन 2001 मध्ये गावची पाण्याची योजना बंद पडली. यामुळे बागायती शेती अडचणीत आली. सन 2004 मध्ये स्वतःच्या खर्चाने त्यांनी साडेसहा हजार फुटांची पाइपलाइन करून शेतीसाठी पाण्याची सोय केली. त्याला सुमारे पावणेचार लाख रुपये खर्च आला. शेतीत प्रगती करण्याची जिद्द असल्याने बॅंकेचे कर्ज काढून ही योजना त्यांनी राबविली. त्यातून नऊ एकर शेत बागायती केले.
शेतकरी- शास्त्रज्ञ मंचात सहभाग
सन 2001 पूर्वी महेश भात आणि ऊस हीच पिके घ्यायचे. आता त्यांचे शेतीत विविध प्रयोग सुरू असतात. नऊ एकरावरील उसात बटाटा, गहू, सूर्यफूल, भुईमूग, फ्लॉवर, कोबी, भाजीपाला आदी आंतरपिके घेतात. सन 2004 मध्ये मका सुधार प्रकल्पांतर्गत दीड एकरावर मक्याची लागवड केली. या मक्याच्या उत्पादनाचा तपशील कोल्हापूर कृषी महाविद्यालयास देण्यास संबंधित योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या वेळी त्यांना कृषी महाविद्यालयातील शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाची माहिती झाली. विद्यापीठातील नवनवे तंत्रज्ञान मंचातील शेतकऱ्यांना लगेच उपलब्ध होते. याचा फायदा शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी होतो. हे लक्षात घेऊन महेश यांनी शेतकरी शास्त्रज्ञ मंचात सहभाग घेतला.
गुऱ्हाळाचा व्यवसाय
सन 2004 पासून सुरू केलेल्या गुऱ्हाळाच्या व्यवसायात महेश यांना आज यशस्वीपणे जम बसवला आहे. सुरवातीच्या काळात त्यांनी हा व्यवसाय भाडेतत्त्वावर केला. चार आंदणाला चार हजार रुपये भाडे आणि 100 किलो गूळ या प्रमाणे त्या वेळी भाडे आकारले जात होते. गेल्या वर्षीच त्यांनी साडेबारा लाख रुपये खर्चून स्वतःचे गुऱ्हाळ बांधले. आपल्या नऊ एकरावर को-92005 या ऊसजातीची लागवड ते करतात. या उसावर साधारणपणे 50 दिवस गुऱ्हाळ चालते. त्यानंतर भाडेतत्त्वावर हा व्यवसाय केला जातो. सुमारे 110 ते 120 दिवस हा व्यवसाय चालतो. सध्या चार आंदणास 5800 रुपये व 100 किलो गूळ इतके भाडे आहे.
मोदक, वडीला जास्त दर
एका काहिलीमध्ये दोन टन उसाच्या रसापासून 250 किलो गूळ तयार होतो. बाजारपेठेच्या मागणीनुसार मोदक, वड्या, पावशेर, एक किलो आणि पाच किलोच्या ढेपा तयार केल्या जातात. मोदकाला गुजरातमधून मागणी आहे. गुजरातमध्ये लग्न समारंभात निमंत्रकांचे स्वागत करण्यासाठी गुळाचा मोदक वापरला जातो. मोदकाला 60 रुपये किलो भाव मिळतो. साधारणपणे एका मोदकाचे वजन 80 ग्रॅम असते. 15 किलोचा एक बॉक्स याप्रमाणे तीन ते चार बॉक्स दररोज तयार केले जातात. वडीला यंदा किलोला 35 ते 40 रुपये दर मिळत आहे. एक किलोच्या गुळाच्या ढेपेलाही प्रतीनुसार 35 रुपये दर मिळत आहे. यंदा क्विंटलला 2800 ते 3200 रुपये दर मिळत आहे. मोदक, वडी व पावशेरच्या ढेपेचे दर नेहमी चढेच असतात.
तंत्रज्ञान संशोधन केंद्राचे...
कोल्हापूर येथील प्रादेशिक ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या गुऱ्हाळघराच्या धर्तीवरचे सुधारित पद्धतीचे गुऱ्हाळघर बांधण्याचा प्रयत्न महेश यांनी केला. पण ते सुधारित करताना पैशाचेही गणित जमले पाहिजे. यामुळे त्यांनी संशोधन केंद्राचे तंत्रज्ञान घेतले आणि आपल्या खिशाला झेपेल अशा पद्धतीनेच सुधारणा करत गुऱ्हाळघर बांधले. तरीही त्यांना साडेबारा लाख रुपयांचा खर्च आला.
सुधारित गुऱ्हाळघराचे फायदे
- चुलवाणात जळण घालणाऱ्या चुलव्यास आरामात बसून जळण घालता येते. पारंपरिक पद्धतीत चुलव्याची होणारी गैरसोय या नव्या पद्धतीत कमी होते. तसेच या नव्या पद्धतीत जळणाचा खर्चही कमी होतो.
- नैसर्गिक वाऱ्याचा फायदा घेऊन ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा होत असल्याने वारंवार राख बाहेर काढण्याचा त्रास कमी होतो. पारंपरिक गुऱ्हाळात दररोज राख बाहेर काढावी लागते. या नव्या पद्धतीत आठ ते दहा दिवसांतून एकदाच राख बाहेर काढली जाते.
- पारंपरिक काहिलीपेक्षा आधुनिक गुऱ्हाळातील काहिलीचा आकार हा मोठा आहे. साडेदहा x साडेअकरा ---- या आकाराची काहील वापरण्यात येते. आकार मोठा असल्याने राहाट कमी मारावा लागतो.
- पारंपरिक गुऱ्हाळात काहील ओतण्यास तीन ते साडेतीन तास लागतात. मात्र आता या पद्धतीत केवळ दोन ते पावणे दोन तासातच काहील ओतण्यासाठी तयार होते.
गुऱ्हाळ घराचा दिवसाचा खर्च ः (अंदाजे)
- दिवसाचा 22 कामगारांचा खर्च - 4000 रुपये
-भेंडी, चुना, फॉस्फोरिक ऍसिड, हायड्रॉस पावडर आदी
रसायनांचा दिवसाचा खर्च - 300 रुपये
-उसाच्या वाहतुकीचा खर्च - 500 रुपये
-वीज बिल (डिझेल) चा खर्च - 400 रुपये
-साधारणपणे दिवसाचा एकूण खर्च 5200 रुपये होतो. सध्या 5800 रुपये भाडे आहे. भाडेवजा जाता 600 रुपये उरतात. त्यामुळे भाडेतत्त्वावरही गुऱ्हाळ चालविण्याचा व्यवसाय करणेही फायदेशीर आहे. पण हा व्यवसाय फक्त 120 दिवसांचा आहे हेही विचारात घ्यायला हवे, असे महेश यांनी सांगितले.
साखर कारखान्यापेक्षा अधिक फायदा
एका काहिलीत साधारणपणे दोन टन उसाच्या रसापासून 250 किलो गूळ उत्पादन होते. दोन टन उसास साखर कारखान्याकडून 2050 रुपये प्रति क्विंटल दराप्रमाणे 4100 रुपये होतात. 250 किलो गूळनिर्मितीतील कामगारांसाठीच्या गुळाचा वाटा 25 किलोचा सोडला तर 225 किलो गूळ मिळतो. तीस रुपये किलो दराप्रमाणे 6750 रुपये मिळतात. यात आडत, हमाली, तोलाईचे 300 रुपये, गूळ तयार करण्याचा 1450 रुपये खर्च वजा केल्यास पाच हजार रुपये मिळतात. त्यामुळे कारखान्यापेक्षा साधारणपणे टनाला 500 रुपये अधिक फायदा होतो.
आंतरपिकांतून घरगुती गरज भागते
घरगुती वापरासाठी लागणारे व आपल्या भागात येणारे पीक ते स्वतःच्याच शेतात पिकवतात. उसात त्यांनी गहू, बटाटा, भाजीपाला, सूर्यफूल, तीळ, भाजीपाला आदी आंतरपिके घेतली आहेत. गव्हाचे एका एकरात चार ते पाच क्विंटल उत्पादन घेतले आहे.
संपर्क ः महेश गजानन यादव,
गाडेगोंडवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर
9860663195
No comments:
Post a Comment