Monday, March 30, 2020

हिताहित जाणावें । हिताचिलागी ।।

 नदी पार करायची आहे. समोर नाव आहे. नावेत बसून नदी पार करायची की पोहत जायचे हे आपणच ठरवायचे आहे. दोन्ही पैकी सोपे व सुरक्षित कोणते हे आपणच ठरवायचे आहे. नावेत सुरक्षित प्रवास आहे. पोहताना दम लागून बुडण्याची भिती आहे. यासाठी सुरक्षित मार्ग स्वीकारणे कधीही चांगले. 

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
मोबाईल 8237857621

कां जे मार्गामार्ग देखावे । साच लटके वोळखावे ।
हिताहित जाणावें । हिताचिलागी ।। 239 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 8 वा

ओवीचा अर्थ - कारण कीं, आपल्या हिताकरितां योग्य-अयोग्य मार्गा पाहावे, खरे-खोटे ओळखावे आणि आपले हित कशांत आहे व अनहित कशात आहे हे समजून घ्यावे.

स्वतःचे हित कशात आहे. विकास कशात आहे. हे स्वतःच ओळखायला हवे. अध्यात्मात सर्व क्रिया या स्वतःच करायच्या आहेत. फक्त त्या माझ्यामुळे झाल्या हा मीपणा तेथे ठेवायचा नाही. स्वावलंबनाच्या मार्गाचा अवलंब आपण करायचा आहे. अध्यात्मात सर्व गोष्टी ह्या स्वतः शोधायच्या आहेत. स्वतः त्याचा अभ्यास करायचा आहे. योग्य काय अयोग्य काय हे स्वतःच ओळखायचे आहे. त्यानुसार स्वतःच योग्य मार्गाची निवड करायची आहे. कशात हित आहे कशात अहित आहे. खरे काय आहे? खोटे काय आहे? हे सर्व स्वतःच जाणून घ्यायचे आहे आणि त्यानुसार आपण आपला मार्ग निवडायचा आहे. समोर एका पेल्यात अमृत ठेवले आहे आणि एकात मद्य आहे. पेला कोणता उचलायचा हे आपण ठरवायचे आहे. अमृत पिऊन अमर व्हायचे की मद्य पिऊन गुंगीत राहायचे हे आपणच ठरवायचे आहे. अमृत पिऊन अमर होता येते. अमृत प्याल तर अमर व्हाल. मद्य प्याल तर गुंगीत राहाल. विकास कशात आहे. हे आपण ओळखायचे आहे. त्यानुसार आपण आपली कृती करायची आहे. चुकीचा मार्ग स्वीकारल तर मार्ग खडतर होईल. योग्य मार्ग स्वीकाराल तर साध्य गाठणे सहज शक्‍य होईल. काय करायचे हे आपणच ठरवायचे आहे. नदी पार करायची आहे. समोर नाव आहे. नावेत बसून नदी पार करायची की पोहत जायचे हे आपणच ठरवायचे आहे. दोन्ही पैकी सोपे व सुरक्षित कोणते हे आपणच ठरवायचे आहे. नावेत सुरक्षित प्रवास आहे. पोहताना दम लागून बुडण्याची भिती आहे. यासाठी सुरक्षित मार्ग स्वीकारणे कधीही चांगले. अध्यात्मातही तसेच आहे. भक्तीचा मार्ग सोपा आहे. योगाचा मार्ग खडतर आहे. भक्तीचा मार्ग स्वीकारायचा की योगाचा हे आपणच ठरवायचे आहे. दोन्हीही मार्ग एकाच ठिकाणी जातात पण सोपा मार्ग निवडणे कधीही चांगले. अध्यात्मिक विकास कशात आहे? त्यासाठी कोणते मार्ग सोपे आहेत? आपणास कोणता आवडतो? कोणता सोपा वाटतो तो मार्ग आपण स्वीकारायचा आहे. येथे प्रवास हा आपणासच करायचा आहे. यासाठी मार्ग निवडताना योग्य तोच निवडावा.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - 
मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment