Friday, March 27, 2020

तैसा हृद्‌यामध्ये मी रामु ।


सोऽहमच्या रांगेत उभे राहून दर्शन झाल्यानंतरच आपले खरे स्वरुप आपणास होईल. तेव्हाच आत्मदर्शन होईल. आपण आत्मज्ञानी होऊन जन्ममरणाच्या या फेऱ्यातून मुक्त होऊ. 

- राजेंद्र  कृष्णराव  घोरपडे,
मोबाईल 
8237857621 

तैसा हृद्‌यामध्ये मी रामु । असता सर्वसुखाचा आरामु ।
की भ्रांतासी कामु । विषयावरी ।। 60 ।। श्री ज्ञानेश्‍वरी अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - सर्व सुखाचा बगीचा असा जो मी राम, तो मी (सर्वांच्या) हृद्‌यांत असताना त्या मला न जाणून मूर्ख लोक सुखाकरितां विषयाचीच इच्छा करतात.

प्रत्येक मानवामध्ये हृद्‌य आहे. सर्वांचे हृद्‌य हे सारखेच आहे. त्याची रचना सारखी आहे. या हृद्‌ययाची धडधड सुरु आहे तोपर्यंत आपण हा देह जीवंत आहे असे आपण म्हणतो. आत्मा हृद्‌यातून निघून जातो तेव्हा त्या हृद्‌याची धडधड थांबते. श्‍वास सुद्धा थांबतो. म्हणजे आपण तो देह मृत झाला असे म्हणतो. या पंचमहाभुताच्या देहात आत्मा आहे तो पर्यंत आपण तो देह जीवंत समजतो. तो असतो तो पर्यंत सर्व शरीरातील क्रिया सुरु असतात. आत्मा देहातून गेल्यानंतर सर्व क्रिया थांबतात. हा आत्मा प्रत्येकांच्या हृद्‌यात आहे. तो आत्मा सर्वांच्याठायी सारखाच आहे. हे जाणण्यासाठी हा मानव जन्म आहे. कुठे शोधीशी रामेश्‍वर अन्‌ कुठे शोधीशी काशी, हृद्‌यातील भगवंत राहीला हृद्‌यातून उपाशी...हे मंगेश पाडगावकर व यशवंत देव लिखित हे गीत याचीच आठवण करून देते की देव शोधण्यासाठी काशी, रामेश्‍वरला जाण्याची गरज नाही. तो तुमच्या हृद्‌यातच आहे. आत्मा हाच भगवंत आहे. आत्मा हाच देव आहे. देव दगडात शोधण्यापेक्षा स्वतःच्या ठायी असणाऱ्या या देवाची ओळख आपण करून घ्यायला हवी. ही ओळख जो पर्यंत आपणास होत नाही तोपर्यंत रामेश्‍वरला जा किंवा काशीला जा सर्व तिर्थक्षेत्राची वारी करा ही सर्व व्यर्थ आहे. सर्व तिर्थक्षेत्रांच्याठायी असणारा भगवंत हा स्वतःच्या देहातच आहे. याची प्रथम आपण ओळख करुन घ्यायची आहे. तेव्हाच खरे देवदर्शन घडेल. अन्यथा सर्व भटकंती ही व्यर्थ आहे. या देवाचे दर्शन घडण्यासाठी सो ऽ हम्‌च्या रांगेत उभे राहण्याची गरज आहे. ही रांग आपण धरण्यास चुकलो किंवा ही सोडली तर आत्मदर्शन होणार नाही. यासाठी सोऽहमच्या रांगेत उभे राहून दर्शन झाल्यानंतरच आपले खरे स्वरुप आपणास होईल. तेव्हाच आत्मदर्शन होईल. आपण आत्मज्ञानी होऊन जन्ममरणाच्या या फेऱ्यातून मुक्त होऊ. ही ओळख करुन घेण्यासाठीच हा जन्म आहे.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - 
मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment