कोल्हापुर जिल्ह्यातील येळवडीतील हरिजनवाडीत यशस्वी प्रयत्न
गावात विकासकामे करायची असतील तर गावातील सक्षम राजकीय नेतृत्व गरजेचे आहे. अनेक गावांमध्ये केवळ राजकीय नेतृत्व चांगले नसल्याने विकासकामे खुंटलेली दिसतात. लहान लहान गावे, वाड्या वस्त्यात तर ही समस्या अधिक प्रमाणात आढळते. कोल्हापूर जिल्ह्यातील येळवडी येथील हरिजनवाडी मात्र याला अपवाद ठरलेय. स्वत:च्या गरजा स्वत:च ओळखून ग्रामस्थांनी कृषी विभागाच्या सहकार्याने पाईपलाईन करुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. नैसर्गिक जलस्त्रोत जपत सायफन पद्धतीने पाणी गावात आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविलाच. पण दुभत्या जनावरांचीही परवड पाण्यासाठीची परवड थांबविली...
राजेंद्र घोरपडे
पश्चिम घाटाच्या डोंगरकपारीतील पावसाळ्यात मुबलक पाऊस पडूनही उन्हाळ्यात पाण्याची टंचाईही भासतेच. त्यातच येथील लोकवस्तीस ग्रामपंचायत नसल्याने येथे शासनाच्या योजनांही राबविण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यामुळे या वाड्यावस्त्या विकासापासून नेहमीच वंचीत राहतात. याचा विचार करून कोल्हापूर जिल्हा कृषी विभागाने या वाडी वस्तींच्या विकासासाठी विशेष योजना आखली आहे. त्या अंतर्गत तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्यानुसार लोकसभागातून तेथे योजना राबविण्यात येतात.
येळवडी हे गाव मरळे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये येते. यामुळे या गावच्या वाड्यावस्त्यांच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी थेट निधी उपलब्ध होत नव्हता. दरवर्षी मार्चनंतर गावच्या वाड्या वस्त्यात पाणी टंचाई भासतेच. या गावची 200 लोकवस्ती असणाऱ्या हरिजनवाडीस पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. पिण्याला पाणी नाही, तेथे जनावरांना पाणी कुठून आणणार? यामुळे वाडीचा विकासही रखडला होता. यावर जिल्हा कृषी विभागाच्या एकात्मिक पाणलोट विकास योजनेअंतर्गत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सायफनने हरिजनवाडीस पाणी पुरवठा करून येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी विचार झाला. याकामी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, कृषी पर्यवेक्षक एस. व्ही. सानप, कृषी सहाय्यक एस. एस. गावडे, तालुका कृषी अधिकारी एच. वाय. इंगवले, मंडल कृषी अधिकारी एस. एम. नांगरे आदींनी यांनी याकामी विशेष परिश्रम घेतले.
आजारपणाच्या समस्येतून मिळाला उपाय
पाण्यासाठी भटकंती ही या हरिजनवाडीस नित्याचीच होती. वाडीस कुपनलिका आहे. पण लोकवस्तीचा विचार करता कुपनलिकेवर पाण्यासाठी गर्दी होत असे. पाणी ओढून महिलांना अनेक आजारही जडले आहेत. मार्च-मे दरम्यान कुपनलिकेचे पाणी कमी होत असे. यामुळे इतर स्त्रोत्रांचा शोध घेण्याची गरज भासत असे. तीन चार किलोमिटरवरून पाणी महिलांना डोक्यावरून आणावे लागत होते. पाणी कमी झाल्यानंतर पाण्याचे प्रदुषणही वाढते. कावीळ, साथीचे आजारांनाही वाडीस धोका कायम होता. याचा विचार करून पाणी समस्येवर हरिजनवाडीने यावर मात करण्याचा विचार केला.
शासनाच्या कामात ग्रामस्थांचे श्रमदान
हरिजनवाडीचे सामाजिक कार्यकर्ते दिनकर लहु कांबळे यांनी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. सायफनने वाडीत पाणी आणण्यासाठी नैसर्गिक जलस्त्रोतांचा शोध घेतला. उन्हाळ्यातही जीवंत राहणारे जलस्त्रोत शोधून तेथून थेट पाईपलाईनने वाडीत पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पाणलोट विकास समिती मरळे अंतर्गत या योजनेसाठी एक लाख 97 हजार रुपयांना निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. साधारणपणे 6500 फुट पाईपलाईन टाकून वाडीमध्ये पाणी आणण्यात आले. यासाठी वाडीतील ग्रामस्थांनी खुदाईकामात श्रमदान केले.
स्वखर्चातून पाईपलाईन
कृषी विभागाच्या सहकार्याने डोंगरातील नैसर्गिक जलस्त्रोतातून सायफनने वाडीत पाणी आणले, पण यंदाच्या कडक उन्हामुळे एप्रिलमध्ये हा नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोताचे पाणी कमी झाले. पुढील दीड महिन्याच्या काळात पाणी टंचाईची समस्या भेडसावू नये यासाठी हरिजनवाडीने स्वखर्चातून 200 फुट दिड इंची पाईपलाईन टाकून पूर्वीच्या सायफनच्या कुंडात दुसऱ्या ठिकाणच्या जलस्त्रोतातून पाणी सोडले व समस्येवर मात केली. यंदाच्या कडक उन्हातही मुबलक पाणी वाडीस उपलब्ध आहे. मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने वाडीमध्ये समाधान आहे. तसेच दुभत्या जनावरांनाही पाणी उपलब्ध झाल्याने वाडीची पाण्यासाठी होणारी परवड आता थांबली आहे.
वनविभागाच्या रोपवाटीकेला आधार
यंदा उन्हाचा तडाखा अधिक असल्याने नेहमीचे जलस्त्रोत आटले आहेत. याचा फटका पेंडाखळे वनविभागाच्या रोपवाटीकेसही बसला आहे. मार्चनंतर ही रोपवाटीका वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला. याचा विचार करून वाडीने या रोपवाटीकेस पाणी उपलब्ध करून दिले आहे. या रोपवाटीकेत मोरआवळा, जांभूळ, नरक्या, मोरवेल, सुरू, निलगिरी, सुबाभूळ, शिसव, बांबू आदी जवळपास एक हजार रोपे आहेत. या रोपांना वाडीने पाणी पुरवठा करून ही रोपे जगविली आहेत. वाडीने पाणी पुरवठा केला नसता तर ही रोपे तशीच वाळून गेली असती.
यंदा सर्वत्र पाणी टंचाई जाणवत असतानाही वाडीस पाणी उपलब्ध झाल्याने समाधान वाटत आहे. याच पाण्यावर पुढील काळात वाडीची पंचवीस हेक्टर जमीन बागायती करण्याचाही विचार सुरू आहे. आता पावसाने ओढ दिली तरी भातशेतीलाही पाणी उपलब्ध होणार असल्याने पिके वाळून जाण्याचा धोका आता टळला आहे.
- दिनकर लहू कांबळे, हरिजनवाडी, येळवडी
वाडीची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी 10-20 लाखाच्या पाण्याच्या योजनेची गरज होती. पण वाडी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये येत असल्याने इतके अनुदान उपलब्ध होत नाही. लोकवस्तीच्या प्रमाणात निधी खर्च करावा लागतो. ग्रामपंचायतीमध्ये इतर गावांच्याही समस्या असतात. अशा वस्तीसाठी कमी खर्चात सायफनने पाणी पुरवठा करणेच अधिक हितावह होते. यासाठी वाडीने एकीने श्रमदान केल्याने त्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
- एस. व्ही. सानप, कृषी पर्यवेक्षक
No comments:
Post a Comment