Friday, March 6, 2020

साधनेचे स्थान कसे असावे ?



चिखल मळता मळता संत गोरा कुंभार नामस्मरणात रमून जायचे. काम करतानाही साधना करता येते याचे हे उत्तम उदाहरण आहे. मनाची तयारी ठेवली तर काहीच अशक्‍य नाही. मनाची स्थिरता हेच साधनेचे खरे आसन आहे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल - 8999732685




म्हणौनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें ।
राहील तेथ रचावें । आसन ऐसें ।। 181 ।। श्री ज्ञानेश्‍वरी अध्याय 6 वा
ओवीचा अर्थ - म्हणून तें स्थान, तसें आहे कीं, नाहीं, हें समजून घ्यावें, आपलें मन तेथें स्थिर राहातें कीं नाहीं, तें पाहावें; आणि राहात असेल, तर तेथें असें आसन लावावें.
मंदिर, मठ, शिवालय यांची उभारणीच मुळात शांततेत साधना करता यावी यासाठी केली गेली आहे. पुरातन मंदिरात याची अनुभुती निश्‍चित येते. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मंदिर, धार्मिक स्थळी गर्दी होते. यामुळे अशा पवित्र ठिकाणी साधनेचा विचारच डोकावत नाही. हळूहळू हा संस्कार लुप्त होताना पाहायला मिळत आहे. पण म्हणून साधना करायची नाही असे नाही. साधनेसाठी आसन, स्थान हे आवश्‍यक आहे. पण ते कसे असावे असा काही नियम नाही. मन जेथे स्थिर होते. मन जेथे स्थिर राहाते असे स्थळ, ठिकाण हे साधनेसाठी योग्य आहे. तेथे निश्‍चित आसन लावावे. कारण आध्यात्मिक प्रगतीसाठी मनाची स्थिरता, मनाची प्रसन्नता ही महत्त्वाची आहे. ती नसेल तर प्रगती होणार नाही. म्हणून उद्देश साध्य होण्यासाठी मुख्य गोष्ट विचारात घेणे गरजेचे आहे. मन केव्हाही, कोठेही स्थिर करता येऊ शकते. फक्त आपली तशी मानसिक तयारी हवी. चिखल मळता मळता संत गोरा कुंभार नामस्मरणात रमून जायचे. काम करतानाही साधना करता येते याचे हे उत्तम उदाहरण आहे. मनाची तयारी ठेवली तर काहीच अशक्‍य नाही. मनाची स्थिरता हेच साधनेचे खरे आसन आहे. ती असेल तर साधना कोठेही करता येऊ शकते.

No comments:

Post a Comment