गांडूळ खत प्रकल्प एक जोड व्यवसाय
डोंगर उताराच्या मुरमाड जमिनीत ऊस शेतीतून चांगले उत्पन्न मिळविण्याचा उद्देश पाली ( ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) येथील अरविंद श्रीधर नानिवडेकर यांनी ठेवला आहे. यासाठी गेल्या सात-आठ वर्षात त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले आहेत. यातूनच त्यांनी कृषी विभागाच्या मदतीने गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. स्वतःच्या जमिनीचा पोत टिकवत गांडूळ खताची विक्री करून जोड व्यवसायाचा एक वेगळा आदर्श त्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
राजेंद्र घोरपडे
कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहुवाडी तालुक्यातील पश्चिम घाटाच्या रांगेत कासारी नदीकाठी पाली हे गाव वसले आहे. करंजफेन या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये या गावाचा समावेश होतो. या गावात अरविंद नानिवडेकर यांची वडीलोपार्जित 14 एकर शेती आहे. 1983 साली अरविंद एम. ए. झाले. उच्चशिक्षीत होऊनही त्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडीलोपार्जित शेतीचा व्यवसायच करण्याचा निर्णय घेतला. अरविंद यांचे वडील श्रीधर यांना जनावरे पाळण्याचा शौक होता. वडीलांच्या काळात गोठ्यात जवळपास 60 जनावरे असत. आजही अरविंद यांच्या गोठ्यात 10 संकरित गायी, दोन संकरित म्हैशी आहेत. येथील हवामान जनावरांच्या संगोपनासाठी पोषक आहे. तसेच येथे उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाईही भासत नाही. यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न पशुपालनाच्या व्यवसायातून मिळविणे सहज शक्य आहे.
डोंगर उतारावर ऊस शेती
अरविंद यांची शेती ही डोंगरमाथ्यावर आहे. बरेचसे शेत हे उतारावर असल्याने ते पडीकच ठेवणे भाग होते. पण अरविंद यांनी या पडीक जमिनीत ऊस शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. येथील बरेचसे शेतकरी डोंगर उतारावर शेती करताना डोझरच्या सहाय्याने जमिन समपातळीत करून घेतात. यासाठी लाखो रुपये खर्च करतात. कर्ज काढून इतका खर्च करणे अरविंद यांना मान्य नव्हते. त्यांनी डोंगर उतारातच ऊस शेतीचा निर्णय घेतला. दरवर्षी करण्यात येत असलेल्या नांगरटीमधून हळूहळू ही जमिन समपातळीत करण्याकडे त्यांचा कल आहे.
अरविंद यांचे उसाचे एकूण क्षेत्र 14 एकर आहे. यातील डोंगर उतारात दोन एकर क्षेत्र आहे. यातून एकरी 25 टन उसाचे उत्पादन ते घेतात. तर इतर क्षेत्रातून एकरी 40 टन उत्पादन त्यांना मिळते. खोडव्याचे उत्पादन 30 ते 35 टनापर्यंत मिळते.
गांडूळ खत निर्मितीकडे...
डोंगर उतारात नांगरट केल्यानंतर अरविंद यांच्या शेतात माती ऐवजी मुरुमच अधिक होता. या शेतात पिके कसे उगविणार आणि यातून उत्पन्न तरी किती मिळणार? या प्रश्न अरविंद यांना सतावत होता. यावर कृषी मदतनीस शिवाजी ढवळे आणि तालुका कृषी अधिकारी डी. डी. धुमाळ यांनी अरविंद यांना गांडूळ खताचा पर्याय सुचविला. 2005 मध्ये गांडूळ खत निर्मितीसाठी कृषी विभागामार्फत अनुदानही वाटप केले जात होते. गांडूळमुळे जमिनीची मशागतही होईल व सेंद्रीय खतामुळे जमिनीचा पोतही सुधारला जाईल. यासाठी अरविंद यांनी गांडूळ खत निर्मितीचा निर्णय घेतला.
शेड उभारणीसाठी शासनाचे अनुदान
अरविंद यांनी गांडूळ खताच्या निर्मितीसाठी शेडची उभारणी केली. या शेडमध्ये 20 फुट लांब, 3 फुट रुंद आणि अडीच फुट उंचीचे हौद बनविले. या हौदात गांडूळ खत निर्मितीसाठी त्यात सुरवातीला वाळलेला काडीकचरा त्यावर शेण, परत ओला काडीकचरा, त्यावर शेणकाला असे करत हौद संपूर्णपणे भरला. त्यात सतत ओलसरपणा राहील इतके पुरेसे पाणी टाकले. त्यात 25 किलो गांडुळ कल्चर टाकली. शेड उभारण्यासाठी आणि हौदांच्या निर्मितीसाठी अरविंद यांना 60 हजार रुपये खर्च आला. यात कृषी विभागाने शेड उभारणीसाठी 15 हजार रुपयांचे अनुदान दिले. तसेच दहा हजार रुपयांचे जयसिंगपूर येथील गांडूळ प्रकल्पातून गांडूळ कल्चरही उपलब्ध करून (गांडूळ बीज) दिले. चांगल्या प्रतिचे गांडूळ खत तयार होण्यासाठी साधारणपणे दोन महिन्यांचा कालावधी लागतो. दोन महिन्यानंतर हे खत काढून त्यामध्ये पुन्हा नव्याने खतासाठी शेण व कल्चर टाकण्यात येते. साधारणपणे एका हौदात दोन टन खत तयार होते. वर्षातून चार ते पाच टप्प्यात खत तयार केले जाते. खताच्या निर्मितीसाठी अर्धवट कुजलेलेच शेण ते वापरतात. ताजे शेण वापरल्यास उष्णतेमुळे गांडूळचे बीज मरून जाण्याचा किंवा गांडूळांची वाढ योग्य प्रकारे न होण्याचाही धोका असतो.
वीस टन खताचे उत्पादन
अरविंद दरवर्षी साधारणपणे 50 ते 60 टनापर्यंत खताचे उत्पादन घेतात. पण बायपास सर्जरीमुळे यंदा त्यांनी फक्त 20 टन खताचे उत्पादन घेतले आहे. खत उत्पादनातील 10 टन खत स्वतःच्या शेतीसाठी वापरतात तर अर्वरित खताची ते विक्री करतात. साधारणपणे साडेतीन रुपये किलो दराने खताची विक्री केली जाते. कोकणात शेणखताची टंचाई असल्याने फळबागांसाठी सेंद्रीय खताची टंचाई भासते. कोकणातील हे फळबागायतदार सेंद्रीय खत विकत घेऊन जातात.
कल्चरची निर्मिती
गांडुळ कल्चर निर्मितीसाठी तीन फुट रुंद दोन फुट उंच दहा फुट लांबीच्या खड्ड्यामध्ये करण्यात येते. पालापाचोळा, शेणखत टाकुन दोन महिन्यात गांडूळ कल्चर तयार केले जाते.
दुग्ध व्यवसायातून लाखाची कमाई
अरविंद यांनी गांडूळ खतासाठी जनावरांचे संगोपन केले आहे. 10 गायी, दोन म्हैशी यांच्या संगोपनातून दररोज 40 ते 50 लिटर दुध उत्पादन होते. तसेच गांडूळ खतासाठी आवश्यक असणाऱ्या शेणही मिळते. दररोज साधारणपणे 100 किलो शेण मिळते. अरविंद दररोज 35 लिटर गायीचे दुध व 6 लिटर म्हैशीचे दुध डेअरीला घालतात. यातून वर्षाला अडीच लाख रुपयांची कमाई होते. गांडूळ खत निर्मिती व जनावरांच्या संगोपणाचा खर्च वजा जाता यातून वर्षाला त्यांना दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.
चारा व्यवस्थापन
जनावरांना बारमाही चारा मिळावा यासाठी एक एकरावर बाजरी व एक एकरावर यशवंत गवताची लागवड अरविंद यांनी केली आहे. या व्यतिरिक्त वाळलेले गवत, उसाचा पाला यांचाही वापर ते चारा म्हणून करतात.
अरविंद श्रीधर नानिवडेकर, पाली, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर. संपर्क ः 02329 - 233818
No comments:
Post a Comment