ऊस उत्पादनातील "शतक'
अनेक वर्षांच्या परिश्रमाने साधले ऊस उत्पादनातील "शतक'
ऊस पीक स्पर्धेत सातत्याने पटकावला क्रमांक; कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची आदर्श शेती
2010 - 11 मध्ये पूर्वहंगामी उसाचे सुमारे 106 टन उत्पादन घेऊन शिरोळच्या (जि. कोल्हापूर) श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पीक स्पर्धेत सतीश नामदेव ढवळे यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. गेली तीन-चार वर्षे ऊस शेतीच्या पीक स्पर्धेत ते सातत्याने क्रमांक पटकावत आहेत. ऊस शेतीत सातत्याने त्यांचे प्रयोग सुरू आहेत. यामुळेच गेल्या काही वर्षांत त्यांना एकरी 50 ते 60 टन मिळणारे उत्पादन आता शंभर टनांपर्यंत पोचले आहे.
राजेंद्र घोरपडे
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीकाठची जमीन सुपीक आहे. पावसाळ्यात पंचगंगेला दोनदा पूर येतो. यामुळे पूरक्षेत्रात मुख्यतः उसाचीच लागवड केली जाते. या उसाला उताराही चांगला मिळतो. मळीचा ऊस गोडीला चांगला म्हणून त्याची ख्याती आहे. जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात रुकडी येथील ढवळे कुटुंबीयांची एकूण 16 एकर शेती आहे. त्यामधील नामदेव ढवळे आपल्या सतीश व संजय या मुलांसमवेत शेतीची जबाबदारी सांभाळतात. सुरवातीच्या काळात उसाचे एकरी 50 ते 60 टन उत्पादन त्यांना मिळत होते. शेती भरपूर असल्याने त्यांनी नदीच्या पूरक्षेत्रात येणारी जमीन ऊस शेतीतील प्रयोगासाठी निवडली. त्यामध्ये त्यांचे विविध प्रयोग सुरू असतात. या प्रयोगांतूनच त्यांनी गेल्या काही वर्षांत शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या पीक स्पर्धेत विविध पारितोषिके पटकावली आहेत. सतीश यांच्याप्रमाणेच भाऊ संजय यांनीही 2009-10 च्या खोडवा पीक स्पर्धेत फुले - 265 जातीचे एकरी 70.233 टन उत्पादन घेऊन क्रमांक पटकावला आहे. गेल्या 20-22 वर्षांच्या मेहनतीनंतर आता एकरी शंभर टन उत्पादनाच्या पल्ल्यापर्यंत सतीश पोचले आहेत. वडील आणि भावाच्या सहकार्यामुळेच ही प्रगती झाल्याचे ते म्हणतात. त्याचबरोबर श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी एम. आर. कोरिया, ऊस विकास अधिकारी डी. बी. जाधव, अमर चौगुले, कृष्णात पाटील यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन त्यांना लाभले. गेल्या वर्षीच्या पीक स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळालेल्या उसाचा खोडवा त्यांच्या शेतात उभा आहे. उसाची संख्या 38 ते 40 हजारांपर्यंत आहे. यंदा एकरी 70 ते 75 टनांपर्यंत उत्पादन मिळेल असा सतीश यांचा अंदाज आहे.
त्यांच्या लागवड व्यवस्थापनाचे नियोजन असे -
...अशी केली पूर्वमशागत
उसाचा खोडवा गेल्यानंतर शिल्लक पाला जाळला नाही, तर रोटर मारून त्याची कुट्टी केली. दोन वेळा खोल नांगरट केली. दोन वेळा तव्याचा कुळव व दोन वेळा कुरी मारली. 20 एप्रिल रोजी सरी सोडून ताग पेरला. जमीन तांबडी असून पूर क्षेत्रात आहे, त्यामुळे पूर येऊन गेल्यानंतर लावण केली जाते. 24 ऑगस्टला आडसाली ऊस लावताना साडेचार फुटांवर सरी सोडली. दोन डोळ्यांचे टिपरे वापरले. सुमारे 4500 बेणे लावणीसाठी लागले. 500 बेणे रोपे तयार करण्यासाठी वापरले. बऱ्याचदा शेतामध्ये अनेक ठिकाणी उसाची उगवण योग्यप्रकारे होत नाही. गवताळ वाढ होते किंवा काही ठिकाणी उगवणच होत नाही. अशा ठिकाणी डाली भरून घेणे गरजेचे असते. यासाठी ही रोपे तयार केली जातात. अंदाजे 300 रोपे वापरली जातात. 500 मध्ये जवळपास 100 रोपे खराब होतात.
मशागतीचे व्यवस्थापन
लावणीनंतर 14 व्या दिवशी लावण किती झाली याची पाहणी करून साधारणपणे 75 ते 80 टक्के लावण योग्य प्रकारे झाल्याचे आढळले. या वेळी एक पोते युरिया दिला. 25 व्या दिवशी उगवण न झालेल्या ठिकाणी डाली भरली. त्यानंतर 45 व्या दिवशी गवताळ वाढ झालेल्या ठिकाणी पुन्हा डाली भरली.
पिकाच्या वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही वापर केला. 19ः19ः19 सारख्या विद्राव्य खताचा वापर केला. पुणे - मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या जिवाणूखताचा वापर केला.
पाणी व्यवस्थापन
पावसाळ्यात पाणी देण्याची गरज भासत नाही. थंडीच्या दिवसांत 15 दिवसांच्या अंतराने एकसरी आड पाणी दिले जाते. थंडीमध्ये जास्त पाणी दिल्यास वाढ खुंटण्याची शक्यता असते. जवळपास पंधरा फेब्रुवारीपर्यंत थंडी असते. त्यानंतर 15 दिवसांनंतर कमीत कमी पण वेळेवर पाणी दिले. साधारणपणे 15 ते 17 पाण्याच्या पाळ्या होतात. जूननंतर पाणी देणे बंदच करतो. त्यानंतर तोडणीपर्यंत पाण्याची गरज भासत नाही. 20 नोव्हेंबरला तोडणी झाली. तोडणीवेळी एका उसाचे सरासरी वजन तीन किलो होते.
उत्पादनवाढीला हे घटक पूरक ठरले
पाला न जाळणे, रोटरने पाला कुट्टी करून जमिनीत गाडल्याने पिकास खत होते
तागाचे पीक घेतल्याने हिरवळीचे खत पिकास मिळते
रासायनिक खत आणि जिवाणू खतांचा योग्य समतोल साधल्यानेही पिकाची वाढ जोमदार होते
पाणी कमीत कमी (अर्थात गरजेनुसार) पण वेळेवर दिल्यास पिकाची वाढ उत्तम होते
जमिनीची एक ते दीड फुटापर्यंत खोल नांगरट केल्याचाही पिकास फायदा होतो.
एकरी खर्चाचा तपशील (रुपये)
दोन भांगलण्या..... 2000
ताग मोडणे (दोन वेळा).... 1000
रासायनिक खत मजुरी..... 1200
पाणी देण्याची मजुरी..... 1500
डाली सांधणे (दोन वेळा).... 400
लावणीसाठीचा खर्च.... 2000
फवारणीचा खर्च....... 6505
खताचा खर्च...... 9050
पाणी पट्टी.... 5000
उन्हाळी औत...... 9000
भरणी..... 2000
बियाणे..... 3500
एकूण खर्च 43,155 रुपये
मिळालेले उत्पादन ः एकरी - 106.158 मे. टन
मिळालेला भाव ः 2300 रुपये प्रति क्विंटल
एकूण उत्पन्न ः दोन लाख 44 हजार 163 रुपये
खर्च वजा जाता मिळालेला निव्वळ नफा ः सुमारे दोन लाख रु.
क्रमांकाने मिळवले यश
(श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या पीक स्पर्धेत ढवळे यांचे यश)
2007-08 - पूर्व हंगामी लागवड ऊस पीक स्पर्धेत को - 86032 जातीचे एकरी 95.981 मे. टन उत्पादन - प्रथम क्रमांक
2008-09 - उसाच्या खोडवा स्पर्धेत को - 86032 या जातीचे एकरी 64.160 मे. टन उत्पादन - प्रथम क्रमांक
2010-11 - पूर्व हंगामी लागवड ऊस पीक स्पर्धेत फुले 265 या जातीचे 106.158 मे. टन उत्पादन - तृतीय क्रमांक
फिनिक्स भरारी
2005 मध्ये झालेल्या मुसळधार पावसात सोयाबीनचे पीक गेले. यामुळे जवळपास 10 ते 15 हजार रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीने सतीश निराश झाले; पण मनाचा धीर सोडला नाही. खंबीर मनाने त्याच शेतात त्यांनी ओलीवरच मिरचीची लागवड तीन हजार रुपयांचे तरू आणून केली. यात त्यांना 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. अति पावसामुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले तरी त्याच शेतात मिरचीची लागवड करून झालेले नुकसान भरून काढले. सतीश म्हणाले, की शेतकऱ्यांनी नुकसानीच्या काळात मनाचा समतोल ढळू न देता खंबीरपणे योग्य वेळ साधणे गरजेचे आहे. योग्य वेळी योग्य पिकाची निवड करून वेळ साधल्यास झालेले नुकसानही भरून काढता येते.
सतीश नामदेव ढवळे - 9657113012
रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment