शासकीय योजनांची वाट न पाहता कोपार्डे (जि. कोल्हापूर) येथील अशोक आनंदराव पाटील यांनी धाडसाने स्वीटकॉर्न (मधुमका) प्रक्रिया उद्योग उभारला. मका उत्पादकांसोबत करार पद्धतीने उत्पादन घेतले. स्वतःसोबत परिसरातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत दिलाच शिवाय बचत गटांना रोजगार उपलब्ध केला.
राजेंद्र घोरपडे
कोपार्डे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी अशोक आनंदराव पाटील समाजशास्त्राचे पदवीधर. कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीतून ते कुस्ती खेळायचे. या निमित्ताने पुण्याला दौरे व्हायचे. त्यातूनच पुण्यातील नाशिक रोडवरील फळप्रक्रिया, शीतगृहे, स्वीटकॉर्नवरील प्रक्रिया उद्योग पाहिला. असा उद्योग आपल्या गावाकडे फायदेशीर करायचा असे ठरवून ते अभ्यासाला लागले. अखिलेश मिश्रा 12-14 वर्षे याच उद्योगात कार्यरत असल्याने त्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा फायदा घेतला.
"महालक्ष्मी ज्योर्तिलिंग'ची स्थापना
गावी सहकारी प्रक्रिया उद्योग उभारण्याचा अशोक यांचा विचार होता. मात्र शेतकऱ्यांना त्याबाबत फारशी माहिती नसल्याने यश आले नाही. अखेर पुतण्या युवराज गोरख पाटील याला सोबत घेऊन "महालक्ष्मी ज्योर्तिलिंग ऍग्रो इंडिया' ही खासगी कंपनी सुरू केली. अशोक यांच्या पत्नी सौ. कमल याही त्यात भागीदार आहेत.
शीतगृहाची उभारणी
2009 मध्ये शीतगृह उभारले. अर्धा टन क्षमतेची ब्लास्ट रूम आणि 25 टन साठवणूक क्षमतेचे शीतगृह उभारण्यासाठी 30 लाख रुपये खर्च आला. याच्यासह मका प्रक्रियेसाठी बॉयलर, वॉटर सॉफ्टनर तसेच सर्व साधने असा एकूण एक कोटीपर्यंत खर्च आला. एवढी मोठी गुंतवणूक करण्यासाठी अनेक बॅंकांचे खेटे मारावे लागले. मात्र प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज देण्यास कोणती बॅंक तयार झाली नाही. अखेर शेतजमिनीवर फेडरल बॅंकेकडून 60 लाख रुपयांचे कर्ज प्रकरण केले.
स्वीटकॉर्न लागवडीचे आव्हान
सहकारी तत्त्वावर उद्योग उभारणीत आलेले अपयश पाहता स्वीटकॉर्न लागवडीचेही मोठे आव्हान अशोक यांच्या समोर होते. करवीर तालुका कृषी अधिकारी डी. बी. पाटील, कृषी विस्तार अधिकारी अमृत मडके यांनी शेतकऱ्यांशी करार करून स्वीटकॉर्नचे उत्पादन घेण्यासाठी अशोक यांना मदत केली. शेतकरी उन्हाळ्यात वैरणीसाठी उसात मका घेतात. मात्र स्वीटकॉर्नचे बियाणे प्रति किलो 2,000 रुपये किमतीचे आहे. एवढे महागडे बियाणे खरेदी करण्यास शेतकरी धजावत नव्हते. मात्र शेतकऱ्यांना करार शेतीचा फायदा समजून देण्यात कृषी विभागाचे सहकार्य झाले. त्यातूनच खुपिरे, शिंदेवाडी, साबळेवाडी, कोपार्डे, सांगरुळ, कुडित्रे, बाचणी, हसूर, पडळ, यवलूज, सातार्डे असे 20 ते 25 किलोमीटर गावपरिसरातील शंभरावर शेतकरी करारबद्ध झाले. शेतकऱ्यांना बियाणे अशोक पुरवितात. त्याची रक्कम स्वीटकॉर्न उत्पादनातून वळती करून घेण्यात येते.
महिला बचत गटास रोजगार
स्वीटकॉर्नचे दाणे नाजूक असल्याने यंत्राच्या साहाय्याने दाणे काढताना नुकसान होते. त्यामुळे 18 ते 20 लाख रुपये खर्चून मका सोलणी यंत्र बसविले. पण फारसा उपयोग झाला नाही. अखेर हाताने दाणे सोलण्यावरच भर दिला. यातून सांगरुळ, चिंचवडे, कोपार्डे, कुडित्रे या गावांतील महिला बचत गटांना अशोक यांनी रोजगार मिळवून दिला. एक महिला दिवसाला 100 किलो दाणे सोलते. किलोला दोन रुपये दराने एका महिलेला रोज दोनशे रुपये मिळतात. दाणे स्वतंत्र करून घेतल्यानंतर बॉयलरमध्ये त्याची प्रक्रिया केली जाते. शीतगृहात दाणे वर्षभर उत्तम प्रकारे राहू शकतात. दररोज एक टनापर्यंत स्वीटकॉर्न दाण्यांवर प्रक्रिया केली जाते.
एक टन दाणे उत्पादन- दररोजचा जमा-खर्च (रु.)
महिला कामगार पगार- 2000
प्रक्रिया कामगार पगार - 2000
वीज खर्च (दिवसाचा) - 1000 (महिन्याला 25 हजार रुपयांचे बिल)
पॅकिंग- - 2000
पाच हजार लिटर पाण्याचा वापर - 100 रुपये (वर्षाला 20 हजार रुपये खर्च)
लाकूड, जळण आदी - 100
अडीच ते तीन टन कणसे - 12,500 रुपये (टनास पाच हजार रुपये हमीभावाप्रमाणे)
इतर खर्च - 2300 रुपये
एक टन दाणे उत्पादनाचा दररोजचा एकूण खर्च - 20 हजार रुपये
दररोज एक टन स्वीटकॉर्नचे उत्पादन. सध्या किलोला तीस रुपये दर. एक टन विक्रीतून तीस हजार रुपये मिळतात. खर्च वजा जाता दिवसाला दहा हजार रुपये उत्पन्न मिळते. वर्षाला सुमारे 200 टन उत्पादन.
मुंबई, नाशिकमध्ये विक्री
स्वीटकॉर्न दाण्यांच्या पॅकेटची खरेदी नाशिक येथील कॅपिटल फूड्स कडून महिन्याला चार ते पाच टन तर मुंबईतील सेटवाला फूड्सकडून (महिन्याला) 10 टन मालाची खरेदी केली जाते. मागणीप्रमाणे विक्री होते. तीस व एक किलोच्या पॅकमध्ये कंपन्या मालाची खरेदी करतात. आवश्यक पॅकिंगचे साहित्यही कंपन्या पुरवितात.
स्वतःच्या ब्रॅंडसाठी प्रयत्न
उत्पादित मालाची स्वतः विक्री करण्याचा परवाना अशोक यांना अद्याप मिळायचा आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून तो घ्यावा लागतो. त्यानंतर स्वतःचा ब्रॅंड त्यांना बाजारात विक्रीसाठी आणता येईल. स्थानिक बाजारपेठेत तसेच मुंबई, हैदराबाद, दिल्ली येथे विक्री शक्य होईल. शेतकऱ्याला उद्योग करण्यात येणाऱ्या अडचणी सरकारने विचारात घेऊन विक्रीचा परवानाही त्वरित दिल्यास अनेक शेतकरी त्याकडे वळतील, असे मत अशोक यांनी व्यक्त केले.
मका उत्पादकही फायद्यात
पाच हजार रुपये टन हमीभावाने अशोक शेतकऱ्यांकडून मक्याची कणसे विकत घेतात. ऑगस्टपासून शेतकऱ्यांशी करार करून त्यांना बियाणे वाटण्यात येते. यंदा बियाण्यासाठी 50 टक्के रक्कम आगाऊ वसूल केली जाणार आहे. पन्नास टक्के रक्कम कणसांची खरेदी केल्यानंतर त्यातून वजा करण्यात येईल. उसात स्वीटकॉर्न घेऊन अनेकांनी तीन महिन्यांत 50 ते 70 हजार रुपयांची कमाई केली आहे.
पाच एकरातील दीड एकर उसात यंदा स्वीटकॉर्नचे आंतरपीक घेतले. दीड टन उत्पादन मिळाले. पावणे दोन किलो बियाणे लागले. त्याचा खर्च 3600 रुपये झाला. कणसांच्या विक्रीतून 50 हजार रुपये उत्पन्न मिळाले. शिवाय उन्हाळ्यात 20 हजारांचा हिरवा सकस आहार उपलब्ध झाल्याने जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ झाली. तीन ते चार फॅटचे दूध देणाऱ्या जनावरांनी ऐन उन्हाळ्यात पाच फॅटपर्यंत दूध दिले.
- विजय पाटील, शेतकरी, खुपिरे
यंदा अडीच एकर उसात स्वीटकॉर्न घेतला. दहा टन उत्पादन मिळाले. अडीच फुटांची सरी असल्याने पिकाची वाढ योग्य झाली नाही. यामुळे उत्पादनात घट झाली. दोन किलो बियाणे लागले. खर्च वजा जाता 40 हजार रुपये मिळाले.
- कुमार कापडे, शेतकरी, सांगरुळ
सीताफळ पल्पचेही उत्पादन
स्वीटकॉर्नचे उत्पादन नोव्हेंबर-जून कालावधीत घेतले जाते. ऑगस्ट-ऑक्टोबर काळात सीताफळ पल्पचे उत्पादन अशोक घेतात. तीन महिन्यांत सुमारे दहा टन उत्पादन होऊन किलोला 110 रुपयांपर्यंत दर मिळतो.
अशोक आनंदराव पाटील, 7588261666
कोपार्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment