शेतीत हवी फक्त जिद्द, मग सर्व काही होते साध्य
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने पीकविविधतेतून केले प्रयोग
शेती थोडी काय नी अधिक काय? तुम्ही आवडीने त्यात समरस होऊन काम कराल तर ती तुम्हाला फायदा दिल्याशिवाय राहणार नाही? कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील विश्वनाथ सावर्डेकर यांनी केळी, हळद, गहू अशी विविध पिकांची विविधता जपत आपली शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. नोकरीतील निवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ शेतीत झोकून दिले आहे.
राजेंद्र घोरपडे
शेतीची आवड असणारी व्यक्ती अगदी प्रतिकूल परिस्थितीतही शेतीत प्रगती करतेच. अगदी माळरान जरी असले तरी ते बागायती करून त्यातून भरघोस उत्पादन घेण्याचे सामर्थ्य दाखवणे त्यातून शक्य होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील विश्वनाथ धोंडिराम सावर्डेकर हे यापैकीच आहेत. सन 2003 मध्ये नोकरीतून निवृत्ती घेतल्यानंतर ते शेतीकडे वळले. स्वतः शेतात राबून सात एकराच्या माळरानावर केळी, हळद, गहू, ऊस आदी नगदी पिके घेऊन इतरांसमोर व्यावसायिक वा नगदी शेतीचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.
विश्वनाथ हे पेठवडगाव येथे राहण्यास आहेत. मात्र त्यांची वडिलोपार्जित सात एकर शेती पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत अंबप फाटा येथे आहे. वडील धोंडिराम हे शेती करायचे तेव्हा शेती ही कोरडवाहू होती. भुईमूग, ज्वारी, सोयाबीन आदी पिके घेतली जात. माळरान असल्याने पाण्याची सोय नव्हती. वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्यामध्ये हिशेबनीस म्हणून विश्वनाथ यांनी 1969 ते 2003 या कालावधीत नोकरी केली. त्या काळात ते शेतीकडेही लक्ष देत. शेतीत प्रगती करायची ही त्यांची मनोमन इच्छा होतीच. यातूनच त्यांनी सन 2000 मध्ये विहीर खोदली. वडिलोपार्जित सात एकर शेती आता त्यांनी बागायती केली आहे.
गाळमातीतून सुधारणा
विश्वनाथ अविवाहित आहेत. त्यांचा लहान भाऊ दिलीप हा नोकरी करतो. त्यामुळे शेतीकडे पूर्णवेळ लक्ष देणे त्यांना शक्य होत नाही. यामुळे विश्वनाथच सर्व शेती पाहतात. निवृत्तीनंतर त्यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग सुरू केले. पेठवडगाव येथे पुरातन तळे आहे. जवळपास 70 वर्षांनंतर हे तळे 2003 मध्ये आटले. या वेळी या तळ्यातील गाळ काढण्यात आला. ही गाळमाती विश्वनाथ यांनी विकत घेतली. जवळपास एक हजार ट्रॉली काळी गाळमाती त्यांनी शेतात टाकली. दोन लाख रुपये यासाठी खर्च केले. निवृत्तीनंतर मिळालेल्या फंडाच्या पैशातून त्यांनी ही सुधारणा केली.
केळी लागवडीचा विचार
बारमाही पाण्याची सुविधा असल्याने वेगवेगळी नगदी पिके घेण्याकडे विश्वनाथ यांचा कल वाढला. त्याप्रमाणे उतिसंवर्धित रोपे लावून केळी लागवड सुरू केली. सन 2004 पासून अर्धा ते एक एकरावर केळीची लागवड विश्वनाथ करत आहेत.
पूर्वमशागत आणि लावण
दोन उभी- आडवी नांगरट करून पाच ते सात ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळले जाते.
सहा x सहा फुटांवर लागवड करण्यात येते. दीड महिन्यानंतर हिरवळीच्या खतासाठी ताग लावला जातो. सुमारे 50 दिवसांनंतर झाडाच्या बुंध्यात ताग मुजविण्यात येतो.
पाण्याचे व्यवस्थापन
ठिबक सिंचन केल्यामुळे पाण्याची बचत होते. वेळेवर पाणी देता येते. योग्य वेळी पाणी देता असल्याने पिकांची वाढ चांगली होते. कामाचा ताण पडत नाही. पावसाळ्यात पाण्याची फारशी गरज भासत नाही. त्या वेळी मोजकेच पाणी द्यावे लागते. पाण्याची गरज पाहून साधारणपणे 15 मिनिटे ठिबक सुरू ठेवले जाते. ऑक्टोबरनंतर दररोज ठिबक सिंचनाने दीड तास पाणी द्यावे लागते. जानेवारी ते मे या कालावधीत दररोज तीन ते चार तास पाणी द्यावे लागते.
खताचे व्यवस्थापन
बेसल डोस म्हणून निंबोळी पेंड, डीएपी, मुख्य अन्नद्रव्यांबरोबर दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली जातात.
खतांमध्ये युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश, मॅग्नेशिअम सल्फेट, डीएपी, पोटॅश आदींचा वापर केला जातो.
केळी लागवडीचा खर्च (अर्धा एकरासाठी रुपयांत)
पाच ट्रॉली शेणखत - 7500
पूर्वमशागत - 4000
उतिसंवर्धित रोपांचा खर्च - 8250
खताचा एकूण खर्च - 10,000
आंतरमशागत - 6000
पाण्यासाठीचा खर्च - 2000
अन्य खर्च- 2500
काढणी - 2000 रुपये
एकूण - 42,250 रुपये
केळीतून मिळणारे उत्पन्न ः
दरवर्षी एकरी सुमारे 30 टन उत्पादन मिळते. यंदा अर्ध्या एकरात साधारणपणे 18 टन उत्पादन मिळण्याची आशा विश्वनाथ यांना वाटत आहे. स्थानिक बाजारपेठेतच ते केळींची विक्री करतात. सर्वसाधारण सहा हजार रुपये प्रति टन दर मिळतो. यातून एक लाख आठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता 65 हजार रुपये निव्वळ नफा मिळतो.
घडांचे संरक्षण
उन्हाळ्यात घड येत असल्याने चांगली प्रत ठेवण्यासाठी त्यांचे संरक्षण करणे गरजेचे असते. दोन ते तीन महिने केळीचा घड केळीच्या पानाने किंवा पोत्याने झाकण्यात येतो. यामुळे घडाचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण होऊन गुणवत्ताही टिकून राहते. मेच्या शेवटच्या आठवड्यात तोडणी येत असल्याने संरक्षणाची गरज भासतेच.
गव्हाचीही चांगली शेती
गेले सहा वर्षे विश्वनाथ ठिबक सिंचनावर गव्हाचे उत्पादन घेत आहेत. एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन त्यांना मिळते. यंदा त्यांनी पंधरा गुंठ्यावर गहू घेतला आहे. घरगुती वापरासाठीच त्याचा वापर होतो.
हळदीचेही नियोजन
गेली दोन वर्षे विश्वनाथ हळदीची लागवड करत आहेत. हळदीच्या सेलम वाणाचे एकरी 30 क्विंटल उत्पादन ते घेतात. हळदीसाठी त्यांना एकरी 55 ते 60 हजार रुपये खर्च येतो. गेल्या वर्षी त्यांनी 20 गुंठ्यांत 15 क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले. क्विंटलला त्यांना 14 हजार रुपये दर मिळाला. उत्पादन खर्च वजा जाता दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. तसेच हळदीचे बेणेही त्यांनी यातूनच राखून ठेवले. यंदा 30 गुंठ्यावर हळदीची लागवड केली आहे. साधारण क्विंटलला पाच हजार दर मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.
हवे फक्त एक एकर शेत
विश्वनाथ म्हणतात शेतीवर तुम्ही नियमित हजर राहाल, शेतीची कामे वेळेवर कराल तर शेतीत फायदाच फायदा आहे. फक्त एक एकर बागायती शेत, दोन जनावरे आणि एक लाखाची भांडवल गुंतवणूक असेल तर एका कुटुंबाचा उदरनिर्वाह यावर सहज चालवणे शक्य आहे. नोकरीची गरज भासणार नाही. फक्त कष्ट करण्याची, शेतात राबण्याची तयारी हवी. जिद्दीने शेती करण्याची मानसिकता हवी.
विश्वनाथ धोंडिराम सावर्डेकर, 9923116680 पेठवडगाव, जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment